ऐंशीच्या दशकातील विवाह: आनंदोत्सव कि कारुण्यसोहळे

Submitted by अतुल. on 9 July, 2018 - 05:25

म्ही भावंडे लहान होतो. मी दुसरी तिसरीला असेन. आईच्या माहेरी शेजारी एक अतिशय गरीब कुटुंब होते. अत्यंत हलाखीची स्थिती. त्यातच काही आजाराने कि कशाने त्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले. मुले लहानच होती. पण आमच्यापेक्षा थोडी वयाने मोठी. मग आईने त्यातल्या एका मुलीला आपल्याकडेच ठेऊन घेऊन तिचे पालनपोषण करायचा विचार तिच्या आईला बोलून दाखवला. खरंतर आम्हालाच तुमच्या मुलीची मदत होईल. तेंव्हा आम्ही तुमच्यावर उपकार वगैरे करत आहोत अशी भावना तुम्ही मनात आणू नका. तिचा मी नीट सांभाळ करीन. असे माझ्या आईने त्या मुलीच्या आईला सांगितले. तिने डोळ्यात पाणी आणून होकार दिला. तेंव्हापासून ताई आमच्याकडे राहायला आली. कपडे धुणे, धान्य निवडणे, पाखडणे, दळण करणे, केरकचरा काढणे, जेवण करणे, चुलीला सरपण आणणे, प्यायला खर्चाला पाणी आणणे, आंघोळीचे पाणी तापवणे, शेतातून भाजीपाला आणणे इत्यादी असंख्य कामे करायला ती आईला मदत करू लागली. तिच्याबरोबर आम्ही सुद्धा हळूहळू हि सगळी मदत आईला करू लागलो. बघता बघता ताई आमच्या घरचीच एक घटक झाली. जणू आमचे थोरले भावंडच.

हां हां म्हणता बरीच वर्षे निघून गेली. ताईचे लग्नाचे वय झाले. तिच्या आईने तिच्यासाठी स्थळे बघायला सुरवात केली. आणि बघता बघता एक दिवस तिचे लग्न ठरवून टाकले. खूप दूर अंतरावर एका अतिशय छोट्या खेडेगावात तिला "दिली" होती. तिचा होणारा नवरा आणि ते कुटुंब काय करत होते वगैरे यातले आता काहीही आठवत नाही. पण फार काही चांगली स्थिती नव्हती हे मात्र खरे. स्वच्छ आठवतोय तो मात्र एकच दिवस. जेंव्हा ताई आम्हाला सोडून चालली होती. तो तिचा आमच्या घरातला शेवटचा दिवस होता. ताईने आम्हा भावंडाना जवळ बोलवून घेतले आणि भरल्या डोळ्यांनी आमच्या डोक्यावर गालांवर हात फिरवत म्हणाली,

"जाते हां... खूप अभ्यास करा. खूप मोठे व्हा. घरातली कामं सगळ्यांनी वेळच्यावेळी करायची. वेळच्यावेळी जेवायचे, अंघोळ करायची. आता मी नसणार तुम्हाला सांगायला, सारखे तुमच्या पाठी लागायला. आईला त्रास देऊ नका. मदत करा. ऐकत जा" आणि असे म्हणून डोळ्यात पाणी आणून रडू लागली. आम्ही सगळे गहिवरलो. आईला त्रास देऊ नका हे तिने अनेकदा बजावून सांगितले. नंतर पुढे कित्येक वर्षे तिचा हा संवाद नुसता आठवला कि मला भरून येत असे.

ताईच्या लग्नाला अर्थातच आम्ही सगळे गेलो होतो. सगळे तपशील मला आता आठवत नाहीत. पण अनेक गोष्टी चांगल्या आठवतात. पावसाळ्याचे दिवस होते. एसटीने बराच लांबचा प्रवास करून मध्येच एका थांब्यावर आम्ही उतरलो. तिथून एक दोन किलोमीटर अंतरावर आतमध्ये ते गाव होते. मग पायवाटेने चालत निघालो. ती चिंचोळी पायवाट. सगळी चिखलाने आणि दलदलीने भरलेली. जिथे चालणे शक्य आहे तिथे घोटाभर आणि अशक्य आहे तिथे गुढगाभर चिखल अशी अवस्था होती. ते कमी म्हणून कि काय अधूनमधून माशा आणि चिलटे त्रास देत होती. दलदलीत मधून मधून दगड विटा टाकल्या होत्या त्यांच्यावर ढेंगा टाकत टाकत जवळजवळ उड्या मारतच चालावे लागे. जिथे मुलांना चालणे शक्यच नाही तिथे वडील आणि बरोबरची मोठी माणसे आम्हा मुलांना खांद्यावर घेत. आईला आणि तिच्या बरोबर आलेल्या इतर बायकांना तर कुठल्याकुठे आलो असे झाले होते. मजलदरमजल करत अखेर आम्ही त्या छोट्या खेडेगावात पोहोचलो. लग्नघराच्या दारातच मांडव घातला होता. कर्कश्श आवाजात लाउडस्पीकर सुरु होता. त्यामुळे कार्याला येणाऱ्याना दिशा कळत होती. छोटा मांडव मोजक्या पाहुण्यांनी भरलेला. मध्ये पाट मांडला होता. त्यावर बहुधा हळदी वगैरे लग्नपूर्व विधी झाले असावेत. बाजूला एकदोघे वाजंत्रीवाले बसले होते. पावसाने ढगाळलेले वातावरण. लग्नाचा प्रसंग खरंतर आनंदाचा. पण धीरगंभीर आणि उदासच जास्त वाटत होते. ताईला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मुंडावळ्या बांधल्या होत्या. त्यातून त्यांचे चेहरे पण दिसत नव्हते.

त्याकाळातले खेड्यापाड्यातले बहुतेक लग्नसमारंभ यापेक्षा फार वेगळे नसत. ऐपतीनुसार सोयीसुविधा कमी जास्त. पण सर्वत्र माहौल मात्र जवळपास तोच. मुंडावळ्या जाड्याभरड्या असत. मेसकाठीच्या पातळ काड्यांना लाल निळे जांभळे जिलेटीन कागद लावून मुकुट सदृश्य बनवलेल्या. त्यातून नवरा-नवरीचे चेहरे अजिबात दिसायचे नाहीत. शिवाय त्यांच्या चेहऱ्यांना हळद गुलाल लागलेला असायचा. वधूचा रडून सुजलेला मलूल चेहरा आणि वराच्या चेहऱ्यावरचे निगरगट्ट भाव हे बहुतांश लग्नात कॉमन दृश्य असायचे. एकत्र संसार करायला निघालेले ते दोघे बोहल्यावर उभे असताना एकमेकांकडे पाहत सुद्धा नसत. बोलणे हसणे तर लांबच. खरेतर लग्न हा आनंदसोहळा. मनोमिलन. दोन कुटुंबांचे मिलन. एका नव्या संसाराची सुरवात. पण आनंद कमी आणि दु:ख, चिंता, तणावच जास्त असलेला वधू पक्ष. विशेषकरून मुलीचे आईवडील. आणि उन्माद वर्चस्व इगो इत्यादी सगळे भाव चेहऱ्यावर आणि देहबोलीतून पदोपदी जाणवून देणारा वरपक्ष. असे चित्र बहुतेक लग्न समारंभात दिसत असे. "बक्कळ पैका हाय तेंच्याकड. नसला तरी त्यांचे पावणे माप शिरमंत हायत. मुलीसाठी वाटेल तेवढा पैका खर्च करायची त्यांची तयारी हाय अशी बातमी आमी काढलीया. तेंव्हा तुमी हुंडा दाबून मागा" असा सल्ला वराच्या आईवडीलाना देणारे एकीकडे, आणि "काही काळजी करू नका भाऊसाहेब. आम्ही हाय कि तुमच्यासोबत. चांगली माणसं हायत ती. आपल्या तायडीला फुलासारखी जपतील. आणि काय लागलंसावरलं तर आमी हितंच हाय कि. जातोय का कुठं?" म्हणून भाबडी आशा दाखवून वधूपित्याला सदगदित करून सोडणारे व मुलीच्या लग्नासाठी तयार करणारे दुसरीकडे. अशा गोष्टी होत होत लग्ने ठरायची.

अनेक लग्नांत बॉम्बस्फोटाआधीचे तणावपूर्ण वातावरण असायचे. याला कारण केवळ आणि केवळ लोकांचे स्वभावदोष. बाकी काही नाही. लग्न ठरवताना बोलणी करताना कोण कुणाला काय बोलला किंवा चुकून कुणाच्यातरी तोंडून काहीतरी शब्द गेला किंवा देण्याघेण्याच्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत इत्यादीचे निमित्त डोक्यात ठेऊनच लोक लग्न मांडवात यायचे. पार्श्वभूमीच अशी असेल तर पुढे काय अपेक्षा करणार? मग एवढ्यातेवढ्याचे निमित्त होऊन लग्नाच्या मांडवात धुसफूस, मानापमान, वादावादी सुरु व्हायची. आणि तापट डोक्याचा कोणी असेल तर पर्यवसान स्फोट होण्यातच व्हायचे. मग नमते घेणारा वधूपक्षच. कारण गरज त्यांनाच असायची. बिनलग्नाची मुलगी घरात ठेवणे म्हणजे विस्तवाशेजारी लोणी साठवल्यासारखी अवस्था. त्यात आणि मुलगी गरिबाघरची असेल तर विचारायलाच नको. वयात आलेली आजूबाजूची टारगट कार्टी, गावातल्या गुंडांच्या नजरा यांपासून मुलीला सांभाळायचे, कि अठरा-वीस वर्षे सांभाळ केलेल्या पोटच्या गोळ्याला मनावर दगड ठेऊन नशिबाच्या हवाली करून येईल त्या स्थळाशी ते म्हणतील त्या मागण्या मान्य करून लग्न लावून द्यायचे अशा कात्रीत वधूपक्ष असायचा. त्यातून लग्न मांडवात मुलीचे लग्न मोडणे हि मुलीच्या दृष्टीने भयंकर गोष्ट. बदनामीला तेवढे निमित्त खूप असायचे. त्यामुळे त्यांना वरपक्ष म्हणेल त्यानुसार वागणे हाच एक पर्याय असायचा. असे झाले कि वराकडच्या लोकांना "गाजवल्या"चे समाधान मिळायचे. त्यांच्या उन्मादाला उधाण यायचे. अशा असमतोल पार्श्वभूमीवर होणाऱ्या विवाह समारंभात प्रेम, मनोमिलन, आनंद, उत्साह या गोष्टी निर्भेळस्वरुपात आढळण्याची अपेक्षा करणेच चुकीचे. त्यामुळे हे आनंदोत्सव कमी आणि कारुण्यसोहळेच अधिक असायचे. लग्नाच्या अशा जुगारात आयुष्य पणाला लावायचे कोणत्या मुलीला आवडेल? साहजिकच लग्न म्हणजे त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य, मोकळीक, लाडकौतुक, मित्रमैत्रिणी, आवडीनिवडी, आवास, निवास या सगळ्या सगळ्याला तिलांजली देणे. आणि एका अशा जगात प्रवेश करणे जिथे फक्त तिला भोगवस्तू आणि मुले जन्माला घालायचे मशीन इतकीच ओळख असेल. त्यामुळे "लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची" म्हणून आनंदाने बागडणारी मुलगी फक्त सिनेमातल्या गाण्यातच दिसत असे. प्रत्यक्षात मात्र सासरी जाणारी मुलगी आईवडिलांच्या गळ्यात पडून रडरड रडली नाही तरच नवल. त्या काळात शहरांमध्ये फार वेगळी स्थिती असेल असे मला वाटत नाही. स्टेज वेगळे असले तरी नाटकाची संहिता आणि गाभा तोच असायचा.

त्याच दरम्यान माझ्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. किती खुश होता तो. त्यानंतर कित्येक महिने त्याच्या तोंडी फक्त आणि फक्त बहिणीच्या सासरच्यांचे कौतुक असायचे. आमच्या दाजींचे एवढे मोठ्ठे घर आहे. आमच्या दाजींकडे अमुक गाडी आहे. आमच्या दाजींनी इम्पोर्टेड टेपरेकॉर्डर घेतला. आमच्या दाजींनी मला कपडे घेतले. आमच्या दाजींनी नवी बुलेट घेतली. एक ना दोन. बघेल तेंव्हा याच्या तोंडी सतत दाजींचेच कौतुक. पण हे फार काळ टिकले नाही. ह्याच दाजीने नंतर आपले खरे रंग दाखवायला सुरवात केली. मित्राच्या बहिणीचा हुंड्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी वारंवार छळ सुरु झाला. ती सतत माहेरीच येऊन राहू लागली. आणि एक दिवस जे व्हायचे तेच झाले. त्याने हिला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न केले. हिने हाय खाल्ली. आजारी पडली. जेवणखाण सोडले. कृश झाली. आणि एक दिवस मरून गेली! आमच्या ताईच्या बाबत सुद्धा काहीसे असेच झाले, फक्त नशीब कि तिने हाय खावून मृत्यूला कवटाळले नाही. कसल्याश्या कारणावरून सासरच्यांनी ताईचा छळ केला. नंतर नवऱ्याने पण घटस्फोट घेतला. पण ताई खंबीर राहिली. तिनेही दुसरे लग्न केले. आतातर त्यालाही अनेक वर्षे झाली. दुसऱ्या लग्नानंतर मात्र ती चांगली स्थिरावली. पाचेक वर्षांपूर्वी जवळ जवळ पस्तीस चाळीस वर्षांनी आम्हाला भेटायला पुण्याला येऊन गेली.

अशा कित्येक मुलींचा हुंड्यापोटी अथवा मुलगा झाला नाही म्हणून छळ झालाय. रोज बातम्या असायच्या. जाळून मारल्याच्या अनेक घटना घडल्यात. अनेकदा ती बातमी मात्र "स्टोव्हचा भडका उडून नवविवाहितेचा मृत्यू" अशी असायची. एकंदर सामाजिक मानसिकताच "सिक" होती. त्यावेळच्या सिनेमातून सुद्धा हेच प्रतिबिंबित व्हायचे. "दाठून कंठ येतो" सारखी मराठी गाणी असोत किंवा "बाबुल कि दुवांये लेती जा" सारखी हिंदी गाणी असोत. लग्नव्यवस्थेचा पलंग हुंडारुपी ढेकणांनी लडबडलेला होता. नवविवाहितेचे रक्त शोषून घेत होता. याच दरम्यान अनेक हुंडाविरोधी चळवळी सुरु झाल्या. नाटके सिनेमांनी याविरोधात जनमानस ढवळायला सुरवात केली होती. माझ्या आठवणीप्रमाणे "लेक चालली सासरला" हा याच विषयावर चित्रपट त्याकाळात निघाला होता आणि तो खूप गाजला पण होता.

नंतर काळ बदलला. नव्वदनंतर परिस्थितीत बरेच बदल झाले. आजकाल तर अशी गाणी आणि सिनेमे निघतही नाहीत. कारण आता समाजमानस बदलले आहे. याचा अर्थ हुंडाबळी आता होत नाहीत असे नाही. बातम्या अजूनही येतात. पण पूर्वीइतके प्रमाण राहिलेले नाही. परवाच पुण्यात एका लग्नसमारंभाला गेलो होतो. किती प्रसन्न वातावरण होते. वधूला डोलीत बसवून आणले जात होते. आणि त्या प्रकारची गंमत वाटून ती खळाळून हसत सुटली होती. त्या जुनाट जाड्या मुंडावळ्या कधीच्या हद्दपार झाल्यात. (पूर्वी त्या मुंडावळ्यांमुळे नवरानवरीचा चेहराच दिसायचा नाही. त्यामुळे, लग्न कोणाचेही असो त्यात नवरानवरीचे "काम करणारे" मात्र एकच असतात असा माझा लहानपणी समज झाला होता. Lol असो) पूर्वी एकमेकांकडे न बघणारे नववरवधू आजकाल लग्न ठरवून केलेले असो अगर प्रेमविवाह, एकमेकांशी बोलत थट्टामस्करी करत उभे असताताना दिसतात. लग्नाचा माहौल सुद्धा पूर्वीसारखा जडगंभीर राहिला नाही. समाजमानस बदललंय. लोक ईझी गोइंग झालेत. खेड्यापाड्यात कदाचित काही प्रमाणात अजून पूर्वीसारखेच असेल क्वचित ठिकाणी. नाही असे नाही. पण अनेक चांगले बदल झालेत. कारुण्यसोहळे कमी झालेत Happy

(टीप: मायबोलीवरील एका धाग्याच्या प्रतिसादात अॅमी यांनी हा लेख लिहायला मला प्रोत्साहित केले त्याबद्दल त्यांचे आभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच मुद्दे पटले. आम्ही शाळेत होतो तेव्हाच तो 'माहेरची साडी' जबरदस्त हिट झाला होता. माझ्या भयंकर डोक्यात जातो.आधी तो काळ तसा त्यात लोकांपुढे भलती रोल मॉडेल सेट झाली असतील.
हल्ली पण सटल 'वरपक्ष' गोष्टी असतात पण त्यांची तीव्रता बरीच कमी झालेली असते. लग्नं टिकतात ती 'एरवी पण रुटिन मध्ये २-३ तास तर घरी असतो दोघं, चालवून घेऊ.परत सगळं तोडायला जुळवायला वेळ कुठेय' या भावनेतून टिकत असावी असा दाट संशय आहे. Happy

एरवी पण रुटिन मध्ये २-३ तास तर घरी असतो दोघं, चालवून घेऊ.परत सगळं तोडायला जुळवायला वेळ कुठेय' या भावनेतून टिकत असावी असा दाट संशय आहे. >>>+११११११११११११११११११
चान लिहिलय

'एरवी पण रुटिन मध्ये २-३ तास तर घरी असतो दोघं, चालवून घेऊ.परत सगळं तोडायला जुळवायला वेळ कुठेय' या भावनेतून टिकत असावी असा दाट संशय आहे.>>
वेळ आणि पैसा पण Wink परत पुन्हा एकदा बल्ल्या व्हायचा चान्स आहेच..

छान लिहिलंय,
पण आजही गावांमध्ये वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही (मला प्रत्यक्ष अनुभव ,माहिती नाही पण बिगबजेट लग्नाचे जे खूळ आलंय, ते पाहता वरची आनंदाची साय बाजूला केली तर खाली काय असेल ते माहीत नाही)

< पण आजही गावांमध्ये वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही (मला प्रत्यक्ष अनुभव ,माहिती नाही) >
>> +१
लेखात दोन अतिशय वेगवेगळ्या समाजाची दोन लग्न वर्णन केली आहेत. त्यात फक्त काळाचा फरक नसून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक फार फरक आहे. भारतात अजूनही ४७% स्त्रियांचे लग्न आणि मूलदेखील (कधीकधी १+ मुलं) १८- वयातच झालेली असतात. आत्ता परवाच एक मुलगी माहित झाली जिचं वय फक्त १५ आहे आणि तिला २ मुलं आहेत. आपापल्या घरी, बील्डिंगमध्ये, हापिसात चाकरीला येणाऱ्या बायकांशी थोडं बोललंतरी कळत काय परिस्थिती आहे. आमची मेडच १९८२ साली जन्मली आहे आणि तिला २ नातवंड आहेत.

===
< पण बिगबजेट लग्नाचे जे खूळ आलंय, ते पाहता वरची आनंदाची साय बाजूला केली तर खाली काय असेल ते माहीत नाही)>
>> त्या डोलीत बसायचं म्हणून खळखळून हसणाऱ्या मुलीदेखील खरंच खुश आहेत, राहतील हे कुठे नक्की असतं? आमच्या नात्यातच एक लग्न नुकतंच मोडलं मुलीकडच्यांनी. "आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात ३० लाख खर्च केले तर तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नात ३०-३५ तरी खर्च करायला हवा" म्हणे :D:D. मुलाकडचे परजात, राज्यातले होते.

जरा अवांतर:

>>परत पुन्हा एकदा बल्ल्या व्हायचा चान्स आहेच..

हा वाक्यप्रचार ऐकुन आमच्या एका सरांची आठवण आली!

अतिशयोक्ती वाटते मी पण लहानपणी 1980
मदे शाळेत असताना अनेक लग्नाना गेलो आहे पण वर रंगवले आहे ते अतिशयोक्ती आहे, एवढे उदास भयंकर असे काही न्हवते, आणि एवढ्या समस्या पण न्हवत्या, आज मोबाईल , ब्रेकअप, एक्स मर्तीअल अफेअरा, व्हॉटसअप इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, मोर्फिंग, फोन रेकॉर्डिंग, त्रोलिंग, ब्ल्यू व्हेल मुळे अनेक समस्या आहेत उगाच ुरविव्हा काळाचे रंगवलेले उदास चित्रा आहे, खरे तर काल्पनिक कथा आहे, कारण गावाचे नाव, लग्नानंतर त्या ताईचे पुढे काय झाले, इंड झाकलेला नवरा कामधंदा करीत होता की न्हवता, आणि लग्नासाठी गावाला गेला का याचा काही उल्लेख नाही, बाकी काल्पनिक कथा म्हणून ठीक आहे

अतिशयोक्ती वाटते मी पण लहानपणी 1980
मदे शाळेत असताना अनेक लग्नाना गेलो आहे पण वर रंगवले आहे ते अतिशयोक्ती आहे, एवढे उदास भयंकर असे काही न्हवते, आणि एवढ्या समस्या पण न्हवत्या, आज मोबाईल , ब्रेकअप, एक्स मर्तीअल अफेअरा, व्हॉटसअप इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, मोर्फिंग, फोन रेकॉर्डिंग, त्रोलिंग, ब्ल्यू व्हेल मुळे अनेक समस्या आहेत उगाच ुरविव्हा काळाचे रंगवलेले उदास चित्रा आहे, खरे तर काल्पनिक कथा आहे, कारण गावाचे नाव, लग्नानंतर त्या ताईचे पुढे काय झाले, इंड झाकलेला नवरा कामधंदा करीत होता की न्हवता, आणि लग्नासाठी गावाला गेला का याचा काही उल्लेख नाही, बाकी काल्पनिक कथा म्हणून ठीक आहे