भारतमाता स्तवन

Submitted by Asu on 16 August, 2018 - 07:26

सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
भारतमाता स्तवन

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

ब्रम्हा सिंधू गंगा गोदा तापी नर्मदा, कावेरी सजल दुहिता
सुजलाम-सुफलाम करती देशा, तव रक्तवाहिन्या माता
पोषण करते सकल जना, संपन्न करती अखिल जगता
हिमगिरी तव मुकुट शोभतो, चरण हिंदू सागर नित धुता

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

बंग सागर अरबी समुद्र ठाकले, भूजा तव रक्षण करता
नद्या नाले झाडे प्राणी आम्ही पूजितो, पूजितो अन् पर्वता
निसर्गनिर्मित आम्ही तुझी लेकरे, सांभाळ करावा आता
रामकृष्ण पदस्पर्श पुनित सुखदायक, मंगल भारतमाता

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

मानवतेचा हा मंत्र दिला सत्य अहिंसा, जगण्याचा जगता
वंदन करिते जगत सर्व, तव शांतिदूत महात्मा वंद्य सुपुता
ऋषी- महर्षी, संत-महंत-पीर, शूरवीर तुझीच लेकरे माता
गुणगान गाती तुझे सर्वथा, निशीदिनी जगी जीवनी जगता

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

हिंदू मुस्लीम सिख ईसाई बौद्ध जैन, धर्म जरी भिन्न नांदता
हृदयातून परि आवाज घुमतो एकच, जय जय भारत माता
कोटी कोटी वीर संतान तुझे, प्राणार्पण करण्या तुज असता
नजर वाकडी करून तुज पाही, हिम्मत ना कुणाची आता

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

गर्व आम्हास असे सर्वदा, पवित्र पोटी तव जन्म घेता
दे वरदान आम्हा आता, असशी सकल जनांची माता
जन्म मिळावा तुझ्याच कुशीत, जन्मोजन्मी मज साता
व्हावे निर्माल्य आयुष्याचे, तुझ्याच चरणी प्रिय माता

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults