एवढा अधिकार आहे

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 3 July, 2018 - 03:03

*एवढा अधिकार आहे*

या सुखांच्या वादळांनी बंद केले दार आहे
वाटते माझ्या व्यथांची झोपडी गर्भार आहे

तू नको देवूस मजला सावली खोट्या नभाची
या उन्हाशी मांडला मी हा उभा संसार आहे

मी निवडला चंद्र माझा जो कधी ना ग्रासणारा
या तुझ्या गर्वात झाली चांदण्याची हार आहे

वाट तू टाळू नको ना वेदने माझ्या घराची
मी तुला पदरात घ्यावे एवढा अधिकार आहे

तू दिलेल्या यातनांची पैठणी कवटाळली अन्
आसवांचे करुन मोती साधला श्रुंगार आहे

(संगती बुजगावण्याच्या कुंपणाने शेत गिळले
आंधळ्यांचे राज्य येथे आंधळा सरदार आहे)

(ते दिवास्वप्नात रमती जे कधी ना शक्य झाले
काजव्यांनी सुर्य गिळला दाटला अंधार आहे)

दे हवे तर लाख काटे तू गुलाबी गालिचांचे
पण फुलांच्या पाकळ्यांचा वाटतो हा भार आहे

राहिले काहीच नाही बोलणे माझे तुझ्याशी
या तुझ्या ओठांत मग हा कोणता सुविचार आहे

जे समांतर चालती पण भेटण्याचे नाव नाही
त्या रुळांचे नशिब साले केवढे लाचार आहे

मी तुझ्या चाफ्यास म्हटले ये जरा गंधाळण्याला
वाटले सा~या जगाला उघड हा व्यभिचार आहे

©रुपेंद्र कदम (रुपक)
पुणे ✍

Group content visibility: 
Use group defaults