नि'वृत्ती'- काही निरीक्षणे!

Submitted by मी_आर्या on 12 July, 2018 - 05:43

नि'वृत्ती'- काही निरीक्षणे!

....तसे आम्ही सूर्यवंशी आणि असही आम्ही काय अगदी रेग्युलर, 'एकही दिवस चुकवायचा नाही' अश्या प्रकारातील फिरायला जाणाऱ्यापैकी नाही. लागोपाठ ४ दिवस फिरायला गेले कि आठवडाभर सुटी घ्यायची अश्यातली.

सकाळी फिरायला जातानाचे निरीक्षणांवर आजवर अनेक जणांनी लिहिलं असेल.
माझीही काही निरीक्षणे!

'घराबाहेर पडलं ना की सामोरा येतो तो अनंत! हसऱ्या चेहऱ्याने आधी स्वागत करतो, मोगऱ्याने तर गंध उधळलेलाच असतो... फाटकाजवळच्या पारिजाताने फुलांच्या पायघड्या टाकलेल्या असतात. रातराणी रात्रभर फुलून गळून गेलेली असते.
थोडे पुढे गेले की बुचाच्या झाडांची रांग लागते. फुले जणू उंचच उंच आकाशात फुललेल्या फुलबाज्याच! उगाच त्याला त्याला आकाशनिंब किंवा गगनजाई नाही म्हणत!
एव्हाना, सगळी झाडे वनस्पती जागे झालेल्या असतात, सूर्यकिरणे झेलायला उत्सुक दिसतात. अंगाखांद्यावर पाखरांची चहलपहल वाढलेली असते.
बॉटलब्रश ट्री मात्र मला एखाद्या गंभीर, ध्यानस्थ ऋषीसारखा वाटतो.!कितीही वर्दळ वाढू द्या, याची तुर्यावस्था काही भंग पावत नाही. एखाद्या फाटकावरची जुईची स्पर्शासक्त वेल जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला हळुवार स्पर्श करत असते.

दोन अगडबंब देहाचे, चेहरे ओघळलेले श्वान मालकांना ओढत आणतात. मग गल्लीच्या श्वानांना अचानक त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला आल्याची, आपण कित्येक दिवस दादागिरी केली नसल्याची आणि आपली शक्ती कमी असल्याची तिहेरी जाणीव एकाचवेळी होते... मग ते गुरगुरत पण शेपूट घालून त्यांच्यामागे निषेध नोंदवतात.

मधूनच एखादी, एका हातात काठी आणि एका हातात कापडी पिशवी घेतलेले आजोबा, दुसऱ्याच्या फाटकावर चढून जास्वंदीची फुले काढताना दिसतात. नेमकं आपण सामोरे आलो की चोरी पकडल्याचे ओशाळवाणे भाव चेहऱ्यावर दिसतात, म्हणून मी पुष्कळदा दुर्लक्ष करते. राहो बापडे आपल्याच आनंदात!

सकाळी फिरायला येणाऱ्या व्यक्तींच्या निराळ्याच तऱ्हा! काही मख्ख, चेहऱ्यावरची रेषा तसूभरही न हलणारे चेहरे तर काही प्रसन्न, उत्साही, हसरे, बोलके!
काही हेडफोनच्या काड्या कानात घालून आपल्याच मस्तीत चालत असतात.एक वयस्कर ग्रुप मोबाइल वर सकाळची भजने लावून चालत असतो. काही 'चिंता करितो विश्वाची ''' असे ऊर्ध्व लावल्यासारखे चालत असतात. तर काही मागून जबरदस्ती ढकलल्यासारखे!!

काही 'सदैव सैनिका पुढेच जायचे/ परेड दाहिने मुड! स्टाईल चालतात.
एक कमनीय ३/४थ लेगिन्स रॅम्पवर चालल्यासारखी चालते. एक अति वयस्कर साडी, तिच्या अविवाहित, वय झालेल्या पंजाबी ड्रेसबरोबर हळूहळू चालतांना दिसते. ३ चुडीदार,कुर्ता गेल्या ३-४ वर्षांपासून इतके सोबत असतात की त्यातली एक जरी नसली कि आपल्याला चुकल्यासारखे वाटेल. एक मेंटेन, पण चेहर्यावर सतत १२ वाजलेल्या वयस्कर गाऊनलाही कित्येक वर्षांपासून पहातेय.
एक चाळिशीतला, डोक्यावरचे छप्पर उडालेला, ताडमाड उंच पायजमा शर्ट डोळे गरागरा फिरवत सगळ्या जगावर सूड उगवल्यासारखा खाऊ की गिळू नजरेने पाहत चालतो.

एक थ्री फोर्थ, टी शर्ट हरभजन सारखी बॉलिंग करत चालताना दिसतो. एक ढेरीवाला टीशर्ट हाफ पॅंट, चालता चालता शाळेत करतात तसे कवायतीतले हात करत चालतो . त्याच्याबाजूने जातांना जपूनच जावे लागते.

३-४ वयस्कर एग्रीकल्चर कॉलेज रिटायर्ड, शर्ट पॅंट," ख्या ख्या ख्या... तुम्हाला सांगतो, आता मागे तो शासनाचा जी.आर. आला ना, ... "अश्या गप्पा मारत चालतांना दिसतात.

एक पाय ओढत चालणारी नऊवारी साडी आणि तिच्यापुढे पाठीमागे हात बांधून , त्यातल्या त्यात भरभर चालणारे एक नेहरू शर्ट,धोतर वर्षानुवर्षांचा अबोला असल्यासारखे चालतात.

दोन ‘ओढणी घेतलेले पन्नाशीतले गाऊन’ वर्हाड निघालंय… मधल्या ,"अजिब्बात कामाला हात लावत नाही हो" स्टाईल
हातवारे करत प्रपंचाचा कोळसा उगाळत असतात.

परवा सकाळी, एक ‘उंची गाऊन’ फोनवर ,"काही करायची गरज नाहीये, ठणकावून सांग त्यांना... ! (बहुधा लेकीचा फोन असावा)असं म्हणत चालत होती. मला एक कळत नाही, सकाळी ६ ला सुद्धा असे विषय कसे काय बॉ सुचतात बायांना!

गंमत म्हणजे, एखाद्या स्त्रीला ओव्हरटेक केलं तर ती पटकन आपसूक वेग कमी करते. पण एखाद्या पुरुषाला ओव्हरटेक करायची वेळ आली तर त्याचा इगो दुखावला जातो. Proud
असो, असतात असे एकेक नमुने!

***
दिवसभर मुखवटे बदलत रहाणाऱ्यांचा खरा चेहरा इथे... यावेळी उघड पडतो हे मात्र खरे!
माझं अनेक वर्षांपासूनच एक स्वप्न आहे. आभाळाच्या पल्याड... अस उंचावर अंतराळात बसून पृथ्वीवर सकाळ दुपार रात्र या चक्रात अडकलेला मानव मला बघायचाय!
यावरून
विंदांच्या कवितेतील काही ओळी देते:

तेच ते नि तेच ते - विंदा करंदीकर

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages