बंदी

Submitted by अतुलअस्मिता on 1 July, 2018 - 04:26

बंदी
- अतुल चौधरी
प्लास्टिक बंदीच्या घसघशीत लोकप्रतिसादामुळे पर्यावरण मंत्र्यांना अचानकच मिळालेल्या अभूतपूर्व प्रसिद्धीमुळे इतर बऱ्याच मंत्र्यांना त्यांचा हेवा वाटत होता. ज्या दिमाखाने त्यांनी पूर्वनियोजन करून गाजावाजा करत, प्लास्टिक बंदीचा महिनाभर आधीपासूनच प्रचार केला होता, त्याच दिमाखाने जनतेने त्यांना प्रोत्साहन दिले होते. एका कौतुकाच्या लाटेवर स्वार होऊन स्तुतीसुमने झेलणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांना पाहिले की आपणही असेच काहीतरी भव्य दिव्य करावे असे जलसंवर्धन मंत्री बा. र. कावे यांना देखील सतत वाटत होते. आपणही अशीच कुठलीतरी एक आगळीवेगळी बंदी जाहीर करून सर्वसामान्यांच्या कौतुकास पात्र व्हावे आणि अचानक प्रसिध्दीझोतात येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला नवीन दिशा द्यावी असे त्यांना मनापासून वाटत होते. हल्ली बा.र.कावे हे सतत नेमक्या कुठल्या गोष्टीवर बंदी आणावी याचा विचार करून अस्वस्थ होत होते. त्यांच्या मनातील काहूर व रक्तातील बारकावे शोधण्याच्या गुणधर्मामुळे, जास्तच खोलात जाऊन विचार करत होते. ज्यावर बंदी आणता येऊ शकते अशा शेकडो गोष्टींचा त्यांनी विचार करून पाहिला होता. परंतु जलसंवर्धन खात्यात असल्याने बऱ्याच गोष्टी त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात नव्हत्या. बा.र.कावे यांनी विचार केलेल्या शेकडो बंदी आणण्याजोग्या गोष्टींपैकी काही मोजक्या गोष्टी खाली नमूद करत आहे.
(१) ध्वनी प्रदूषणाचे कारण पुढे करून सर्व ध्वनी निर्माण करणाऱ्या कृत्रिम वस्तूंवर बंदी आणणे. म्हणजेच गिरणीचा भोंगा, वाहनांचा भोंगा, खेळण्यातील भोंगा, सायकलीची घंटा, घराची घंटा, पों पों वाजणारे अभ्रकांचे पादत्राण, लग्नाचा बँड, इत्यादी इत्यादी. प्लॅस्टिकबंदीप्रमाणे काही ठराविक नाद निर्मितीला सूट देणे हे अपरिहार्य असल्याने मग देवळातील घंटेस, गवयाच्या गळ्यातील सुरांस, स्त्रियांच्या कुजबुजण्यास, किंवा अपचन झाल्यास पार्श्वभागातून निघणारा संगीतमय नाद, निवडणुकांचा प्रचार, दिवाळीचे फटाके, होळीचे मुखशुद्धीकरण वगैरे वगैरे अशा कित्येक किरकोळ ध्वनी प्रदूषणास मग सूट देता येऊ शकेल. केवळ त्यांच्या जवळच्या लाडक्या बायकोचा, लांबचा भाऊ, हा कर्णरोगतज्ञ असून, त्याचा बहिऱ्या माणसांना कर्णयंत्र बसविण्याच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, या भीतीपोटी त्यांनी ही कल्पना नाकारली.
(२) हल्ली स्मार्टफोनच्या उगमामुळे फारशी मंडळी छापील पत्रकारितेकडे ढुंकून पाहण्यासही उत्सुक नसतात. शिवाय त्यांच्या बारीक नजरेतून, बेरकी धाक दाखवून, त्यांनी नुकताच त्यांच्या स्वस्तुतीपर लिहून घेतलेला लेख, कितीतरी वर्तमानपत्रातून कितीदा तरी प्रकाशित करूनही, सर्वसामान्य मतदारांनी त्याची साधी दखल देखील न घेतल्याची खंत असल्याने त्यांचा स्मार्टफोनवर रोष होता.तेव्हा स्मार्टफोन वर बंदी लागू केली तर खळबळ माजून आपल्याला प्रसिद्धी मिळू शकेल. तसेच तरुण व निवृत्त अशा दोन्ही पिढया बिघडवणाऱ्या या लोकप्रिय यंत्रावर बंदी आणणे आवश्यक आहे हे समजावून सांगणे सोपे जाऊ शकेल. ओठांचा चंबू करून स्वयंप्रतिमा रेखाटण्याच्या व्यसनापायी कोणाचा जीव जाऊ न देण्याची तळमळ व्यक्त करून लोकप्रियतेचा व मानवतेचा कळस गाठता येणार होता. परंतु सफरचंद खिशात न बाळगता आल्यामुळे राज्याबाहेरील आपली प्रतिष्ठा खालावेल या भीतीपोटी अशा बंदीचा विचार त्यांना मनाबाहेर काढावा लागला.
(३) जी अवस्था वर्तमानपत्राच्या वाचकांची तीच व्यथा जाणकार श्रोत्यांची. हल्ली पोत्याने ढीगभर नोटा ओतूनही सभेला पूर्वीसारखी जाणकार श्रोत्यांची वर्णी लागत नाही हे बा.र.काव्यांनी हेरले होते. नुकत्याच एका सभेमध्ये त्यांचे भाषण ऐकण्यास आलेल्या मोजक्याच श्रोत्यांमधल्या एका रसिकाने चिडून त्यांच्यावर एक जोडा फेकून मारला होता. तेव्हा सरसकट जोडे वापरण्यास बंदी करून टाकावी, असेही त्यांच्या मनात आले होते. या राज्यामध्ये कुणीच कधीच जोडे न वापरण्याचा वटहुकूम काढावा. त्यात कातड्याच्या जोडयांना सवलत द्यावी. लाकडी खडावा वारू द्याव्यात. देशांतर्गत प्रवास करताना राज्याची सीमा ओलांडली की मगच जोडे वापरता येऊ शकतील असा नियम करून दहशत निर्माण करण्याचे त्यांना वाटत होते. काहीतरी नियम केले की प्रसिद्धी मिळतेच हा प्लॅस्टिकबंदीवरून बा.र.काव्यांचा अनुभव पक्का होता. शिवाय या प्रसिध्दीसोबतच पुन्हा कधी राज्यात भाषणानंतरच काय पण घरीदारीदेखील 'जोडे' खावे लागणार नाहीत या स्वप्नवत कल्पनेचा आनंद होता. कुठलेही पादत्राण नसताना रस्त्यावर चालत राहिले तर पायाला घाण लागू शकते, पण पादत्राण बंदीमुळे ही घाण जर पायांना लागू द्यायची नसेल तर नाईलाजास्तव रस्ते स्वच्छ सजवावे लागतील. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत योजनेस हे पूरक असल्याने, असा निर्णय घेतल्यास राजकीय पदोन्नती देखील मिळू शकते. लख्ख व चकचकीत रस्त्याचे दिव्य स्वप्न या जोडेबंदीवर अवलंबून आहे. परंतु याचे श्रेय समाजकल्याण मंत्र्यांना मिळेल या भीतीपोटी त्यांना ही कल्पना गुंडाळून ठेवावी लागली.
(४) हल्ली खाजगी मोटारगाड्यांनी उच्छाद मांडलाय हे बा.र. काव्याना माहीत होते. प्रत्येक गृहकुल संस्थानात वाहन ठेवायला कदापिही जागा उरली नाही. तेव्हा नवीन वाहनांच्या निर्मितीवर बंदी आणावी का नवीन गृहकुल निर्माण करण्यावरच बंदी आणावी? वाहने आणि गृहकुल दोन्ही त्यांच्या जलसंवर्धन खात्यात येत नसले तरी बारकाईने विचार केल्यावर बा.र.काव्यांना असे आठवले या वाहनांना रोज सकाळी धुण्यासाठी विनाकारण वापरण्यात येणाऱ्या अमर्याद पाण्यावर निर्बंध लादता येतील. प्रत्येक वाहनचालकाकडून गाडी धुताना त्यासाठी जर पाण्याचा वापर केलेला आढळल्यास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुचवल्या जाऊ शकते.त्यात विद्युतचलीत वाहनांना सवलतही देता येईल. ज्या कोणाला पाण्याने गाडी धुवायची असेल त्याने स्वखर्चाने ते सांडलेले पाणी जमा करून, साठवून, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी नगरपालिकेला विनाशर्थ परत करण्याची आत देखील टाकता येऊ शकेल. असा एक प्रयोग त्यांनी एकदा त्यांच्या एका छोट्या गृहकुल संस्थेत केला होता. शेवटी फक्त यात भीती एकच होती. सर्व लोक घागरभर पाण्यात पलीभर दूध टाकत होते, आणि गाडीला दूधाचा अभिषेक चालू असल्याचे भासवत दररोज आपली गाडी धुणे सुरूच ठेवत होते. दण्डवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यास ते पाणीच आहे व दूध नाही हे त्या अधिकाऱ्याच्या स्वखर्चाने सिद्ध करून दाखवण्याचे आवाहन देत असल्याने हा प्रकल्प बारगळला होता, तेव्हा यात यशाची खात्री नसल्याने हा मार्ग परत प्रयोगशील नसल्यामुळे दुसरी कल्पना करणे योग्य ठरेल असे बा.र.कावे यांना तीव्रपणे जाणवले.
(५) नुकतेच एका रेल स्थानकावर पादचारी पुलावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन प्राणहाणी झाली होती. अशी दुर्दैवी घटना पुनश्च कधी घडू नये या कारणास्तव रेल्वेवरच बंदी घोषित करावी का पादचारी पूलांच्या वापरावर बंदी आणावी? का प्रवाशांना रेल्वेप्रवास करायला मनाई करावी- म्हणजे छत्रपतींचा वारसा असलेल्या या राज्यात प्रवास छत्रपतींप्रमाणे फक्त घोड्यावरूनच करण्याची परवानगी द्यावी? त्यामुळे प्रदूषण कमी होईल. लोकांचे आरोग्यमान सुधारेल. घोडेसंघटना खूष होऊन आपला मतदारवर्ग वाढेल. प्रत्येक शाळेत प्राथमिक शिक्षणातच घोडेस्वारी शिकवता येईल. त्यामुळे शिक्षणाचाही दर्जा वाढेल. मोटोर गाड्या वापरणे कमी होईल, रस्त्यावर जागा मोकळी मिळेल, रस्ते वाहतुकीने तुंबणार नाहीत, वाहनांची कमी गर्दी म्हणजे हवेची पातळी शुद्ध होईल.... इतकया फायद्यांवर व घोडेगिरीवर तर पर्यावर्णावरण संरक्षणांचे एखादे नोबेल पारितोषिक देखील मिळू शकेल. गराज्याच्या सीमेवरच सर्व रेल्वे रोखून चेंगराचेंगरी राज्याबाहेर होईल अशी तरतूद करावी? त्यात म्हाताऱ्या लोकांसाठी व सर्व सरकारी, निमसरकारी, आमदार, खासदार यांना केवळ सवलत आणि अपवाद म्हणून रेल्वे वापरू द्यावी? पण राज्यात जर अपवादात्मक लोकांनाच रेल्वे वापरू दिली तर त्यातील खाद्यपदार्थ पुरवठा करण्याच्या त्यांच्या कंत्राटी जोड व्यवसायाला खीळ बसू शकत असल्याने, एवढा मोठा आर्थिक फटका सहन करण्यापेक्षा पर्यावरणाच्या नोबेल पुरस्कारावरच पाणी सोडावे असे बा.र.काव्यांनी ठरवले.
(६) एका माजी जलसंवर्धन मंत्र्याने विमानातून लघुशंका करून धरणात पाणीसाठा वाढवण्याची अचाट कल्पना मांडली होती. त्यानुसार विमानात जर कधी कोणालाही लघुशंकेस जायचे असले तर पायलटने विमान जवळच्या धरणाकडे वळवावे; तसे न केल्यास विमानप्रवासात लघुशंकेवर संपूर्णपणे बंदी टाकून हा नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर प्रत्येकी ५०००₹ दंड ठोठावण्याचे फर्मान काढता येईल का याचा त्यांनी आढावा घेतला. यामध्ये परदेशी नागरिक, संसदेचे सभासद, आणि माननीय आजी व माजी आमदार, नगरसेवक, यांना अपरिहार्य अपवादामुळे सूट देता येईल.
(७) याचप्रमाणे हास्यबंदी, चहाबंदी, काचबंदी, नसबंदी, धूरबंदी, चित्रबंदी, रंगबंदी, शब्दबंदी, जेलबंदी, वनबंदी, फुलबंदी, सूरबंदी, बासुंदीबंदी, पुरणपोळी बंदी, पुलावबंदी, दाढीबंदी, तांब्यापेलाबंदी, अंथरूणबंदी, पांघरुणबंदी, अश्रूबंदी, कुठल्याही बंदीवरच बंदी, इत्यादी इत्यादी..अशा अनेक बंदीच्या शक्यतेंचा बा.र.काव्यांनी बारकाईने अभ्यास केला.
नेमकी कुठली गोष्ट 'बंदी' साठी निवडावी याचा लवकर निर्णय होत नसल्याने बा.र. कावे खंगत होते, ते बावरून गेले होते. परंतु त्यांचा धीर मुलूच खचला नव्हता. यापूर्वी कोणीही विचारदेखील केली नसेल अशी चमत्कारिक बंदी जाहीर केल्याशिवाय अपेक्षित ती प्रसिद्धी मिळणार नाही , हे ते जाणून होते. शिवाय आपण शेकडो गोष्टींचा विचार केला आहे तेव्हा हा असाच विचार पुढे चालू ठेवला तर त्यात कधी न कधी यश जरूर मिळेल असा त्यांना दुर्दम्य आत्मविश्वास होता. बंदीची नवीन योजना सुचण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिकबंदीची पार्श्वभूमी जरा सूक्ष्मपणे तपासून पाहण्याचे त्यांनी ठरवले. याच पार्श्वभूमीचाच आधार घेऊन प्लास्टिक बंदीवर कशी कुरघोडी करता येईल याचा ते गंभीरपणे चिंतनशील विचार करू लागले. आशा चिंतनातून त्यांना एक अतिशय मूलभूत अशा गोष्टीचा उलगडा झाला. खरे तर प्लास्टिक बंदीच्या कारणांचा त्यांच्या जलसंवर्धन खात्याशी फारच जवळचा असा संबंध होता. त्यांना दोन घटना लागली आठवल्या. एक म्हणजे, अमेरिकेतील समुद्राच्या पाण्यामध्ये प्लास्टिकचा समुद्र निर्माण झाला होता. दुसरी घटना म्हणजे, याच राज्यामध्ये दीड दशकांपूर्वी झालेल्या जलप्रलयात प्लास्टिक तुंबल्याने राजधानी पाण्यात बुडाली होती. तेव्हा या दोन्ही घटनांमध्ये प्लास्टिक आणि पाणी एकमेकांशी निगडित अडचणी आहेत. त्यातील एक अडचणींवर पर्यावरण मंत्र्यानी बंदी टाकली, दुसर्‍यावर आपण म्हणजे जलसंवर्धन मंत्र्यानी बंदी का टाकू नये? जेव्हा जलप्रलयामुळे राजधानी बुडून गेली होती तेव्हा त्या विध्वंसाचे कारण व अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीचे मूळ कारण हे प्लास्टिकच आहे अशी नेत्यांनी बोंबाबोंब करून, प्लॅस्टिकला अगदी ब्रम्हराक्षस ठरवून, शेवटी त्यावर बंदी आणली. पण बारकाव्याने बा. र. कावे यांनी सखोल विचार केला तेव्हा त्यांच्या बुद्धिमतेला असे पटले की त्या जलप्रलयामुळे झालेल्या विध्वंसाचे मूळ कारण ते प्लास्टिक नसून तो जलप्रलयच आहे. जर जलप्रलय झालाच नसता तर प्लास्टिक तुंबलेच नसते, प्लास्टिकच्या बंदीची मग गरजही जाणवली नसती आणि प्लास्टिक बंदीचे असे श्रेय कोणा पर्यावरण नामक मंत्र्यांना मिळूच शकले नसते.
आपण जलसंवर्धन खात्याचे मंत्री असल्याने आपले परमकर्तव्य समजून आपण त्या तेव्हा जलप्रलयावरच बंदी आणावी आणि अशा रीतीने प्लॅस्टिकबंदीच्या कारणामधील मूळ हवाच काढून घ्यावी या विचारांनी त्यांचे डोळे चकाकले. राज्यामध्ये जलप्रलयावर बंदी घालण्याचा निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठीच्या पूर्वतयारीची आखणी त्यांनी पक्की केली आणि 'जलप्रलंयबंदी' कशी लोकप्रिय करता येईल याचा विचार करणे सुरू केले.
जलप्रलयावर नियंत्रित बंदी घालण्याचा अद्यादेश तब्बल ४१ दिवसांची पूर्वसूचना देऊन इंद्रदेवास स्वर्गात धाडण्यात आला. अंबा, अप्सरा, रंभा, उर्वशी, उर्मिला या साऱ्या स्वर्गलोकीच्या सुंदरींचा पदसंन्यास अनुभवण्यात इंद्रदेव रममाण झाले होते. नुकतेच हापूस आंब्याचे जेवण करून वामकुक्षी झाल्यानंतर शीण घालवण्यासाठी बोलावलेल्या नृत्यदरबाराची लालित्याने पेशकश सुरू होती. इतक्या रमणीय कलेचा आस्वाद मनमुरादपणे लुटत असतांनाच हळूहळू हापूस आंब्याचा शीण दूर होऊन मनात प्रफुल्लतेच्या तारका दौडत होत्या. अशा रम्य प्रसंगी, देहभान विसरून तल्लीन होत असलेल्या इंद्रदेवाची ही प्रसन्नता पुढील काही क्षणातच संपणार होती. अशा भरल्या दरबारी नृत्यकलेच्या समारंभात व्यत्य आणण्याचे धाडस शेवटी नारदांना करावेच लागले. राज्य सरकारचा शासकीय मुद्रेसाहितचा तो अद्यादेश इंद्राला तत्परतेने वाचून दाखवणे हे नारदांचे आद्यकर्तव्यच होते. त्या अद्यादेशामध्ये इंद्राला अनुसरून एक प्रदीर्घ व अशक्यप्राय असे आवाहन केले होते. पर्जन्यवृष्टी जर यापुढे कधीही करायची असेल तर राज्याला त्यामधून वगळण्याच्या संदर्भात तो अद्यादेश होता. निसर्गचक्रात खंड पाडून त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा ठराविकच भागात पर्जन्यवृष्टी करणे हे देवतांसाठीसुद्धा एक आवाहनच होते. या सृष्टीचे जगतनिर्माते साक्षात ब्रम्हदेव देखील या आद्यदेशाद्वारे चकित झाले होते. स्वर्गातील या सर्वच देवदेविकांना राज्यात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीवर नियंत्रण ठेवण्याचे हुकुमी फर्मान जारी करण्यात आले होते. जर स्वर्गलोकातील देवदेविकांना हे आव्हान पेलवणार नसेल तर त्यांचे अस्तित्व अमान्य ठरवण्याची धमकीदेखील या आदेशामध्ये होती. म्हणजेच, जर खरोखर नियंत्रित पर्जन्यवृष्टी करता येणे हे जरी अवघड असले तरी अशक्य नव्हते, आणि तशी आता देवदेविकांना तरतूद करणे भाग होते. कुठल्या एका कुचेष्टीत सर्वसामान्य कुवतीच्या पृथ्वीतलावरील एका छोट्या भूभागाच्या छत्रपतींच्या मामुली सरदाराने त्यांचे अस्तित्व, इंद्रदेवाची शक्ती व इंद्राच्या एकंदरीत असलेल्या प्रभावाला अनैसर्गिक आव्हान केले होते. हा अद्यादेश न पाळावा तर स्वतःमध्ये सामर्थ्य उरले नाही हे सिद्ध होईल असे त्या अज्ञादेशात स्पष्टपणे नमूद केले होते. शेवटी ‘देव’ जरी देव असले तरी त्यांना स्वतःचे अहंकार होते. त्यांच्या मूळ अस्तित्वाला व त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेला तडा जाण्यापेक्षा या अद्यादेशाचे तंतोतंत पालन करण्याचे इंद्रसभेने ठरवले.
या हुकुमानुसार यापुढे पर्जन्यवृष्टी ही फक्त काही मर्यादित भागातच करायची होती. कोरडवाहू शेतजमीन बाजरी सोडली तर राज्यात इतर सर्वत्र पर्जन्यवृष्टीला बंदी लागू करण्यात आली होती. नदी नाले यांच्या पूरामुळे प्लास्टिक अडकून, तुंबून नुकसान होते तेव्हा कधीच हे नदीनाले भरू न देण्याचे प्रयोजन करण्यात आले होते. असेही या पृथ्वीतलावरील तीन चतुर्थांश भूभाग हा समुद्राने आणि पाण्याने व्यापलेला असल्याने आकाशातून होणाऱ्या या जास्तीच्या जलप्रलयाची आता राज्याला निकड नव्हती. अद्यादेशासोबत राज्यातील सर्व शेतजमीनींचे सात बाराचे उतारे विशेष पुष्पक विमानामार्फत पाठवण्यात आले होते. पुढच्या ४१ ददिवसात इंद्रास या सर्व सात बारा उताऱ्याचा सखोल अभ्यास समरणात ठेवून पर्जन्यवृष्टी नेमकी कुठे करण्यास परवानगी आहे हे निश्चित करायचे होते. याच कालावधीमध्ये राज्यात नेमका कुठे पाऊस पाडायचा आहे याचे नियोजन करायचे होते. अवधी जरी अपुरा असला तरी तो वाढवून मागणे म्हणजे आपले दुर्बल्य प्रदर्शित करण्यासारखे असल्याने इंद्रदेवांनी या कमी कालावधीत सात बाराच्या उताऱ्यानुसारच राज्यात पर्जन्यवृष्टीचे नियोजन करण्याचे जलसंवर्धन मंत्र्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले.

इकडे पृथ्वीवर तर एक मोठाच हाहाकारच माजला. बा.र. काव्यांनी राज्यातील प्रमुख पत्रकारांची तातडीने पत्रकार परिषद बोलावून राज्यात पर्जन्यबंदीचा अद्यादेश जारी केल्याचे फर्माणपत्रक प्रसिध्द केले. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देखील पत्रकार परिषदेतली इतकी हादरवणारी व गौप्यस्फोट करणारी बातमी ऐकून व्याकुळ झाले. उंटासारखे मनुष्याला पाण्याचा साठा शरीरात करता येईल का या विषयी पुढील ४१ दिवसाचे आत संशोधन करून त्याचा वृत्तांत सादर करण्याचे त्यांनी त्याच व्याकुळतेने विज्ञान संशोधन विभागाला आदेश दिले. अद्यादेश ताबडतोब तपासून पाणी पिण्यावर बंदी नाही अशी त्यांची खात्री झाली तेव्हा व्याकुळ झालेल्या घशाखाली त्यांनी काही पाण्याचे थेंब ढकलले.
ही वृत्तघोषणा सर्व वाहिन्यांवरून ताबडतोब प्रसारित करून टाकल्याने लोकांमध्ये हल्लकल्लोळ माजला.क्षणात प्रसिद्धी मिळवण्याचे बा.र.काव्यांचे स्वप्न पूर्ण होत होते. साक्षात इंद्रदेवाला अद्यादेश पाठवून तो इंद्रास मान्य असल्याचे अविश्वसनीय कागद त्यांनी जेव्हा सादर केले तर तेव्हा काही जणांची बोबडी वळली, वाचा खिळली. विस्मयचकित डोळ्यातून हे पर्जन्यबंदीचे साक्षात देवास केलेल्या अद्यादेशाने त्यांचे महत्व सिद्ध झाले होते. अतिशय अदभुत वाटणाऱ्या परीकल्पनेच्या पलीकडे जाऊन देवालादेखील कुसुम करण्याच्या त्यांच्या धारिष्ट्याचे सर्वत्र कौतुक सुरू झाले. इंद्रदेवाने तो हुकूम मान्य असल्याची पोचपावती पाहून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले होते. देवदेविकांवर इतकी हुकूमत प्रस्थापित करणारे व्यक्तीत्व तितकेच भारदस्त असेल या कल्पनेतून जनसामान्यांना बा.र. कावेंबद्दल असलेला आदर शतगुणित होत होता. ज्या कुणा इसमाचा या अशा भाकडकथांवर विश्वास नव्हता आणि ज्या काही मोजक्या लोकांची सदसद्विवेकबुद्धी शाबूत होती, त्यांनादेखील लवकरच त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होणार होती कारण इंद्राने खरोखरच हे आव्हान स्वीकारले होते. अगदी मूठभर बुद्धिवादी वर्गाने केलेली वलग्ना वगळता बा.र.काव्यांच्या दूरदृष्टीचे सर्वच जण आनंदाने समर्थन करत होते.
नुकत्याच प्लास्टिक बंदीनंतर दण्डवसुली करण्यासाठीचे पावतीपुस्तक पावसात भिजू नये म्हणून चोरून प्लास्टिक वापरणाऱ्यावर ही आनंदाची बातमी होती. पर्जन्यवृष्टी होणार नसल्याने पावतीपुस्तकाच्या सुरक्षिततेची आता त्यांना अधिक चिंता नव्हती. रस्त्यावर खड्डे पडणार नव्हते. पावसामुळे कार्यालयात पोचायला उशीर होणार नव्हता. पाणी तुंबणार नव्हते. लोकल गाड्या रखडणार नव्हत्या. साचलेल्या पाण्यामुळे पसरणारे रोग बंद होणार होते. रस्त्यावर जागोजागी साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी लावलेल्या पंपांची ऊर्जा वाचणार होती. जुन्या इमारती अजून किती तरी वर्ष खचणार नसतील. नदीला पूर येऊन जनहानी, वित्तहानी, पीकपाणी नासाडी इत्यादी काहीही होणार नसेल. वा! ‘अच्छे दिन’ नारा जो पंतप्रधानांनी पुकारला होता तो अतिशय यशस्वीपणे इथे राबल्या जाणार होता. ठराविक व नियंत्रित ठिकाणीच पर्जन्यवृष्टी होणार असल्याने जनसामान्य तात्पुरते सुखावले. बा.र. काव्यांच्या अद्यादेशातील सूर्यास बाष्पीभवन थांबवण्याचे आदेश नसल्याची त्रूट या तात्पुरत्या सुखात कुणाच्या ध्यानात आली नाही. निसर्ग, ऋतुचक्र, यांवर कृत्रिम नियंत्रण करणे अशक्य असल्याचे तेव्हा कुणाच्या निदर्शनास आले नाही. पर्जन्यवृष्टीचे बहुत्तर लोकांनी खुल्या दिलाने स्वागत केले. अशी बंदी लागू करणाऱ्या जगातील पहिल्याच राज्याचे आपण नागरिक आहोत हा अभिमान प्रत्येकालाच वाटत होता. या अभिमानापोटीच पर्जन्यबंदीला जास्तीत जास्त समर्थन मिळत होते. पर्यावरणाचे हित जपल्याच्या भावनेचा संसर्गजन्य प्रसार झाला होता. विश्वास आणि अंधविश्वास यातील सीमारेषा पुसत झाल्या की दोन्ही गोष्टी एकमेकात विलीन होऊन जातात; त्याचप्रमाणे या पर्जन्यवृष्टीबंदीचा राज्यावर अनुकूल असाच परिणाम होणार असल्याचा लोकांना विश्वास वाटत होता.
मुदतीप्रमाणे ४१दिवसांचा कालावधी उत्सुकतेच्या लाटेवर कधी एकदा संपला हे कुणालाच कळाले नाही. ‘अच्छे दिन’ची आता खरोखर सुरुवात झाली होती. पावसावर आधारित दरच वर्षी कविता, कथा करणाऱ्या नवसाहित्यिकांनी बंडाचा पहिला मोर्चा धडकवला.पावसावर आधारित निसर्गसाहित्य रचण्यास राज्यात पूरक वातावरण नसल्याने जर शासकीय खर्चाने इतर राज्यात पाऊस अनुभवयास पाठवले नाही तर बहिष्काराच्या व निषेधाच्या रुपात हे राज्यच कायमस्वरूपी सोडून जाण्याची धमकी त्यांनी दिली. साहित्य हा जीवनाचा आत्मा आहे; तरीदेखील बिनआत्म्याचे राज्य म्हणून आता उदयास यावे लागेल ही भीती सरकारला वाटू लागल्याने साहित्यिक व नवसाहित्यिक रहात असणाऱ्या सर्वच वसाहतीमध्ये पर्जन्यवृष्टी नेहमीप्रमाणे, सुरळीतपणे कोसळण्याची सूट देण्याच्या आदेशाचे नवीन परिपत्रक इंद्रास धाडणे राज्य सरकारला भाग पडले.
या साहित्यिकांनी मिळवलेल्या सवलतीच्या यशस्वीतेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील सर्वच गवई लोकांनी त्यांना उत्कटतेने राग मेघमल्हार आवळता येत नसल्याच्या सुरेल कारणांवरून राज्यत्याग करण्याची धमकी दिली. संगीताशिवाय राज्यातील लोकांचे जिणे हे अगदी नीरस होणार असून, एका खूप मोठया कलावंतांच्या संघटनेस दुखावल्याचे दुरोगामी परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसू शकतील याची खात्री पटल्याने राज्य सरकारने गवई लोकांच्या वस्तीमध्ये असलेली पर्जन्यवृष्टी मागे घेत असल्याचे इंद्रास सूचित केले.
सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाची महत्ती मुळी पावसावर अवलंबून होती. दरवर्षी पावसाळ्यात एकच रस्ता अनेकदा खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेतून जात होता.अनेक रस्त्यांवरील अनेज खड्डे प्रत्येक एका पावसाच्या सरीनंतर बुजवण्याची त्यांची ती थोर समाजशील जबाबदारी होती; या थोर समाजसेवी भावनातून त्यांना गडगंज जरी नव्हे तरी कुबेराशी स्पर्धा करण्याइतपत धनप्राप्ती होत होती. ही धनप्राप्ती आता बंद झाल्याने सर्वच भागीदार म्हणजे मंत्री, आमदार, कंत्राटदार इत्यादींनी एक तातडीची सभा बोलावली. या भीषण समस्येवर काहीतरी तोडगा म्हणून शहरांमधील रस्त्यावर होणाऱ्या पर्जन्यवृष्टीबंदीची शहानिशा करण्यात आली. राज्यातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग वगळता , शहरातील किंवा खेड्यातील, प्रत्येक रस्त्यावर पूर्वव्रत पर्जन्यवृष्टी सुरू करण्याचे नवे परिशिष्ट काढण्याचे या महासभेत ठरवण्यात आले. थोडक्यात, पर्जन्यवृष्टी राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गावर होणार नसल्याने अजूनही ‘अच्छे दिन’ हे ब्रीदवाक्य चघळता येणार होते.
या निर्णयामुळे छत्री, रेनकोट, पावसाळी बूट इत्यादी पाऊसअवरोधी तत्सम गोष्टी बनवणाऱ्या उद्योगधंद्यातील मन्दिदेखील थोडी कमी होणार होती. या उद्योजकानांदेखील या निर्णयाने थोडी संजीवनी मिळाली होती. सर्वसामान्य जनता मात्र गोंधळून गेली होती. घरातून निघावे तर तर कुठे पाऊस तर कुठे शुष्क कोरडेपणा. एखाद्या रस्त्यावर पाऊस तर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कोरड. शेवटी या गोंधळाची हळूहळू सवय करून घेणे हाच एक पर्याय होता.
पाऊस पडणार नसल्याने धरणात पाण्याचा साठा वाढणार नव्हता. पूर्व जलसंवर्धन मंत्र्यांना सतत विमानातून धरणाची पाहणी करायला पाठवणे खर्चिक तर होतेच पण विरोधी पक्षाची मदत घेणे म्हणजे नाक कापल्याच्या नाचक्कीसारखे होते. शिवाय बा.र. मूळ अद्यादेशातील बाष्पीभवनाची त्रुटी आता चांगलीच लक्षात येऊ लागली होती. तेव्हा धरणक्षेत्रातील नद्यांमध्ये पावसाच्या बंदीचे मागे घेण्याचे ठरविण्यात असले. या सवळतीमुळे लोकांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याची जपणूक करण्याचा उद्देश होता. अजूनही इतर नदी नाल्यांवर असलेली पर्जन्यवृष्टीबंदी कायम असल्याने पूरामुळे होणाऱ्या नुकसानीची चिंता करण्याची जनसामान्यांना गरज नव्हती.’अच्छे दिन’ अजूनही ‘अच्छे’ होण्यासाठी हया अशा किरकोळ सवलतींची गरज असल्याचे बा.र.काव्यांनी त्यांच्या ताज्या पत्रकारपरिषदेत नमूद केले.
‘शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’ या बालगीतामध्ये असलेली निरागसतेची भावना लोप पावून शाळेतील मुले निराशावादी व औत्सुक्यहीन जीवन जगण्यास नाईलाजाने सामोरे जात आहेत. पाऊस पडणार नसल्याने दररोजच शाळेत जाण्याच्या धास्तीने किशोरवयांच्या या समुदायावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने सर्व शाळांभोवती असणारी पर्जन्यवृष्टीबंदी शिथिल करण्याच्या विरोधी पक्षाच्या मागणीकडे सहजासहजी दुर्लक्ष करणे अशक्य होते. किशोरवयीन भाव भावनांच्या मानसिकतेचा विचार करून राज्यातील प्राथमिक शाळांवरील पर्जन्यवृष्टीबंदी मागे घेण्यात आली. मात्र उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन परिसरात ही बंदी अजूनही लागू होती. ज्या संस्थांच्या एकाच आवारात प्राथमिक व उच्च माध्यमिक वर्ग आहेत त्यांना तातडीने दोन्ही वर्गांचे वर्गीकरण या सीमारेषा आखणारे नकाशे अद्यवत करून सरकार दप्तरी सुपूर्द करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, इंद्राला हे नकाशे मिळाले तेव्हा कितीतरी बहुमजली शाळांमध्ये प्राथमिक शाळेचे वर्ग २,४,६ माळ्यावर तर इतर वर्ग १,३,५,७ व्या मजल्यावर असल्याचे आढळले. नेमकी कुठे व कशी पर्जन्यवृष्टी करावी व कुठे करू नये याचे सतत बदलणारे परिकोष्टक तयार करून करून इंद्राच्या कार्यालयातील कर्मचारी देखील वैतागून गेले होते. राज्यसरकार मात्र या बंदीच्या यशस्वीतेचे गोडवे गात होते.
अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरांमधील, सर्व व्यवसायांमध्ये, सर्व जीवनात कुठलातरी विस्कळीतपणा आल्याचा बहाणा करून पर्जन्यवृष्टीबंदी हळूहळू शिथिल होत गेली. शेवटी फक्त मंत्रालय, विधानभवन, आजी माजी आमदारांचे निवासस्थान आणि इतर दुय्यम अशा जागांपूर्तीच ही बंदी उरली. मंत्रालयात पाण्याच्या अभावापाई घास व्याकुळ होत होते. संमिश्र प्रतिसाद मिळालेली ही बंदी थोडीफारच यशस्वी झाली होती. त्यातच प्लास्टिकबंदीला ही बर्याच सवलती मिळाल्या होत्या. नदीनाले आता परत भरू लागले होते. सवलत मिळालेले प्लास्टिक हे प्लॅस्टिकबंदी असूनही दिमाखाने आपला अपवाद मिरवत त्या भरलेल्या नाल्यांवरून सैरपणे प्रवास करायला लागले होते. सवलत मिळालेल्या प्लास्टिकने सवलत मिळालेल्या जलप्रवाहासोबत अभूतपूर्व अशी राजकीय युती केली; प्लास्टिक तुंबल्याने शहरांची अवदसा परत एकदा उजळून निघाली. कित्येक प्रकारच्या बंदीनंतर, अशा अवदसेने जनजीवन सामान्य व सुरळीत झाल्याचे जाणवल्यावरच राज्यातील जनतेने मग समाधानाने आपला डोळा मिटून, या अवदसेच्या तृप्तीचा आस्वाद घेत पुढील बंदी जाहीर होईपर्यंत व जोवर बंदी नाही तोवर तरी थोडी विश्रांती घ्यावी ह्या हेतूने स्वतःच्या शरीरास बिछान्यात कोंबले!

1 जुलै, 2018

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults