तिच्यासारखा दिसतो पाउस

Submitted by -शाम on 13 July, 2018 - 05:26

खूप लावतो वाट पहाया अखेरीस पण वळतो
तिच्यासारखा दिसतो पाउस छळतो मग कोसळतो

आधी आधी छान वाटते झुळझुळणारे पाणी
अपुली होडी बुडली की मग स्वभाव त्याचा कळतो

निर्मळतेला चिखल बनवते या दुनियेची माती
सहज वाटते तरिही पाउस सहज कुठे दरवळतो

हिला भेटतो तिला भेटतो तिला गाठुनी भिजवी
कोण म्हणाले पाउस केवळ धरतीवर पाघळतो

तो गेल्यावर तिने मनाला बंध घातला मोठा
तिला बिलगतो जेंव्हा पाउस चिरा चिरा ढासळतो

तुम्हीच सांगा आता त्याला कुठली छत्री द्यावी
डोळ्यांमधला पाउस ज्याच्या गालावर ओघळतो

पावसापरी वाहत असतो मातीवरती आपण
पावसापरी जन्म आपला मातीतच विरघळतो

शाम कुणाला मनासारखा पाउस मिळतो येथे
कुणास देतो सुखे, कुणाची सुखे घेउनी पळतो

______________________________ शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुर्रेखच...

शेवटचा शेर खासच....

अप्रतिम !
डोळ्यांमधला पाउस ज्याच्या गालावर ओघळतो, मस्तच !

एकच नंबर! जबरदस्त गझल!
एकूण एक शेर,बराच वेळ सलग आठवत राहतील असे,पावसाच्या सरींसारखे!

अप्रतिम ..
ओघळतो , विरघळतो ..विशेष आवडले