पाहुणा

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 June, 2018 - 05:52

आली ज़ोरदार थाप
कोण पाहुणा दारात ?
कडी काढ़लेल्या क्षणी
त्याने घेतले कवेत

नार घरात एकली
केली अशी दांडगाई
क्षणभर सावराया
अवसर दिला न्हाई

नाही ओळख-पाळख
कशी सोसू ही लगट ?
तोल सावरण्या आधी
चुंबियले गाल-ओठ

धसमुसळा-रांगडा
ह्याची पुरूषाची जात
मागे-पुढे न पाहता
घाली पदराला हात

झाले कावरी-बावरी
आले होते दूरदेशी
सखा आला मागोमाग
सख्य त्याचे पावसाशी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users