प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

Submitted by hemantvavale on 13 June, 2018 - 11:01

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील होते. यावर्षी मात्र, मृगाचा किडा पाहताना, ते वाचलेले सर्व आठवले व एक वेगळाच विचार मनात येऊन गेला. आता थोडा थोडा आठवुन इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.

डार्विन ने उत्क्रांतीवाद मांडला. सुरुवातीस पृथ्वीवर एक पेशी असलेला जीव तयार झाला, व पुढे त्यापासुन अनेक पेशी असलेले अनेक जीव उद्यास आले. डार्विनच्या तत्व-प्रणालीनुसार पृथ्वीतलावरील सर्वच्या सर्व सजीव (वृक्ष, वेली, वनस्पती, झुडपे, किडे, मुंग्या, सर्प, मणका असलेले प्राणी, जलचर, इत्यादी) त्या एकाच पेशी पासुन तयार झालेले आहेत.
प्रत्येक पेशी मध्ये एक ज्ञान भांडार असते. त्याला विज्ञानाच्या भाषेत जिनोम म्हणतात. जिनोम मध्ये, त्या पेशीने (पृथ्वीवर एकपेशीय जीव अस्तित्वात आल्यापासुन) आजपर्यंत जे काही ज्ञान अनुभवातुन मिळवलेले आहे ते सर्व ज्ञान असते. म्हणजेच काय तर जिनोम एक प्रकारे सजीवाची ब्लु प्रिंटच आहे. ब्लु प्रिंट मध्ये, त्या पेशीचे शरीर कसे बनणार आहे याची माहिती तर असतेच, त्या सोबतच, उत्क्रांतीच्या करोडो वर्षांच्या प्रक्रियेमध्ये आलेले अनुभव देखील साठवुन ठेवलेले असतात.
68607899-darwin-wallpapers.jpg
एक माणुस म्हणुन जरी मी एक स्वतंत्र अस्तित्व असलो तरी माझे मुळ अस्तित्व हे पेशी स्तरामध्ये माझ्या डीएनए मध्ये आहे. व माझ्या शरीराच्या ज्या काही अब्जावधी पेशी असतील त्या प्रत्येक पेशी मध्ये, ते अब्जावधी वर्षांचे ज्ञान साठवलेले आहे.
या ज्ञानामध्ये नक्की काय आहे? व हे ज्ञान काय फक्त माणसालाच आहे का? जर सगळ्या पृथ्वीतलावरील, सगळे सजीवांचा पुर्वज एकच आहेत तर, सध्या अस्तित्वात असलेल्या सगळ्या पेशी (म्हणजेच सगळे सजीव) एकाच प्रकारच्या का नाहीत? जिनोम मध्ये ज्ञान साठवलेले असते, हे मनुष्यास कसे काय समजते? उत्क्रांतीवाद ज्याप्रमाणे झालेल्या उत्क्रांतीविषयी गप्पा मारतो, त्याप्रमाणे उत्क्रांतीवाद, होणा-या उत्क्रांतीविषयी काही बोलतो का? सगळेच्या सगळे सजीव उत्क्रांतीच्या वाटेवर आहेत तर मग त्यांचे ध्येय काय आहे?
वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी काही देऊ शकत नाही. तेवढा माझा अधिकार नक्कीच नाहीये. इथे, मृगाच्या किड्याच्या निमित्ताने काही निवडक मुद्द्यांकडे मी आपले लक्ष वेधणार आहे.
संत तुकाराम सिनेमामध्ये एक सुंदर डायलॉग, तुकारामांच्या मुखी बोलवला आहे. “नुकतच ज्न्मलेले मुल मातेचे स्तन्य चोखु लागते, तेव्हा त्याला तस करण्यासाठी कुणा अमंलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही.”
चित्रपटातील या डायलॉगची पार्श्वभुमी थोडी वेगळी आहे. त्याविषयी आता बोलायचे नाही. पण वरील वाक्यामध्ये, जिनोम मधील करोडो वर्षांच ज्ञान भांडाराची प्रचीती येईल इतकी अनुभुती येईल एवढा ताकत आहे. नुकत्याच जन्मलेल्या बालकाला कुणी शिकवलेले असते, मातेचे स्त्यन्य चोखायचे असते म्हणुन? माता फारतर, बालकाचे मुख स्तनाग्रापर्यंत नेईल, पण ते स्तनाग्र चोखुन त्यातील अमृत प्राशन करायचे असते असे ज्ञान बालकास कुणी दिलेले असते?
असे फक्त मनुष्याबाबतीच घडते असे नाही, तर सृष्टीमधील सर्वच्या सर्व जीवांच्या बाबतीत हेच गेली अब्जावधी वर्षे घडत आले आहे. आपल्या कडे कोकणात समुद्र किनारी, कासवे अंडी घालुन मातीच्या घरट्यामध्ये लपवुन ठेवतात. योग्यवेळी, मातेशिवाय, किंवा कुणाच्या देखभालीशिवाय, ती अम्डी उबवली जातात, आणि जेव्हा छोट्या छोट्या पिलांचा जन्म होतो तेव्हा, ही पिल्ले हजारोंच्या संख्येने, किना-यावरुन समुद्राच्या लाटांकडे धावायला सुरुवात करतात. कुणी या पिलांना शिकवले असेल की जीवंत राहायचे असेल तर, समुद्रात जावे लागेल म्हणुन?

अशी अनेक उदाहरणे आपण अनेकदा पाहिली, अनुभवली असतील. तर, हे शिकणे जे आहे ते काही आज-काल किंवा शे दोनशे वर्षांचे नाहीये. हे ज्ञान तेच आहे की जिनोम मध्ये साठवलेले आहे. या ज्ञानाच्या जोरावरच पृथ्वीवरील सगळे सजीव, अहोरात्र जगण्यासाठी धडपड करीत असतात. मनुष्य देखील त्यातलाच एक जीव. ही सगळी धडपड नुसती जगण्यासाठी नाही, तर मृत्युनंतर देखील स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्याची देखील असते. मनुष्य याला अपवाद नाही. सुदृढ निरोगी आणि बलवान शरीर बनवुन , योग्य वेळी समागम, संभोग, मैथुन करुन पुनर्निमाण करणे हे ज्ञान कोणत्याही संस्कृतीमधील (culture) मधील नसुन ही प्रत्येक सजीवाची उपजत वृत्ती आहे. ही उपजत वृत्ती म्हणजेच हे पिढ्यान पिढ्यांचे पेशीस्तरावरील अमुल्य ज्ञान आहे.
ही सगळी धडपड, करायची कशासाठी याचे उत्तर मात्र डार्विन किंवा त्याचा उत्क्रांतीवाद देऊ शकत नाही. इथे डार्विनचा सिध्दांत थांबतो. कार्यकारण भावाशिवाय मांडलेला हा सिध्दांत, मानवी कुतुहलास शमवु शकत नाही.
आपल्याकडे नुकताच पाऊस सुरु झाला. मॉन्सुनचा पाऊस. हा पाऊस सिरि होण्याच्या आसपास जमीनीवर अवतीर्ण होणा-या मृगाच्या किड्याविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत. उपजत वृत्ती ही उपजतच स्वाभाविक आहे. मैथुन करावास वाटणे हा काही दुर्गुण नाहीये. मैथुन निसर्ग आहे.. मैथुन नैसर्गिक स्वभाव आहे. त्यात मानवीय म्हणुन काहीतरी वेगळे आहे असे अजिबात नाही. निसर्गामध्ये मात्स्त्य न्यायाने मैथुन होत असतो, तर मानवाने मैथुन या अत्यंत मुलभुत आणि मानवी महत्वाच्या दोन हेतुंपैकी एक असणा-या एका वृत्तीस संस्कृतीच्या मालेत गुंफुन, विवाह संस्थेस जन्म दिला. निसर्गात अशा विवाह संस्था अन्य प्राण्या पक्षांमध्ये देखील दिसतात. काही पक्षी आजीवन एकमेकांचे साथीदार बनुनच जगतात. त्यामुळे मानवाने वेगळे काही केले आहे असे नाही. असो.

मृगाचा किडा, पावसाचा किडा, गोसावी किडा, रेन बग, रेड वेलवेट माईट अशा अनेक नावांनी या किडयास ओळखले जाते. भारतातील प्रत्येक भाषेमध्ये या किड्यास वेगळे नाव आहे. खरतर याला किडा का म्हणतात हेच कळत नाही. दिसायला जरी एखाद्या कोळ्यासारखा असला तरी पुर्ण वाढ झालेला मृगाचा किडा खुपच आकर्षक दिसतो. लक्षात आहे ना? प्रत्येक जीवास सुदृढ आणि आकर्षक व्हावेसे वाटणे ही देखील उपजत वृत्तीच आहे.
मृगाच्या किड्याचे जीवनचक्र खुपच गुंतागुंतीचे आहे. साधारण पणे ७-८ वर्षांचे आयुष्य असण-या या किड्याचा जन्म अंड्यामधुन होत असतो. या मध्ये माता (पिता सुध्दा) आणि मुल असा संबध नसतो. मादी अंडी घालते आणि सोडुन निघुन जाते. एका वेळेस ६० ते दहा हजारापर्यंत अंडी मादी घालते. कोणती उपजात आहे त्यावरुन अंडी किती हे ठरते. ती अंडी योग्य वेळी उबलती जातात. आणि त्यापसुन पिलांचा जन्म होतो. जन्म झाल्या पासुन ते प्रौढ किडा बने पर्यंत ही पिल्ले वेगवेगळ्या अवस्थांमधुन जातात. ही पिल्ले खुपच सुक्ष्म असतात. इतकी की हजारोंच्या संख्येने ती एखाद्या दुस-या प्राण्याच्या शरीरावर राहतात. व हे दुसरे प्राणी म्हणजे तरी कोण असतात तर, साधारण एक ते दोन इंच लांबी रुंदी असणारे, दुस-या जातीचे किडे. मृगाच्या किड्याची पिल्ले जन्मानंतर परावलंबी म्हणजेच पॅरासाईटस च्या रुपात दुस-या यजमान किड्याच्या शरीरावर जगतात. झाडावर असणा-या परावलंबी जीवास आपण मराठी मध्ये बांडगुळ म्हणतो. बांडगुळ, स्वःत अन्न तयार करीत नाही. ते दुस-याने बनवलेले, रेडीमेड अन्न खाते. व हळु हळु त्या यजमान झाडाला संपवते. आंब्याच्या झाडावर आपण नेहमी अशी बांडगुळे बघतो. मृगाच्या किड्याची पिल्ले देखील अशीच बांडगुळे आहेत. व अशा पध्दतीने बांडगुळ म्हणुन जगत असताना, ही पिल्ले जी त्यावेळी अळीच्या रुपात असतात, त्यांना ६ पाय असतात. आणि पुर्ण वाढ झालेल्या किड्यास आठ पाय असतात. अंड्यामधुन बाहेर पडल्यानंतर एक दोन दिवसामध्येच, प्रत्येल पिल्लु, स्वतसाठी एक यजमान किडा शोधते आणि त्याच्या पाठीवर चढुन एक छिद्र तयार करते. व त्या छिद्रातुन त्या यजमान किड्याचे रेडीमेड रक्त पीत स्वत जगते. यजमान किडा, जिकडे जाईल तिकडे मग त्या पिल्लांचा प्रवास सुरु होतो.
साधारण पणे दोन्न आठवड्यांच्या आतमध्ये, ही पिल्ले आवश्यक तेवढे अन्न यजमान किड्यामधुन शोषुन घेतात व मग त्या पासुन वेगळे होऊन जमीनीवर पडतात. त्यानंतर, ते स्वःत भोवती एक आवरण तयार करुन, जमीनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये जातात. या अवस्थेमधुन जेव्हा ही पिले बाहेर येतात तेव्हा, त्यांना आठ पाय आलेले असतात. हा टप्पा देखील त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. या मध्ये त्यांचे मुख्य काम असते, खाणे, आणि फक्त खाणे. कारण पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा सुप्तावस्थेमध्ये जायचे असते. भरपुर खावुन झाले की पुन्हा हे किडे सुप्तावस्थेम्मध्ये जमीनीखाली जातात. एकदा का शारीरीक वाढ पुर्ण झाली की, हे किडे पुर्ण वाढलेले प्रौढ किडे बनतात. त्यांच्याअ अवस्थेमध्ये मध्ये देखील ते, वर्षाचे फक्त काही तासच जमीनीच्या वर, अन्न आणि मैथुनासाठी जोडीदार शोधण्यासाठी येतात. नर आणि मादी दोघेही जमीनीवर येतात व शोधमोहीम सुरु होते.
मृगाच्या किड्याची मैथुनाच्या बाबतीत एक खासियत आहे. आजपर्यंत आपली मैथुनाच्या बाबतीतील एक धारणा समुळ नष्ट होईल पुढे लिहिलेले वाचुन. आपली सामान्य धारणा काय असते की मैथुनासाठी प्रत्यक्ष शरीरसम्बंध झाला पाहीजे. पण हा किडा प्रत्यक्ष शरीरसंबंध न करताच, मैथुन करतो.
माणसाठी, माणसाने तयार केलेला शब्द मैथुन खरतर खुपच कोत्या अर्थाचा आहे. मैथुनाचा अर्थ फक्त शरीरसुख , उपभोग इथपर्यंतच घेतला जातो किंवा घेतला गेला, त्यामुळे मृगाचा किडा जे करतो त्यास नक्की मैथुन म्हणता येणार नाही. अभ्यासकांचे म्हणने आहे की नर किडा, स्वःतचे शुक्राणु (स्पर्म्स) एका विशिष्ट फेसाळ अशा रसायनाच्या मदतीने गवतावर आकर्षक पध्दतीने आधीच सोडतो. त्या फेसामध्ये लाखोंच्या संख्येने शुक्रजंतु असतात. याला इंग्रजीमध्ये अभ्यासकांनी लव्ह गार्डन असे नाव दिले आहे. आपण त्याला प्रणय बाग म्हणुयात. ही प्रणय बाग तयार झाल्यानंतर, किडा, एक रेशमी असा रस्ता बागेपासुन तयार करतो व दुरपर्यंत नेऊन सोडतो. रस्ता जिथे संपेल तिथेच किडा त्याच्या मादीची वाट पाहत बसतो. मादी त्या दिशेने येताना दिसली की मग नर किडा नृत्यसदृश्य हालचाली करतो. मादीला ते आवडले तर मग ती नर किड्या सोबत, त्या रेशमी रस्त्याने, प्रणय बागेकडे येते व बागेमध्ये जाऊन शुक्राणुंच्या फेसामध्ये बसते. शुक्रजंतुंचा प्रवेश तिच्या मध्ये होऊन पुढे बीजधारणा होते. व मग अंडी , पुन्हा पिले, असे जीवनचक्र अव्याहत पणे सुरुच राहते. आहे ना गंमत, शरीरसंबंधाशिवाय मैथुन! यातुन एक गोष्ट पक्की समजते, ती ही की, आपण ज्यास मैथुन म्हणतो, तो जिनोममधील एक प्रोग्राम आहे. तो आपल्या नियंत्रणामध्ये नसतो. आपोआप होणारा व निसर्गचक्राचा एक अविभाज्य असा, अंगभुत घटक, म्हणजे मैथुन. उपजत वृत्ती म्हणजे मैथुन!
दुर्दैवाने मृगाच्या किड्याची प्रणय बाग काही अजुन मला पाहायला मिळाली नाही. यावर्षी, म्हणजे या काही दिवसांमध्येच, म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीस ही संधी असते. व तसा प्रयत्न ही मी करीन.
मृगाचा किडा, माणुस, आणि इथुन तिथुन सगळेच जीव, एकदा का सुदृढ शरीर प्राप्त केले की पुनरुत्पादन करण्यासाठी धडपड करतात. ही धडपड करण्यामागचा हेतु, ध्येय, साध्य काय आहे? एकुणच काय तर उत्क्रांतीचा शेवट काही आहे की नाही? उत्क्रांतीला काही ध्येय आहे की नाही?
घ्या तुम्ही सुध्दा धांडोळा या प्रश्नाचा, आणि सांगा मलादेखील जर तुम्हाला उकल झाली तर !

भेटु पुन्हा
धन्यवाद.
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लेख. मृग किड्याचा फोटो असायला हवा होता.

बाकी कासवांचे समुद्रात जाणे किंवा सस्तन प्राण्यांच्या पिल्लांचे दूध पिणे हे हार्मोन मुळे सुरु आणि बंद होते. DNA मध्ये याच्या सूचना असतात. म्हणजे जैविक घड्याळानुसार ठरते कि केंव्हा काय करणे अपेक्षित आहे. हे सगळं आला उत्क्रांतीमधून.

तसं पाहायला गेलं तर उत्क्रांती ला काही हेतू नाही, ध्येय नाही. हे का होता तर विश्वाच्या नियमानुसार हे घडणे शक्य आहे म्हणून. It just happens because it's possible.

सजीवांची विविध कृती हि अंतःप्रेरणा (शरीरातील व परिसरातील रासायनिक बदल, जैविक घड्याळ, ईत्यादी) मूळे घडत असावी असे वाटते. मृग किड्याच्या शुक्राणु बाहेर सोडण्याचे स्पष्टीकरण या पद्धतीने देता येईल. परंतु मादीची वाट पाहणे व नृत्य करणे याला काय प्रेरणा असू शकेल? हे कसे घडत असावे? त्या किड्याचा मेंदू व शरीर हे कसे घडवून आणत असतील?

https://www.amazon.in/Jankantariche-Astitvachya-Prashnana-Vidyanachi-Utt...

गो फ जन्मांतरीचे -- फार भारी पुस्तक आहे. पुन्हापुन्हा वाचावे असे (आणि कळण्याकरता काही काही चॅप्टर म ला तरी दोनदा वाचावे लागले होते Proud )
हे जाता जाता वाचण्यापेक्षा अभ्यासा चे पुस्तक आहे.. पण अफाट आहे!

मला असचं ड्रॅ गन ऑफ इडन (कार्ल सॅगन) आवडते.

नानबा, ड्रॅगन ऑफ इडनबद्दल अनुमोदन. माझंही ते फार आवडतं पुस्तक आहे. गोफ जन्मांतरीचे वाचायला हवे.
नवलेसाहेब, आपला लेख आवडला.

बेडकाची गर्भधारणासुद्धा external fertilization अशी काहीशी असते असे ऐकले आहे. मादी आपल्या अंड्यांचे समूह आपल्या पाठीवर सांभाळते आणि नराच्या पाण्यात विखुरलेल्या शुक्रजंतूंमुळे त्यांचे फलन होते असे काहीसे.