माझी सैन्यगाथा (भाग १२)

Submitted by nimita on 15 June, 2018 - 00:20

This is the best part about the ‘armed forces’. दर २-३ वर्षांनी नवीन जागा, नवीन ओळखी, नवीन मित्र मैत्रिणी !

पण जरी नवी नाती जुळली तरी आधीची नाती पुसट नाही होत… उलट अजूनच घट्ट होतात.. लोणचं कसं मुरत जातं…. तशीच !

भलेही तुम्ही वर्षानुवर्ष एकमेकांपासून लांब असलात तरी जेव्हा कधी भेटीचा योग येतो तेव्हा असं वाटतं जणू काही कालच भेटलो होतो, मधली सगळी वर्षं अचानक नाहीशी होतात! आणि हे फक्त ऑफिसर्स बद्दलच नाही बरं का! Ladies आणि मुलांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो.

पण यामधेही काही नाती ही खूप स्पेशल असतात. अगदी खासम् खास …..“नवऱ्याचे कोर्समेट्स आणि त्यांचे परिवार” …

प्रत्येक ऑफिसर च्या मनात त्याच्या course mates करता एक वेगळा कप्पा असतो. आणि तिथे इतर कोणालाही प्रवेश नसतो… अगदी बायकोला सुद्धा नाही! आणि यात आम्हा फौजी ladies ना काहीच वावगं वाटत नाही. कारण हे ‘course mates’ चं नातंच असं आहे.. ‘सारी दुनिया एक तरफ और course mates एक तरफ।

जगाच्या पाठीवर कुठेही आणि कधीही जर कोणाला मदतीची गरज भासली तर हेच course mates धावून येतात.. अगदी मध्यरात्री सुद्धा !

१९९७ साली आम्ही जंगलोट ला (जम्मू-कश्मीर मधे) असताना नितीनचा एक कोर्समेट बॉर्डर वर एके ठिकाणी पोस्टिंग वर होता. साहजिकच त्याच्या परिवाराला त्याच्या बरोबर राहायची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याची बायको आणि ५-६ वर्षांची मुलगी देवळालीला राहात होत्या. एका कोर्स करता तो ऑफिसर एक महिन्यासाठी जंगलोट ला येणार होता. निदान महिनाभर तरी एकत्र राहता येईल असा विचार करून त्याची बायको आणि मुलगी देवळाली हून all the way जंगलोट ला आल्या. अर्थातच ते तिघं आमच्याकडे राहणार होते… हे तर गृहीतच होतं. आणि त्यांच्या दिमतीला आमची गाडी पण होतीच.

पण कर्मधर्म संयोगानी तिथेच पण दुसऱ्या युनिट मधे नितीन चा अजून एक कोर्समेट पोस्टिंग वर होता. तो आणि त्याची फॅमिली सुट्टी मिळाली म्हणून महिन्याभरासाठी दिल्लीला जाणार होते. तर जायच्या आधी त्यांनी चक्क चक्क आपल्या घराच्या किल्ल्या कोर्स करता आलेल्या मित्राला दिल्या…म्हणाले,” महिनाभर आमचं घर रिकामंच असणार.. तुम्ही राहा तिथे! Enjoy your family life together for the next one month.”

या पूर्ण प्रसंगात आम्हां तिन्ही जोडप्यांना काहीच वावगं वाटलं नाही.. पण आपलं राहातं घर आणि त्यातल्या सगळ्या वस्तू ..म्हणजे अगदी किचन मधल्या सामानापासून ते टीव्ही, फ्रीज पर्यंत सगळं काही असं कोणाच्या हवाली करणं आणि तेही एक महिन्यासाठी…… I can’t imagine such a thing happening in the civil life… This happens only in the armed forces!

एकदा नितीन कोणाशी तरी फोनवर बोलत होता.. त्याचं बोलणं झाल्यावर मी त्याला विचारलं,” मित्राचा फोन होता का?” त्यावर तो म्हणाला,” नाही, course mate चा!!” So, you see… मैत्रीच्या नात्यापेक्षाही घट्ट असतं हे नातं.

आणि असे हे सगळे ‘यारों के यार’ जेव्हा एकत्र येतात तेव्हाचा नज़ारा तर अगदी बघण्यासारखा असतो….. सगळ्या जगाला विसरून हे तमाम ‘कोर्स मेट्स’ आपल्याच विश्वात मग्न असतात. त्यांच्या न संपणाऱ्या गप्पा, एकमेकांची चाललेली चेष्टा मस्करी, training च्या काळातल्या academy मधल्या आठवणी…….सगळं काही जगावेगळं !!! अशा वेळी म्हणावसं वाटतं…’ दिल तो बच्चा है जी।’

मलाच काय पण माझ्या मुलींना पण आता हे लक्षात आलंय. जर कधी त्यांनी नितीनला फोन वर बोलत असताना बघितलं तर त्याच्या एकंदर हावभाव आणि बोलण्याच्या style वरूनच त्या ओळखून घेतात…..”बाबा कुठल्यातरी कोर्स मेट अंकल शी बोलतायत!”

पण खरं सांगायचं तर त्यांच्या या मैत्री सारखीच घट्ट मैत्री आम्हां बायकांमधे पण जुळते बरं का! त्यांच्या सारख्याच आमच्या पण मैत्रीच्या व्याख्या ठरलेल्या असतात…. म्हणजे नवऱ्याच्या कोर्स मेट ची बायको ही नकळत आमची मैत्रीण झालेली असते.. In fact, तशी default setting च असते मनात! आणि त्याला कारणंही तशीच आहेत. एक तर समान वयोगट.. त्यामुळे आयुष्यात येणारी आव्हानं, milestones, achievements- सगळं सारखंच… शिवाय मुलंही साधारण एकाच वयोगटातली , त्यामुळे त्यांच्याशी निगडित सगळ्या गोष्टीही थोड्याफार फरकानी एक सारख्याच…पण त्याहीपेक्षा महत्वाचा असा आमच्या नवऱ्यांमधला मैत्रीचा घट्ट धागा !!त्यामुळे आम्ही बायका देखील जिवाभावाच्या मैत्रिणी बनतो. आणि अडचणीच्या काळात, testing times मधे एकमेकींची support system बनतो.

जर कधी ‘नवरा आणि त्याचे कोर्स मेट्स’ या विषयावर एखादा सिनेमा किंवा टीव्ही सिरिअल काढायची झाली ना तर माझ्याकडे त्याच्यासाठी एक अगदी योग्य नाव आहे….‘ सवत माझी लाडकी ‘ किंवा “माझ्या नवऱ्याची बायको’ …..

पण खरंच, ही अशी सवत असेल तर ती कुठल्याही बायकोला नक्कीच पटेल!

माझं हे मनोगत ज्या ज्या फौजी ladies नी वाचलं असेल, त्यांच्या चेहेऱ्यावर नक्कीच एक हलकंसं हसू झळकलं असेल !! “अगदी माझ्या मनातलं बोललीस!” – अशा अर्थाचं हसू !!

तसं पाहिलं तर ‘नवरा आणि त्याचे कोर्स मेट्स’ या विषयावर एक प्रबंध लिहिता येईल. कदाचित पुढे कधीतरी माझ्याच लेखणीतून अवतरेल ती गाथा ! पण आत्ता तरी परत माझ्या गाथेकडे वळूया ….

आता तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या मैत्रिणी बरोबरचं माझं नातं !

डिसेंबर १९९३ मधे आम्ही आगरतला मधला आमचा गाशा गुंडाळला आणि देवळालीच्या दिशेनी कूच केलं. देवळालीचा कोर्स एक वर्षाचा असल्यामुळे ऑफिसर्स ना त्यांची family बरोबर घेऊन यायची परवानगी होती. आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा already कोर्स करता येणाऱ्या सगळ्या ऑफिसर्स साठी temporary accommodation राखून ठेवण्यात आलं होतं. आमच्या घराशेजारीच माझ्या आगरतलाच्या मैत्रिणीचं घर होतं. बरेचसे ऑफिसर्स येऊन स्थिरस्थावर झाले होते. आम्ही पोचलो तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. मी आमच्या ‘kitchen बॉक्स’ मधलं सामान काढत होते तेवढ्यात बेल वाजली. दार उघडून बघते तर बाहेर एक lady उभी होती- चेहेऱ्यावर मनमोकळं हसू आणि हातातल्या ट्रे मधे चहाचे दोन mugs आणि त्या सोबत घरी बनवलेला केक … मी काही विचारायच्या आधीच तिनी स्वतःची ओळख करून दिली. ती नितीनच्या अजून एका कोर्स मेट ची बायको होती. माझी दुसरी शेजारीण! मला म्हणाली,” आत्ताच पोचलात ना? दमला असाल. मस्त चहा करून आणलाय. शांतपणे चहा घ्या आणि मग लागा कामाला!” पहिल्याच भेटीत तिनी मला जिंकून घेतलं.. इतकी प्रेमळ मैत्रीण आणि तीही मराठी बोलणारी…. हो !! माझी दुसरी मराठी मैत्रीण ! आणि luckily आम्ही तिघी अगदी शेजारी शेजारी राहात होतो. त्यामुळे आमच्या एकत्र भेटीगाठीही खूप व्हायच्या. आणि जेव्हा आम्ही तिघीच असायचो तेव्हा आम्ही आमची मराठी बोलण्याची हौस भागवून घ्यायचो. नितीन च्या शब्दांत सांगायचं तर – आमचं तिघींचं ‘भगिनी मंडळ’ होतं ! पण आज इतक्या वर्षांनंतर ही आमचं त्रिकुट अजूनही टिकून आहे. तसं पाहिलं तर देवळालीच्या त्या एक वर्षाच्या सहवासानंतर आम्ही तिघी परत कधीच एके ठिकाणी नाही राहिलो (कारण आमच्या नवऱ्यांची एकत्र एकाच गावात कधीच पोस्टिंग नाही आली.) पण त्यामुळे आमच्या मैत्रीत कधीच अंतर नाही पडलं. आणि या पुढेही आमची ही मैत्री अशीच टिकून राहील याची खात्री आहे मला!

या अश्या life long friendships हा armed forces चा सगळ्यांत मोठा प्लस पॉईंट आहे. ‘आपल्या अडचणीच्या काळात जर कधी गरज पडली तर हक्कानी मदत मागण्यासाठी कोणीतरी आहे ‘ हा विश्वास, ही खात्री इथल्या प्रत्येकाच्या मनात असते.

आणि या मदतीचे प्रसंग आणि पद्धती देखील वेगवेगळे असू शकतात…मी स्वतः पाहिलेले आणि काही बाबतीत अनुभवलेले प्रसंग म्हणजे… जर एखादा ऑफिसर काही कारणास्तव स्टेशन मधे (म्हणजे त्या मिलिटरी स्टेशन मधे) नसेल तर तिथले इतर ऑफिसर्स आणि त्यांच्या बायका त्याच्या घरच्यांची काळजी घेतात… या मधे अगदी भाजी आणून देण्यापासून ते आजारपणात त्यांची शुश्रूषा करण्यापर्यंत कुठलंही काम असू शकतं, बरं का! त्यांच्या घरी अचानक बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांना स्टेशन वर घ्यायला जाणं, त्यांच्या मुलांना शाळेत सोडणं/ शाळेतून आणणं, अधून मधून त्यांच्या घरी जाऊन त्यांना हवं नको ते बघणं या आणि अशा प्रकारच्या direct मदती बरोबरच गरज पडल्यास त्या परिवाराला मानसिक आधार देण्यासारखी indirect मदतही करतात हे देवदूत !

आगरतला मधे असताना एका सीनिअर लेडी नी सांगितलेली घटना अजूनही लक्षात आहे माझ्या. त्यांचा नवरा एकदा टेम्पररी ड्युटी साठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस अचानक त्या लेडीला हॉस्पिटल मधे ऍडमिट करावं लागलं…आणि तेही ICU मधे. त्यांचा मुलगा तेव्हा जेमतेमपाच सहा महिन्यांचा होता. त्यावेळी त्यांच्या युनिट मधल्या त्यांच्या मैत्रिणीनी पुढचा मागचा काहीही विचार न करता त्या बाळाला स्वतःच्या घरी नेलं आणि त्याची सगळी काळजी घेतली. एक दोन दिवस नाही तर जवळजवळ महिनाभर! तातडीचा निरोप पाठवून बाहेरगावी गेलेल्या त्या ऑफिसरला परत बोलावण्यात आलं. पण जोपर्यंत त्यांची बायको हॉस्पिटलमधे होती तोपर्यंत रोज त्यांच्या घरी युनिट मधून जेवणाचे डबे जात होते.

हे असे अनुभव ऐकले की मैत्रीवरचा विश्वास अजूनच दृढ होतो.

देवळाली चा कोर्स सुरु झाला आणि नितीन त्याच्या अभ्यासात आणि परीक्षांमधे बिझी झाला. कोर्स साठी आलेल्या सगळ्या ऑफिसर्स ची घरं जवळपास च असल्यामुळे रात्री बऱ्याचदा नितीन आणि त्याचे मित्र एकत्र अभ्यास करायचे ..एकदा असाच नितीन अभ्यासासाठी म्हणून आमच्या शेजारी राहणाऱ्या मित्राच्या घरी गेला होता. त्याला यायला उशीर होणार होता. त्याच्यासाठी दार उघडायला म्हणून मला जागं राहावं लागू नये , असा विचार करून तो घराच्या मुख्य दाराला बाहेरून कडी लावून गेला. आम्ही आर्मी एरिया मध्ये राहात असल्यामुळे चोर, डाकू वगैरेंची अजिबात भीती नव्हती. त्यामुळे कुलूप लावायच्या भानगडीत न पडता त्यानी फक्त कडी लावली…. म्हणजे त्याला असं वाटलं की त्यानी कडी लावलीये पण ती नीट लागली नव्हती. मी पण निर्धास्तपणे बेडरूम मधे गेले झोपायला. I was in the family way and in the third trimester. मी झोपायची तयारी करत होते तेवढ्यात बाहेरच्या दाराचा किरकिरण्याचा आवाज झाला. “कडी नीट लागली नाही वाटतं” असं म्हणत मी दार बंद करायला उठणार तेवढ्यात कुठलातरी पक्षी उडत उडत बेडरूम मधे आला. इतक्या रात्री पक्षी कसा काय आला? रात्रीच्या अंधारात नीट दिसत नव्हतं

पण तो छोटासा पक्षी बाहेर जायचा रस्ता शोधायच्या नादात अक्षरशः वेडा वाकडा फडफडत उडत होता. मधेच भिंतीवर आपटत होता. मी उशीखाली ठेवलेला टॉर्च काढला आणि त्याच्या उजेडात पाहिलं…. तो पक्षी नव्हता तर चक्क एक छोटंसं वटवाघूळ होतं. घराच्या दारात राहिलेल्या फटीतून आत घुसलं असावं.. आणि आता बाहेर जायला रस्ता शोधत होतं.

आता याला कसं बाहेर काढायचं ? ‘ वटवाघूळ हा एक सस्तन प्राणी आहे आणि तो ध्वनि लहरींच्या सहाय्यानी उडतो ‘ एवढंच मला माहित होतं. माझी विचारचक्र सुरू झाली. आता ते पिल्लू खूपच खालच्या पातळीवर उडत होतं. माझा प्रॉब्लेम हा होता की अशा प्रसंगी एखादं वटवाघूळ नक्की काय करतं याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती.. म्हणजे ते घाबरून कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसतं का स्वसंरक्षणासाठी म्हणून समोरच्या व्यक्तीवर ऍटॅक करतं ? No idea ! जर चावत किंवा ओरबाडत असेल तर? त्याचा चावा विषारी असतो का? त्यामुळे माझ्या बाळाला काही धोका तर नाही होणार??मनात या आणि अशा विविध आणि विचित्र प्रश्नांची गर्दी सुरू झाली. शेवटी मी रणांगणावरून काढता पाय घ्यायचं ठरवलं… पण ते पिल्लू ज्या हिशोबानी खोलीत गोल गोल उडत होतं.. ते बघता जर मी बेडवर नुसती उठून जरी बसले असते तरी ते नक्कीच माझ्यावर येऊन आदळलं असतं. त्यामुळे मग मी हळूच कॉटवरून खाली उतरले, माझं पांघरूण होतं ते डोक्यावरून गुंडाळून घेतलं आणि अक्षरशः रांगत जाऊन घराचा दरवाजा गाठला. बाहेर जाऊन दार पूर्ण उघडलं आणि समोरच्या पॅसेज मधे वाट बघत बसले….नितीनची नाही…त्या वटवाघूळाच्या बाहेर येण्याची ! Thankfully, थोड्या वेळानी तो वाट चुकलेला निशाचर माझ्या घराच्या बंदिवासातून बाहेर मोकळ्या आकाशात उडत गेला आणि मी सुटकेचा श्वास सोडला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

विद्या, बरी आहेस ना आता? होप सो Happy

लिहिलंय चांगलं
पण कोर्समेट्सच्या आख्यानात मधेच वटवाघूळ कशाला आणलंत