घराभोवतालची हिरवाई

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 August, 2018 - 03:20

झाडे, पाने फुले ही माझ्या आयुष्याचाच एक भाग आहेत. माझं बालपणच उरण नागांवातील झाडे, वेली, शेती, मळ्याच्या सहवासात गेल. बालपणापासूनच निसर्गातील हा हिरवा रंग माझ्या मनाला गारवा देत आला आहे. आई-वडील त्यांच्या नोकर्‍या सांभाळून वाडीतील वृक्ष संपदेची, शेतीची मशागत करताना मी त्यांचे अनुकरण करत होते. बी ला आलेला अंकूर किंवा एखाद्या कोवळ्या फांदीला कळी धरते ते पाहण्यातील समाधान मला बालपणापासून ते आतापर्यंत शब्दात व्यक्त न करण्याइतपत आनंददायी आहे.

माझे वडील हयात असे पर्यंत सगळ्यांना सांगायचे, हिला कुठे थिएटरमध्ये सिनेमा दाखवायला नेलं तरी ही बाहेरच्या पाना-फुलांतच रमायची. माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी आणलेली तीन गुलाबांची रोपे अजूनही माझ्या स्मरणात आहेत.
१)

२)

३)

शाळेत असताना मैत्रिणींकडून किंवा कुठे पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्याकडे असलेली व आमच्याकडे नसणारी झाडांची देवाण घेवाण करणं हा एक छंदच होता जो अजूनही आहेच. ह्या निसर्गाच सानिध्य लग्नानंतरही मिळेल की नाही या बाबत कधी कधी मनात पाल चुकचुकायची पण निसर्ग देवतेने माझ्यावरची माया अबाधित ठेवली. सासर्‍यांनी उरण- कुंभारवाड्यातच नवीनच वाडी घेतली होती व तिथे घर बांधायला सुरुवात केली होती. लग्ना नंतर वर्षभरातच आम्ही नवीन जागेत राहायला गेलो आणि माझी निसर्ग सानिध्याची ओढ फळास आली. इतर मोठ्या झाडांपेक्षा मला बागेतील फुलझाडांचे खूप वेड होते. नवीन घरा भोवती नर्सरीतून आणि परिचितांकडून आणून खूप फुलझाडे मी लावली. घरातील इतर मंडळीही आपआपल्या आवडीनुसार फळझाडे, फुलझाडे आणून लावत होते. काहीच दिवसात आमचा परिसर हिरवा गार व फुलांनी रंगीबिरंगी झाला.
४)

जास्वंदीचे सात-आठ प्रकार, गुलाब, अनंत, मोगरा, मदनबाण, जुई, सायली, रातराणी, तगर, प्राजक्त, लिली, कर्दळ अशी अनेक फुले वार्‍यावर डुलू लागली. प्रत्येक झाडांची वेगवेगळी वैशिष्ट्ये तशाच त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी व ती ज्यांच्याकडून आणली त्यांची आठवण ही वृक्षसंपदा नियमितपणे करून देते. परिसरातील ह्या वृक्षांमुळे अनेक जीव ह्या हिरवाईवर येतात. आमच्या आवारातील फळझाडे म्हणजे जाम, चिकू, पेरू, आंबे ह्यावर येणारे पक्षी आणि त्यांचे गुंजन फार मनोरंजक असत. फुलपाखरांचे कोवळ्या उन्हात फुलांवर बागडणे मन त्यांच्यावरच खिळवून ठेवते. मधमाश्याही बागेतील फुलांतील मधुरास गोळा करून आंब्याच्या झाडावर पोळ्यामध्ये आपली वस्ती बनवतात. पावसाळ्यात काजव्यांची मिणमिण दिसते, बेडूक टुणुक टुणुक करत अंगणात फिरतात, सरपटणारे प्राणीही येतात बरं का पाहुणचाराला झाडीत.

५)

६)

७)

सकाळी उठल्यावर ताज्या ताज्या फुलांचे विलोभनीय दर्शन घ्यायला मला खूप आवडते. हल्ली तर काय मोबाइलवर त्यांचे फोटो काढून ग्रुप्सवर शेयर करुण दुसर्‍यांसोबत हे प्रसन्न वातावरण शेयर करायचं असा नियमच पडला आहे. जास्त फुले असतील तर ती मैत्रिणींना देऊन आमची मैत्री सुगंधी करण्यात फुलांचा वाटा आहे. ऑफिसच्या टेबलवर असणार्‍या देवाच्या प्रतिमेला न विसरता मी काही सुगंधी फुले नेते ज्याने ऑफिसचे काम करत असताना त्या फुलांच्या सहवासाने मन प्रसन्न राहते व कामाचा ताण जाणवत नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर चहा घेतल्यावर एक तास बाग कामासाठी राखलेलाच असतो. ह्या वेळी माझ्या दोन मुली श्रावणी आणि राधाही मदतीला असतात. त्याही आवडीने झाडांना पाणी घालतात. दीर-जाऊबाईही गार्डनिंगचे काम आवडीने करतात. माझ्या मिस्टरांना माझे झाडांचे वेड माहीत असल्याने ते हल्ली मला वाढदिवसाला फुलझाडेच आणतात गिफ्ट म्हणून मग ही झाडेही माझ्यासाठी स्पेशल होऊन जातात. मोठ्या प्रमाणात खताची व्यवस्थाही तेच करतात. मी आमच्या जागेत फक्त शेणखत आणि झेड.बी.ऍना.एफ.च्या देसाई कुटुंबाने ओळख करून दिलेले जीवामृत घरी करून वापरते, कोणतेही रासायनिक खत अथवा औषध वापरत नाही.
८)

९)

आता सोशल नेटवर्कच्या जमान्यात झाडांविषयी अनेक माहिती उपलब्ध होते. मायबोली डॉट कॉम वरील निसर्गाच्या गप्पा ह्या माझ्या ग्रुपमुळे माझी फुलझाडे हिच ओढ न राहतं अनेक दुर्मिळ व नवनवीन वृक्षांची ओळख होऊन त्या वृक्षांबद्दलही ओढ वाटू लागली आहे. त्यामुळे मी ६-७ वर्षापूर्वी आमच्या परिसरात नर्सरीतून आणून बहावा लावला त्याचे पिवळे झुंबर दिवसा ढवळ्या परिसर चमचमवत होते. बकुळही आता फुलू लागली आहे. हादगा तर मागील तीन-चार वर्षापासून आपल्या कुयरीच्या आकाराच्या फुलांची देवाण करत आहे. ह्या फुलांची भाजी होते.

माहेराहूनही अनेक फुलझाडे आणून लावली त्यामुळे माहेरच्या बगिच्याची सोबतही अजून हरवल्यासारखी वाटत नाही. नर्सरीतून आणलेल्या झाडांपेक्षा कोणाकडून आणलेली-दिलेली झाडे विशेष काळजीने, मायेने वाढवली जातात. साधनाने दिलेल्या भूईचाफ्याचे खूप वैशिष्ट्य वाटते. त्याच्या कंदातून पहिला सुगंधी फुल उगवते व नंतर रोप तयार होते. सायलीने नागपूरवरून पाठवलेली पिवळी लिली, दुपार शेंदरी फुलली की नागपूरच्या मातीचा गंध येतो. पुण्यातील अंजलीने पाठवलेले आयरीस फुलले की त्याचे सौंदर्य पाहायला मन कुंडीजवळ वारंवार रेंगाळत. ह्या फुलांसोबत आमची मैत्रीही अधिक फुलत जाते.
१०)

११)

घरासमोरची तुळस आमच्या अंगणाची शोभा आहे. पावसाळ्यात फुलणारा मोगरा, मदनबाण, अनंत ही फुले मन धुंद करतात. रात्री फुलणारी रातराणी रात्र सुगंध करते. सकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा जणू मोती पोवळ्यांची रांगोळी घालते अंगणात. तगरीचे फुललेले झाड मला उन्हातील चांदण्या वाटतात. आमच्या बागेतील गुलाब फुलले की बाग श्रीमंत वाटू लागते. मी फुललोय हे सांगण्यासाठी कवठी चाफ्याचा सुगंध अगदी घरात येऊन दरवळतो. खिडकीतील ऑफिसटाईम न चुकता ऑफिसच्या वेळेवर फुलतो. सोनचाफा फुलल्यावर सगळा परिसर सुगंधाने प्रसन्न होतो. पावसाळ्यात जेव्हा एकदाच २०-२५ पांढरे कॅकटस ज्याला ब्रह्मकमळ म्हणून आपल्याकडे नाव पाडलंय (खरे ब्रह्मकमळ हिमालयात उगवते) ते फुलतात तेव्हा शुभ्रता, सुगंध आणि सौंदर्य ह्यांचा रिमझीमणार्‍या पावसात स्वर्गीय देखावा पाहायला मिळतो.

ऋतू नुसार फळे-फुले येतात. पाऊस आणि हिरवी झाडे हे एक सुंदर समीकरण आहे. रिमझिमणार्‍या पावसातील झाडे फुले अधिक तजेलदार, गारेगार दिसतात. हिवाळ्यात फुलणारी फुले मनमोहक रंगाची असतात तर उन्हाळ्यातील फुले कडक उन्हाच्या मार्‍य पासून मनाला थोडी शीतलात मिळावी म्हणून सुगंधी असतात असा माझा अंदाज आहे. ही फळे-फुले, त्यांचा सुगंध आणि सौंदर्य ही ईश्वराची अगाध लीला आहे हे नेहमी मनोमन वाटत असते.

हा लेख दिनांक ०४/०८/२०१८ रोजी लोकसत्ता वास्तुरंग या पुरवणीत प्रकाशीत झालेला आहे.
https://www.loksatta.com/vastu-lekh-news/article-on-homes-greenery-1725001/

अधिक फोटो पाहण्यासाठी ब्लॉगवर हा लेख पहा. https://prajaktamhatretarangmaniche.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! जागू, तू निसर्गाचेच देणे परत त्याला देऊन नवीन सृष्टी निर्माण केलीस की गं ! खूप कौतुक वाटते तुझे. Happy

खास तुझ्यासाठी हे गाणे .
https://www.youtube.com/watch?v=K9b63nSt9jY

व्वा ! जागू, तू निसर्गाचेच देणे परत त्याला देऊन नवीन सृष्टी निर्माण केलीस की गं ! खूप कौतुक वाटते तुझे+११११

कित्ती मस्त..तुम्ही फार फार श्रीमंत आहात..ईतकी निसर्गसंपदा तुम्हाला रोज लाभते..
खुप छान लेख

मस्तंच लेख जागूताई, फोटोही एकदम भारी आहेत फुलाफळांचा आणि अगदी सापाचा सुद्धा. मला तुमच्या बागेत येऊन अख्खा दिवस बागडावंसं वाटतंय. Happy

लेख मस्त. फोटो अजूनच मस्त. सापाचा फोटो बघुन मात्र चर्रर्र झालं.
आमच्या बागेतले फोटो पण टाकेन मी. टाकायला येईल तेव्हा.

जागु, किती सुंदर फोटो!
अर्थात याची देही याची डोळा रायगड जिल्ह्यातील निसर्ग सोहळा एक दोन नाही तब्बल २० वर्ष जगलोय त्यामुळे तिथला उन्हाळा पावसाळा हिवाळा पावसाळ्यातील पाचूची वनं तर उन्हाळ्यातील पांगार्‍यावर फुललेली आग पाहिली! पावसाळ्यात कोसळणारे धबधबे तर उन्हाळ्यात पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन मैलभर पायी वणवण पण पाहिली! कोकण सुंदरच कोणताही ऋतु असो..
तुमच्या सगळ्या ह्या प्रकाशचित्रातून आणि वर्णनातून त्याची पुनरानुभुती मिळते!

जागुताई, हे निसर्गसुख ज्यांनी जोपासलं, मनमुराद अनुभवलं अशा भाग्यवंतांपैकी मी एक. लहानपणापासुन निसर्गाचे सानिध्य लाभल्याने पुण्या-मुंबईच्या प्रदुषित वातावरणात कामासाठी जाणेसुद्धा नकोसे वाटते.