“ एका संध्याकाळची डायरी ”

Submitted by Charudutt Ramti... on 7 July, 2018 - 16:05

वेळ संध्याकाळची. दिवे लागणीची. काहीशी एकाकी, काहीशी कातरवेळ वगैरे म्हणतात तसली. बाल्कनी मधे बसलो होतो, एकटाच. स्वत:च्याच अस्तित्वाचे फरसाण खात. किती वेळ ते माहिती नाही. पण बराच वेळ. एक डोंगर आहे पश्चिमेला बाल्कनी मधून दिसणारा. त्या डोंगरा पलीकडे होणारा सूर्यास्त आमच्या बाल्कनी मधून दिसतो. अगदी दररोज. विशेषत: उत्तरायणात नक्कीच. पुर्वी दक्षिणायनातही दिसायचा, साधारण आठेक वर्षांपूर्वी इथे राहायला आलो तेंव्हा. आता ह्या वर्षीच्या संपत आलेल्या उत्तरायणाचे थोडेच काही दिवस शिल्लक उरलेत. मोजायचेच झाले तर फक्त अकरा दिवस. मग मात्र हळू हळू हा सूर्यास्त दिसायचा बंद होईल. कारण अजस्त्र अशा त्या बेढब उंचच उंच इमारतींच्या भिंती तो निळसरसा सोनेरी संधीप्रकाश अडवतील. पण तरीही त्यांच्या काचा आणि अल्यूमिनियमच्या त्या चकचकीत फसाड वरुन परावर्तीत होणा-या गुलबक्षी मजेन्टा रंगांच्या त्या शलाकांच्या छटा येतातच थोडे दिवस आमच्या बाल्कनी पर्यंत. त्या छटा म्हणजे जणू नॉर्दर्न लाइट्स पडावेत उत्तर ध्रुवावर तसे प्रकाश पाडतात आमच्या काचेवर. मग मात्र हळू हळू थंडी वाढते तशी पुढील काही महिन्यांच्या गॅप नंतर सूर्यास्त परत आमच्या बाल्कनीमधे येतो तो सरळ मग जानेवारीत संक्रांतीनंतर. तो पर्यंत मग फक्त उधार उसनवारीचे संध्याछायेचे हे झरोके इकडून तीकडून दुस-या तिस-या इमारतींच्या लोलकामधून येणारे पाहत उभे राहायचे, बाल्कनीच्या कठड्याला मुठीन्नी अलगद असे स्पर्श करत.

हा बाल्कनी मधून दिसणारा सूर्यास्त मला फार गरजेचा असतो कधी कधी. विशेषत: दिवस भर मनाविरुद्ध घटना घडल्या असतील तर. रात्रीस शरण जाण्या आधी हा संधी प्रकाश बराच आधाराचा ठरतो. त्या एकल कोंड्या संध्याकाळी मग मी जुनाट कुठले तरी पुस्तक शोधून वाचत बसतो. घरी कुणीच नसतं. सोबतीस् तसे नाही कुणी लागंत, पण हवीच असली तर घ्यायची कुठली तरी ग्रेस ची कविता दुखा:ची किनार शिवत बसलेली. आणि अर्थ काढत बसायचे वेगवेगळे. लयबद्धतेने एक एक असं करत जाणिवाचं वारूळ बांधणारे हे ग्रेस. नाहीच सापडले ग्रेस तर मग बोरकर. 'संधी प्रकाशात अजुन जे सोने' अशी शब्दावली अशीच सूर्यास्ता वेळी सुचली असेल का एखाद्या विचार करत वाचत बसायचं. ह्यांच्या पैकी कुणीच नाही सापडले जुनाट पुस्तकांच्या रॅकवर (ब-याच वेळेला मित्रांना दिलेली पुस्तके तिकडेच रहातात. माझ्या कडे ही असलेली सगळी पुस्तके मी विकत आणलेली नाहीत.) तर मग सरळ इयर फोन घ्यायचे आणि यू ट्यूब 'रन्जिशि सही' सारखी गझल सुरू करायची. मेहदी हसन वाली ओरिजिनल किंवा हरिहरनने हरकती घेत घेत गायलेली. त्यातला 'पहेले से मरासिम नही' हा शेर आला की त्यातला ‘तीव्र मध्यम’ पुन्हा पुन्हा ऐकायचा. अगदी कंटाळा येई पर्यंत. डोळे मिटून पाठीचा कणा नसलेल्या रॉकिंगच्या खुर्ची वर संध्याकाळ च्या वेळेस गझल ऐकत बसणे म्हणजे समाधी मध्ये 'तुरिया' अवस्था प्राप्त होण्या इतकीच दुर्मिळ मानसिक प्रक्रिया. निष्कांचन अवस्थेत खुर्चीत पाहुडून दोन्ही पाय एकमेकांत गुंतवून बाल्कनीच्या आडव्या गजान्मधे गुंफलेले. जमिनी पासून तीस औन्शात वरती कललेले. पायांना मुंग्या येईस्तोपर्यंत अगदी न केलेली हालचाल.
इतक्यात बाहेर टपो-या थेंबांचा पाऊस सुरू झालेला असतो. 'ती गेली तेव्हा रिम झिम पाऊस नीनादात होता’ वाला पाऊस...कवितेतला पण प्रत्यक्षात उतरलेला. त्या गझलेतल्या ‘तीव्र मध्यम’ मधे दरावरची बेल दोन तीनदा कुणी तरी वाजवून गेलं असतं. तिसर्या चवथ्या बेल ला लक्षात येतं. मग कानातले प्लग्स काढायचे. पायांना आलेल्या मुंग्यांना पायापासून दूर सारत दरवाज्या पर्यंत जायचं. पावसांन फुगलेला दरवाजा जोर देऊन उघडायचा. पावसाळा आसमन्तात स्थिरावल्याची दोन मुख्य लक्षणं आमचा दरवाजा दर वर्षी न चुकता देतो..... एक दरवाजा घट्ट होणे आणि दुसरा सकाळ चा पेपर उंबर्यात भिजून पडलेला असणे.

दारात मुग्धा, पल्लवी आणि ‘ही’...अश्या तिघी उभ्या असतात. एरोबिक्स करून आलेल्या. घामाने आणि पावसाच्या थेंबांनी निथळणार्या तिघी! अर्ध्या गारठयामध्ये बेल वाजवत माझ्या दार उघडण्याची वाट पाहत उभ्या असतात.

“काय हे किती उशीर? कधीची बेल वाजावतोय आम्ही काका?” – गारठलेली मुग्धा लडीवाळ पणे माझ्यावर हसत हसत ओरडते.
पल्लवी आमच्या ‘समोर’ राहते सी-टू थ्री-झिरो-थ्री मधे. मुग्धा तिची मुलगी. यंदा दहावीत गेलेली. नुकतीच वयात आलेली. परिजातकाच्या झाडाला नुकतीच पालवी फुटून नवीन फुलं लागावित तशी दिसते. अवखळपणा आणि नाविन्याची उर्मि तिच्यात क्षणाक्षणा गणिक जाणवते हल्ली. दार उघडल्या उघडल्या मुग्धा तशीच स्वयंपाकघरात पळते झर्रकन...तिचे ओले पाय सगळ्या हॉल भर आणि स्वयंपाक घरातल्या फरशी वर पसरतात. त्यांच्या घराची किल्ली आमच्या स्वयंपाक घरात फ्रीझ पाशी टांगलेल्या किल्ल्यांच्या हुका वर कुठे असते हे तिला आंधळी कोशिंबीर खेळताना डोळ्यावरची पट्टी न काढता शोध म्हणून सांगितले तरी ती ‘न’ चुकता शोधेल इतकी ती जागा तिच्या सवईची आहे.
“पुन्हा डॅडी विसरला किल्ली, मम्मा!” मुग्धा आणि पल्लवी मधे मग काही संवाद होतो. आता पल्लवी आणि मुग्धा ला तिचे बाबा येई पर्यंत वाट पहाणे अपरिहार्य. 'ही' ची कॉफी ची दोघींना ऑफर. ह्या सगळ्या लगबगीत माझी ‘यमन’ मधली हरिहरनची गझल मागे पडते. आणि मग मी, पल्लवी, मुग्धा आणि वेदा च्या संवादात अडकून पडतो. तिकडे सूर्यास्त होउन संधी प्रकाश सरला असतो आणि रात्रीचं काळसर गर्दनिळ आकाश हळू हळू घरावर काजळमाया पांघरू पाहत असते. मला ही कॉफी घ्यायची ची ऑफर येते. मग पल्लवी मुग्धालाच 'मुग्धा तूच कर गं कॉफी सगळ्यांना' असं म्हणते. पाचव्या मिनिटाला आमच्या स्वयंपाक घरात मुग्धाचा मुक्त पदन्न्यास सुरू होतो. कधी काळी कुर्ग हून आणलेल्या भरडलेल्या कॉफी बिन्स बरोबरच कॉफी मधे वेल्दोडयाच्या दोन पाकळ्या पडतात आणि घर नुसतं मग दरवळून निघतं.

पुढच्या दोनच मिनिटात मग कॉफी ची वाफ डायनिंग टेबलाच्या काचांना दवमय करून जाते. कॉफी पिता पिता मग बडबडी मुग्धा अव्याहत पणे काही बाही बोलत राहते. अलीकडे नवीन काय काय वाचलं...कुठले पिक्चर...कुठली गाणी... एखादा खळखळणारा झरा ओसंडून वाहवा तशी नुसती बडबड. गडबडीत माझ्या पुढयातला माझा मोबाइल घेत त्यावर ती तिचं इनस्टाग्रॅम ओपन करते आणि...तिचे काल अपलोड केलेल फोटो आणि त्यावरचे कॅपशन्स मला वाचून ऐकवत बसते...बराच वेळ निघून जातो...अगदी सहज झर्रकन...!

कातर संधी प्रकाशात सुरू झालेली ग्रेस च्या कवितेत भिजलेली संध्याकाळ...मुग्धाच्या कॉफी बिन्स आणि तिच्या इनस्टाग्रॅम च्या पोस्ट नि संपलेली असते...! आता अशी संध्याकाळ आणि तो क्षितीजावरचा मालवणारा सूर्यप्रकाश केवळ परत उत्तरायण सुरू झाल्यावर जानेवारी नंतर... परंतु मुग्धा ची कॉफी मात्र मिळत राहील आम्हा चौघांना लहर येईल तेंव्हा, अधे मधे कधीही... मला दोन्हीची तितकीच अपूर्वाई…!!

चारूदत्त रामतीर्थकर.
८ जुलै १८, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users