थकले आता

Submitted by निशिकांत on 18 June, 2018 - 00:36

( १५.०६.२०१८ रोजी 'करम'-जागृती-रंगत संगत तर्फे माहाराष्ट्र सहित्य परिषद, पुणे येथे "साहित्यातील जातीवाद" या विषयावर एक कवि संमेलन झाले. त्यात मी वाचलेली रचना. )

न्यायाची मी वाट पाहुनी पिकले आता
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

तळातल्या गाळात जात माझी फसलेली
फक्त उपेक्षा पाचवीस असते पुजलेली
वळून मागे काय बघावे? विरान सारे
काळोखाने वाट उद्याची बरबटलेली
श्वास चालतो म्हणून जगणे शिकले आहे
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

शिवाशिवी हे शस्त्र नेहमी वापरताना
स्थान आमुचे पायतळी हे दाखवताना
दंश मारता वखवखणार्‍या नजरा त्यांच्या
काया माझी ओरडते की, सामंतांना
अस्पृशाची नार चालते, कळले आता
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

प्रश्न मनाला एकच आहे ना सुटलेला
जातीवरुनी समाज का हा विभागलेला?
असशीलच तर सांग ईश्वरा कशामुळे रे!
कुणी तुपाशी, कुणी उपाशी, नागवलेला
देव निरुत्तर, प्रश्न अंतरी थिजले आता
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

तळातल्यांचे लिखाण असते धगधगणारे
अन्यायाच्या विरुध्द एल्गाराचे नारे
रुदनांचे आक्रोश जाहले, सनातन्यांनो
नोंद तुम्ही घ्या, ओळखून बदलांचे वारे
पशावरी बलुताच्या जगणे सरले आहे
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users