'मी'पण माझे

Submitted by nimita on 19 August, 2018 - 00:49

या महिन्याचा साहित्य कट्ट्याचा विषय सगळ्यात अवघड विषय आहे...निदान माझ्या साठी तरी!

जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की 'यावेळी स्वतः बद्दल लिहायचं आहे' तेव्हा वाटलं, " माझ्याबद्दल लिहायचं म्हणजे तर किती काही लिहिता येईल. कारण माझ्या इतकं मला कोणीच ओळखत नाही." पण जेव्हा त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये..

माझ्यातलं 'मी'पण शोधताना मला बरंच काही सापडतंय. माझ्या आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षांत मी कशी घडत आणि काही वेळा बिघडत गेले याचा अभ्यास करताना किती तरी interesting गोष्टी लक्षात आल्या.

मी इतक्या सहजपणे माझं वय जगजाहीर करते आहे याचं कदाचित आश्चर्य वाटेल काही जणांना! पण यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. उलट मी अगदी अभिमानानी सांगते की मी वयाची पन्नास वर्षं पूर्ण केली आहेत. कारण वयाच्या ३७व्या वर्षी मरणाच्या दारात उभी असताना, स्वतःच्या हातानी ते दार बंद करून पुढे निघालेल्या माझ्यासाठी त्यानंतर येणारा प्रत्येक दिवस आणि त्या दिवसागणिक वाढणारं माझं वय हे माझ्या विजयावर होणारं शिक्कामोर्तब आहे!

बरेच जण त्यांच्या वाढत्या वयाबद्दल सांगताना ," I am so many years YOUNG " , असं सांगतात.. यातला 'YOUNG' हा शब्द वापरण्यामागचं कारण कळत नाही. कदाचित 'आता आपण शरीरानी young राहिलो नाही' हे सत्य accept करायला त्यांना अवघड जात असेल, कमीपणा वाटत असेल. मला त्यांना एकच सांगावंसं वाटतं," म्हातारपण हे प्रत्येकाला नाही मिळत. देवानी ही privilege काही खास लोकांकरताच राखून ठेवली आहे. म्हणूनच आपलं वाढतं वय अभिमानानी सांगावं..

Aging gracefully is also an art! आणि ज्यानी ही कला आत्मसात केली त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य आनंदी आणि समाधानी असणार ,यात शंका नाही.

असो, आता मूळ मुद्द्याकडे वळू या.

तर माझ्या या ५० वर्षांच्या प्रवासाकडे बघताना काही गोष्टी अगदी प्रकर्षानी जाणवतायत..काही वेळा या प्रवासातली काही स्टेशन्स सुटून गेली..कधी आयुष्याची गाडी तिथे न थांबताच पुढे निघाली, तर कधी माझ्या हलगर्जीपणामुळे मी नुसतीच खिडकीतून स्टेशनची पाटी वाचत बसले, आणि जेव्हा ते स्टेशन नजरेआड झालं तेव्हा स्वतःची चूक समजली. सुरुवातीच्या असमंजस वयात या सुटलेल्या स्टेशन्स बद्दल थोडे दिवस खंत वाटायची.. पण 'जे होतं ते चांगल्यासाठी' हा माझ्या आईचा विश्वास नकळत माझ्याही मनात निर्माण झाल्यामुळे, जे मिळालं त्यातच समाधान मानून,मी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचा माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला.

पण जसजशी मोठी होत गेले तसतशी एक गोष्ट लक्षात येत गेली... ती सुटून गेलेली स्टेशन्स माझ्या साठी नव्हतीच मुळी!

माझा एक दृढ विश्वास आहे... हा सगळा संसार चालवणारी ती जी अदृश्य शक्ती आहे ना, जिला आपण लौकिकार्थानी 'देव' म्हणतो.... ती शक्ती-तो आपला देव - त्याला आपला भूतकाळ माहीत असतो, वर्तमानकाळ दिसत असतो आणि त्याचबरोबर आपला भविष्यकाळ ही त्यानी ठरवलेला असतो. आणि या सगळ्याच्या विचार करूनच तो आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवत असतो. आपलं जीवन सुकर व्हावं, रस्त्यातले अडथळे दूर व्हावे या उद्देशानी तो आपलं आयुष्य घडवत असतो- त्याला योग्य ती दिशा देत असतो. असं असताना मग आपण उगीच कशाला काळजी किंवा मनस्ताप करून घ्यायचा. आज जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर त्यासाठी त्रागा कशाला करायचा? त्यातून पुढे नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे असा विश्वास ठेवला की आपलं काम झालं.मग बाकी सगळं ठीक करायला 'तो' आहेच की!

या एका ठाम विश्वासामुळे आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या अनेकविध संकटांना मी धीरानी तोंड देऊ शकले.. कारण मला एक खात्री होती की ' हा अवघड काळ काही वेळापुरताच आहे..लवकरच यातून काहीतरी चांगलं होणार आहे'.

लहानपणापासून मला कायम लोकांच्यात राहायची सवय होती. शाळा-कॉलेज मधे देखील मी कायम मित्र मैत्रिणींच्या गराड्यात असायची. आणि 'सतत बडबड करत राहाणं' हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखी माझ्या तोंडाची टकळी कायम चालू असायची....आत्ता ही असते म्हणा!

मला लोकांशी बोलायला, गप्पा मारायला खूप आवडतं. माझ्या मुलींच्या मते," आई कोणाशीही गप्पा मारू शकते..." म्हणजे एखाद्या बसचे ड्रायव्हर- कंडक्टर असोत किंवा UN मिशन वर आलेला एखादा विदेशी नागरिक...मी अगदी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखी त्यांच्याशी गप्पा मारू शकते. गप्प बसणं जमतच नाही मला. त्यामुळे लग्नानंतर आम्ही लोहितपुर ला असताना जेव्हा पहिल्यांदा मला एकटीला राहायची वेळ आली तेव्हा मला वाटलं होतं की 'कशी राहू शकेन मी एकटी? बोलायला पण कोणी नाही." पण जेव्हा एकटी राहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं, की हे एकटेपण ही आपण एन्जॉय करू शकतो. त्या चाळीस दिवसांत मी स्वतःशी संवाद साधायला शिकले. आणि एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट लक्षात आली... एकटं असणं आणि एकाकी असणं या दोन्हीतला फरक लक्षात आला.

तुम्ही लोकांच्या गराड्यात असून ही एकाकी असू शकता...

आणि त्याउलट एकटे असताना स्वतःच्याच सहवासात खुश राहू शकता...

तुमच्या मनाची स्थिती ही पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते.

मधे एकदा मी सद्गुरू चं एक वाक्य ऐकलं होतं.."If you are lonely when you are alone, then certainly you are in bad company." खरंच, या एका वाक्यात किती मोठा अर्थ लपलाय, नाही!

जर आपण स्वतःच आत्मसंतुष्ट नसलो तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण काय आणि कसली खुशी देणार?

ही आत्मसंतुष्टी मिळवायचा एक सोपा मार्ग सापडलाय मला.... आनंदी आणि संतुष्ट राहण्यासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहणं!! अगदी सरळ गणित आहे हे... माझ्या मनानी आणि पर्यायानी मी- कधी खुश राहायचं, कधी उदास राहायचं हे ठरवायचा अधिकार फक्त मला आहे...मी दुसऱ्या कोणालाही तो अधिकार दिलेला नाही.

पण ही साधी, सोपी गोष्ट लक्षात यायला मला इतकी वर्षं लागली. काही हरकत नाही...देर आए दुरुस्त आए। Better late than never.

आणि ही उपरती होण्यासाठी एक छोटीशी घटना पुरेशी झाली. त्याचं असं झालं.. एकदा माझी एक मैत्रीण तिच्या नवऱ्याबद्दल माझ्याकडे तक्रार करत होती- म्हणजे तो रोज ऑफिस मधून उशिरा घरी येतो, तिला अजिबात वेळ देत नाही, त्यामुळे ती कायम एकटी असते...वगैरे वगैरे . या सगळ्या गोष्टींमुळे ती हळूहळू depression मधे जात होती. तिचं म्हणणं," मी एकटी असताना कशी खुश राहू?"

तिचं हे वाक्य ऐकलं आणि डोक्यात विचारांची रांग लागली. वाटलं, आपण एकटे असताना रागावू शकतो, रडू शकतो, उदास होऊ शकतो...त्यावेळी कोणाच्या कंपनी ची गरज नाही भासत. मग खुश राहायलाच का बरं कोणाची तरी साथ लागते आपल्याला? आपण on our own खुश का नाही राहू शकत?

त्या क्षणी ठरवून टाकलं...यापुढे आपली feelings आपण च कंट्रोल करायची, त्या बाबतीत स्वावलंबी बनायचं! पण हे सगळं लिहायला जितकं सोपं आहे तेवढंच आचरणात आणायला कठीण आहे..पण त्या दिशेनी प्रयत्न चालू आहे माझा.... आणि जमतंय हळूहळू.

अजून एक गोष्ट लक्षात आलीये मला माझ्याबद्दल....I can forgive but i cannot forget! माझ्या स्वभावाचा हा पैलू चांगला आहे का वाईट याबद्दल माझं माझ्याशीच दुमत आहे. माझ्या मनातला माझे लाड करणारा emotional कप्पा आहे ना त्याला माझ्या या स्वभावाचं कौतुक वाटतं. पण मग माझं practical मन मला दटावून जाब विचारतं... "हा तर दुटप्पीपणा झाला ना! You can't forget,... it means you haven't forgiven. It's as simple as that! कारण जर तू एखाद्याला खरंच मनापासून माफ केलं असशील तर त्याबद्दल काहीच मनात नाही ठेवणार."

पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला या दोन्ही बाजू पटतात. त्यामुळे माझा हा स्वभाव बरोबर आहे की चूक हे माझं मलाच उमजत नाही. तेव्हा मी आता असं ठरवलंय की योग्य वेळ आली की 'तो वर बसलेला' मला नक्की मार्ग दाखवेल. तसं पाहिलं तर 'तो' नेहेमीच प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडवून आणत असतो, पण आपला त्याच्या या timing वर विश्वास नसतो.

एकदा एका ट्रक च्या मागच्या बाजूला लिहिलेलं एक वाक्य बघितलं होतं-'वक्त से पहले और किस्मत से ज़्यादा किसींको कुछ नहीं मिलता।' अगदी मनापासून पटलं ते मला.

असंच शाळेत असताना कुठल्यातरी नाटकात एक वाक्य ऐकलं होतं..'जर-तर ..या साऱ्या फसव्या गोष्टी आहेत.' हे वाक्य देखील कायमचं मनात ठसून बसलंय. त्यामुळे 'असं झालं असतं तर' किंवा'तसं नसतं तर' या आणि अशा पळवाटा न शोधता, वस्तुस्थिती ला स्वीकारून त्यातून हवा तो मार्ग काढायचा प्रयत्न करणं मला जास्त योग्य वाटतं. , आणि म्हणूनच मी तसं वागण्याचा प्रयत्न करत असते...अर्थात, तो यशस्वी होतो की नाही हे माझ्या आजूबाजूचे लोकच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील.

माझ्यातलं 'मी'पण शोधताना बरीच भरकटत गेले की मी! पण अजूनही कितीतरी वेळा असं वाटतं की - मी स्वतःच स्वतःला अजून पूर्णपणे ओळखलं नाहीये.. अजून बरंच काही आहे जे माझं मलाच माहीत नाही..

अशा वेळी लताजींनी गायलेल्या गाण्याची ती ओळ आठवते.....

'शोधू मी कुठे कशी प्रिया तुला....'!!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users