आगमन - शतशब्दकथा

Submitted by द्वादशांगुला on 15 June, 2018 - 13:11

तिला दरवेळी त्याचं आगमन नको वाटायचं. खरंतर तो बापासारखाच तिच्या जगण्याच्या गरजा पुरवायचा. पण पितृमन वरवर कठोरच असतं ना! जगाला सुखवायचा तो येण्याने. जगाला वाटत असेल तो कंटाळ्यावर फुंकर मारून चैतन्य वाढवणारा! तसा वागायचाच तो! तो नसल्यावर लोक कासावीस व्हायचे. कृष्णाच्या बासरीसारखा होता तो लोकांसाठी. पण तिच्यासाठी? तिला धाकात ठेवायचा लबाड प्रयत्न करायचा तो. त्याला वाटत असेल, तो खेळकरपणे मुलीसारख्या असलेल्या तिला रमवतोय; पण तिला कठोरतेचं पाणी चढलेलं बापाचं प्रेम समजायचं नाही. तो न येण्याची ती मनोमन प्रार्थना करायची. पण आजही आला तो नेहमीप्रमाणे.

"च्चच्च! काय हा वारा!" असं उद्गारत त्या छोट्याशा देवळातील पुजार्‍यांनी देवापुढील दिव्याच्या थरथरणार्‍या ज्योतीभोवती हात धरले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझा शतशब्दकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न! कशी वाटली ते नक्की सांगा! Happy

- द्वादशांगुला
जुई नाईक.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त....!!

Pages