नात्यांचा श्रावण

Submitted by Asu on 11 August, 2018 - 22:09

नात्यांचा श्रावण

ढग विरुन आषाढाचे,
श्रावणमास अवचित यावा.
सणासुदीच्या गाठीभेटी
रुसवा फुगवा विसरून जावा.

रेशिम रिमझिम प्रेम बरसता
हिरवा गालिचा अंथरावा.
साेनपिवळ्या नात्यांमधुनि
हर्षधनु अंगणी यावा.

चैत्र वैशाख जेष्ठ कशाला
श्रावणमास सदा जाणावा.
भाव भावना आपुल्या हाती
जगण्याचा जल्लोष करावा.

साथ देऊन एकमेकांना
मिळून सारे फेर धरावा.
स्नेह बंध मैत्री मधुनि
बारा महिने गोफ विणावा.

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults