रंग

Submitted by निशिकांत on 1 August, 2018 - 02:25

रंग

हिरवे, पिवळे, निळे कधी तर
क्षितिजावरची केशर लाली
वेगवेगळे रंग जीवना
दावलेस तू सांज सकाळी

तारुण्याच्या उभार समयी
इंद्रधनूचे रंग बरसले
वसंत ऋतुची बघून किमया
कैक उन्हाळे झळा विसरले
रंगांचा तो उत्सव होता
मधुमासांचे भाग्य कपाळी
वेगवेगळे रंग जीवना
दावलेस तू सांज सकाळी

सुखदु:खांची रंगसंगती
परस्परांच्या विरोधातली
खूप पाहिली मना भावली
कधी ऊन तर कधी सावली
काट्यासंगे दिलेस देवा
मंद स्मीत कुसुमांच्या गाली
वेगवेगळे रंग जीवना
दावलेस तू सांज सकाळी

लांब सावली पूर्व दिशेला
माझी आता दिसू लागली
साथ करूनी प्रवासात ती
खूप असावी अता भागली
अंधाराचे रंग पसरता
विरून जाइल सर्व झळाळी
वेगवेगळे रंग जीवना
दावलेस तू सांज सकाळी

हरवुन गेले सर्व कुंचले
रंग उडाले कॅन्व्हासाचे
दार रोज मी खटखट करतो
रंगबिरंगी इतिहासाचे
सायंकाळी ओज शोधण्या
भटकत आहे रानोमाळी
वेगवेगळे रंग जीवना
दावलेस तू सांज सकाळी

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users