लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग १)

Submitted by मनस्विता on 9 July, 2018 - 03:34

प्रस्तावना:

१.

मे २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात लेह, लडाखला जाऊन आले. ह्या प्रवासाचे वर्णन नक्की लिहून काढायचे असे ठरवले होते. मग नाव काय द्यायचे त्याचा विचार सूरु केला. आजकाल इंग्लिशमधेच बऱ्याचदा विचार करायची सवय झालेली असल्याने, सुरुवातीला नावसुद्धा इंग्लिशच सुचलं - Leh Ladakh Trip - A Journey Within! पण मग बाकीचे लेखन मराठीमध्ये करणार असल्याने हे नाव कसं चालणार, म्हणून मग पुन्हा विचार सुरु केला. ह्या इंग्लिश नावाचे मला वाटणारे 'लेह लडाख सहल - एक अंतर्मनातला प्रवास' असे भाषांतर सुचले. पण ते फारंच कृत्रिम वाटले. मग पुन्हा नावासाठीचा शोध आणि विचार सुरु झाला.

मग विचार केला की हा प्रवास, मी माझ्यापुरती चाकोरी मोडून केलेला आहे. म्हणजे खरंतर लेह-लडाख हा प्रवास कित्येक लोक सायकल, बाईक किंवा स्वतःची कार घेऊन करतात. पण माझा प्रवास तर 'वीणा वर्ल्ड' सारख्या सहलींचे नियोजनपूर्वक आयोजन करणाऱ्या कंपनीतर्फे एका ३० लोकांच्या समूहाबरोबर केलेला प्रवास होता. मग एवढी काय मोठी गोष्ट! तर हा प्रवास मी माझा नवरा आणि मुली ह्यांच्यासोबत न करता बहिणींबरोबर केला. तसं पाहायला गेलं तर मुली फार मोठ्या नाहीयेत, त्यामुळे ८-९ दिवस त्यांना सोडून जाणे आणि तेही एकप्रकारे मजा करायला ही खरोखर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तर हा प्रवास म्हणजे घरच्यांबरोबर फिरायला जाऊन आनंद लुटणे ही चाकोरी मोडून बहिणींबरोबर जाणे असा होता.

अनेकदा कित्येक अडथळे हे प्रत्यक्षात नसून आपल्या मनात असतात. आणि हे अडथळे मोडून काढणे फार अवघड असते. तर असे मानसिक अडसर बाजूला सारून केलेला हा प्रवास.

२.

हा असा प्रवास आम्हा फक्त तिघी बहिणींनी एकत्र करावा ही कल्पना सर्वप्रथम माझ्या मधल्या बहिणीने मांडली. साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिने आम्हा बहिणींचा एक कॉन्फरन्स कॉल ठेवला. आणि तेव्हा तिने ही कल्पना मांडली. अर्थातच बाकीच्या आम्हा दोघींनाही ही कल्पना खूप आवडली आणि आम्ही ती उचलून धरली.

मग चर्चा सुरु झाली की जायचे कुठे? कारण जायचे झाले तर मे महिन्यातच जावे लागणार होते. तिघींपैकी दोघींना ते सोयीचे होते. एवढ्या भर उन्हाळ्यात जायचे म्हणजे थंड हवेच्या ठिकाणीच जावे लागणार हे नक्की होते. मधली बहीण (तिला मी 'माई' म्हणते आणि सर्वात मोठी बहीण आहे तिला आम्ही 'ताई' म्हणतो.) सिमला, कुलू, मनाली तसेच काश्मीरला जाऊन आलेली असल्याने ती ठिकाणे बाद झाली. तसं माईला पुन्हा काश्मीरला जायचा उत्साह होता पण मला भीती वाटत असल्याने तिथेही नको म्हणले.

माझ्या मनात का कोणास ठाऊक लेह-लडाखला जायचे होते. म्हणजे मी प्रत्यक्ष तिथे जाईपर्यंत मी फारसा त्याबद्दल काही वाचला नव्हतं किंवा माझ्या माहितीत कोणी गेलं नव्हतं. तसेच 3 idiots मध्ये तिथले शूटिंग होते म्हणून जावेसे वाटले म्हणावे तर त्यानंतर तिथे ढगफुटी झाली होती आणि त्या बातम्या वाचताना पण अरेरे आपल्याला इथे जायचे आहे आणि इथे असे होते वगैरे विचार पण मनात आले नाहीत. असो, पण कुठे तरी इच्छा होती. त्यामुळे मी तसे बोलून दाखवले. ताईलापण तिथे जायचे होतेच. आणि माईला आम्हा दोघींबरोबर कुठेही जायला मिळाले तरी आनंदच होता.

ही मूळ कल्पना माईची असल्याने आम्ही तिलाच सगळी चौकशी करणे आणि त्याचप्रमाणे पुढील बुकिंग करणे ह्याची जबाबदारी दिली. साधारणतः मे महिन्याचे शेवटचे १० दिवस असा अतिशय मर्यादित कालावधी आम्हा तिघींनाही चालणारा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात माईची सुरु होणारी शाळा तसेच माझे सुरु होणारे क्लासेस ह्यामुळे ट्रिपनंतर किमान २-३ दिवस विश्रांती मिळणे फार आवश्यक होते. ताईला तारखा थोड्याफार इकडेतिकडे झालेल्या चालणार होत्या.

माईने वीणा वर्ल्डव्यतिरिक्त अजून एके ठिकाणी चौकशी केली होती. परंतु त्यांच्या सहलीत कारगिलदर्शन देखील होते. आणि मला काही तिकडे जायचे नव्हते. त्यामुळे आम्ही वीणा वर्ल्डनेच जायचे ठरवले. त्याप्रमाणे २३ मे ते २९ मे ह्यादरम्यान असलेल्या सहलीबरोबर जायचे ठरले. परंतु ही सहल मुंबई ते मुंबई अशी होती. त्यामुळे ताई व मला पुणे ते ठाणे आणि नंतर मुंबई आणि पुन्हा मुंबई ते पुणे असा प्रवास करावा लागणार होता. तसेही पुण्याहून सहल असली असती तर माईला ठाणे ते पुणे आणि नंतर पुन्हा ठाणे असा प्रवास करावा लागला असता.

अश्या रीतीने अनेक चर्चासत्रे झडून, कदाचित बुकिंग न मिळाल्याने प्रवास रहित होतो की काय अशी शक्यता स्वीकारून आम्हा तिघींचे बुकिंग होऊन एकत्र प्रवास करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

क्रमशः

भाग २:
https://www.maayboli.com/node/66734

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Namokar आणि उपाशी बोका, धन्यवाद!

उपाशी बोका, तुमचा अनुभव कसा होता?

वीणा वर्ल्ड चांगले आहे, पण लेह लडाख हा प्रकार एकदम ओव्हररेटेड आहे. दगड जास्त आणि झाडे कमी. तो फडतूस प्यॉन्गाँग लेक बघायला ४-५ तास जीपमध्ये बसून हाडे खिळखिळी करणार्‍या रस्त्यावर जायचं म्हणजे एक शिक्षा होती. त्या लेकमध्ये मूत्रविसर्जन करणारा एक महाभाग पण दिसला तिथे. त्याचा फोटो काढून सोशल मिडियावर टाकायचा मोह झाला होता, पण आपल्याच तोंडाने आपलीच काय बदनामी करायची म्हणून ते टाळले.

लोक म्हणजे पण कहर होते, आम्हाला टॉप फ्लोअर का दिला म्हणून हॉटेलमध्ये भांडण केले, अखंड खाण्याकडेच लक्ष, नेहमी नवीन-नवीन पदार्थ पाहिजेत, चमचमीत पाहिजे, स्वीट डिश पण पाहिजे असे अनेक नखरे. लेह सारख्या ठिकाणी जिकडे काही पिकत नाही, अन्न बाहेरून आयात करावे लागते, तिथे "परवाच तर बटाटा आणि कोबीची भाजी केली, आज पण परत कोबीच का?" असे म्हणून वीणा वर्ल्डच्या मॅनेजरला नावे ठेवणारे नग पण दिसले तिथे. कधी न मिळाल्यासारखे, हपापलेल्या प्रकारे जेवण घ्यायचे आणि मग अन्न टाकून द्यायचे, असल्या भरपूर तऱ्हा.पण बरेचसे चांगले लोक पण भेटले. एकंदरीत वेगवेगळे लोक भेटले आणि त्यांचे अनुभव ऐकता आले हीच काय ती जमेची बाजू.

सँड ड्यून म्हणजे जेमतेम ५-६ फुटांचा वाळूचा ढीग असला प्रकार आहे आणि तिथे उंटावर बसता येते. तिथेपण लायनीत घुसणे प्रकार झाले भरपूर (इतर टूर्सचे लोक पण येतात तिथे), मग त्या उंटाच्या माहुताला फोटो काढायला त्रास द्यायचा किंवा फेरी संपली तरी न उतरता सेल्फी काढत बसायचे, असे नानाविध प्रकार बघायला मिळाले. थ्री ईडियट्समुळे प्रसिद्ध झालेली शाळा म्हणजे बळंबळं केलेला टूरिस्ट स्पॉट आहे, पण युनिफॉर्म घालून शिकणारे विद्यार्थी बघायला छान वाटले.

शे पॅलेस आणि मोनॅस्ट्री, हेमिस मोनॅस्ट्री, डेस्किट मोनॅस्ट्री ठीक आहे. हेमिस म्युझियम आणि शांती स्तूप मात्र आवडले. मोनॅस्ट्री बघून बघून नंतर कंटाळा आला. बहुतेक सगळ्या एकसारख्याच, पण आतमध्ये प्रसन्न वाटते, स्वच्छता आहे. मॅग्नेटिक हिल हा भंपक प्रकार पण पाहिला. मात्र लेहसारख्या अशा कठीण परिस्थितीत आपले सैनिक कसे राहातात, काम करतात आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो, हे बघून मात्र त्यांच्याबद्दल अपार आदर वाटला.खारदुंगला आणि चांगला पास ही ठिकाणे चांगली आहेत, पण तिथे टॉयलेटची सोय आहे त्याची पूर्ण वाट लावली आहे. लोकांनी कुठेही घाण करून ठेवली आहे, इतकी की मला ऑलमोस्ट उलटी होणार होती तिथे इतकी भयानक परिस्थिती आहे.

लेहमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवली पहिल्या दिवशी. नंतर सवय झाली. एका संध्याकाळी वीणा वर्ल्डने लोकनृत्याचा कार्यक्रम ठेवला होता, तो खूप छान होता. हॉटेल्स स्वच्छ होती, प्रवासाची सोय चांगली होती (स्वतंत्र जीप होत्या), प्रत्येक ठिकाणी सवडीने व्यवस्थित दाखवले, कुठेही घाईघाई केली नाही. दररोज पाण्याच्या बाटल्या पण दिल्या होत्या. त्यांनी केलेली एकंदर सोय बघता मी "वीणा वर्ल्ड"ची नक्कीच शिफारस करीन.

@उपाशी बोक@: खूप उशिरा प्रतिसाद देत आहे. पण मधले काही दिवस कॉम्पुटरवर बसणेच जमले नाही. आणि मोबाईलवरून मराठी टायपिंग अवघड जाते.

खूपच विस्तृत प्रतिसाद दिला आहेत तुम्ही. परंतु आमच्याबरोबर असलेले लोक खरंच खूप चांगले होते. त्यामुळे प्रवास छान झाला.