मळई

Submitted by धनुर्धर on 9 August, 2018 - 05:58

आमच्या गावा शेजारून नीरा नदी वाहते. नदीचे नाव जरी नीरा असले तरी अनेक ठिकाणी तिला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. गावाच्या मागुन जेंव्हा ती वाहत येते तेव्हा ती मळई म्हणून ओळखली जाते. गावाच्या पुढे ती पद्मावती या नावाने ओळखली जाते. नदीच्या त्या भागाला मळई हे नाव का बरे पडले असावे? या शब्दाचा नेमका अर्थ काय? हे प्रश्न मला नेहमी पडत असे. घरातल्या मोठ्या माणसांकडून मळईला पोहायला जाऊ नका अशा सुचना मी लहानपणी बर् याच वेळा ऐकल्या असल्यामुळे तिकडे जाताना सुध्दा त्या वेळी भिती वाटत असे. मळईला तिकडे एक श॓कराचे पुरातन मंदिर आहे. सणावाराला तिकडे नैवेद्य दाखवावा लागायचा. बहुतेक वेळा मी नैवेद्य दाखवयाला जात असे. मंदिरामागचा परिसर तिथल्या त्या दाट झाडीमुळे अतिशय गुढ वाटत असे. उन्हाळ्यात पुर्ण नदी आटून जाते पण मळईच्या डोहातले पाणी अटत नसे.
मळई विषयी भीती वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे वर्षा दोन वर्षांनी कोणी ना कोणी तिथे बुडून मृत्यू पावत असे. आधीच गुढ वातावरण आणि बुडून होणारे मृत्यू त्यामुळे त्या ठिकाणा विषयी अनेक आख्यायिका पसरल्या होत्या. खुप वर्षापुर्वी तिथे एक धनगर आणि त्याचा घोडा तिथे बुडून मरण पावल्याचे माझी आजी आम्हाला सागंत असे. त्या नंतर तिथे अनेक जण बुडले. भुतं पाण्यावर पोहणार् या माणसांना आतमध्ये ओढून नेतात अशी जुन्या लोकांची धारणा होती. मी स्वतः तिथे एक तरूण मुलगा बुडाल्या नंतर त्याचे प्रेत बाहेर काढताना पाहिले आहे. गावातील एका बाईने तिथेच उडी मारून जीव दिला होता.
आता नदीवर धरणे झाली. पावसाळ्यात नदीला पूर येईनासा झाला. उन्हाळ्यातही नदीला पाणी दिसू लागले. शेती वाढली. लोक मोटरने पाणी खेचू लागले. गावाची लोकसंख्या वाढली. झाडी कमी झाली. लोकांचा वावर वाढल्याने मळईला पुर्वी वाटत होती तशी भिती हल्ली वाटत नाही. पण तिच्या त्या काळ्याशार डोहात उडी मारण्याची हिंमत आजही माझ्यात नाही..

....धनुर्धर...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मळई शब्द बरोबर आहे की नाही माहित नाही पण असाच उच्चारतात. आणि हे कुठल्याही नदीचं नाव नसून नदीकडेचं अगदी चिकटून जे वाळूमिश्रित मऊ मातीचं शेत असतं त्याला मळई हा शब्द आहे. बाकी....
छान लिहिलय. सविस्तर लिहायला हवं होतं. की क्रमश: आहे. लिहा की पुढे.>>>+११