भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हायझेनबर्ग मलाही अगदी असाच अनुभव आला आहे
आमच्या इथे गुलटी लोक घरून नुसता तांदूळ घेऊन हाफीसात मायक्रोवेव्ह मध्ये शिजवताना बघितले आहे.

बाहेरच्या देशातला नव्हे तर हा पुण्यातलाच किस्सा.
मोठ्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीने पुण्यात मगरप्ट्ट्यात नुकत्याच सुरू केलेल्या छोटेखानी ऑफिसात मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच नोकरीवर रुजू झाला (वय २१).
मी जॉईन झालो तेव्हा ५० एक अनुभवी/सिनियर लोक ऑलरेडी कामावर होती (मेजॉरिटी मराठी)...नवा डायरेक्टर जो ऑफिसचा सर्वेसर्वा असणार होता तो अमेरिकेवरून (जन्माने भारतीय पण बॉर्न अँड ब्रॉट अप अमेरिका) येणार होता. ऑफिस सुरू होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन डायरेक्टर येईपर्यंत एका अतिशय अनुभवी मराठी डायरेक्टरला ईंटरिम सर्वेसर्वा बनवला होता.
तर ह्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉईज होते आणि पँट्री मध्ये फोन करून त्यांना दिवसाच्या कुठल्याही वेळेला चफा कॉफी माझ्या डेस्कवर घेऊन ये म्हणून फोन करू सांगता येत असे. आणि ते बिचारे ट्रे मधून प्रॉपर डिझायनर कपबशी तून चहा कॉफी दिवसभर सर्व करीत असत. नंतर कधी कुठल्या कंपनीत असे ऑन डेस्क सर्विंग बघितलेले आठवत नाही. मराठी डिरेक्टरच चहाबाज होते आणि दिवसातून अर्ध अर्धा कप करीत दहा बारा वेळा चहा मागवत. हे का कळाले तर डिरेक्टर चा कप जरा स्पेशल भारीतला होता आणि ऑफिस बॉय सदान कदा तोच कप घेऊन जाताना येताना दिसे. मग देखादेस्खी सगळेच असे करायला लागले. तिथे अजून एक पद्धत होती. बरोबर चार वाजता एका मोठ्या बरणीत तर्हेतह्रेची बिस्किटे काढून ठेवत आणि पन्नास जणांचा सगळा ग्रूप त्यावर हपापल्यासारखे एकाच वेळी बरणीत हात घालत तुटून पडत असे. मराठी ड्यारेक्टर साठी मात्र चार बिस्किटेआणि स्पेशल कप त्याच्या ऑफिसमध्ये रवाना होई. मी नव्यानेच जॉईन झालेला ज्युनिअर असल्याने त्या बरणीत हात घालण्याचा काही चान्सच नव्हता आणि जमाव पांगल्यानंतर त्या बरणीत फक्त बिस्किटांचा भुगाच ऊरत असे. खूप राग येत असे ह्या लोकांचा.

अमेरिकन डिरेक्टर आल्यानंतर दोन-तीन दिवसात नेमका तो कॅफेत यायला आणि आणि ही बिस्किटांच्या बरणीत हात घालण्यासाठी साठमारी व्हायला एकच गाठ पडली तेव्हा तो सॉलिड शॉक झाला आणि लोकांचे हे वागणे पाहून खूप चिडला.
त्याने तिथल्या तिथे ऑफिसाबॉईजना हुकूम सोडला ही ऊद्यापासून ही बरणी मला सकाळ ते संध्याकाळ पूर्ण भरलेली पाहिजे. आणि डेस्कवर चहा मागवणार्‍यांची यादी रोज संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये आणून द्या.

दुसर्‍या दिवसापासून दोन गोष्टी होऊ लागल्या... बिस्किटांची बरणी दिवसातून चार -पाच वेळा रिकामी होऊन भरली जाऊ लागली.. आणि मराठी डिरेक्टर सहित सगळे मशीनमधून आपला चहा/ कॉफी घायला स्वतः येऊ लागले. Proud खरी गंमत पुढेच आहे.
आठवड्याभरानंतर पब्लिकला बिस्किटांचा एवढा कंटाळा आला की सकाळी भरलेली बरणी संध्याकाळपर्यंत अर्धीही रिकामी होत नसे. Lol

ह्या ऑफिसमध्ये अजून एक विचित्र पद्धत होती. आय आय टीच्या आठ जणांची एक टीम होती ह्यात चार मुले आणि चार मुली होत्या. ती ऑफिसपासून हाकेच्या अंतरावरच्या बिल्डींगमध्ये रहात. ही मुले दिवसभर ऑफिसटाईम मध्ये टेबल टेनिस खेळणे, कॅफेत चकाट्या पिटणे, चार चार तास गायब असणे वगैरे करीत आणि डिनर नंतर ऑफिसला येऊन रात्री दोन वाजेपर्यंत नॉनव्हेज जोक मारत हसत खिदळत आरडाओरड करीत काम करत.
कोणी तरी नव्या डिरेक्टरला तक्रार केली होती.. म्हणून डिरेक्टर स्वत: मध्यरात्री हे बघण्यासाठी आला. त्याने मोठी डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन नाही घेतली पण हे आठही लोक जे मराठी डायरेक्टरच्या कृपेने अतिशय मग्रूर वागत ते सुतासारखे सरळ झाले.

ही पोस्ट योग्य वाटली नाही तर उडवा.
या खालच्या गोष्टी भारतात पण तितक्याच लागू आहेत. पण परदेशात आपण अशा गोष्टींमुळे हायलाईट होतो तेंव्हा वाईट वाटते.

बरेच भारतीय परदेशी लोकांकडे विशेषतः मुलींकडे स्टेअर करतात. परदेशात ड्रेस ( म्हणजे वन पीस) आणि स्कर्ट हे रोजचे कपडे आहेत हे आता कोणालाही आश्चर्याचे वाटू नये. तरीही भारतीय मुलं आणि मुलीसुद्धा भारतीय भाषेत याबद्दल कमेंट करताना दिसतात. न्यूड स्टॉकिंगस आहेत की बेअरफूट आहे, ड्रेसचा नेक कसा आहे वगैरे वगैरे. भाषा कळत नसली तरी नजर, हातवारे, हावभाव, हसणे यावरुन काय चर्चा चालू आहे याचा सहज अंदाज येतो. and it feels creepy.

भारतात आपण रोज डिओ, परफ्यूम वापरतोच असं नाही. पण इथे ते पर्सनल हायजीन मध्ये येतं. आपला वास आपल्याला येत नसतो. पण घाम, सर्दी, हीटरमुळे निर्माण झालेली कृत्रीम उष्णता, त्यामुळे येणारा बॉडी ओडर इतरांना जाणवतो. आमच्या इथे एकाला त्याच्या टीमने बाजूला घेउन बाबा दिवसातून २ वेळा तरी डिओ / परफ्यूम मार असे सांगितले होते.

हाब मस्त. अजून लिहा

माझ्या एमेन्शीत सुरुवातीला अगदी दिडशे लोकांची टिम होती, अ‍ॅक्चुअली ती छोटी टिम टीसीएसमधून फुटून नवी कंपनी तयार झालेली, त्या कंपनीला एका जायंटकंपनीने विकत घेतले. आणि पहिली पाच वर्षे अक्षरशः खुदा महरबान तो गधा पहलवान अशी परिस्थिती होती. पाच तास पूर्ण केले की दिवस पूर्ण धरला जायचा. चहा कॉफी कँटीनच्या सुविधा होत्या, फोनची सुविधा होती. म्हणजे सर्व फारीनच्या हाफिसातल्या सुविधा सढळहस्ते होत्या. खूप मोठी यादी आहे. पण नंतर जसे हायरींग वाढले आणि कुलीज भरती व्हायला लागले. तसे सगळ्या सुविधांचा गैरवापर प्रचंड वाढला. आणि एक एक करत सगळ्या सुविधा बंद करण्यात आल्या. पाच तासाचा दिवस भरायचा तो पाच तासाचा हाफ डे झाला. सात तास पूर्ण केले तर फुलडे. जास्त वेळ थांबावे लागले तर कँटीनमध्ये जेवण फुकट मिळे. नंतर ते मॅनेजरने अप्रुव केले तर कुपन मिळे. तेही अतिशय अपमानास्पद परिस्थितीत. जणु फुकट खायला मिळावे म्हणून भिकार्‍यासारखा उगाच ऑफिसात थांबले आहात. साधी पेन्सिल घ्यायची तर अ‍ॅडमिनकडे तुरुंगातल्या कैद्यासारखं जाऊन रजिस्टरमध्ये साइन आणि मॅनेजर अप्रुवल लागत असे. म्हणजे विचार करा की काय हालत करुन ठेवली देसी लोकांनी.

नंतर नंतर तर अक्षरशः खोगीरभरती सुरु झाली होती तेव्हा खूप वाईट प्रवॄत्तीची लोकं आली. चोर्‍या व्हायला लागल्या. फारीनातून एक डायरेक्टर काही महिन्यांसाठी आला होता त्याचा लॅपटॉप त्याच्या केबिनमधून चवथ्या दिवशी चोरीला गेला. त्याला जो काय शॉक बसला. कारण तो ज्या ऑफिसातून आला होता तिथे अगदी घरगुती वातावरण असते. इथे सीएमएम लेवल ५ कंपनीत असे झोल. अगदी संडासच्या दरवाज्याचा कड्या. पुसायच्या पेपर टांगायची कडी असे बरेच काय काय चोरीला जात असे.

वीपीएन वापरुन सिनेमे म्युझिक डौलो करणे. ऑफिस टाइममध्ये दोन चार तास भटकायला जाणे.

वरील सर्व वागणार्‍यांमध्ये क्लासचा काही फरक नव्हता. गरिब श्रीमंत, झोपडपट्टी, उच्चभ्रू, कमी शिकलेला, उच्चशिक्षित युपीबिहारीमराठीगुजरती असा काही फरक नव्हता. चांगल्या संस्कारी लोकांची संख्या किती होती माहित नाही पण ज्या अर्थी सोई कमी केल्या त्याअर्थी खूपच धिंगाणा घातला गेला असेल. कारण मी ह्या सगळ्या सुविधा बंद झाल्यानंतर जॉइन झालो होतो.

माझा तो पैलाच एमएन्शी अनुभव असल्याने मलाच तो मोठा कल्चरल शॉक होता. कारण आधी मी अगदी छोट्याशा चार लोकांच्या फर्ममध्ये नोकरी करत होतो व सहकार्‍याने ऑफिस फोनवरुन कोणाला पर्सनल फोन लावले तरी मला फार राग येत असे. ऑफिस प्रॉपर्टी आपल्या बा'ची नसते हे संस्कार.

फोन, खाणं, इंटरनेट हे सगळं ऑफिस मध्ये वापरायलाच ठेवलेले असते. ते वापरले तर ठीकच आहे. पण रिस्पॉस्निबल वापर झाला नाही, गैरवापर झालेला आढळला की रिस्ट्रिकटिव्ह अ‍ॅक्शन घ्यावी लागते. सुरुवात ही विश्वास टाकुनच होते. कारण बिझनेस चालायला तोच आवश्यक असतो.
तो एकदा का गेला की सगळी मजाच जाते.
हाब, पुण्याची कंपनी आणि बिस्किटांचे जवळचे नाते आहे तर! माझ्या पुण्याच्या स्टार्टअप मध्येही बिस्किटे, दुपारी क्युब मध्ये चहा, इतर वेळी फोन करुन चहा... रात्री टेबल वर मॅगी ह्या चैनी होत्या. Biggrin
बाकी काही असो, तो ३ चा चहा जाम मिस करतो मी! Happy

पुण्यात पत्नी कम्प्युटर मध्ये डिरेक्टर ला आलेला चहा प्यायचो त्याची आठवण झाली. दुपारी डिरेक्टर साठी चहा यायचा आणि माझा क्यूब त्याच्या केबिनच्या बाहेरच होता, तो कॅन्टीनवला मग उरलेला कितलीतला चहा मला द्यायचा.
भारी वाटायचं कारण 4 पर्यंत कॅन्टीन मध्ये पब्लिक साठी चहा मिळायचा नाही.

please, thank u, sorry वगैरेचा कंजूष वापर. >>>>
मला याच्या उलट अनुभव आलाय
इतक्या वर्षाने प्लीज, सॉरी, थँक यु म्हणायची इतकी सवय झालीये की भारतातले मित्र आणि नातेवाईक माझ्यावर वैतागलेले अनुभवलं आहे.
त्यामुळे मी आता भारतात बोलताना काळजी घेतो Happy
थँक यु काम केल्याबद्दल किंवा सॉरी तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला असं म्हणणं कटाक्षाने टाळतो
अर्थात सगळे प्रेमाचे जवळचे लोक असतात आणि ते हक्काने तक्रार करतात
पण हा ही एक प्रकार चा कल्चरल अनुभव च, उलट बाजूने Happy

>> या धाग्याचा मला त्रास होतोय. हा दिसणार नाही असे सेटींग्ज करता येतात का ?

सहमत आहे. नको असलेले धागे वारंवार डोळ्यासमोर दिसणे अनॉइंग असते. ग्रुप मधून बाहेर पडणे हा योग्य पर्याय नव्हे. धागे ब्लॉक किंवा हाईड करण्याची सोय हवी पण मायबोलीवर सध्या तरी ती नाही.

त्रास नक्की कशामुळे होतोय?

1. वरचे सगळे प्रतिसाद अतिरंजित व अवास्तव आहेत. भारतीय लोक देशात व बाहेर आदर्श वागतात.

2. प्रतिसाद वाचताना स्वत:समोर आरसा धरल्यासारखा वाटतोय. आपले तेव्हाचे वागणे चूक होते हे धागा वाचल्यावर आता समजतेय.

3. भारतीयांच्या चुकांबद्दल बोललेले अजिबात खपत नाही, मग भले समोरचा कितीही खरे बोलत असो. शहामृगी वृत्ती अंगी बाणवलेली आहे.

धागा उघडण्याची सक्ती अजून मायबोलीने कुणावर केली नाही. मायबोली साईट उघडताच पहिल्या पानावर 20 धागे दिसतात. त्यातला प्रत्येक धागा उघडून वाचला तरच पुढचे पान उघडते असे कुलूप अजून तरी इथे नाही. त्यामुळे तुमचे कारण कुठलेही असले तरी धाग्याला इग्नोर मारून उरलेल्या मायबोलीचा तुम्हाला आनंद घेता येईल. त्यासाठी हा धागा बंद करून बाकीच्यांची गैरसोय करण्याची गरज नाही.

बाकी भारतीय भारताबाहेरच वैताग आणतात असे नाही. इथेही तेच करतात. गेल्या आठवड्यात केरळात गेले होते. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 14व्या व 15 व्या शतकातील चर्च व सिनेगॉग भेटी आयोजित केल्या होत्या. सोबतच्या ग्रुपमध्ये 90 टक्के लोक 50 च्या पलीकडले, काही रिटायर झालेले असे होते. ऐतिहासिक स्थळी ह्या लोकांनी धुडगूस घातला. कुणाच्या प्रार्थनस्थळी आपण जमलोय, गाईड माहिती सांगतोय याचे अजिबात भान न ठेवता सेल्फी काढणे, गाईड बोलत असताना ओरडून एकमेकांना नवे सेल्फी पॉईंट दाखवणे, प्रत्येक ठिकाणी ग्रुप फोटो हवाच म्हणत आरडाओरडा करत तो काढणे इत्यादी सुरू होते. शेवटी एका जागी आवाज करू नका म्हणून सुनावले गेले.

>> त्रास नक्की कशामुळे होतोय?

एखाद्या सदस्याला नको असलेला एखादा धाग्याचा विषय लिस्टमध्ये सतत डोळ्यासमोर आल्यास त्याला/तिला ते अनॉइंग होऊ शकते. इग्नोर करता येतेच, पण त्या त्या सदस्यापुरता तो धागा हाइड होईल अशी सुविधा असल्यास ते अधिक सोयीचे. (फेसबुकवर "हाईड धिस पोस्ट" असते तसे).

बेबे अप्रतिम पोस्ट.

बाकी सर्वांच्या पोस्टी पण छान आहेत. खूप काही शिकायला मिळते आहे. असे गाईड खरंतर भारतीयांना (बाहेर प्रवास करण्या अगोदर हातात दिले पाहिजे) खूप मदत होईल.

दक्षिणा सहमत, पण बाहेर प्रवास करण्या अगोदरच नव्हे तर हे संस्कार लहानपणा पासूनच आपल्याच देशा गावात वावरायला मिळायाला हवे.

बाकी अंगाच्या (मसाल्यांच्या वगैरेमुळे) वासाबद्दल बोलायचे तर परदेशात सुरवातीला आपल्यालाही त्यांच्या अंगाचा वास येतो जो सहन होत नाही.
झ्युरीक मध्ये एकदा लिफ्टने जाताना मला तो वास असह्य झाला (त्यांना पण माझा आला असेलच). मी मग मधल्याच कुठल्या मजल्यावर लिफ्ट बाहेर येऊन काही मिनिटे थांबुन मग परत लिफ्टने वर गेलो. असा अनुभव बर्‍याचदा आला.

दुसरी एक गोष्ट की शॉपिंग नंतर कॅश दिली असताना जेव्हा आपल्याला उरलेले पैसे परत मिळतात, तेव्हा आपल्याला ते स्वतः मोजून घ्यायची सवय असते, भलेही मग समोरच्याने आपल्यासमोर मोजून दिले असताना.

मी पहिल्यांदा ट्रॅव्हलर्स चेक वठवायला गेलो तेव्हा कॅशिअर ने माझ्यासमोर व्यवस्थित नोटा मोजून दिल्या मला दाखवत. मी ते घेउन परत मोजू लागलो तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, काही चुकलंय का असे तिने विचारले तेव्हा मी ओशाळलो आणि नाही या नविन करन्सीज जरा बघत होतो, सॉरी असे थातुर मातुर उत्तर दिले, ते तिला कितपत पचले कुणास ठाऊक.

माझ्या ऑफिसमध्ये एक हंगामी कामगार आहे. गुज्जू किंवा राजस्थानी असावा. माझ्या डेस्कच्या 3 डेस्क पल्याड बसतो. सारखा नाकात बोटं घालून घाण डेस्कवर झटकतो.... मला तर एकदा त्याला असं करू नको अश्या अर्थाची निनावी नोट ठेवावीशी वाटतेय त्याच्या डेस्कवर!
नवऱ्याचा टीममध्ये एकजण मीटिंग मध्ये कानात बोटं घालायचा!

खरंय मानव Sad इथे सुद्धा हे सगळं अवलंबू शकतोच.
ऑफिसात उपलब्ध सोयींचा सोयिस्कर गैरवापर केला जातो हे पाहून माझा जीव रोज जळतो. Sad
मुली तर बेसिन शेजारी मोबाईल आणि पर्स ठेवायला सर्रास हात पुसायचे नॅपकिन्स मशिन मधून खेचतात ( तीन चार एकदम) आणि ते अंथरून त्यावर पर्स ठेवतात. बर्‍याचदा टॉयलेट मध्ये रोल नसतो, तेव्हा पण सी फोल्ड्स आधीच घेउन आत जायचे. आत रोल नसेल तर वापरता येतात, पण रोल असेल तर मात्र ते तसेच न वापरता कचर्‍यात टाकतात. किंवा तिथे जे सॅनिटरी नॅपकिन चे डिस्पोजल युनिट असते त्यावर ठेवून जातात. ते कुणिही वापरत नाही. अशा पद्धतीने ते वाया जातात.
बेसिन मध्ये ओकणे हा माझ्यासाठी पण मोठा शॉक आहे. मी स्वतः कधीही माझ्या घरात सुद्धा फक्त आणि फक्त टॉयलेट मध्येच उलटी करते. एकदा ऑफिसात एक मुलगी बेसिन मध्ये उलटी करून ते न स्वच्छ करताच गेली. बरं काही बोलायची सोय नाही. पण आपल्या आपल्याला एक बेसिक सेन्स हवा की आपण करतोय त्याने कुणाला घाण वाटता कामा नये. मला मुळात प्रायव्हसी इश्यु असल्याने इतकी प्रायव्हेट गोष्ट मी कुणासमोर नाही करू शकत म्हणून वॉशरूमात जाते.
* केस विंचरून गळलेले केस बेसिन भर तसेच ठेवणे.
* ऑफिस मध्ये आल्या आल्या वॉशरूम मध्ये जाऊन केस विंचरणे, चेहरा धुवून मेकप करत वेळ घालवणे. त्यात नक्कीच अर्था तास मोडतो.
* कँटिन मध्ये ताटात भरमसाठ जेवण वाढून घेणे आणि निम्म्यापेक्षा अधिक टाकून देणे. आमच्या कँटीन मध्ये आज वाया गेलेले जेवण अमूक अमूक किलो यात इतके लोक आरामात जेवले असते अशी नोट लिहितात तरिही ढिम्म काहिहि फरक नाही.
* दर शुक्रवारी ऑफिसच्या बाहेर जेवायला जाणे (१२ ला निघणे आणि साडेतीन शिवाय परत न येणे) आल्यावर परत मोठा टि ब्रेक घेणे. कॅम्पस मध्ये स्मोकिंग बॅन्ड् असल्याने १० मिनिटे चालत जाऊन का होईना पण तो ब्रेक घेणे (दिवसातून ४ वेळा एकून मिनिटे २५ (दहा जायला दहा यायला ५ सिगरेट ओढायला, सोबत चहा असेल तर वाढिव)
* ऑफिस कम्युनिकेटर चे स्टेटस मॅनिप्युलेट करणे Sad अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे ही. अ‍ॅव्हेलेबल असून अवे करून ठेवणे. का तर लोक सतत पिन्ग करतात अरे त्यासाठीच तुम्हाला इथे ठेवले आहे ना? Uhoh

हे सगळे माझ्यासाठीचे शॉक आहेत. या बेसिक गोष्टी आहेत आणि.

मला या धाग्यातून बरेच शिकावयास मिळत आहे. मी स्वत: ९०% वेळा अतिशय दक्ष असतो ऑफिसमध्ये वावरताना परंतू तरीही काही चुका नकळत होत असतील, त्या टाळण्यासाठी हे गाईड उपयोगी ठरेल.

दक्षिणा, अगदी अगदी,
मला रोज किमान ४ सुंदर्‍यांच्या कानाखाली मारुन ते नासलेले टिश्यू आणि टॉयलेट पेपर रोल उचलायला लावावे वाटतात.

मी आणि आई ८-९ दिवस स्वित्झ्र्लँडला गेलो होतो. तेव्हा पहिले ८ दिवस एकही देसी दिसला नाही (कारण आम्ही पर्यटनप्रसिद्ध अशा जागा सोडून तळ्याकाठच्या गावांत राहिलो होतो आणि ट्रेनचे रूटही आडमार्गाचे, छोट्या छोट्या स्टेशनांचे होते). शेवटच्या दिवशी झुरिकला ट्रेनने जाताना डब्यात देशी टोळकी होती. एक माणूस समोरच्या सीटवर पाय ठेवून बसला (अर्थातच बूट घालून). ट्रेन मॅनेजर आली आणि असं करू नका म्हणून सांगून गेली. ट्रेन पूर्ण हीटेड होती, कारण बाहेर थंडी होती. त्यात एका माणसानं खिडकी उघडली फोटो काढायला. बराच वेळ वाट बघून शेवटी मीच त्याला खिडकी बंद करायला सांगितलं.
जेव्हा आपण बाहेरून भारतात येत असतो, आणि पहिल्या फ्लाईटनंतर मग भारताकडे येणारी दुसरी फ्लाईट असते, तेव्हा त्या दुसर्‍या फ्लाईटच्या गेटवर पोचता पोचता नकळत डिप्रेस व्हायला होतं मला.. कारण रांगेत मधेच घुसणे, खुंटासारखे वाटेत उभे राहणे, स्टेअर करणे, थोड्याफार प्रमाणात धक्काबुक्कीही करणे हे सगळं दिसू लागतं.

मसाल्यांच्या आणि लहान बाळ घरात असतांना मोठ्यांच्या अंगाला येणार्‍या वासाचा त्रास हिवाळ्यात जास्तं होतो. घरे कायम बंद असतात ह्याघरातली बंद हवा तिथेच फिरत राहते. त्यात ह्युमिडीफायर चालू असते मग डँप कारपेट आणि लोकरीचे कपडे ते सगळे वास ट्रॅप करून ठेवतात.
आणि पब्लिक ट्रानस्पोर्ट मध्ये मग अश्या लोकांच्या बाजूला बसणे अतिशय असह्य होऊन जाते.

त्यासाठी लोकरीचे कपडे कोट क्लॉजेट मध्येच कंपल्सरी ठेवावेत...क्लॉजेटमध्ये ओडर डिफ्यूजर च्या बॅग्स लावाव्यात.. बेडरूमची दारे किचन अ‍ॅक्टिव असतांना बंद करून घ्यावीत... कारपेट रेग्यूलरली शॅपू करावे. घरात एअरप्युरिफायर $२०० एक मशीन आणून ठेवावे. लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी पंधरा मिनिटे ड्रायर मधून लो हीट वर फ्रॅग्रन्सचे पेपर टाकून फिरवून घ्यावेत.
गाड्यांमध्ये सुद्धा क्लीन न केल्यास हे वास भरून राहतात.

दक्षीणाची पोस्ट वाचून ऑफिस मध्ये कुठलाही रुल वगैरे नसताना ,लोक बाथरुम सिंक वापरुन झाल्यावर पाणी वगैरे सांडलेल पुसून घेवून मगच बाथरुम मधून बाहेर जातात ते आठवल. आता इतके वर्ष झाल्यावर तीच सवय अंगवळणी पडली आहे.
मला वाटत या गोष्टी लहान पणापासूनच घरी, शाळेत शिकवायला हव्यात. आपल्याकडे देवाला नमस्कार कर, मोठ्यांना नमस्कार कर, प्रार्थना म्हण वगरे शिकवल जात पण या गोष्टी शिकविल्या जात नाहीत.

अ‍ॅरेंज मॅरेज ही गोष्ट अजुनही लोकांना अदभुत वाटते. एकाच माणसला भेटुन त्याच्याबरोबर सगळ आयुष्य ही कल्पना लोकांना पटणं फार कठीण जात अस मी पाहिलयं.

अ‍ॅरेंज मॅरेज ही गोष्ट अजुनही लोकांना अदभुत वाटते >> हो ! माझ्या कलीग्ज ना अपार आश्चर्य वाटायचे या कॉन्सेप्ट चे! असे जॉब ला अप्लाय करावे तसे लग्नाला अप्लाय करणे, तसेच बॅकग्राउंड चेक करणे, सिलेक्शन करणे सगळे त्यांच्या डोक्यापलिक्डे होते.
एकदा त्यांना मी म्हटले, इफ यु थिन्क अबाउट इट, ही सिस्टिम इतकी पण वाईट नाही. या सिस्टीम मधे तुम्ही कितीही गरीब, कुरुप, लाजरे, मुखदुर्बळ, सोशली ऑकवर्ड कसेही असलात तरी प्रत्येकाला लग्न करून सेटल व्हायचा फेअर चान्स मिळतो. काय वाईट आहे Happy त्यांनाही मग वाटले की पॉइंट आहे की यात! Lol

मै, Biggrin

विमानातल्या सोयी-सुविधा कशा वापराव्यात याचं पण चांगलं खरमरीत ट्रेनिंग लोकांना दिलं पाहिजे. काही गोष्टी पहिल्यानं माहिती नसतात पण माहिती करून घ्यायची पण इच्छा असावी लागते. उदा: विमानातल्या सिन्कमधलं पाणी आपणच नळाच्या वरचा नॉब दाबून ड्रेन करायचं असतं हे लहान-थोर कुणाच्याच गावी नसतं. मी २-३ वेळा लोकांना मागे बोलावून घेऊन ते पाणी ड्रेन करायला लावलं आहे.

>> या सिस्टीम मधे तुम्ही कितीही गरीब, कुरुप, लाजरे, मुखदुर्बळ, सोशली ऑकवर्ड कसेही असलात तरी प्रत्येकाला लग्न करून सेटल व्हायचा फेअर चान्स मिळतो
Happy
चान्स मिळतो, तो फेअर च असतो असं मात्र मला वाटत नाही.

आणि खरंतर लग्न हा असा जुगार आहे की लव्ह मॅरेज (नवरा बायकोने आधी एकमेकांनां शोधून, "तपासून" मग लग्नाचा निर्णय घेणे) किंवा अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज (ज्यात एकमेकांनां लग्नाआधी भेटायची, एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेलच असं नाही) ह्यात काही फरक आहे असं मला वाटतंच नाही Lol

मी पण तेच सांगते Happy डेटींग करून काही वेळा वैतागलेल्या कलिग्ज ना अ‍ॅरेंज मॅरेजचे फायदे पटले आहेत अगदी. काही फारसा प्रयत्न न करता , लग्न होत असेल आणि उद्या काही चुकीच झालचं तर मोठ्यांवर खापर फोडतात येईल ही कल्पना फॅसिनेटींग आहे अस त्यांना वाटत. अर्थात आई वडिल ही जबाबदारी कधीच घेणार नाहीत हे ही त्यांना माहिती आहे.
सेक्स कंपॅटीबिलिटी हा मात्र काहींना यात तोटा वाट्तो. अ‍ॅरेंज मॅरेज केलेल्या माणसाबरोबर संसार वगैरे ठिक चालू आहे पण "व्हॉट विल हॅपन इफ ही इज नॉट गुड इन बेड " (डेटींग सुरु झाल्यावर , लग्नाला विचारण्यापुर्वी हे एक मोठ रिजेक्शनच कारण असत) हा प्रश्न ताबडतोब एक दोन क्लोज महिला कलिग्ज कडून आला. 'माहित नाही. भारतात असा काही डाटा नाही. /नसावा. सेक्स हा विषय अशा प्रकारे सहजगत्या चर्चीला जात नाही .' अस सांगितल. ते ही त्यांना सरप्राइझिंग वाटत.

लग्नानंतरच कौमार्यभंग होतं हे पण धक्कादायक वाटतं परदेशस्थ लोकांना. अर्थात आता हे नॉर्मस बदलत चालले आहेत आणि पूर्वीच्या काळात पण किती प्रमाणात हे घडायचं याची काही माहिती उपलब्ध नाही असंही मी परवाच एका कलीगला सांगितलं.

सकाळी 9.30 ची वेळ असलेल्या आमच्या ऑफिसात 10.30 च्या सुमारास लेडीज रेस्टरूममध्ये गेल्यास जमिनीवर केस व सिंकच्या ओट्यावर पाण्याचे थारोळे दिसते. काहीजणी टिश्यू सुद्धा त्यातच टाकतात. प्रत्येक टॉयलेट मध्ये, निघताना फ्लश करा, पाणी खाली जमिनीवर सांडू नका, टिश्यू पेपर कमोडमध्ये नको तर बाजूला ठेवलेल्या बिनमध्ये टाका, सॅनिटरी नॅपकिन्स वेगळे युनिट ठेवलेय त्यात टाका, निघताना लाईट बंद करा वगैरे संदेशाचे फलक लावलेत. ऑफिसात काही फॉरीन्सर्स पण आहेत, त्यांना धक्का बसत असणार वाचून Happy Happy

Pages