ऊनऊन

Submitted by फूल on 27 July, 2018 - 00:23

परवाच कुठेसं वाचलं की स्वयंपाक झाल्यानंतर तासाभरात जेवावं. तरंच त्या अन्नातलं चैतन्य आपल्या ठायी उतरतं. हे वाचलं आणि माझ्या पोटात गरमा-गरम पडावं म्हणून ओट्याशी रांधत उभ्या राहिलेल्या सगळ्या माय-माऊल्या आठवल्या. कुठल्या जन्मीची पुण्याई होऊन या माय-माऊल्या माझ्या नशीबाला जोडल्या गेल्या असतील? जन्मदात्या माऊली व्यतिरिक्त किती जणींच्या पदराला हात पुसायचं भाग्य मला लाभलंय असा विचार केला की मनोमन कृतज्ञतेने आपोआप हात जोडले जातात.

माझी आई नोकरी करायची. त्यामुळे दुपारच्या जेवणाला सकाळी केलेली पोळी भाजी असायची. पण रात्री मात्र गरमा-गरम वाफाळलेला भात आणि शेगडीवरून नुकती उतरलेली आमटी. मी अभ्यास करत असेन तर दहा हाका मारून मला उठवून ते गरमागरम ताजं-ताजं माझ्या पोटात पडेल असं बघायची. शिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तिला सुट्टी असायची. शाळाही अर्धा दिवस. १० वाजेपर्यंत घरी आले की थालीपीठ, पोहे, उप्पीट, घावन, आंबोळी यापैकी काहीतरी खरपूस-खमंग होऊन माझी वाट बघत असायचं. आता जेव्हा माझ्या लेकीसाठी मी असलं काही करू जाते तेव्हा लक्षात येतं की असं वेळेवर कुणाच्या पोटात ताजं अन्नं पडावं असं वाटणाऱ्याला त्याआधी किती विचार करून नियोजन करावं लागत असेल. पण वरकरणी किती सहज दिसायचं ते.

आई नोकरी करत असल्याने पाळणाघरात वाढले. आईने दिलेला डबा असला तरी पाळणाघरातल्या मावशी रोज गरमागरम आमटी-भात जेवायला वाढायच्या. रोज एकाच प्रकारची आमटी आणि तसाच आंबेमोहोर भात. लग्नानंतर अनेकदा तसली आमटी घडवायचा प्रयत्न केला पण तशी आमटी जमायला निराळीच रेसिपी हवी. घरात वावरणाऱ्या दहा लेकरांबद्दलची माया ऊरी हवी, करता-सवरता भला-थोरला हात हवा, मापाच्या मानाने पसाभर डाळ जास्तच पडायला हवी, आल्या-गेल्या पै-पाहुण्यांची नावं आमटीतल्या प्रत्येक दाण्यावर लिहिलेली असायला हवी... आपणही शाळेतून भुकेने कळो कळो होऊन पानावर बसायला हवं. मगच ती आमटी तश्शी लागेल. आईने त्या मावशीला कितीतरीदा विचारलं असेल, “अगं काय घालतेस आमटीत? लेक भारी कौतुक करत असते तुझ्या आमटीचं..” मावशी तिच्या नेहमीच्या स्टाईलने सांगायची... “इश्श.. अगं त्यात काय मोठंसं.. हिंग, मोहरी, हिरव्या मिरचीची फोडणी, हळद आणि मीठ... एवढं आणि एवढंच... ”

रोज सकाळी पोळी-भाजी करून ऑफिस गाठायच्या नादात लेकीच्या म्हणजे माझ्या पानात तव्यावरली गरम पोळी पडत नाही याचं आईला फार वाईट वाटायचं. तिने अनेकदा हे बोलूनही दाखवलं. कधी घरी असली की मग आवर्जून आयत्या वेळी पोळ्या करायला घेणार. ती पोळी तव्यावरून पोळ्यांच्या डब्यात न जाता थेट माझ्या ताटात पडावी हे स्वप्नंच जणू तिचं. एकदा असंच माझ्या कॉलेजच्या परीक्षेच्यावेळी आई सुट्टी घेऊन घरी थांबली होती. दुपारी जेवून परीक्षेला जायचं असं ठरवलं होतं. आईने अगदी वेळेवर मला पोळ्या करून वाढायच्या म्हणून माझं बाकी सगळं आवरलेलं बघून पोळ्या करायला सुरुवात केली. टम्मं फुगलेली मऊसूत घडीची पोळी ताटात पडली. पण मला त्या पेपरचं इतकं टेंशन आलं होतं की पोळी काही घशाखाली उतरेना. मी कशी बशी अर्धी खाल्ली आणि आईला म्हटलं बास मला मी आल्यावर जेवेन उरलेलं. तरीही आई पोटतिडकीने सांगत राहिली “अगं खा गं... ती पानातली तरी संपवून जा.” पण मला काही केल्या नकोच वाटत होतं जेवण. मी ताट झाकून ठेवलं आणि उठले.. आईने तरी चारेक वेळा पुन्हा पुन्हा सांगितलं असेल. शेवटी मी वैतागूनच नको म्हटलं आणि धुसफुसतच आईच्या पाया पडून परीक्षेला निघून गेले. इथे परदेशी आल्यावर प्रत्येक परीक्षेला जाताना ही आठवण बोचत राहते. कुठून तरी तव्यावरल्या खरपूस पोळीचा वास येतो. अभ्यास संपवण्याच्या नादात स्वत:साठी काही करून घ्यायला वेळ मिळालेलाच नसतो. मग त्या अर्ध्या पोळीची आठवण काढत थंडगार दुधातली व्हीट बिक्सची लक्तरं पोटात ढकलायची..

या पोळ्यांचीच अजून एक आठवण... आई-बाबा माझ्याकडे ऑस्ट्रेलियात रहायला आले होते. तेव्हा ठरवलं रोज दुपारी दोघांना पानावर बसवून गरम गरम पोळ्या करून वाढायच्या. बाबा आरामात बसून आनंदाने जेवायचे. लेक करून वाढतेय याचं समाधान दिसायचं त्यांच्या चेहऱ्यावर पण आई मात्र फार अस्वस्थ असायची. “झालं का... बास मला.. ये तू आता.. तू बस... मी करते शेवटच्या पोळ्या... मला कधी घालता नाही आली तुला गरम पोळी रोजच्या रोज..” ही असली भूणभूण सतत मागून सुरू असायची. आता आई झाल्यावर कळतंय.. आईला खाण्यात नाही तर खाऊ घालण्यात समाधान असतं.

या खाऊ घालण्यावरूनच मॉरीन आठवली... माझ्या ऑस्ट्रेलियातल्या घराला शेजार फार भला मिळाला. दोन आज्ज्या एकत्रं राहायच्या. बार्बरा आणि मॉरीन. माझी तीन वर्षांची लेक आणि मी म्हणजे त्यांना आपली नात आणि मुलगीच शेजारी रहायला आली असलं वाटायचं. मॉरीनचं वय ऐंशी. पण स्वयंपाकाची भारी हौस. मी scrambled egg खाल्लं नाहीये असं कळल्यावर एकदा म्हणाली मी करून तुला खाऊ घालते. मलाही गम्मत वाटली. म्हटलं चालेल, मी मदतीला येते. माझी आज्जी स्वयंपाक करताना जशी मी लुडबूड करायचे तशीच मनसोक्त मॉरीनभोवती तिच्या स्वयंपाकघरात मी बागडत होते. तिने pan मध्ये scrambled egg गरमगरम तयार केलं आणि म्हणाली लग्गेच खायला बस.. तिचा pan शेगडीवरून उतरवून ती डायनिंग टेबलजवळ घेऊन आली आणि माझ्या प्लेट मध्ये वाढून मोकळी झाली. मी त्या पदार्थाचा फोटो काढण्यात गुंतले होते. तिने शेवटी माझ्या खांद्यावर चापटी मारली आणि म्हणाली “फोटो काढण्यासाठी मी पुन्हा करेन हवं तर पण हे तू गरम गरम खा...” माझ्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं. आई तिकडे लांब मायदेशी, आज्जी तर त्याहूनही कायमचीच लांब गेलेली..... गरम गरम खा गं असं म्हणणारं जवळ कुणी उरलंच नव्हतं..

नाही म्हणायला आम्ही इथल्या सख्याच एकमेकींची माहेरपणं करतो. एकमेकींना घरी बोलावून गरम गरम खाऊ-पिऊ घालतो. कधी कधी नवराही गरम-गरम डोसे करून खाऊ घालतो. गरमागरम चहा करून देतो. पण यातल्या कशालाच आजोळी जगलेल्या स्वर्गसुखाची सर नाही...

मामा सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडायचा. त्यावेळी आज्जीचा स्वयंपाक तयार असायचा. पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर आणि ताक. घरात दोन्ही वेळा कमीत कमी सात-आठ माणसं तरी जेवायला असायचीच. त्या मानाने स्वयंपाक व्हायचा.. मामा पूजा करून येऊन पानावर बसला की आज्जी स्टोव्ह पेटवून खाली पोळ्या नाहीतर भाकरी करायला बसायची. पोळी तव्यावरून थेट मामाच्या ताटात. बाजूलाच मावशी ताक घुसळत बसलेली असायची. मामाच्या भाकरीवर ताजं लोणी पाडायचं. आम्ही पोरं-टोरं आजूबाजूला असलो तर आज्जी आम्हालाही सांगायची ताट घेऊन बसा. मग तूप गूळ पोळी, तूप चटणी भाकरी असलं काहीतरी आम्हीही हाणायचो. दुपारचं जेवण वेगळं. पोळी संपवून उठलं की मावशी सांगायची आ कर... आणि तो आ लोण्याचा मोठ्ठा गोळा गट्टम करूनच बंद व्हायचा.

आज्जीकडे आठवड्यातल्या एका विशिष्ट वारी बरोब्बर याच वेळी एक भिकारीण आपलं एक किरटं पोर खाकोटीला मारून दारात दे माय म्हणून उभी रहायची. मामा जेवायला बसलेला असायचा. आज्जी आम्हा पोरांना त्या बयेला एवढं देऊन ये म्हणून सांगायची. घरातलं शिळं शिल्लक असायचं ते आज्जी आणि मावशी दुपारी जेवायच्या. त्या बाईला आत्ता तव्यावरून उतरलेली पोळी नाहीतर भाकरी, ताजा भात, आमटी, भाजी असलं सगळं आम्ही पोचतं करून यायचो. ती बाई माझ्या डोक्यावर हात धरून काहीतरी पुटपुटायची. ती काय पुटपुटायची ते कधीच कळलं नाही. पण तिच्या डोळ्यांतली कृतज्ञता मला आजही आठवते. तिच्यापर्यंत ते गरमगरम जेवण पोचवताना आमचे इवले हात पोळायचे. मग आज्जी म्हणायची, “पोळला काय हात..? ये तूप लाव हाताला... आणि आ कर...” तोंडात तुपाची धार...

सुट्टी संपत आली की सगळेच जमायचे आज्जीकडे. मग दोन्ही वेळच्या जेवणाला १४-१५ माणसं तरी असायची. कितीही अगदी अंदाज बरोबर ठरला तरी एखाद-दोन पोळ्या, एखादी वाटीभर भात असली शिळवड प्रत्येक जेवणाला असायचीच. अश्यावेळी जेवायला बसलं की आज्जी आणि तिच्या मुली म्हणजे माझ्या मावश्या, आई यांच्यात नेहमी वादावादी व्हायची... शिळा भात आणि शिळी पोळी कोण खाणार यावरून. आज्जीला वाटायचं लेकी माहेरी आल्यात त्यांना शिळं कसं खाऊ घालायचं आणि लेकींना वाटायचं आई किती दिवस शिळं खाईल. आम्ही मुलं त्यांची चेष्टा करायचो. पण आता विचार केला की डोळ्यांत पाणी येतं... आज्जीने किती जणांना गरम गरम जेवू घातलं असेल आणि कितीदा तिच्या स्वत:च्या पोटात गरम गरम पडलं असेल? आज्जीच जाणे.

आज्जी काय आई काय त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्याही नकळत फार मोठा संस्कार पेरत होत्या. गरम गरम खा.. ताजं ताजं खा हा संस्कार. माझ्या नवऱ्याला, लेकीला गरम-गरम खाऊ घालताना या माय-मावश्या सतत आठवत राहतात. घरात उरलेली शिळासप्तमी आपण संपवून नवऱ्याला, लेकीला ताजं खाऊ घालताना आज्जी आठवते. मलाही कुणीतरी गरम-गरम खायला घातलंय. त्या माऊल्यांच्या उपकारांची परतफेड नाही करता यायची... वळचणीचं पाणी आढ्याला कसं जाईल...? मग आपणच आता आढा व्हायचं आणि वळचणीला पाणी देऊ करायचं...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर ! डोळ्यात पाणी आलंच शेवटी
आपल्या आयांनी आज्यांनी मावश्या/काकू नी अश्या कैक पोळ्या ताज्या गरम मऊ लुसलुशीत करून घरच्यांना आणि दारच्याना करून घातल्या असतील त्याला मोजदाद नाही _/\_
सुखात ,दुःखात ,आनंदात ,नैराश्यात, कामाच्या गडबडीत, आजारी, कंटाळलेली, वैतागलेली अश्या कोणत्याही क्षणी पोळ्या( अर्थात बाकी सगळा स्वयंपाक हि ) मात्र त्याच मायेने आपुलकीने करून वाढून देणारी आई आठवली ..

"आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई" असे कधीतरी घडून सुद्धा हे ऋण फेडता येईल कि नाही कुणास ठाऊक

मस्त लिहलस.
पोळी तव्यावरून पोळ्यांच्या डब्यात न जाता थेट माझ्या ताटात-> सुख अजुन काय वेगळ असत...<<+१११

या पोळ्यांचीच अजून एक आठवण... आई-बाबा माझ्याकडे ऑस्ट्रेलियात रहायला आले होते. तेव्हा ठरवलं रोज दुपारी दोघांना पानावर बसवून गरम गरम पोळ्या करून वाढायच्या. बाबा आरामात बसून आनंदाने जेवायचे. लेक करून वाढतेय याचं समाधान दिसायचं त्यांच्या चेहऱ्यावर पण आई मात्र फार अस्वस्थ असायची. “झालं का... बास मला.. ये तू आता.. तू बस... मी करते शेवटच्या पोळ्या... मला कधी घालता नाही आली तुला गरम पोळी रोजच्या रोज..” ही असली भूणभूण सतत मागून सुरू असायची. आता आई झाल्यावर कळतंय.. आईला खाण्यात नाही तर खाऊ घालण्यात समाधान असतं.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> घरोघरी मातीच्या चुली Happy

या पोळ्यांचीच अजून एक आठवण... आई-बाबा माझ्याकडे ऑस्ट्रेलियात रहायला आले होते. तेव्हा ठरवलं रोज दुपारी दोघांना पानावर बसवून गरम गरम पोळ्या करून वाढायच्या. बाबा आरामात बसून आनंदाने जेवायचे. लेक करून वाढतेय याचं समाधान दिसायचं त्यांच्या चेहऱ्यावर पण आई मात्र फार अस्वस्थ असायची. “झालं का... बास मला.. ये तू आता.. तू बस... मी करते शेवटच्या पोळ्या... मला कधी घालता नाही आली तुला गरम पोळी रोजच्या रोज..” ही असली भूणभूण सतत मागून सुरू असायची. आता आई झाल्यावर कळतंय.. आईला खाण्यात नाही तर खाऊ घालण्यात समाधान असतं.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> घरोघरी मातीच्या चुली Happy

खूप छान लिहिलंय.
माझ्या आजोळी अजूनही दूध/चहा "ऊन" प्यायचा असतो, तसंच पाणी "ऊन" आहे, तेव्हा लवकर आंघोळ करुन घ्यायची असते Happy

खूप हळवं करून सोडतं तुमच लिखाण....

अन्नपूर्णा होउन स्वयंपाकघराला आपल्या प्रत्येकाच्या मनात अशी ऊबदार , प्रसन्न , स्नेहल आठवणीची विशेष जागा निर्माण करणार्या माऊलींचे सानिध्य लाभलेले माय्बोलीवरच इतके सारे "गणगोतीय" पाहून एका कोकणातल्या घरात सुट्टीला एकत्र आलेल्या कुटुंबाचा "फील" आला !

Pages