स्वातंत्र्य सेलिब्रेट करावं म्हणतेय

Submitted by विद्या भुतकर on 5 July, 2018 - 08:45

चार जुलै ! अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन.

बरंय, इंग्रजांमुळे भारत, अमेरिका, पाकिस्तान सारख्या आपल्या देशांना मिळाला, स्वातंत्र्यदिन.

एक हक्काची सुट्टी.

स्वातंत्र्य, इतक्या सर्व लोकांना, एकदम, एकेदिवशी. कुणापासून? कशापासून?

म्हणजे भारतातल्या लाईट नसलेल्या एका खेड्यातल्या माणसाला त्या दिवशी कळलं असेल, आपण स्वतंत्र झालो म्हणून?

तर स्वातंत्र्यदिन नसेल तर काय? इंग्रज काय सेलिब्रेट करत असतील? त्यांच्या साठी तर हे सर्व दिवस म्हणजे एक हारच. असो. काहीतरी करतच असतील तेही.

बाय द वे, स्वातंत्र्य म्हणजे तरी काय?

आज इथे सहा महिन्यांच्या थंडीनंतर कडकडीत ऊन पडलेलं आहे. बीचवर भल्या पहाटे आठपासूनच गर्दी. सुट्टीच्या दिवशी इतक्या लवकर कुणी उठून आवरून जातं का?

तर चार दिवस मिळणाऱ्या या उन्हाच्या झळा अंगावर घेण्यासाठी शक्य होईल तितके तोकडे कपडे घातलेल्या पोरी.

स्वातंत्र्य म्हणजे काय?

आजूबाजूला छोट्या छोट्या मुलांचे हात धरून त्यांना आनंदात पाण्यात घेऊन जाणारे त्यांचे आईवडील. एखादी गरोदर बाई. तिच्या पोटात वाढणारं मूल. ते बाहेर येण्याआधी स्वतंत्र की बाहेर आल्यावर? ते बाहेर पडलं की बाई 'सुटली' असं आपल्याकडे म्हणतात. तर ते बाहेर आल्यावर बाई सुटली की अजून अडकली?

बीचवर वाळूत ओळीने लावलेले, विखुरलेले तंबू, त्यात रोवलेल्या खुर्च्या. आणि त्यांना पाण्यापर्यंत जोडणारी वाळू !

एक जोडपं मात्र अगदी पाण्याच्या आतपर्यंत खुर्च्या घेऊन बसलंय. पायांच्या वरपर्यंत येणारं पाणी. याच दोघांना बाकीच्यांसारखं दूर खुर्च्या टाकून बसावं का वाटलं नाही? न आखलेल्या रेषेच्या पलीकडे जाऊन का खुर्च्या टाकल्या त्यांनी?

विचारांच्या चौकटीतून बाहेर पडायचं स्वातंत्र्य आहे हे तरी कुठे माहित असतं आपल्याला?

माझ्यासारखे भारतीयही दिसत आहे आजूबाजूला, आपल्या कपड्यांच्या तुरुंगात अडकलेले. आपल्या सवयीचे कपडे घालणं स्वातंत्र्य की त्या सवयीत अडकणं म्हणजे तुरुंग?

जावं का आपणही सगळे कपडे उतरवून पाण्यात? मग विचार येतातच की, नवरा, बायको, मुलं, अगदी आजच भेटलेले मित्राचे आई वडीलही काय म्हणतील वगैरे.

स्वातंत्र्य !

पाण्यातून किनाऱ्याने चालताना पाणी एकदम थंड लागलं सुरुवातीला. सहा महिन्याचं बर्फ, थंडी पोटात घेऊन बसलेला समुद्र तो. थंड असणारच ना? पहिलं पाऊल ठेवलं तर करंट बसला. मग हळूहळू आत जाऊ तसं पायांना नवीन ठिकाणी नव्या थंडपणाच्या संवेदना. काही क्षणांतच त्याही कमी होतात. सवय होतेच माणसाला, सगळ्याचीच. अगदी किनाऱ्याकडे येणारं पाणीही उन्हासोबत जरासं तापायला लागतं.

हळूहळू किनारा धरून चालताना, बारीकशी लाट येतेय आतलं थंड पाणी घेऊन.

किनाऱ्यावरचं कोमट पाणी आणि आतून येणारं थंड पाणी, दोन्ही कुठेतरी मिसळतंय. त्यांना वेगळं करून पाहता येईल का? कुठलं थंड, कुठलं गरम? डाव्या पायाला लागेलेलं गरम, उजव्याला थंड?

शुभ्र पाण्यासोबत घरंगळत वाळू आत सरकत चाललीय पायाखालून. मधूनमधून ती सरकल्याची संवेदनाही तळपायांना. इतकं स्वच्छ पाणी आणि इतकी सुंदर वाळू. सोबत असूनही आपापलं अस्तित्व टिकवून राहणारे.

फक्त कुणी बोट टेकवण्याचा अवकाश, गढूळ करायला.

स्वातंत्र्य.

आत गेल्यावर मात्र सर्वच एकसारखं, त्या समुद्राला. समुद्राला असेल का स्वातंत्र्य? इतकं अजस्त्र असल्यावर कुठलं आलंय स्वातंत्र्य? उद्या आपल्या लाटा घेऊन कुठे निघून जायचं म्हटलं तरी कुठे जाणार तो? जितके मोठेपण जास्त तितकं अडकून पडणं. नाही का?

ते ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर कॅप्टन कुक उतरला तेव्हा तिथले भटके लोक त्यांनी तिथे पाहिले. त्याने लिहिलं त्यांच्याबद्दल. त्यांची भटकंती इतकी की एखादी गुहा शोधून राहण्याचेही कष्ट घ्यायचे नाहीत. झोपडी बांधायचं तर राहूच दे. जितका व्याप कमी तितकी भटकंती सोपी.

स्वातंत्र्य.

तर या लोकांची मुलंही आईच्या दुधावर वाढायची ३-४ वर्षापर्यंत. का तर, असं भटकतांना लहान मुलाला पचणारं जेवण कुठे मिळणार? एखादं लुळं-पांगळं असेल, म्हातारा, आजारी असेल तर त्यालाही मागंच ठेवायचं.

इतक्या सहज सोडता येतं सगळं?

घर, गाडी, मुलं, नाती गोती, नोकऱ्या आणि काय काय.

विचंवासारखं पाठीवर घर घेऊन फिरता यायला हवं. पण मग भटकायचंच आहे तर घराची हाव तरी कशाला?

म्हणे स्वातंत्र्य, डोंबल.

हां, एक आहे. मी इथे असताना मनाने दुसरीकडे जाण्याचं स्वातंत्र्य. समोर सर्व असताना आतून एकटं असण्याचं किंवा एकटं असतानाही सोबत कुणीतरी असण्याचं.

विचार करायचं स्वातंत्र्य, मनातल्या मनात. पण ते मांडता येण्याचं? आणि लोकांची पर्वा नाही केली स्वतःच्याच आखलेल्या चौकटींचं काय?

स्वातंत्र्य, मर्यादित स्वातंत्र्य.

आज इथे सगळे ग्रिलिंग, बारबेक्यू करतायंत. सोबत कलिंगड. आपल्याकडे जिलेबी आणि मठ्ठा. पाकिस्तानात काय असेल? असो.

मीही स्वातंत्र्य सेलिब्रेट करावं म्हणतेय. आपल्या मर्यादित स्वातंत्र्यात हे लिहिता येतंय हे तरी कमी आहे का?

विद्या भुतकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली !! माझा रुमाल ..
आता वाचते.. Happy

खूप सुंदर लिहिलंय .. भिडलं Happy
खूप दिवसांनी वाचायला मिळालं .. लिहीत राहा आणि इथे पोस्टत राहा Happy

हो, बीच मध्ये इंडियन काकवा सूट मधे पाण्यात उतरून माहोल खराब करतात. पण त्यांची पण चूक नाही - शरम ही औरत का गहना है असेच बिंबवले गेलेले असते.

आता अगदी व्यवस्थित अंग झाकता येईल असे सुटस मिळतात की.
नीट ३/४ अँकल लेंथ लायक्रा टाईट, त्याला अटॅच वरचा टोर्सो आणि अर्ध्या बाह्या.
हा असावाला सूट घालून कोणत्याही समुद्र किनार्‍याला/वॉटर पार्क ला/स्विमिंग पूल मध्ये निवांत जाता येते.

https://www.amazon.in/Carrel-Lycra-Fabric-Swimsuit-AGSPL-3221-SIY-SW-13-...

अबस्ट्रॅक्ट आवडलं.

इथे असताना मनाने दुसरीकडे जाण्याचं स्वातंत्र्य. समोर सर्व असताना आतून एकटं असण्याचं किंवा एकटं असतानाही सोबत कुणीतरी असण्याचं.

हे जाम पटलं.

>>>
अबस्ट्रॅक्ट आवडलं.

इथे असताना मनाने दुसरीकडे जाण्याचं स्वातंत्र्य. समोर सर्व असताना आतून एकटं असण्याचं किंवा एकटं असतानाही सोबत कुणीतरी असण्याचं.

हे जाम पटलं.>> +१००

हो, बीच मध्ये इंडियन काकवा सूट मधे पाण्यात उतरून माहोल खराब करतात. >>> स्वतःला आवडणारे कपडे घालून आवडेल तिथे बागडणं, हे त्यान्चे स्वातंत्र्य!

सर्वांचे आभार. Happy समुद्राकाठी गेलं की विचार पळायला लागतात. यावेळी एका मैत्रिणीकडून पेन घेतला आणि एका कागदी प्लेट वर लिहिलं आणि मग घरी येऊन टाईप केलं. कारण तिथ्ले विचार इतके वेगळे असतात की परत येऊन तसंच लिहिता येत नाही.
त्यावेळी जे सुचलं ते लिहिलं.

विद्या.

अनु अगं माझ्याकडेही आहे तसा swimming costume, पण एकूणच आपण चौकटीतून बाहेर पडणं किती अवघड आहे याचा विचार करत होते.

स्वतःला आवडणारे कपडे घालून आवडेल तिथे बागडणं, हे त्यान्चे स्वातंत्र्य!
>>> मुद्दा कळला नाही तुम्हाला. वैचारिक चौकटीतून बाहेर पडण्याच स्वातंत्र्य कुठेय त्यांना?

प्रत्येक ठिकाणाचा एक अलिखित ड्रेस कोड असतो. रस्त्यात कोणी बिकिनी घालून चालत असेल तर जितके ऑड वाटेल, तितकेच स्वीममिंग ला पंजाबी घालून उतरणे ऑड वाटते.

इथे असताना मनाने दुसरीकडे जाण्याचं स्वातंत्र्य. समोर सर्व असताना आतून एकटं असण्याचं किंवा एकटं असतानाही सोबत कुणीतरी असण्याचं. >>> वाह, हे खूप महत्वाचं असतं.

छान लिहीलंय.

छान लिहीलय.
स्वीममिंग ला पंजाबी घालून उतरणे ऑड वाटते << सेफ्टीच्या द्रुष्टीनेही ते बरोबर नाहीये.

छान लिहिलंय. आवडलं.
समुद्रकिनारी वारंवार जात जा Wink

===
< ते बाहेर पडलं की बाई 'सुटली' असं आपल्याकडे म्हणतात. तर ते बाहेर आल्यावर बाई सुटली की अजून अडकली? >>>
आगीतून फुफाटयात किंवा आस्मानसे गिरा असे काहीसे Lol

===
< मुद्दा कळला नाही तुम्हाला. वैचारिक चौकटीतून बाहेर पडण्याच स्वातंत्र्य कुठेय त्यांना? >>>
अगदी सहमत!

स्वीममिंग ला पंजाबी घालून उतरणे ऑड वाटते.>>
बुर्किनी घालून पाण्यात उतरणार्‍या बायका कधी बघितल्या नाहीत का?
पंजाबी सुट, बुर्किनी हे पाण्यात उतरताना घालणे तुम्हाला ऑड वाटते. पण आपल्या बांध्याला आणि शरीरयष्टीला अजिबात न शोभणारी बिकिनी घालणं हे कोणाला ऑड वाटत असेल तर?
वैचारिक चौकटीतून बाहेर पडण्याच स्वातंत्र्य कुठेय त्यांना>>
बिकिनी घालून चांगलं दिसावं म्हणून जिम मध्ये तासन्तास घालवणे, तब्येतीला बाधक अशी डायेट्स करणं, हे सगळ एका विशिष्ट वैचारिक चौकटीचा भाग आहे. मग त्या वैचारिक चौकटीत अडकलेल्या बायकांना सुद्धा स्वातंत्र्य मिळावं असं तुम्हाला वाटते का?