बाबूजी, भावगितांच्या क्षितीजा वरील ध्रुवतारा!

Submitted by Charudutt Ramti... on 24 July, 2018 - 21:48

आज २५ जुलै, कै. सुधीर फडके उर्फ 'बाबूजिं'चा जन्मदिवस. यंदाचे वर्ष हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमीत्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन बाबूजी प्रेमी सध्या करत आहेत. गेल्या शुक्रवारी २० जुलै रोजी, पुण्यात 'भरत नाट्य' मधे 'क्षितिज' नावाच्या वाद्य वृंदाने 'एक धागा सुखाचा' असे शीर्षक देऊन बाबूजिंच्या गाण्यांचा एक बहारदार कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमा नंतर, क्षितिज वाद्यवृंदाचे संचालक आणि गायक श्री. गिरीश पंचवाडकर ह्यांना, त्यांच्या फेसबुक वॉल वर लिहिलेले पत्र, इथे पुन:प्रकाशित करत आहे, आज बाबूजिंच्या वाढ दिवसाचे निमित्त साधून…

---------------------------------------

गिरीश सर,

परवा तुमच्या 'क्षितिज'चा बाबुजिंच्या गाण्याचा भरतनाट्य येथे अत्यंतिक रंगलेला सुरेल असा कार्यक्रम पाहिला आणि कित्येक दिवसांनतर, खरं तर कित्येक वर्षानंतर, माझे मन भूतकाळात रममाण झाले. स्वरतीर्थ सुधीर फडक्यांची गाणी! मग ती प्रेयसी ला मिलनाचे संकेत देणारी द्वन्द्वगीते वा युगुलगीते असोत अथवा त्यांच्या गीतरामायणातील सात्विकशी ती पदे, ती सगळी निवडक गाणी आकाशवाणी च्या 'सांगली' केन्द्रावर सकाळी साडे’सहा’ ला 'न' चुकता लागत. कित्येक वर्षे. अगदी रोज नव्हे तरी सप्ताहातील तीन चार दिवस तरी नक्कीच. ती मधुर गाणी ऐकत ऐकतच आम्ही कढत्त-कढत पाण्याचे तांबे थंडीच्या दिवसात स्वत:च्या माथ्यावर ओतून घेत असू आणि पंच्याने खसखसा ओले अंग पुसत तो शाळेचा खाकी चड्डी आणि पांढरा शर्टवाला यूनिफॉर्म अंगी चढवत असू. तिकडे आई सुद्धा स्वयंपाकघराच्या ओट्यावर आमच्या साठी ‘मधल्या सुट्टीचे’ डबे भरत असे तेही ती बाबुजिंची गाणी गुणगुणतच. गाण्याचे आणि स्वरांचे ‘संस्कार’ ‘संस्कार’ म्हणतात ते ह्याहून वेगळे नसावेतच मुळात.

नंतर पुढे कधीतरी दस-या दिवाळीच्या खरेदी निम्मित्त फिलिप्स चा ‘टू इन वन’ आला घरात...आणि मग आकाशवाणी वरील बाबुजिंची गाणी, कधीतरी व्हिनस किंवा एच. एम. व्ही. च्या नव्वद मिनिटांच्या ‘ब्लॅंक’ कॅसेट वर आम्ही ती रेकॉर्ड करायला सुरू केली. त्या नंतर कित्येक वर्षे मग ती गाणी आम्ही, ती घरीच रेकॉर्ड केलेली कॅसेट परत परत, उलट सुलट, करून फिरवून फिरवून, ऐकत असु...शेवटी शेवटी तर त्या कॅसेट ची मॅग्नेटिक स्ट्रिप अक्षरश: फिक्कट झाली आणि ती कॅसेट स्पष्ट ऐकू यायचीच शेवटी बंद झाली, इतक्या वेळेला ती अवीट गाणी ऐकली आम्ही. अगदी अगदी अलीकडे पर्यंत ती कॅसेट आमच्या कडे होती...टेप रेकॉर्डर वजा कॅसेट प्लेयर कधीच रविवारच्या रद्दीच्या कोणत्या तरी गठठयाबरोबर किलो च्या भावात विकला गेला, पण ती कॅसेट मात्र तशीच होती एका जुन्या फोटोंच्या आल्बम शेजारी. अगदी अगदी अलीकडे पर्यंत, बुकरॅक वर एका काचेच्या अनिवर्सरी ला गिफ्ट आलेल्या महागड्या परफ्यूम च्या नक्षीदार बाटली शेजारी निवांत पणे विसावलेली! त्या बाटलीतले अत्तर कसे हवेच्या एकनएक अणू-रेणू ला स्वत:चा परिमळ देत त्या कुपी च्या जवळ येणा-यास सुखावून टाकत असे, अगदी तसेच ती ध्वनीफीत ही आम्हाला अगदी सुखावून टाकत असे, केवळ तिच्या अस्तित्वाने...!

आज तुमच्या कार्यक्रमाला आलो, आणि ते सर्व जुने बाबुजिंच्या गाण्याने संमोहित झालेले दिवस स्मृति पटलावर तरल पणे एक एक असे करून हजेरी लावून गेले. लहान पणी जसा आम्ही ‘ध्रुव तारा’ रात्री च्या वेळी अंगणात चटईवर बसून फक्त लांबून पाहत असू आणि त्या ध्रुव ता-या ची गोष्टीच फक्त आज्जि आजोबांच्या कडून ऐकत असू...तसेच बाबूजी उर्फ सुधीर फडके हा ही आमच्या साठी मराठी संगीतातल्या क्षितीजी कित्येक वर्ष तळपलेला पण आम्ही फक्त लांबूनच पाहिलेला एक ध्रुव तारा. खरं तर 'पाहिलेला' नव्हेच, फक्त 'ऐकलेला', आणि तोही केवळ रेडिओ आणि टेप च्या माध्यमातून. तुम्ही जसे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि त्यांना समक्ष समोर बसून ऐकलेत तसे भाग्य लाभले नसेल कदाचित आमच्या पिढीला...पण ती आमच्या आयुष्यातली उणीव मात्र काल काही प्रमाणात तुम्ही नक्कीच भरून काढलीत. सचिन तेंडुलकरला ग्राऊंड वर चोफेर फटके मारताना पहिले की कसे पंचाहत्तर ऐन्शि च्या घरातील बुजुर्गशा क्रिकेट प्रेमींना ‘सर डॉन ब्रॅडमनच खेळतोय की काय?’ असा भास व्हायचा...तसाच तुमचा आवाज ऐकला आणि आपण क्षणभर बाबुजिंची जुनी कॅसेटच ऐकतोय की काय असा भास झाला इतके तुमच्या गाण्यात आणि त्या कॅसेट मध्ये अनोखे साम्य!

ग. दि. मा. आणि बाबुजिंच्या गीत-रामायणातील नुसती झलक म्हणून तुम्ही “दोष ना कुणाचा…पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा” हे ऐकवलत आणि कालच्या मैफिलीत तुम्ही आम्हा सर्व उपस्थित रसिकांच्या चक्क बोटाला धरून सुधीर फडके नामक स्वर:ब्रम्हाच्या दर्शनासाठी अक्षरश: ह्या मराठी गाण्याच्या त्यांच्या हेमाडपन्थी बांधकाम असलेल्या मन्दिराच्या अगदी गाभा-या आम्हाला पर्यंत घेऊन गेलात. इकडे तुमचा हा बाबूजिंची रेखीव स्वरमूर्ती कोरण्याचा सोहोळा सुरू असताना, आशाबाईंच्या बाबुजिंच्या गाण्यातल्या रंगपेटीतील एकेक रंग कॅनव्हास वर भरण्याचे काम तिकडे सौ. शीतल पंडित करत होत्या. त्यांना तर आशाबाई स्वत: समोर बसवून एक एक ताना शिकवून "हं..जा आता म्हण..." असं म्हणून कार्यक्रमाला पाठवतात की काय अशी शंका यावी इतकी ह्या मनस्वी गायिकेची बाबुजिंनी बांधलेल्या चालीतल्या एकेका गाण्याची तयारी. सर्वच अजब आणि नवल वाटावं असं ह्या मैफीलितल्या स्वरकुपीतले एकेक रसायन. धाग्यात माळलेल्या दर दोन सोन्याच्या मण्यांमधे एक टपोरा मोती गुंफावा तसा दोन गीतांच्या मधे ओवलेल्या कौस्तुभ गोडबोल्यांचा निवेदनातून साकार केलेल्या बाबुजिंच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दलचा आलेख तर निव्वळ अद्वितीयच. त्यांच्या ' जितके दूराग्रही बाबूजी तितकेच स्वराग्रही बाबूजी' अश्या निरूपमेय शब्दकोट्यां मधून व्यक्त झालेले त्यांचे व्यक्तीचित्र केवळ शब्दातीत. मुळातच वेगळ्या पातळी वर सुरू झालेल्या ह्या बैठकीची कौस्तुभजीन्नी केलेल्या अस्खलीत सूत्र संचलनामुळे, पुढे ह्या मैफिलिने अपूर्व अशी उंची गाठली. आणि वर तुमच्या ह्या अमोघ सुरावटीला 'अक्षय'ताला ची लाभलेली साथ! एकंदरच हा प्रवास फारवेळ क्षितिज समांतर न रहाता हा स्वरगरूड आकाशाला गवसणी घालणारी उंच अशी एक भरारी घेणार हे निश्चित.

बाबूजिंच्या कालच्या सर्व गाण्यांना तुम्ही व अख्या: ‘क्षितिज’ च्या वाद्यव्रुन्दाने दिलेल्या न्यायाबद्दल 'ह्या बाबुजिंच्या अस्फूटश्या पण निस्सीम अश्या माझ्या सारख्या ह्या एका फॅन फॉलोअर कडून ही मनस्वी पण तरीही अपुरीच पडणारी अशी ही छोटीशी शब्द-दाद’. खरे सांगायचे तर बाबुजिंचे फॅन फॉलोवर वगैरे नसतातच मुळी. असतात ते फक्त बाबुजिंनी स्थापन केलेल्या स्वर:पंथाचे पान्थस्थ. फरक फक्त इतुकाच, की तुम्ही त्या पंथाची दिंडी घेऊन पुढे निघालात आणि आम्ही त्या दिंडीचे वारकरी बनून तुमच्या मागे मागे निघालो आहोत.

चारूदत्त रामतीर्थकर,
२२ जुलै २०१८, पुणे

---------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. अशा प्रकारचे कार्यक्रम मराठी चॅनल्स वर व्हायला हवेत. पुर्वि दूरदर्शन वर व्हायचे, हल्ली कल्पना नाहि.

गाजलेल्या भाव/चित्रपट गीतांबरोबरच गीतरामायणामुळे बाबूजी मराठी माणसाच्या हृदयात आहेत. बाबूजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनोहर कविश्वर यांनी श्रीकृष्णावर रचलेली हि दोन भावगीतं, माना मानव वा परमेश्वर आणि कर्तव्याने घडतो माणूस, इथे द्यावीशी वाटतात...

छान लेख.

कर्तव्याने घडतो माणूस - हे अतिशय सुंदर गाणे आहे. प्रचंड आवडते मला.

मला एकूण सुधीर फडक्यांची भावगीते फारशी आवडत नाहीत. पण भक्तीगीते, काही चित्रपटगीते, ऐतिहासिक संदर्भातली गाणी किंवा 'श्रमिक हो घ्या इथे विश्रांती' सारखी गाणी खूप आवडतात. अजूनही अनेकदा ऐकतो.

मात्र त्यांचे गणपतीवर एकही लोकप्रिय गाणे नाही याचे कायम आश्चर्य वाटत आले आहे.

त्यांचे संगीत असलेली इतरांची गाणीही खूप आवडतात. 'सुवासिनी' मधली आशा भोसलेची गाणी, किंवा "उठ पंढरीच्या राजा" वगैरे गाणी.

बालपणीच्या अनेक पहाटवेळा बाबूजी सुधीर फडके यांच्या आवाजानेच भारलेल्या असायच्या. घरी सकाळी नित्यनेमाने रेडीओवर भक्तीसंगीत लागायचेच (लेखात ज्या सांगली आकाशवाणीचा उल्लेख आहे तिच्याशी त्या काळात अनेकांचे भावनिक नाते जोडले गेले होते). बाबूजी गेले तेंव्हा "पापण्यांत गोठवली मी नदी आसवांची" असा एसेमेस सर्वत्र फिरत होता. त्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले जात होते. आजकाल कलाकारांना एखादे फास्टफूड टाईप ढिंच्याक गाणे बनवून मार्केटिंगच्या जोरावर सोशल नेटवर्कवर लाखो कोटी फ्यान मिळवणे बरेच सोपे झाले आहे. औटघटकेची कृत्रिम प्रसिद्धी. पण कित्येक दशकाहून अधिक काळ श्रोत्यांच्या ह्र्दयात इतरांहून लाखोपटीने वरचे स्थान मिळवणारे बाबुजींसारखे गायक होणे सोपे नाही. त्यासाठी त्यांनी खूप खडतर तपश्चर्या आणि प्रवास केलेला होता.

गाणी आठवावीत तितकी कमी आहेत. अवीट गोडीचे "संथ वाहते कृष्णामाई", "त्या तरुतळी विसरले गीत" हि काही ह्रदयाच्या कप्प्यातली. गदिमां आणि बाबूजी यांच्या गीतरामायणाने तर इतिहास घडवला. सिनेमात सुद्धा या दोघांनी "फिरत्या चाकावरती देसी" सारखी अजरामर गाणी निर्माण केली. "ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा" कित्येक वर्षे विस्मरणात गेले होते. कुठूनसे कधी पुन्हा जेंव्हा कानावर पडले तेंव्हा क्षणभर बालपणीची ती पहाटच पुन्हा एकदा परतल्यासारखे वाटले होते.

>> 'श्रमिक हो घ्या इथे विश्रांती' सारखी गाणी खूप आवडतात. अजूनही अनेकदा ऐकतो.

मला चांगलं आठवतंय हे गाणे सांगली आकाशवाणीवर पूर्वी (पंच्याऐंशीच्या आसपास) आठ चाळीस ते नऊ जो गाण्यांचा कार्यक्रम असायचा त्यात हे हमखास लागायचेच Happy "मानवतेचे मंदिर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती..." अशी सुरवात.

माना मानव वा परमेश्वर या गाण्यातल्या विशेषकरून या ओळी ज्या पद्धतीने गायल्या आहेत त्याला तोड नाही. केवळ आणि केवळ अप्रतिम. पहिल्या दोन ओळी विमानाने टेकऑफ घ्यावा तशा आणि नंतरची ओळ म्हणजे राजहंसाप्रमाणे हवेत ते तरंगत राहावे तसा भास होतो...

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन मी कलंक हा धरितो

ज्योतीकलश छलके
राजहंस सांगतो
थकले रे नंदलाला
गीतरामायणातली जवळजवळ सगळीच
या गाण्यांसाठी बाबुजी अतीप्रचंड आवडतात.

छान लेख !
` एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात ' हे पण अतिशय सुरेख (ल) आहे.

"मानवतेचे मंदिर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती..." अशी सुरवात. >>> हो बरोबर. हे गाणे 'ते माझे घर' मधले आहे असे दिसते. कोणत्यातरी चित्रपटातले आहे हे माहीत होते. हे वारकर्‍यांवर असावे. भागवताची ध्वजा फडफडे - असे उल्लेख, "पथिक हे परंपरा सांगती" वगैरे.

हे अजून एक गाणे प्रचंड आवडते. 'सत्य शिवाहून सुंदर हे'. अगदी लहानपणी माझी आजी आणि आणखी कोणाबरोबरतरी 'ज्योतिबाचा नवस' बघायला पुण्यात 'विजय' ला गेलो होतो. काहीतरी ग्रामीण अ‍ॅक्शनपॅक्ड कथा असलेला चित्रपट आणि त्यात एकदम वेगळेच वाटणारे हे गाणे होते इतकेच लक्षात होते. आता हे गाणे एका झटक्यात त्या आजीची आठवण आणि एकूणच एकदम नॉस्टॅल्जिक करेल असे तेव्हा कधी वाटले नसेल Happy हा चित्रपट फ्लॅशबॅक मधे असावा. कारण मागे चंद्रकांत (की सूर्यकांत? अजूनही गोंधळ होतोच Happy ) फोटोत आहे - ती कथा नंतर उलगडत असेल.

भावगीते फारशी आवडत नाहीत, पण या गाण्याचे संगीत आणि चाल फार सुरेख आहे. विशेषतः सुरूवातीचा पीस

प्रणयगीतात या गाण्याचा उल्लेख व्हायलाच हवा - सखी मंद झाल्या तारका. हे गाणं पं. भिमसेन जोशींच्या आवाजातहि आहे, पण मला बाबूजींचं जास्त आवडतं... Happy

>> सखी मंद झाल्या तारका. हे गाणं पं. भिमसेन जोशींच्या आवाजातहि आहे, पण मला बाबूजींचं जास्त आवडतं...
+१११

अजून काही खास ठेवणीतली गाणी:

पर्णपाचू सावळा सावळा मधले "चराचरातील पांडुरंगा", "पाखरांचा हसरा मेळा" असे काही शब्द केवळ आणि केवळ बाबूजींनीच गावेत.

तुझे गीत गाण्यासाठी मधलं "शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा" ऐकताना मन:चक्षुंसमोर अथांग दृश्य उभे राहत असे

तुझे रूप चित्ती राहो यातलं "उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा" ऐकताना सद्गदित व्हायला होतं

रवी आला हो हे ऐकतच लहानपणी अनेकदा जाग आली आहे. आजही हे ऐकताना अजूनही सकाळची हुडहुडी भरते.

ही सही आहेत! यातले 'रवी आला' कधी ऐकल्याचे आठवत नाही. पण शुभ्र तुरे माळून आल्या.... एका झटक्यात थेट शाळेच्या दिवसांतील एखाद्या पहाटे सहा-सव्वासहा वाजताच्या वातावरणात पोहोचवते Happy

पर्णपाचू सावळा सावळा तर अत्यंत आवडते आहे.