माझे खाद्यप्रयोग (१) टोमॅटो बिर्याणी

Submitted by राजेश्री on 11 July, 2018 - 10:24

माझे खाद्य प्रयोग (भाग १)

IMG-20180707-WA0040_0.jpg

मम्मी पप्पांची पाऊले पंढरीची वाट चालू लागली की ,घरात मी,मनी आणि मोती. शिवाय त्या दोघांच्या खण्यापिण्याचा विचाराबरोबर माझ्या पोटातील कावळ्यांच्या चोचीत आता नेमके काय घालावे असा प्रश्न मला ग्रासू लागतो.मम्मीने वारीला जायच्या आठेक दिवस आधी हे बघ यात तांदूळ निवडून ठेवले आहेत.भाजी तीन चार दिवसाची आणलीय मग तुला हवी ती आण, दूध रोजच तीन चार वेळा तरी तापव,हा भाकरीच्या पिठाचा डबा, हा गव्हाच्या पिठाचा डबा,सारा खाऊ या मोठ्या डब्यात आहे.खा ते सगळ मात्र नको करू अश्या सूचनांचा भडीमार सुरू केला होता.अजून घोडा मैदान दूर होत मग जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसारखं आढावा बैठकीत दिल्या जाणाऱ्या सूचना व महितीकडे मी साफ दुर्लक्ष करीत राहिले.
एव्हाना आठ दिवस भुर्रकन उडून गेले आणि मम्मी पप्पांनी वारीसाठी प्रस्थान केले. त्यादिवशी रात्रीचे जेवण मम्मीने दुपारीच करून ठेवले होते.माझ्या प्रयोगांना सुरवात दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासून होणार होती.सकाळी उठल्यावर मोतीने योगासने करीत आणि मनीने म्याव करीत भूख लागली आहे हे आपल्या मनीचे भाव मला बोलून दाखवले.एकाला दूध दुसऱ्याला बिस्कीट दिल्यावर माझ्या पोटातली कावळ्यांनी आम्हाला दूध बिस्कीट चालणार नाही असे तोंड वेंगाडले.मी घड्याळाकडे नजर टाकली ,ऑफिसला जायचे होते माझ्याकडे एकूण उना पुरा पाऊण तास होता.काय करावं हे न सुचता मध्येच एक कविता सुचली.मग ती सगळ्या ग्रुप वर टाकली तरी पाच मिनिटं कुणाला आवडतेय का पटकन कविता अश्या विचारात,किंवा वाट बघण्यात गेले. मग एका हाताला दुसऱ्या हाताने चापटी मारली मग तसच व्हाईस व्हर्सा करीत हातातून मोबाईल स्विच ऑफ करून उंचावर नेऊन ठेवला.आता माझ्या हातात अर्धा तास होता.पटकन दोन भाकरी आणि भाजी बास्केट मध्ये सापडलेले टोमॅटो यांची भाजी करावी हा विचार मनी तरळला.पण दोन डब्यातील नेमके गव्हाचे पीठ कोणते,कोणते भाकरीचे या प्रयोगात आपला फार वेळ वाया जाणार असे लक्षात येताच.मी भाकरीचा बेत रद्द करून टाकला.मग विचार करू लागले मोकळाच विचार करण्यापेक्षा मघाशी पाठवलेली कविता आणि कुणाला आवडली असेल काय हे बघुयात का.फार कष्टाने तो विचार टाळत.गॅस कट्ट्यावर नजर टाकली.तर रात्रीचा शिळा भात नजरेस पडला.मग डोक्यात एकदम बत्ती पेटली.म्हंटल पावसाळा आहे भाताला चटपटीत फोडणी देऊयात.टोमॅटो भाजी बास्केट मध्ये ठेवणार तोपर्यंत आणखी एक विचार मनात आला की आपण टोमॅटो बिर्याणी करू शकतोय.मी मनात स्वतःकडे खाना खजाना मधील कुकची भूमिका घेतली आणि मनातल्या मनात अँकरिंग सुरू केलं,
नमस्कार ....रसिकहो(खादाडहो...) आपले "माझे खाद्य प्रयोग"या नाविन्यपूर्ण एपिसोड मध्ये स्वागत आहे,मी राजश्री.... खाद्यसम्राज्ञी आणि आज आपण टोमॅटो बिर्याणी कशी करायची ते पाहू,खरं तर मलाही नेमकं काय करावं माहीत नाहीच आपण काही ना काही करून ही टोमॅटो बिर्याणीची खिचडी पकवूयाच.(कारण दिखाऊ योजनासारखं नाव तरी चांगलं दिल आहेच आपण) तर सुरवातीला तुमच्या पोटात किती भूख आहे याचा अंदाज करून टोमॅटो घ्यावेत,ते स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावेत.कांदाही लगोलग चिरून घ्यावा.मिरची असेल तर एखादं दुसरी चिरून घ्या,आता चिरायला काही उरल नसेल तर हात नका चिरून घेऊचिरण्या कापण्याचे अघोरी पाप करून आता आपण आपले प्रमुख पाहुणे खरंतर ते कालच जाणार होते,पण उरल्याने ते आज कार्यक्रमास उपस्थित आहेत.खरंतर हा कार्यक्रम त्यांच्या निरोप समारंभासाठीच आपण आयोजित केला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे.कालच्या भाताला (शिळा म्हणू नका) आपण सन्मानपूर्वक बोलावून घेऊ,त्यावरून हात फिरवून त्याचे हालहवाल विचारून घेऊ.मग प्रत्यक्ष यज्ञ पेटवू म्हणजे गॅस,पातेल्यात तेल घातल्यावर जिरे आणि मोहरीचे मी जाणार पहिला मी जाणार पहिला असे भांडण लागले तर जो प्रथम हातात गवसेल त्याला तडतडवून घ्या.मग दुसऱ्याला, मग कांदा घाला ,कांदा मंद आचेवर(आचरेकर नाही)परतत रहा.. परतत रहा (हे धुत रहा... धुत रहा या चालीवर वाचा जाम मज्जा येईल) मधेच हळदीची चिमूट सोडून त्या फोडणीला रंगीत करा.आता भात म्हणेल मी आधी जातो त्याला सांगा तू ViP आहेस तू सर्वात शेवटी जायचस..मग टोमॅटोला नेऊन फोडणीत सोडा मग सर्वकष भाजून तो सगळीकडून आकसून गेला की थोडे त्याच्या दुःखावर मीठ चोळा..सॉरी टाका.मगाशी मिर्ची नसेल घातली तर चटणीचा मारा करून टोमॅटोला आणखी लाल करा, मग त्यात थोड्याच वेळात भाताचे आगमन होईल (तुतारी असेल तर वाजवा,)पांढरा भात रंगात दंग होऊन रंगीत होऊन जाईल.त्यावर झाकण टाकून एक वाफ येऊन द्या.तुमची टोमॅटो बिर्याणी तयार आहे.खाण्याआधी तिला ताटात घेऊन सजविण्यासाठी कोथिंबीर ,शेव टाका.फोटो काढून व्हाट्स aap व फेसबुक वर टाकल्याशिवाय खाऊ नका नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही...आता मी खाऊन बघते टोमॅटो बिर्याणी कशी झालेय ते...उद्या पुन्हा भेटू एका वेगळ्या पदार्थांसहित तोपर्यंत ....मस्त खा...स्वस्थ रहा... आम्ही सारे खवय्ये.

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०७/०७/२०१८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कडे माञ थोडा बदल होतो. आई वडील वारी ला गेले की संपुर्ण एक महिना (ञंबकेश्वर ते पंढरपुर) ताई नवनवीन प्रयोग करते नी मला निमुटपणे सहन करावेच लागतं.
तुमचं लिखाण नेहमी प्रमाणेच छान