अंधाराशी लढता लढता

Submitted by निशिकांत on 12 June, 2018 - 01:45

कळोखाचा विजय जाहला
घडूनये ते घडता घडता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

किती अमीषे आली गेली
मोह कधी ना मनास शिवला
ओली सूखी जशी मिळाली
त्यात सुखाचा शोध घेतला
सर्व सुमंगल शुचित्व दिसते
वळून मागे बघता बघता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

देवपुजा मी कधी न केली
जरी अंतरी देव मानतो
मंदिरात मूर्ती अन् ईश्वर
कष्टाच्या घामात पाहतो
व्यस्त केवढा ! पोटाची मी
रोज चाकरी करता करता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

निसर्ग, धरती, हिरवळ माझी
आकाशाचा मला चांदवा
झोपडीत मी जरी राहतो
मला कशाची नसे वानवा
वेदनेतही आनंदाशी
नाळ जोडली जगता जगता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

सत्व परिक्षा आयुष्या का
पदोपदी घेतलीस माझी ?
जरी जाहलो गलितगात्र मी
तरी नावडे हांजी हांजी
मान झुकविणे स्वभाव नाही
कणा ताठ रे मरता मरता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

रडलो, हसलो, पडलो, उठलो
करायची ना मला शिकायत
जरी जाहला पुनर्जन्म, मी
करेन नवखी पुन्हा बगावत(*)
हसेन दाउन जगा वाकुल्या
चितेवरी मी चढता चढता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

(*) बगावत=बंडखोरी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users