जीवन गाणे गातच रहावे.

Submitted by संगीता थूल. on 19 August, 2018 - 13:57

जीवन गाणे गातच रहावे
|
जीवन गाणे गातच रहावे.
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवन गाणे गातच रहावे.
सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला
हृदयी हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासामधूनी आकारा यावे
जीवन गाणे गातच रहावे
मातीमधूनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रितीला हितगूज सांगावे
जीवन गाणे गातच रहावे......
चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवूनी का बसली
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली
रुसली फुगली खुदकन हसली पापे किती घ्यावे.
जीवन गाणे गातच रहावे......

मनाला सकारात्मक उर्जा देणारे आपली माणसं या चित्रपटातील हे सुंदर जीवनगाणे संगीतकार राम लक्ष्मण यांच्या स्वरसाजात दमदारआवाजाचे गायक महेंद्र कपूरआणि उषा मंगेशकर यांच्या दमदार आवाजात, जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि बाल भूमिकेतील पल्लवी जोशी या गुणी अभिनेत्रीवर चित्रीत झालेले आहे. चित्रपटातील कथेच्या ओघानुसार पुढे मोठी झालेली ही मुलगी एका लहानशा समारंभात हेच गीत पुन्हा गाते.
जीवन गाणे गातच रहावे असा सुंदर संदेश देणारे हे गीत जणू आपल्याला जाणिव करून देत आहे की, तुम्ही गात रहा. कुठेही थाबू नका. जीवनाच्या या प्रदीर्घ प्रवासात किती ही थांबे (व्यत्यय) आले तरी गात रहा. कुठे तरी तुमचे सूर हे सुर सापडेपर्यंत गात रहा. आलाप ताना घेत रहा. नित्याच्या सरावाने आज बेताल असलेले गाणेे उद्या तालबद्ध असेल अशा आत्मविश्वास मनात ठेवून गात रहा.
प्रस्तुत गीताचा प्रारंभच मुळी उत्साह वर्धक आहे.गीतकार
लिहितात. झाले गेले विसरुन जावे. .... जे झाले तो भूतकाळ होता. ते विसरून आजचा दिवस नव्याने सुरु करा. वर्तमानात येऊन भविष्याचा वेध घ्या. तुमची पावलं नविन दिशेने वळवा. रस्ता निश्चितपणे सापडेल.मानवी जन्म हा चालत राहण्यासाठीच आहे.पडणे - धडपडणे हा निसर्ग नियमच आहे.ज्याने आपल्याला जन्म दिला तो
आपल्याला पडू देणार नाही. आपल्या जीवनाच्या पतंगाची दोरी त्यांच्या हातात आहे. ही दोरी कधी तो तंग करतो, कधी सेल करतो.आपल्या जीवनाचा सुत्रधार असलेला तो या लपाछपीच्या खेळात सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतो. सावरत असतो. म्हणून चालत रहा. अगदी एकटे असाल तरी सुद्धा निर्भयपणे चालत रहा.
आपल्याला मिळालेले हे जीवन खूप सुंदर आहे. हे अधिक
सुंदर करता आले पाहिजे. आयुष्याच्या या पाऊलवाटेवर कधी हिरवळ, कधी वाळवंट, कधो खाच खळगे तर कधी खोल दर्याही असतील. तेव्हा हिरवळीतून चालतांना जो आनंद, तोच आनंद वाळवंटातून चालतानाही अनुभवता आला पाहिजे. केवळ फुलावरूनच नाही तर काटेरी कुंपणातूनही जाण्याची मानसिकता असावी लागते.
कारण आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपले वाईटच करुन जाते की असे नाही, तर कधी कधी ती आपल्याला काहीतरी देऊनही जाते.जीवन कसं जगायचं हे ही शिकवून जाते.जीवनाचा अर्धा पेला भरलेला आहे म्हणून समाधान मानावे की, अर्धा रिकामा आहे म्हणून दुःख कष्टी व्हावे याचीही जाणिवे होते.
आपले आयुष्य हे एक गीत आहे.प्रस्तुत गीतात त्याला
जीवनगाणेे म्हटलेले आहे म्हणून असेही म्हणता येईल की, आयुष्य हे संगित शिकण्यासारखे आहे संगीत शिकतांना सुरांची ओळख करुन घ्यावी लागते. त्याचे नियम माहित करुन घ्यावे लागतात तसेच आयुष्याच्या सुरुवातीला जगण्याचे नियम, व्यवहार, रितीरिवाज संकेत इ. सर्वांची माहिती करून घ्यावी लागते.मग आयुष्याचा सुर सापडायला वेळ लागत नाही. या अनुषंगाने जीवन आणि
संगीत या दोन वेगवेगळ्या गोष्टी असूनही एकमेकांना खूप जवळच्या आहेत. म्हणूनच जीवनगाणे किंवा जीवनसंगीत या जोड शब्दाची निर्मिती झाली असावी.शब्दसूरांच एक मधुर नात म्हणजे गीतसंगीत आणि ते मानवी जीवनाशी निगडीत म्हणून जीवनसंगीत . संगीतात ताल सांभाळावा
लागतो. जीवनात तोल सांभाळावा लागतो. संगीतात शब्दसूरांची गुंफण, जीवनात सुखदुःखाची गुंफण. जीवनात हारमोनियमसारख्या सुखाच्या पट्ट्या पांढर्या आणि दुःखाच्या पट्ट्या काळया गम्मत अशी की, दोन्ही एकत्र वाजविल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माण होत नाही. संगीताशिवाय जीवन निरस. म्हणजे ओघानेच जिथे संगीत तिथे आनंदीआनंद .आयुष्यातील दुःख हलके करणारे किंबहना दु:ख विसरायला लावणारे संगीत आपल्याला नवचैतन्य देते, सप्तरंगी मनमोहक असलेले इंद्रधनुष्यासारखे संगीताचे सात सूर अवघ्या विश्वास व्यापलेले आहे म्हणण्यापेक्षा या सप्तसुरांनी सार्या विश्वाला वेड लावलेले आहे.असे भावमधुर सूर ऐकतांना कधी हदय भरुन येतं, तर कधी तन मन डोलायला लागते , आणि प्रसंगी कधी नेत्रही औलावतात, रुसवा फुगवाही दूर करतात. प्रस्तुत गीताच्या शेवटी असलेली रुसलेली फुगलेली चिमणाबाई तिच्या बाबांनी पापे किती घ्यावे म्हणताच एकदम खुलुन गेली.बाबासोबत तीआनंदाने नाचू गाऊ लागली. शब्दसूरांचीच ही सर्व किमया. गाणेआपल्याला जगणे शिकवितं हेच खरे.वाचकहो’ असे हे आपले जीवनगाणे निसर्गाच्या सर्व रसात(कडू, गोड, आंबट, तुरटतिखट) भिजलेले. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणिवा असतातच. कुणाचे आयुष्य परिपूर्ण नसते.अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग शोधत पुढे पुढे चालणे यालाच जीवन ऐसे नांव म्हणूनच आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगावे एवढेच.
वाचकहो।...... किती दिवसाचे आयुष्य असते?
मग, जगावे हे हसून ... कारण.
उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसते...
एवढयाचसाठी की आपला सूर कसाही असो
इथे सर्वांनाच गाणे आहे.

O प्रा.संगीता भारत थूल
से.नि.प्राध्यापिका संस्कृत विभागप्रमुखांशी
महिला महाविद्यालय,
अमरावती,मो. ९४२२९५७१७१

Group content visibility: 
Use group defaults

संगीताच्या माध्यमातून सुखी जीवनाचे सार तुम्ही किती सहजपणे सांगितले आहे. खूप सुंदर लिहिले आहे. गाणेही छान आहेच.

छान.
स्वतःला गाता येत नसेल तर दुसर्‍याचे गाणे ऐकावे, पण हिंदी सिनेमातली रडकी गाणी टाळावी. आनंदी आनंद गडे सारखी गाणी ऐकावीत.