जागीर

Submitted by पायस on 20 July, 2018 - 02:28

१९८१ साली इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क आला आणि अचानक खजिना-शोध या जॉनरला नवचैतन्य प्राप्त जाहले. त्याला फॉलो अप म्हणून स्पीलबर्गने १९८४ साली टेंपल ऑफ डूम रिलीज केला. एवढे होत असताना बॉलिवूडने मागे राहणे हे बॉलिवूडच्या शान के खिलाफ असल्याने कोणीतरी हे फेकलेले गाँटलेट उचलणे गरजेचे होते. त्यात प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला रुचेल असा सिनेमा बनवण्याचा अनुभव असणेही गरजेचे होते. म्हणून "लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्‍या प्रमोद चक्रवर्तीने त्याच वर्षी जागीर नामे चित्रकलाकृती निर्मिली. या महान कार्याचा आढावा घेण्याकरता हा चिरफाड, आपलं रिव्ह्यू प्रपंच!

१) रम्य ही स्वर्गाहून जागीर

मांगा इन थिअरी अ‍ॅन्ड प्रॅक्टिस या अप्रतिम पुस्तकामध्ये प्रसिद्ध लेखक हिरोहिको अराकी सांगतो की तुमच्या कथेचा मुख्य मुद्दा कथा सुरू झाल्या झाल्या स्पष्ट झाला पाहिजे. जेव्हा अराकी त्याची उमेदवारी करत होता तेव्हाच्या काळात सुद्धा आमच्या चक्रवर्तीकाकांच्या डोक्यात हा मुद्दा पक्का होता. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता ते आपल्याला खजिना दाखवून मोकळे होतात. कारण खजिना किती आहे हे महत्त्वाचे नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा आहे. मग खजिन्याबद्दल रहस्य निर्माण करून काय फायदा?

तर कमल कपूर (अमिताभच्या डॉनमधला नारंग) शूरवीर सिंह म्हणून अंजानगढचा राजा दाखवला आहे. ज्याला इंग्रजीत प्लूम्ड टर्बन म्हणतात आणि ज्याला आपण पीस खोवलेला फेटा म्हणतो असा फेटा, जोधपुरी सूट आणि गळ्यात मोत्यांच्या माळा असल्याने त्याच्या राजेपदावर शिक्कामोर्तब होते. राजा असूनही बिचार्‍याकडे एक जागीरच काय ती असते. त्याचे राज्य नक्की कुठे असते असे भौगोलिक प्रश्न व्यर्थ आहेत. कारण तो कोणत्या तरी मोठ्या शहराच्या जवळ राहत असतो ज्याच्यापासून थोड्याच अंतरावर नदी, जंगल, माळरान, डोंगर, दर्‍या सर्व काही असते यापेक्षा जास्त माहिती चक्रवर्तीकाका आपल्याला देत नाहीत. याच डोंगर दर्‍यांमध्ये कुठेतरी त्याचा राजवाडा असतो. तिथेच कुठेतरी एक पहाडी असते. त्या पहाडीच्या खाली शाही खजिना असतो.

सिनेमा सुरु होतो तो कमल कपूर खजिन्याच्या खोलीत उभा राहून शंकराच्या मूर्तीशी गप्पा मारत असतो. टेंपल ऑफ डूम ला उत्तर द्यायचे असल्याने खजिन्याच्या खोलीला मंदिराचे स्वरुप दिलेले आहे. त्याच्या दरवाज्यावर सात घंटा टांगलेल्या आहेत. खजिना म्हणून जेवढं मध्यम वर्गीय बंगाल्याला सुचू शकतं तेवढं दाखवलेलं आहे. इथे वाचकांनी नोंद घ्यावी की याच व्यक्तीने धर्मेंद्राचा अलिबाबा और चालीस चोर बनवला होता. असो, तर कमल कपूर सांगत असतो की त्याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेला असल्यामुळे तो आता खजिन्याची जबाबदारी राजकुमारावर सोपवण्याच्या विचारात आहे (इथे मूर्तीच्या चेहर्‍यावर बरी ब्याद टळली असे भाव). तर त्याला आशीर्वाद दे इ. इ. मूर्तीच्या मनातही बहुधा प्रेक्षकाच्या मनात चमकून जातो तोच प्रश्न येतो - ते आशीर्वाद देतो मी पण ज्याला द्यायचा तो राजकुमार कुठे आहे? याला उत्तर म्हणून कमल कपूर घंटा वाजवतो आणि कुठून तरी एक गरुड पैदा करून बाहेर पडतो.

हिंदी सिनेमात प्राणी-पक्षी अमर्यादित प्रमाणात चतुर असल्याने कमल कपूर सारासार विचार करून राजकुमार खजिन्याची जबाबदारी घेईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी बाजबहादूर शमशेर असे भरभक्कम नाव असलेल्या त्या गरुडावर टाकतो. त्याला हे माहित नसते की आपल्या गरुडावर कोणीतरी नजर ठेवून आहे. तो असतो डाकू लाखन सिंह अर्थात अमरीश पुरी. अमरीश पुरीला या खजिन्यात रस असतो पण अंजानगढचा भूगोल समजायला फारच क्लिष्ट असल्याने त्याला दुर्बिणीतून ती पहाडी दिसत असूनही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नकाशाची गरज असते. शूरवीर सिंगचा भाऊ दिगंबर सिंग (सुब्रतो महापात्रा, सत्यम शिवम सुंदरम मधला शास्त्री) हा अमरीश पुरीला जाऊन मिळालेला असतो. तो खजिन्याच्या अर्ध्या हिश्श्याच्या बदल्यात नकाशा कुठे आहे हे सांगायला तयार होतो. नकाशा एका लॉकेटमध्ये असतो जे कमल कपूर घालून फिरत असतो. अमरीश पुरी लगेच ते लॉकेट ताब्यात घेण्यासाठी अंजानगडाच्या हवेलीकडे कूच करतो.

2) प्राणिमात्रांचे ऋण

2.1) शाही उपसर्गाची संकल्पना

दिगंबरच्या दगाबाजीची कल्पना नसलेला कमल कपूर निवांतपणे प्राणशी गप्पा मारत असतो. प्रत्येक शाही खानदानाचा नोकर असलाच पाहिजे या नियमानुसार प्राण मंगलसिंग नावाने शाही नोकर दाखवला आहे. राजकुमार मोठा होईपर्यंत शाही खजिन्याचे रहस्य आणि नकाशावाल्या ‘लाकट’ ची जबाबदारी कमल कपूर प्राणवर सोपवतो.
याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की अशा सिनेमात जर शाही हा उपसर्ग नावामागे लावला असला तर तो/ती बाय डिफॉल्ट भारी आणि मरणार नाही हे फिक्स असते. म्हणून राजकुमार कधी मरत नसतात कारण उनके रगों में शाही खून दौडत असते. दुसरं म्हणजे जोवर उघड उघड शाही हा उपसर्ग प्रयुक्त होत नाही तोवर शाही उपसर्गाची सुरक्षा प्राप्त होत नाही. तिसरं म्हणजे या उपसर्गाची प्रयुक्तता तुम्ही स्वतःकरिता करून उपयोग नाही. अन्यथा आत्मप्रौढीचा नियम या उपसर्गाच्या सुरक्षाचक्राचा भेद करतो. चौथे म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या शाही वस्तूची जबाबदारी असली तर तुम्ही शाही राजदार बनून तुम्हाला हा नियम लागू होतो. कमल कपूर शाही राजा नसल्याने तो मरणार, दिगंबरमध्ये शाही खून असले तरी त्याचा प्रत्यक्ष उल्लेख न झाल्याने तो मरणार आणि प्राणकडे शाही खजिन्याचा नकाशाचे शाही रहस्य सोपवले असल्याने तो जगणार हे नक्की झाले.

2.2) मूर्ख राजाकडे नोकरी करू नये

कमल कपूर अशक्यप्राय मूर्ख दाखवला आहे. अमरीश पुरी राजवाड्यात येतो. त्याला ते लाकट हवे असते. कमल कपूर विचारतो की तुला कोणी सांगितलं, लगेच मागून दिगंबर सिंग म्हणतो की मी. त्या दिवशी तू मला ५००० रुपये द्यायला नकार दिलेला आता मला अमरीश पुरी 5 कोटी देणार आहे. थोडं गणित करूयात. सिनेमा १९८४ चा. यानंतर तरी पंचवीस तीस वर्षे निघून जातात (ही कमीच आहेत. प्रत्यक्षात धर्मेंद्र पन्नाशीचा दिसतो). दिगंबरला खजिन्याचा अर्धा हिस्सा मिळणार म्हणजे खजिन्याची तेव्हाची किंमत १० कोटी रुपये. सध्याच्या भावाने तरी ५०० कोटी रुपये. हा आकडा नंतर कामी येईल.

५००० हजार देऊन जे टाळता आले असते ते न टाळल्याचा मूर्खपणा लपवण्याकरिता कमल कपूर विषय दगाबाजीकडे वळवतो. त्यावर अमरीश पुरी म्हणतो "आज के जमाने में वफादारी की उम्मीद तो आजकल सिर्फ कुत्ते से की जा सकती हैं. फिर ये तो इन्सान हैं."

इथे मौका देख के संकलक चौका मारतो. कट टू वफादार प्राण. प्राण तिकडे राजकुमारच्या गळ्यात ते लाकट टाकून त्याला चेतक नावाच्या घोड्यावर बसवून जायला सांगतो. इथे राजकुमारचे नाव प्रताप ठेवून पोएटिक जस्टिस साधण्याची संधी दिग्दर्शक दवडतो. चेतकला एस पी साबचे घर ठाऊक असल्याने प्राण सर्वकाही समजावणारी चिठ्ठी देण्याचे काम घोड्याला सांगतो. घोडासुद्धा समजूतदारपणे मान हलवतो. मग राजकुमार आणि घोडा एस पी इफ्तेकारच्या घराच्या दिशेने पळतात. इथे प्राणच्या मुलाकडे घोड्याइतका समजूतदारपणा नसल्याने तो फक्त चड्डी घालून हिंडत असतो. मग प्राण त्याला राजकुमारचे भरजरी कपडे घालायला देतो.

इकडे लॉकेट देत नसल्याने लाखन आणि दिगंबर राजावर बंदूक ताणून उभे असतात. तेवढ्यात प्राण मध्ये पडतो. प्रजा का सबसे बडा खजाना कमल कपूर असल्याचे सांगून तो तसेच गरुडाच्या आकाराचे नकली लॉकेट देतो. कधीतरी महाराज आपल्याला त्यांच्या गळ्यातले लॉकेट देतील आणि ते शत्रूला हवे असू शकते म्हणून नकली लॉकेट बनवून ठेवावे एवढा अंतर्यामी प्राण असतो. म्हणून दिगंबर आपण राजा शूरवीर सिंगचेच बंधुराज असल्याचा पुरावा देत केवळ ते गरुडाच्या आकाराचे आहे म्हणून खरे लॉकेट असल्याचे छातीठोकपणे सांगतो. लाखन मात्र अधिक हुशार असल्यामुळे तो आधी नकाशा चेक करायचे ठरवतो. तेव्हा प्राण थातुर मातुर कारण देऊन ते टाळतो.

इथे कमल कपूर मूर्खपणा नंबर दोन करतो. अमरीश पुरीचे समाधान झालेले असल्याने तो घरी जायला निघालेला असतो तर विनाकारण कमल कपूर त्याच्या सोबत असलेल्या सुब्रतो महापात्रावर गोळी चालवतो. दिगंबर जरी शाही खानदानाचा असला तरी उपरोक्त नियमानुसार त्याच्यासाठी शाही उपसर्ग थेट प्रयुक्त झाला नसल्याने त्याला संरक्षण मिळत नाही आणि तो मरतो. इंटरेस्टिंगली कमल कपूरच्या दुनळी बंदूकीत दोन गोळ्यांची जागा असताना त्याने एकच गोळी भरलेली असते कारण तो एकच चाप ओढतो आणि एकाच गोळीचा आवाज होतो. जर दोन गोळ्या असत्या तर त्याला अमरीश पुरीला मारायचा चान्स होता. या सिनेमात अमरीश पुरी जरा उसुलों वाला व्हिलन असल्याने तो दिगंबरची शेवटची इच्छा (मेरे बेटे रणजीत को अपने बेटे की तरह पालें) तो पार पाडतो तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे तो राजा आणि राजकुमारला मारायला तयार होतो. चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच की नाव रणजीत असल्यावर मोठा होऊन तो रणजीत खेरीज इतर कोणी होऊच शकत नाही.

"मिळाल्या मालकासी व्हावे प्रोटेक्टर" मंत्र असलेला प्राण एवढे सगळे होऊनही मध्ये पडतो. चाहो तो मेरी जान लेलो पर महाराज को छोड दो चा धोशा तो लावतो. तेवढ्यात प्राणच्या मुलाला राजकुमार समजून अमरीश पुरीच्या गँगमधला एक चिल्लर डाकू घेऊन येतो. महाराज ऐवजी राजकुमारचा बळी जाणार असे ठरते. प्राणही हे बलिदान द्यायला तयार होतो. अजूनही कमल कपूरला गप्प बसण्याचे सुचत नाही. तो म्हणतो की हा राजकुमार नसून प्राणचा मुलगा आहे. सुदैवाने अमरीश पुरीला त्या मुलाला "बाळा तुझे बाबा कोण ते सांगतोस का?" विचारायचे सुचत नाही. तो त्या मुलाला तलवारींवर नाचवून फेकण्याचा आदेश देतो. वफादार नोकराचा मुलगा असल्या कारणाने त्याचे जिस्म फौलादी असावे. कारण एकही तलवार त्याच्या पाठीत घुसत नाही. त्याला कॅच कॅच खेळल्यासारखे करून खिडकीतून खाली फेकतात. "आज जरा आडरस्त्याने जाऊयात" असा विचार करून चाललेल्या एका भटक्या दांपत्याच्या घोडागाडीत जाऊन नेमका तो पडतो. इथून तिथून, न जाणे कुठून आलेल्या घोडागाडीत पडलेला तो मुलगा पुढे जाऊन मिथुन होणार हे नक्की होते.

एवढे होऊनही कमल कपूरचे समाधान होत नाही. तो एक सुरा फेकून अमरीश पुरीला मारतो. त्याने खांद्याला किरकोळ जखम होण्यापलीकडे काही होत नाही. मग मात्र बिचार्‍याचा निरुपाय होतो आणि तो एकदाचा कमल कपूरला गोळी घालतो. कमल कपूर हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून मरतो. इकडे भर उन्हात बिन चार्‍याचे पळवल्याबद्दल चेतक राजकुमारला नदीत पाडतो. शेवटी वफादारी की उम्मीद फक्त कुत्तोंसे की जा सकती हैं घोडोंसे नही. सर्वकाही लक्षात आल्यानंतर अमरीश पुरी प्राणला बांधून फटके देत असतो. प्राणची जुबान काटण्याची धमकी दिल्यानंतर प्राण म्हणतो की मेरी जुबान के दो टुकडे करोंगे तो आवाज दुगुनी होगी, चार टुकडे चौगुनी. प्राणच्या हे लक्षात येत नाही की तुकडे जीभेचे होणार आहेत, स्वरयंत्राचे नाहीत. फार फार तर तो दुप्पट बोबडा किंवा चौपट बोबडा होऊ शकतो. अमरीश पुरीला मात्र एव्हाना या लोकांचा मूर्खपणा असह्य झालेला असतो. त्यात राजकुमार आणि लॉकेट निसटल्यामुळे तो आधीच त्रासलेला असतो. इतके होऊन सुद्धा तो फक्त प्राणचा उजवा हात कापून त्याला सोडून देतो. मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण ते काय?

२.३) घोड्याने पाडले, ससाण्याने तारले

इफ्तेकार प्राणची चौकशी करायला राजवाड्यावर येतो. कधीतरी कमल कपूरने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आपल्या मुलीचे, सीमाचे लग्न मोठे झाल्यावर राजकुमारशी लावून द्यायचे मान्य करतो. तेव्हा कळते की राजकुमार इफ्तेकारकडे पोचलाच नाही. मग तो गेला कुठे? बाकी सर्वांनी हलगर्जीपणा केला असला तरी शमशेरने केलेला नसतो. इतका वेळ ठिपकेदार गरुड असलेला शमशेर अचानक बहिरी ससाणा बनतो आणि आजूबाजूला कुठेही मंदिर नसताना पूजेची थाळी घेऊन फिरत असलेल्या आशालताचे लक्ष वेधून घेतो. नदीत वाहत आलेला राजकुमार आशालताला सापडतो आणि ती त्याचा सांभाळ करण्याचे मान्य करते. सहसा कंटिन्यूटी मिस्टेक्स कपड्यांमध्ये होतात. इथे पक्ष्यांमध्ये झाली आहे.

३) वेस्टर्न सिनेमा बनवण्यासाठी दिलवाले नायक हवेत

३.१) धनाच्या पेटीपाशी चावरे विषारी नाग असलेच पाहिजेत.

असा हा राजकुमार मोठा होऊन धर्मेंद्र बनतो. गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे लगेच त्याची ओळख पटते. तिथल्याच कुठल्यातरी जंगलात तो खड्डा खणत बसलेला असतो. कुठून तरी त्याला कळलेले असते की इथे खजिन्याची पेटी गाडलेली आहे. इथे आपल्याला कळून चुकते का हा सिनेमा वेस्टर्नच्या अंगाने जातो. वेस्टर्नमध्ये सर्वजण एक्स्प्लोरर्स असतात. त्यांना घोडेस्वारी करणे, गाडलेले खजिने शोधणे आणि गाणी म्हणणे याशिवाय काही उद्योग नसतात. तसेच प्रत्येकजण बंदूक चालवण्यात वाकबगार असावाच लागतो. इथे रॉय रॉजर्स, जीन ऑट्री वगैरेंच्या जागी धर्मेंद्र असणार हे निश्चित होते. वेस्टर्नला साजेशी हॅट आणि गळ्याला रुमालही असतो. पेटी घेऊन धर्मेंद्र निघणार इतक्यात तिथून चाललेला मिथुन ती पेटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. चेक्सचा शर्ट, मळकट रंगाची हॅट बघून वेस्टर्न्स मधली दुय्यम हिरोची भूमिका याच्या वाटेला आली आहे हे निश्चित होते. थोडी मारामारी झाल्यावर लाक्षणिक रित्या मिथुनला धर्मेंद्र खड्ड्यात जा म्हणतो. म्हणजे लाथ मारून वेगळ्याच एका मोठाल्या खड्ड्यात पाडतो. हमरस्त्याने जायचे सोडून त्याला दोन दगडांमधल्या चिंचोळ्या वाटेतून जाण्याची हुक्की येते. आपल्या निवासस्थानापाशी झालेल्या आवाजामुळे एक नाग (खराखुरा) वैतागून बिळातून बाहेर येतो. त्रासलेला तो बिचारा जीव धर्मेंद्राला डसण्याचा प्रयत्न करतो तर मिथुन मध्ये येऊन त्याचा (धर्मेंद्राचा, नागाचा नव्हे) जीव वाचवतो.

मिथुन गारुड्यांमध्ये वाढलेला असल्याने निवांतपणे स्वतःच्याच जखमेतून विष चोखून थुंकून टाकतो. तो हे इतक्या निवांतपणे करतो की त्या नागालाही "काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" वाटल्याखेरीज राहिले नसावे. इथे धर्मेंद्राचे नाव शंकर आणि मिथुनचे नाव सांगा असल्याचे स्पष्ट होते. मिथुन मोठ्या अभिमानाने त्याला आपल्या पाठीवरच्या तलवारीच्या खुणा दाखवतो आणि आपण प्राणचा मुलगा असल्याचे प्रेक्षकांना कळवतो. प्रत्यक्षात गंज लागलेल्या तलवारींमुळे रॅश आल्यासारख्या त्या जखमा दिसतात. याने धर्मेंद्राला भलतेच वाईट वाटते आणि तो सापडलेल्या धनाचा अर्धा हिस्सा मिथुनला देऊ करतो.

अशा सिनेमांत एक तिसरे पात्र सुद्धा लागते. सहसा हे नेटिव्ह अमेरिकन किंवा मेक्सिकन, म्हणजे हिरोपेक्षा ड्रॅस्टिकली वेगळे दिसणारे लागते. इथे डॅनीची वर्णी लागली आहे. डॅनीचे नाव डॅनीच असते. त्या पात्रांच्या नियमांनुसार डॅनी सुरेफेक करण्यात आणि कुलुपे तोडण्यात निष्णात असतो. डॅनी येऊन तीन हिश्श्यात वाटणी करण्याचा सल्ला देतो. तो सल्ला धुडकावून ते दोघे आधी दगड मारून, नंतर बाँबच्या मदती ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात. अखेर हार मानून ते डॅनीची ऑफर स्वीकारतात. डॅनी अत्यंत सहजतेने ती पेटी उघडतो. त्यात शंभरच्या नोटा, सोन्याची बिस्किटे आणि दागिने पाहून हा खजिना नसून स्मगलिंगचा माल असल्याचे आपल्याला कळते. हा माल ज्यांचा असतो ते लोक हा माल घ्यायला येतात. मग धर्मेंद्राला युक्ती सुचते आणि तो डॅनीला ती पेटी बंद करायला सांगतो.

३.२) मुलांची फाजील कौतुके केल्यास त्यांच्याच्याने एक काम धड होत नाही

पुढच्या सीनमध्ये कळते की तो माल अमरीश पुरीचा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचे डाकू मधून स्मगलरमध्ये प्रमोशन झाले आहे. रणजीतही मोठा होऊन रणजीत झाला आहे. रणजीत ती उपरोक्त पेटी घेऊन परत आलेला असतो. मिळालेली वस्तु योग्य आहे का नाही हे चेक न करण्याची सवय वडलांकडून रणजीतला मिळालेली असते. त्यामुळे तो पेटी न उघडताच घेऊन आलेला असतो. सोबत सुजितकुमार आणि मॅकमोहन पण असतात. या तिघांना हॅट दिलेल्या आहेत. आणखी पण एक कोणी फरकॅपवाला असतो ज्याच्या हातात काही कारणाने बिगुल दिलेले आहे. याला फक्त "बाप का बेटा, सिपाही का घोडा, बहुत नही तो थोडा थोडा" हा डायलॉग मारण्यासाठी ठेवलेलं आहे. अमरीश पुरी उगाचच रणजीतचे कौतुक करतो. रणजीतही अंजानगढ चा खजिना शोधून काढण्याच्या वल्गना करतो. ती पेटी डॅनीने बंद केलेली असल्यामुळे ती काही उघडत नाही. मग रणजीत ब्लोटॉर्चने तिचे झाकण तोडतो. झाकण उघडण्यापूर्वी शँपेन उघडली जाते आणि झाकणावर ग्लास भरले जातात. शँपेन आवडत असल्याने आत बंद केलेला नाग "घोटभर शँपेन मलाही द्या की" करून बाहेर येतो आणि फालतू कामाचा दर्जा अमरीश पुरीला कळून चुकतो.

३.३) घोड्यावरून प्रवास करताना गाणे व्हायलाच पाहिजे

१९४०-१९५० च्या वेस्टर्नचे बलस्थान होते त्यांच्या रेंजर हिरोंनी म्हटलेली गाणी. एका जीन ऑट्री एपिसोडमध्ये तर अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये १० मिनिटाचे गाणेच होते. इथे तर बॉलिवूड वेस्टर्न आहे. हिरोंना यशश्री प्राप्त झालेली आहे. मग गाणे झाले नसते तरच नवल! तिघेही आपले घोडेस्वारीचे कसब दाखवत गाणे म्हणू लागतात "हम दिलवाले, सारी दुनिया से निराले, हम जैसा कौन हैं?" गाणे संपल्यावर धर्मेंद्राच्या घोड्याने "ओझे वाहायला मी गाढव वाटलो का रे?" हा प्रश्न प्रमोद चक्रवर्तीला नक्की विचारला असावा. डॅनीवर क्लोजअप मारून त्याचे त्रिकालदेवलाही खुश करू शकणारे हास्य बघण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गाण्याच्या कडव्याच्या ओळी मोठ्या मनोरंजक आहेत "हम दोस्त नही हम भाई हैं, इस दौर के हातिमताई हैं" (मागून जितेंद्र कुजबुजतो, हातिमताई मी तू धरम) सतत "हम जैसा कौन हैं" विचारल्यामुळे सूर्याला सुद्धा कंटाळा येतो आणि तो अस्ताला जातो. रात्रीची विश्रांती घ्यावी म्हणून माळरानात घोडे पळवत असणारे ते तिघे थांबतात आणि गाणे संपते.

इथे माझा अल्पविराम. उरलेली चिरफाड प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच मस्त लिहीलं आहे.
अमरीष पुरीचा अंत... Biggrin
नि:शस्त्र माणसांसोबत शस्त्र वापरून लढणे अमरीशला प्रशस्त वाटत नसल्याने तो परत बंदूक उचलण्याचा प्रयत्न करत नाही. .. असं असताना अमरीष परत मॅकमोहन ने दिलेली मशीन गन का म्हणून घेतो? Happy
'शमशेर' बद्दल तर लिहावे तितके थोडे! मग आधीच का नाही धरम पाजी ह्या शमशेर ला हाताशी धरुन खजिन्या पर्यंत पोहोचत..?
आणि शमशेर ने 'ओवलेल्या' बंदुकांचं पुढे काय होतं?

हे माबोवरचे all time classic झाले आहे! आपण 'तिलक' माहिती असलेले महानुभाव आहात, त्यासाठी विशेष दंडवत!

त्यांनी स्वतंत्र पणे एक सिनेमा का(फा)डून दाखवावा अशी त्यांना आणी श्रद्धाताईंना >>>>> +++११११ 'शान' ची चिरफाड कुणी करा रे!

नवीन प्रतिसादांचे आभार Happy

आपण 'तिलक' माहिती असलेले महानुभाव आहात, त्यासाठी विशेष दंडवत! >> Lol आगाऊ खरं सांगू, मला पण माबोवर कोणी 'तिलक' माहिती असलेला महानुभाव सापडेल अशी अपेक्षा नव्हती. Happy

@आंबट गोड तुमच्या प्रश्नांची उत्तरे

आणि मधेच ते शोमाला इथे कळते की आपले वडील वाटतात तितके साधे नाहीत. त्यामुळे जेव्हा पुढच्या सीनमध्ये मिथुन तिला अमरीश पुरीच पाद्री आहे असे सांगतो तेव्हा तिला तेवढा धक्का बसत नाही.. असं काय लिहीलंय...? >> बेसिकली मिथुन तिला सांगत असतो की तुझे वडील व्हिलन आहेत. आधीच्या प्रसंगात रणजीतची मुक्ताफळे आणि अमरीश पुरीचे व्हिलनीश बोलणे चोरून ऐकल्यामुळे तिच्यासाठी ही बातमी धक्कादायक नसते. मिथुनच्या चेहर्‍यावर मात्र इथे "मी एवढा मोठा गौप्यस्फोट करत आहे आणि तुझ्या चेहर्‍यावर काहीच भाव कसे नाहीत? सिनेमात एक भाभू आहे तो पुरेसा नाही का?" असे एक्स्प्रेशन्स आहेत. Lol

अमरीष परत मॅकमोहन ने दिलेली मशीन गन का म्हणून घेतो? >> बरोबर आहे तुमचे, त्याने ती मशीनगन नाही घेतली पाहिजे. पण उसुल वाले व्हिलन सहसा मरत नाहीत, ते शेवटी सरेंडर करतात. उदा. परवरीश मधला अमजद खान. थोडक्यात आपल्या कॅरेक्टरच्या विरोधात जाऊन काही वर्तन केले तर हिंदी सिनेमामध्ये तुमचा अंत निश्चित होतो. इथे लेखक-दिग्दर्शकाला बहुधा अमरीश पुरीच्या कॅरेक्टरला मारणे अधिक इफेक्टिव्ह वाटल्याने त्यांनी अखेरच्या टप्प्यात त्याला असे आऊट ऑफ कॅरेक्टर वागायला लावले आहे.

शमशेर ने 'ओवलेल्या' बंदुकांचं पुढे काय होतं? >> जेव्हा पाजी आणि शमशेर दोघेच अमरीशच्या गुंडांना मारत असतात तेव्हा शमशेर तो ओवलेला दोरा ओढून गोळ्या झाडतो. त्या गोळ्या हीट सीकिंग मिसाईलप्रमाणे गुंडांना शोधून मारतात.

मॅक्स : हिंदी वर्जन "This Video is not available" असे दाखवत आहे....
@पायस तुमचे परत एकदा आभार. खरं म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांना एक छान मनोरंजक अनुभव दिलात...

थोडी संगीतावर पण टिप्पणी आवडली असती. कसेही असले तरी आर.डींनी प्रयत्न केलेत...!!

असाच एक हॉलिवूडपट पण सर्वजणांनी मिळून फाडला तर मजा येईल.

माझा 'चिरफाड' या शब्दाला आक्षेप आहे. त्यात एक अनावश्यक निगेटीव्हिटी, द्वेष, आक्रमकता आहे. पायस किंवा फारेंड खुनशीपणे अशा सिनेमांवर तुटून पडत आहेत असा एक चुकीचा टोन त्यात आहे. पण माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांना अशा सिनेमाबद्दल अत्यंत प्रेम आणि कुतूहल आहे, त्याशिवाय इतके उच्च लिखाण शक्य नाही.

मिथुनच्या चेहर्‍यावर मात्र इथे "मी एवढा मोठा गौप्यस्फोट करत आहे आणि तुझ्या चेहर्‍यावर काहीच भाव कसे नाहीत? सिनेमात एक भाभू आहे तो पुरेसा नाही का?" असे एक्स्प्रेशन्स आहेत.>. अर्र Lol
कर्मा घ्या फाडायला.

त्या गोळ्या हीट सीकिंग मिसाईलप्रमाणे गुंडांना शोधून मारतात.<<<<<
असाच ओवलेल्या बंदुका शॉट तहलका आणि क्रांतीमध्ये पण आहे. मुकेश खन्ना तहलकामध्ये शमशेरसारखंच दोऱ्या वापरतो पण क्रांतीत दिलीपकुमार (सगळ्यांत भारी) असल्याने तो काठी वापरतो.

आगाऊ खरं सांगू, मला पण माबोवर कोणी 'तिलक' माहिती असलेला महानुभाव सापडेल अशी अपेक्षा नव्हती. >> तिलक म्हणजे तो व्हि शांताराम चा नातू उर्फ बनवाबनवी मधला अशोक सराफ च्या भावाचा पिच्चर म्हणताय का?

आगाऊ खरं सांगू, मला पण माबोवर कोणी 'तिलक' माहिती असलेला महानुभाव सापडेल अशी अपेक्षा नव्हती.
>>>>>
तिलक थेटरात जावून पाहिलेला आहे मी. Biggrin
कोणाला सांगू नये खरंतर, पण एकेकाळी शिल्पा शिरोडकर खूप आवडायची. Lol

आमच्या शेजारच्या आजोबांना कुणितरी तिलक लो टिळकांवर आहे असे सांगून नेले होते.
ते आजोबा शीघ्रकोपी होते.
अवांतर : असले अनवट सिनेमे पहाणार्‍यांबद्दल आदर वाटतो. जॅकी श्रोफ चा "हफ्ता वसूली" आम्ही पाहिला तेव्हा पहिल्या शोलाच जेमतेम दहा लोक होते. नंतर अमेरिकेत आल्यावर देसि दुकानात त्या सिनेमाची ऑडिओ कॅसेट विकायला ठेवली होती तेव्हा थक्क झालो. त्या कॅसेट मध्ये मी वीस डॉलर्स ची नोट लपवून ठेवली. म्हणलं जो कुणी नरपुंगव ही विकत घेइल त्याला मिळो. वर्षभराने गेलो तर कॅसेट व पैसे तसेच होते.

>>> हिंदी वर्जन "This Video is not available" असे दाखवत आहे....
अरेच्च्या काल रात्री मी थोडा भाग बघितला की
पायस, तुझ्यामुळे त्यांनी रीजनल रिस्ट्रिक्शन्स एनेबल केली बहुतेक ... Lol

फारएण्ड आणी श्रद्धा, ह्या दोघांना, ज्या प्रकारे सिनेमांची नावं घेऊन, आता हा सिनेमा फाडायला घ्या वगैरे आमंत्रण मिळतं ते पाहून मला म्हाळसाकांत पोंबुर्पेकर आठवतो. Wink Light 1

कॅच अप करतोय. पायस सगळे भन्नाट लिहीले आहे! काही पंचेस कहर आवडले आहेत. त्याचा उल्लेख करायच्या आत मला बघताना जे सुचले ते विसरायच्या आत लिहीतो:

मी जेथून पाहिला - लेट'स कट टू "भाग्य के सामने सब बचन बेकार है" सीन. अमरीश पुरी व रणजित यांचा भावस्पर्शी अभिनय. जरूर पाहा. मग ते झीनत ला रणजित शी लग्न करायला पटवायला येतात. तर ती म्हणते मी शंकरची राहणार. या जन्मी नाही झाले तर पुढच्या जन्मी. खरे तर इथे सोपा फुलटॉस तिने दिलेला होता. तिला फक्त सांगायचे - "मग शंकरचे पुढच्या जन्मी पाहू. आत्ता तू रणजितशीच लग्न कर". पण अमरीश पुरीला येथे काहीही संबंध नसताना पुरोगामी विचार मांडावेसे वाटतात. वास्तविक रणजीत शी तिचे लग्न झाले काय किंवा न झाले काय, त्याला काहीच फरक पडणार नसतो. पण प्राण चा नमक हलाल कोटा अजून बाकी असतो. तो तिला समजावयाला येतो. तर ती 'माफ कीजिये' म्हणून, किंवा पायस म्हणतो तसा 'बाप व सासरे आग्रह करत नाहीत तर तू कोण मधेच' टाइप चेहरा करून निघून जाते. इफ्तेकार यात आयजी असतो. म्हणजे प्राण लिटरली आयजी च्या जीवावर बायजी उदार झालेला असतो रणजीत शी तिचे लग्न लावायला.

कट् टू हीरोज आणि नन. हे इथे कसे एकत्र आले? माहीत नाही. त्या दिवशी त्या विमानातून दिल्लीला चाललेले लोक प्रत्यक्षात एकमेकांच्या आसपासच राहात असावेत. पण नन-संवाद साधारण असा होतो:
नन: (मनातः अरे माहीत आहे तुम्ही तिघे मित्र आहात. ज्याला शोधताय त्याचा फोटो दाखवा फक्त. सगळीकडे तिघांचा फोटो घेउन फिरायची गरज नाही). प्रकटः तुमचा दोस्त विमानात बेशुद्ध पडला, मग दाढीवाल्या डॉक्टरने त्याला (इण्डियन एअरलाइन्स ने चालवलेल्या 'गाव तेथे विमानतळ' योजनेतून उभ्या राहिलेल्या) रामनगर विमानतळावर उतरवला.
डॅनी/मिथूनः ब्लँक एक्स्प्रेशन
ननः आणि हो. तो सिगरेट रोल करून पीत होता (त्या सीन मधे मी तसे काही पाहिले नसले म्हणून काय झाले?)
डॅनी: रोल करून? यू मीन हातानी रोल करून?
नन: (नाही विमानात एक पोलपाट लाटणे घेउन बसला होता). हो.
डॅनी/मिथूनः ओके.
ननः (थांबा थांबा. मला ननगिरी पूर्ण केल्याशिवाय हा सीन संपवता येणार नाही) "हम गॉड से.... गॉड ब्लेस यू माय सन्स..." हुश्श.

तेवढ्यात तेथे पाजी येतात. हा इथे कसा आला? माहीत नाही. पेरिफेरल व्हिजन कडे दुर्लक्ष करायची सवय असल्याने इतका वेळ खिडकीबाहेर बंदूक घेउन उभा असलेला मॅक कोणाला दिसलेला नसतो. किंवा ती खिडकी नसून टीव्ही आहे व शोले सांभाच्या सीन वर फ्रीझ झाला आहे असे ते समजले असतील. पण पाजी त्याला पाहतात व सगळे बाजूला पळाल्याने गोळीबारातून वाचतात.

आता तुम्ही एका बंदिस्त घरात आहात. तेथे एक नन व एक लहान मुलगा आहे. बाहेर बंदुकधारी व्हिलन आहे. तुम्ही कसे सर्वांना वाचवाल?

बरोब्बर - ते सगळे ओपन मधे त्याला शोधायला बाहेर येतात.

पुढे सुरू....

तेथून मॅक जो पळतो तो थेट कब्रिस्तान मधे पडीक असलेल्या अमरीश पुरी कडे. "आज पहली बार मेरा निशाना गलत निकला" सांगायला. इथे आपल्याला वाटते अमरीश पुरी म्हणेल साला धरमपाजीला गोळी घालायचे तुझे पहिल्यापासून वांदे आहेत. शोले मधे बांधला होता तरी जमले नाही. मग मॅक म्हणेल - "तेथे उन्हातान्हात दगडावर बसवून ठेवत दिवसभर. शेवटी माणूस आहे...." पण तितक्या गेट बाहेर मोटारीचा आवाज आल्याने असा काही संवाद प्रत्यक्षात होत नाही.

पुढच्या सीननुसार तेथे भर कलकत्त्यात दुपारी अमरीश पुरी आत फुल थ्रीपीस सूट, टाय वगैरे घालून त्यावर पाद्रयाचा झगा आणि शिकार्‍याची टोपी घालून आलेला असतो. आणि नकली दाढी वर. मग ते कब्रिस्तान मधल्या त्या तळघरात शिरतात. कब्रिस्तान मधले तळघर म्हणजे आत फायटिंग करताना सीलिंग पासून जपून राहावे लागत असेल. फायटिंग करताना भिंत पडली किंवा सीलिंग तुटले तर वरून काय पडेल सांगता येत नाही.

इथे आधी अमरीश पुरीच्या पापांचा पाढा वाचण्यात येतो. तू पाद्री नाहीस, नो माय सन. ठाकुरसाब? करेक्ट माय सन. आशाके पिताजी? यस माय सन. पाद्र्याचा वेष उतरवला तरी त्या भूमिकेतून तो बाहेर यायला तयार नसतो उत्तरे देताना. "हाच शैतान त्या दिवशी तुझे विमान उडताना बघत होता" - ऑ? हा कधीपासून गुन्हा झाला. "म्हणजे ते डॉक्टर वगैरे तुझेच लोक होते" - पुन्हा एकदा, ऑ? पण इथे अमरीश पुरी त्यांच्या डोक्याला त्रास नको म्हणून सगळे कबूल करतो. "उस अ‍ॅम्ब्युलन्स मे तुम्हारेही गुंडे थे?" "राइट. पण ते थर्ड पार्टी कामगार होते. Check your contract. Section 3c. Working with third party villains. "The 'Lakhan Singh', 'Aasha ke Daddy', mentioned as 'Thakur" for the scope of this document might, from time to time, engage with third parties for irrelevant fight scenes.... the Thakur bears no responsibility...."

"तो आपही ने हमे मारने के लिए रेल्वे ट्रॅक से बंधवा दिया था?" इथे मात्र अमरीश पुरीचे ब्लँक एक्स्प्रेशन. बहुधा "क्यो शरमिंदा कर रहे हो? हो तो सायडिंग ट्रॅक होता. वरती ओव्हरहेड वायर पण नव्हती. कशी जाणार गाडी तेथून? Not my proudest moment" असे स्वगत म्हणत असावा.

तेथे ते आत ते लोहगोल व साखळ्या तयार असतात. मग जँगो येतो आणि तिघांना बांधतो. या फायटिंग नंतर त्यांना सोडवण्याचा भाग इतका लोकप्रिय झाला, की हॉलीवूड ने तो तिकडे नेउन स्वतंत्रपणे "Django Unchained" नावाने रिलीज केला. असो.

अजून पुढे बरेच नाट्य बाकी आहे असे दिसते.

क ह र Rofl
पायसने आधीच हसवून पोट दुखवलं आहे... फा, बच्चेकी जान लोगे क्या।
गाव तिथे विमानतळ आणि django unchained साठी शिरसाष्टांग नमस्कार घ्यावा

खूपच छान......अगडी हसून हसून पुरेवाट होत्येय..

आयजी च्या जीवावर बायजी उदार , कब्रिस्तान मधले तळघर , लोहगोल......... वगैरे वर अशक्य हसलेय. पायस व तुमच्या या विनोद बुद्धीला खरेच चांगले व्यासपीठ मिळायला हवे... Biggrin

हॅटस ऑफ. :हहपुवा:

जबरी अ‍ॅडिशन फा Happy

प्राण लिटरली आयजी च्या जीवावर बायजी उदार झालेला असतो रणजीत शी तिचे लग्न लावायला. >>
नन: (नाही विमानात एक पोलपाट लाटणे घेउन बसला होता). >>
Lol अधिक विचाराअंती मला वाटतं रोलिंग सिगारेट किंवा रोल्ड सिगारेट म्हणजे हाताने वळलेली सिगारेट म्हणायचं असावं. आता एका वर्षात त्या थोटकावरून डॅनीला हे समजते पटण्याजोगे आहे. पण ती नन केवळ एका नजरेत समोरचा मनुष्य हँड रोल्ड सिगारेट पितो हे सांगू शकत असेल तर त्याचा मतितार्थ प्रेक्षकाने काय घ्यावा?

तेथून मॅक जो पळतो तो थेट कब्रिस्तान मधे पडीक असलेल्या अमरीश पुरी कडे. "आज पहली बार मेरा निशाना गलत निकला" सांगायला. >> हो ना, जसं काही हा अचूक नेमबाज म्हणून जगप्रसिद्ध आहे. याला आणि सुजित कुमारला नक्की का घेतलं आहे काही कळतच नाही. मॅक तरी क्लायमॅक्सपर्यंत आहे, सुजित कुमार त्या प्रीति सप्रूच्या गाण्यानंतर गायबतो.

Check your contract. Section 3c. Working with third party villains. "The 'Lakhan Singh', 'Aasha ke Daddy', mentioned as 'Thakur" for the scope of this document might, from time to time, engage with third parties for irrelevant fight scenes.... the Thakur bears no responsibility...." >> हे कहर आहे Rofl

Not my proudest moment आणि Django Unchained साठी साष्टांग प्रणिपात!!

पायस..पुन्हा पुन्हा वाचलं तरी काही गोष्टी अजूनच मजेदार वाटताहेत.
प्राणचा आनंदी चेहरा बघून अमरीशला कळते की घरात शोमाला सासू नाही. सुटकेचा निश्वास टाकून तो मरतो. - हे खूपच मस्त

फारएण्ड... Rofl

गाव तेथे विमानतळ, आयजीच्या जीवावर बायजी उदार.. Lol
Django unchained हे एपिक आहे. _/\_

फारएण्डा - काय 'नजर' आहे मित्रा तुझी, हिंदी सिनेमाकडे पहायची? वाह!! Happy

फा आणी पायस, This Bollywood of the analysis (हे ऑफिस ऑफ द डॉक्टर च्या चालीवर वाचावे), is म्हणजे, एक नंबरचा 'क्लास'. that is to say, a masterpiece. त्यानंतर you go to the Hollywood of the analysis (फॅमिली ऑफ माय डॉक्टर). Wink

धन्यवाद.

जागीर मधले सर्वात भन्नाट लॉजिकः एखाद्या व्यक्तीला जर बांधले असेल आणि तिच्या आजूबाजूच्या सगळी कडे आग लावून दिली असेल गोल आकारात, तरः
- वाचवणारा जेथे असेल तिथपासूनच त्याला जवळच्या झाडावर उडी मारून १००-२०० फूट झाडांवरून माकडासारखे सूरपारंब्या करत जावे लागते. हे बहुधा युनिव्हर्सल असावे. द बर्निंट ट्रेन मधे आग इंजिनाजवळ लागली असली, आणि गाडी व्हेस्टिब्यूल असली, तरी सर्वांना तेथे पोहोचायला आहेत त्या डब्यापासूनच टपावरून तेथपर्यंत जावे लागते.
- अशा तर्‍हेने वाचवणारा तेथे पोहोचून बांधलेल्या व्यक्तीला सोडवले, की अजून ती रिंग ऑफ फायर तशीच असली, तरी दोघांना तेथून एका उडीत बाहेर सुखरूप येता येते.

या प्राण ला दर थोड्या वेळाने अमुक कसे करतात, तमुक कसे करतात याच्या चौकश्या असल्याने आमच्या पुणेकरांनी त्याकरता योग्य मार्ग काढून कार्यालयाबाहेर "हे मंगल कार्यालय आहे. आत बघण्यासारखे काही नाही.." पाटी बनवली असणार.

या प्राण ला दर थोड्या वेळाने अमुक कसे करतात, तमुक कसे करतात याच्या चौकश्या असल्याने आमच्या पुणेकरांनी त्याकरता योग्य मार्ग काढून कार्यालयाबाहेर "हे मंगल कार्यालय आहे. आत बघण्यासारखे काही नाही.." पाटी बनवली असणार.<<<<<<
Rofl

बाकी माझा अजून एक अंदाज असा आहे की, 'महाराज गेल्यानंतर मी एकहाती राज्यकारभार सांभाळला' असे प्राणला शब्दशः म्हणता यावे, म्हणून लाखनने त्याचा एक हात तोडला असावा.

फारएंड आणि पायस यांचे सिनेमा रिव्यू वाचून त्यांना 'हास्यरत्न' हि पदवी बहाल करावी. किती मस्त लिहिता वाचून दिवस सरतो बघा.

प्राण ला दर थोड्या वेळाने अमुक कसे करतात, तमुक कसे करतात याच्या चौकश्या असल्याने आमच्या पुणेकरांनी त्याकरता योग्य मार्ग काढून कार्यालयाबाहेर "हे मंगल कार्यालय आहे. आत बघण्यासारखे काही नाही.." पाटी बनवली असणार.<<<<<< Rofl
कहर Lol

Pages