Nat Geo...याचि देहि याचि डोळा (भाग १)

Submitted by nimita on 25 July, 2018 - 04:04

‘Once a year, go some place you have never been before.’

कधीतरी कुठेतरी दलाई लामा’ यांचं हे वाक्य वाचलं होतं आणि वाचल्या क्षणी ते मनात कोरलं गेलं…. मला मुळातच भटकंती करायला आवडते म्हणूनही असेल कदाचित !

शाळा कॉलेज मधे असताना महिन्यातून एकदा तरी मित्र मैत्रिणींबरोबर एखादा ट्रेक व्हायचाच. आणि लग्नानंतर तर माझ्यासाठी पर्वणीच होती.. दर दोन-तीन वर्षांनंतर नवीन जागा बघायची संधी मिळाली. Thankfully, माझ्या सारखीच नितीनला आणि आमच्या दोघी मुलींना ही प्रवासाची- भटकंती ची आवड आहे त्यामुळे आम्ही वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार एखाद्या नवीन जागी फिरायला जातो.

मागच्याच आठवड्यात आम्ही या वर्षीच्या आमच्या ट्रिपहुन परत आलो. या वर्षी आम्ही केनिया ला गेलो होतो….

तिकडची wild life, safaris, स्थलांतर करून येणारे प्राणी हे सगळं टीव्ही वर बऱ्याचवेळा बघितलं होतं. अगदी जवळून.... पण तेच सगळं प्रत्यक्ष बघायची इच्छा होती. ..अगदी ‘याचि देहि याचि डोळा’ ….आणि शेवटी या वर्षी तो योग जुळून आला.

आमच्या या Dream Vacation साठी आम्ही अगदी जय्यत तयारी केली होती. तिथे वापरण्यासाठी कोणती दुर्बीण योग्य राहील याची अगदी तपशीलवार माहिती काढून तशी दुर्बीण विकत घेतली. इतकंच नाही तर जास्तीतजास्त फोटोज् काढता यावे म्हणून प्रत्येकानी आपापल्या फोन मधली फोटो गॅलरी रिकामी केली .

आणि फायनली आम्ही मुंबई हून आदिसअबाबा मार्गे नैरोबी ला पोचलो.

नैरोबी च्या Jomo Kenyatta International Airport वर उतरल्यानंतर बाहेर येऊन जेव्हा आम्ही आमच्या टॅक्सी साठी थांबलो होतो तेव्हा एकदम सृष्टी (माझी मुलगी) म्हणाली,” आपल्या कडच्या सारखंच वाटतंय इथे सगळं!”

खरं म्हणजे मलाही जाणवलं होतं ते… पण हे ‘at home’ feeling नक्की कशामुळे होतं ते नव्हतं लक्षात येत.

पण नंतर संपूर्ण टूर मधे जेव्हा त्या दुष्टीनी बघायला आणि विचार करायला लागले तेव्हा हळूहळू कळायला लागलं.

तिथल्या लोकांची इंग्लिश बोलायची पद्धत बरीचशी आपल्यासारखी आहे.. म्हणजे इतर काही पाश्चिमात्य देशांतल्या लोकांसारखा heavy accent नाही जाणवत आणि त्यामुळेच की काय पण त्यांच्याशी बोलताना परकेपणाची भावना नाही वाटली….at least मला तरी हं !

सगळे लोक खूपच friendly आणि co operative आहेत.

तिथल्या गाड्या सुद्धा आपल्या सारख्याच रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालवतात. शक्यतो सगळे जण स्पीड लिमिट्स पाळतात… नाही तर पोलिस पकडतील ही भीती! पण दुसऱ्या दिवशी सकाळी नैरोबीहून Aberdare national park ला जाताना मला हायवे वर कुठेच पोलीस नाही दिसले. मी जेव्हा आमच्या जीपच्या ड्राइवर (आणि आमचा टूर गाईड) ला विचारलं तेव्हा तो म्हणाला,” असे सहजासहजी दिसत नाहीत ते! मोक्याच्या जागी टपून बसलेले असतात. आणि बऱ्याच वेळा तर इथल्या ‘मसाई’ जमातीतल्या लोकांच्या वेशभूषेत रस्त्याच्या कडेला उभे असतात; सावज दिसलं की प्रकट होतात!”

हे सगळं ऐकल्यावर वाटलं, " आपल्या कडच्या आणि इथल्या पोलिसांची ट्रेनिंग एकत्रच होते की काय??"

पोलिसांच्या भीतीमुळे अगदी रिकाम्या रस्त्यावर सुद्धा आमची जीप ८० च्या स्पीड नी चालली होती. पण त्यामुळे एक फायदा झाला.. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे नजारे अगदी नीट बघायला मिळाले.

मला खूपच आवडला तो प्रवास-

रस्त्याच्या दुतर्फा केळीच्या बागा, छोटी छोटी घरं, तुरळक वस्ती ….ते सगळं बघून मला आमच्या मामा आजोबांचं कोकणातलं घर आठवलं. आम्ही शाळेत असताना बऱ्याचदा आईबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो कोकणात. तिथे आजोबांच्या घरी पण त्यांची मोठी केळ्याची बाग होती.

वस्ती सोडून तसंच पुढे जात असताना अधून मधून ऊटी, कुन्नूर ची आठवण होत होती. आम्ही जेव्हा वेलिंग्टन ला होतो तेव्हा तिथून ऊटी ला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जशी हिरव्यागार गवताची कुरणं आणि निलगिरीची झाडं दिसायची तशीच इथेही होती. रस्त्याच्या दुतर्फा लांबवर पसरलेली माळरानं, लाल माती, मधे मधे घाणेरीच्या रंगीबेरंगी फुलांची झुडपं...काही ठिकाणी तर मला धोत्र्याची फुलं पण दिसली.

त्यात अधून मधून ठिपक्यांच्या रांगोळीसारखी छोटी छोटी घरं आणि गवतात चरणारी गाई गुरं !

अजून एक लक्षात येण्यासारखं साम्य दिसलं- तिथल्या गाई आणि शेळ्या मेंढ्या अगदी आपल्या इकडच्या सारख्याच होत्या. त्यांचं नुसतं रूपरंग च नाही तर एकूण रंगढंग पण अगदी आपल्या कडच्या जनावरांसारखे होते!

रस्त्याच्या बरोब्बर मधे घोळका करून उभं राहाणं, लांबून गाडी येताना दिसली की (मुद्दाम ? ) शांतपणे डुलत डुलत रस्ता क्रॉस करणं… त्यांच्या या आणि अश्या सवयी बघून मला नेहेमी वाटायचं की त्यांना विचारावं, “ अगं बायांनो, तुम्ही कधी ‘कुंभ मेळ्यात’ गेला होतात का? आणि तिथल्या गर्दीत तुमच्या आया-बहिणींपासून तुमची ताटातूट झाली का ? कारण तुम्ही रस्ता चुकून इकडे निघून आलात पण त्या सगळ्या तिकडेच राहिल्या!”

एखादं गाव जवळ यायला लागलं की लगेच कळायचं; रस्त्याच्या बाजूनी छोट्या छोट्या शेकोट्या पेटवून त्यावर मक्याची कणसं भाजणारे लोक दिसायचे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमधले लोकही थांबून आवर्जून त्यांच्याकडून ती गरमागरम कणसं विकत घ्यायचे. अगदी आपल्याकडच्या hill stations ची आठवण झाली ते बघून.

आमचा टूर गाईड खूपच अनुभवी होता आणि तितकाच बहुश्रुत देखील. एकीकडे गाडी चालवता चालवता बरीच माहिती सांगितली त्यानी… केनिया बद्दल, तिथल्या चालीरीती आणि संस्कृती बद्दल.

पहिल्याच भेटीत त्यानी स्वतःची ओळख करून दिली.. “My name is Wanjohi.” पण मी ऐकलं,” My name is नामजोशी”! …. बस्स्, तेव्हापासून संपूर्ण ट्रिप मधे इतरांसाठी जरी तो Wanjohi असला तरी माझयासाठी मात्र ‘नामजोशी’ च राहिला.

आमच्या जीप मधे आमच्या बरोबर एक बंगाली जोडपं पण होतं. त्या दिवसांमधे फुटबॉल वर्ल्ड कप च्या मॅचेस चालू होत्या. फुटबॉल आणि Bengalis यांचं किती घनिष्ट नातं आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.. आणि भरीस भर म्हणजे नामजोशी पण फुटबॉल चा दिवाना होता, हे कळताच आमचे 'बाबू मोशॉय' खूप खुश झाले. त्या दोघांच्या फुटबॉलच्या गप्पा खूप रंगायच्या. ज्या दिवशी मॅच असायची त्या दिवशी सकाळी ‘कोणती टीम जिंकणार ‘ याबद्दल दोघं पैज लावायचे ... आणि पैज पण साधी सुधी नाही बरं का! ‘जो हरेल त्यानी जीपमधून खाली उतरून सिंहाचा फोटो घ्यायचा’ ….

दुसऱ्या दिवशी सकाळी पैज हरलेल्याचा चेहेरा बघण्यासारखा असायचा!

पण झालं गेलं विसरून पुन्हा दोघंही नवीन पैजेकरता तयार असायचे.

आमच्या नैरोबी मधल्या हॉटेलच्या आसपास भारतीय लोकांची बसहत असल्याचं नामजोशी कडून समजलं. म्हणजे ते सगळे मूळचे भारतीय पण आता केनिया चे नागरिक आहेत.

त्याबद्दल सविस्तर माहिती देताना नामजोशी म्हणाला,”सन १८९० च्या सुमारास ब्रिटिश सरकारनी युगांडा आणि केनिया ला जोडणारी रेल्वे सुरू करायचं ठरवलं. पण केनिया च्या स्थानीय रहिवाश्यांनी त्यांचा निषेध व्यक्त करत त्या प्रोजेक्ट मधे काम करायला नकार दिला. यावर तोडगा म्हणून ब्रिटिशांनी भारतातून कामगार आणले आणि त्यांच्याकडून त्या रेल्वे लाईन चं काम पूर्ण करवून घेतलं.

काम पूर्ण झाल्यानंतर भारतात परत जायचं का केनिया मधेच स्थायिक व्हायचं याचा निर्णय त्यांनी भारतीय कामगारांवर सोडला. त्यावेळी बऱ्याच कामगारांनी तिथेच राहायचं ठरवलं. आणि अशा रितीनी ते केनिअन इंडियन्स झाले. आत्ताची ही त्यांचीच पाचवी पिढी आहे.

नामजोशी कडून अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली त्यावेळची….

जेव्हा त्या रेल्वे लाईन चं काम चालू होतं तेव्हा जंगलातले सिंह कामगारांवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचे. दिवसेंदिवस सिंहांचा हा उपद्रव वाढतच होता आणि त्यामुळे जीवाच्या भीतीनी कोणी काम करायला तयार नव्हते. यावर उपाय म्हणून ब्रिटिश आर्मी मधल्या कर्नल जॉन पॅटरसन ला केनियाला पाठवण्यात आलं. आणि त्यांनी एक एक करून त्या सिंहांचा नायनाट केला. त्यातलेच चार सिंह आजही न्यूयॉर्क मधल्या एक म्युझियम मधे ठेवण्यात आले आहेत.

१९८० च्या आसपास या विषयावर एक चित्रपट ही बनवण्यात आला होता- ‘The ghost and the darkness’. आम्ही हा सिनेमा नक्की बघावा असा नामजोशी चा आग्रह होता. वेळात वेळ काढून बघणार आहे मी तो!

केनिया मधे स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी तिथल्या खाद्य संस्कृती वरही आपली छाप सोडली आहे. पोळी, समोसा, तंदुरी खाद्यपदार्थ, याच बरोबर भारतीय मसाले, वेगवेगळी कडधान्यं तिथले लोक अगदी आवडीनी आणि चवीनी खातात. नामजोशी ला पण ‘lentil curry’ (म्हणजे आपली उसळ) आवडते असं त्यानी अगदी आवर्जून सांगितलं.

‘केनिया’ या नावाबद्दलही बऱ्याच दंतकथा आहेत. त्यातली एक म्हणजे-

एकदा एक जर्मन प्रवासी तिथे आला आणि त्या प्रदेशातला सगळ्यात मोठा डोंगर बघून त्यानी तिथल्या स्थानीय लोकांना त्या डोंगराचं नाव विचारलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं,” Kii Nyaa” म्हणजे स्थानीय भाषेत ‘ Mountain of the ostrich’. पण त्या जर्मन व्यक्तीला ऐकू आलं,” kenya’ आणि अशा प्रकारे केनिया हे नाव रूढ झालं.

जीप मधून जाताना रस्त्याच्या कडेला बरेचसे छोटे छोटे ‘कार वॉश पॉईंट्स’ दिसले. म्हणजे केनिया ची लोकसंख्या आणि त्यातही ज्यांच्याकडे गाड्या आहेत असे लोक बघता, सरासरी ‘एका गाडी करता एक कार वॉश पॉईंट’ असा हिशोब लागेल….त्याबद्दल जेव्हा मी नामजोशी ला विचारलं तेव्हा त्यानी सांगितलं,” इथे छोट्या छोट्या गावांमधले बरेच तरुण अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून मग ते हाय वे वर ही अशी दुकानं थाटतात. फक्त एक पाण्याचा पाईप आणि गाडी पुसायला कापड एवढीच काय ती इन्व्हेस्टमेंट!”

हे सगळं ऐकून वाईट वाटलं.. पण तेवढ्यात एक मजेशीर विचार ही डोकावून गेला…. वाटलं, या लोकांनी जर रशिया मधे जाऊन राहायचं ठरवलं तर बिचाऱ्यांची दुकानं लवकरच बंद पडतील. कारण तिथल्या लोकांना स्वतःच्या गाड्या धुवून पुसून स्वच्छ ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये… म्हणजे त्यांच्या धुळीनी माखलेल्या गाड्या बघून माझा तरी असाच समज झाला होता!

अजून एक वारंवार नजरेस पडणारं दृश्य म्हणजे - गावांत मार्केट मधे चौका चौकात उभ्या असलेल्या मोटरसायकल टॅक्सिज् . अशा टॅक्सिज् मी आपल्याकडे गोव्यात पाहिल्या होत्या. केनिया मधे या टॅक्सी ला ‘बोडा बोडा’ म्हणतात. जितक्या रंगीबेरंगी गाड्या तितकेच रंगीबेरंगी कपडे घातलेले ड्रायव्हर्स - गर्दीतूनही उठून दिसतील असे!

मोक्याच्या ठिकाणी या गाड्यांकरता ‘बोडा बोडा शेड्स’ उभारण्यात आल्या आहेत. पण बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला पॅसेंजर ची वाट बघत ओळीनी थांबलेल्या बोडा बोडा आणि त्यांचे चालक ही दिसले. आपल्या कडच्या रिक्षा स्टँड सारखे!

एकीकडे नामजोशी च्या गप्पा ऐकत मी आजूबाजूला दिसणारी दृश्यं नजरेत साठवून घेत होते. मधे मधे चालत्या जीपमधून जमतील तसे फोटो पण काढत होते.

या अश्या खूपच इंटरेस्टिंग दृक्श्राव्य प्रवासानंतर आम्ही एकदाचे Aberdare country club ला पोचलो.

तिथे मुख्य गेटमधून आत गेल्या वर समोर बघितलं तर एक हरीण उभं होतं, आमच्या गाडीकडेच बघत होतं. जणू काही आमचं स्वागत करत होतं.

तिथल्या परिसरात बरीच हरणं,मोर वगैरे अगदी स्वच्छंद विहार करत होते.

त्यांना असं माणसांच्या गर्दीत ही बिनघोर फिरताना बघून एक जाणीव झाली...आता आपण या प्राण्यांच्या विश्वात आलोय,आपण त्यांचे पाहुणे आहोत. इथे आपले नियम, आपले शिष्टाचार बाजूला ठेवून निसर्गाशी एकरूप व्हायला पाहिजे.
तिथे लंच केल्यावर मग नामजोशी च्या सांगण्याप्रमाणे आम्ही आमचं सगळं सामान तिथल्या क्लोक रूम मधे ठेवलं आणि फक्त एक छोटी overnight सामानाची बॅग घेऊन पुढे Aberdare national park च्या दिशेनी कूच केलं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख! मस्त सुरुवात. ब्रिटीशांचे तिथे राज्य असल्याने त्यांचे नियम भारतासारखेच इतर ठिकाणी पण लागु झाले. जसे डावीकडुन गाडी चालवणे वगैरे. आणी हो तो सिनेमा मी पाहीलाय. अगदी अंगाचा थरकाप उडतो पहातांना. भयानक जीवघेणा वाटतो तो. निदान रात्री तरी बघु नका.

बाकी पुढील वाचायला उत्सुक.

त्यावरती एक पुस्तक आहे
स्तव्हो चे नरभक्षक सिंह
त्यात या दोन सिंहाची कशी शिकार केली याचे सद्यांत वर्णन आहे. लहानपणी चे माझे आवडते पुस्तक.
पण पॅटर्सन आणि जिम कॉर्बेट यांच्यातला फरक जाणवला की पटर्नस अनेकदा हौस म्हणून शिकार करत आणि तीही भरमसाठ

फोटो हवेत पण... स्मिता ,
बरेच फोटो आहेत. इथे अपलोड होत नव्हते. माझ्या ब्लॉग वर फोटो सहित लिखाण टाकले आहे. https://priyadivekarjoshi.wordpress.com
माझ्या ब्लॉग ची लिंक

छान निमिता Happy

१९९६ चा का हा सिनेमा??
आणी त्या सिनेमात आपला गुलशन ग्रोवर पण आहे.>> त्यात ओम पुरी दिसला.

ब्लॅाग पाहिला - त्यातले फोटो ( .png) ७००-८०० केबीचे मोठे आहेत पण धुरकट का दिसतात? मला तरी तसे वाटतात.
लेख मजेदार होणार.