ऐसी बरसातोंमें कैसा लगता है...

Submitted by अतुल ठाकुर on 10 June, 2018 - 00:28

images.jpg

राजेश खन्ना गाण्याचं सोनं करतो याबद्दल दुमत नसावे. अर्थात मी त्याच्या सोनेरी काळाबद्दल बोलतोय. गंमत म्हणजे त्याला नृत्याचे अंग नव्हते. तरीही त्याच्या विशिष्ट स्टेप्स खुप लोकप्रिय झाल्या. इतक्या की राजेश खन्नाची नक्कल करणारे त्या पद्धतीने नाचून दाखवतात. बाकी काकाचे ते तसे नाचणेही मस्त वाटते. त्याच्यावर प्रेम करणारी माणसे त्याचे नाचणे, त्याचे हातवारे, त्याचे काहीवेळा काही अक्षरे लांबवत बोलणे यावरही खुप प्रेम करतात. पावसाचे दिवस आहेत. त्यादिवशी गाणी ऐकत, पाहात असताना मुद्दाम १९७४ सालच्या "अजनबी" सिनेमातील "भीगी भीगी रातों में" लावले आणि घरातल्या घरात पावसाने चिंब झाल्यासारखे वाटले.

गाण्यात सोबतीला झीनत आहे. आणि पाऊस. आणि तिने घातलेला गुलाबी ड्रेस. यावर हिन्दी चित्रपटात मुरलेल्या चाणाक्ष प्रेक्षकांना वेगळ्याने काही सांगण्याची गरज नाही. ओलेती झीनत दिसलीय सुरेख. बाकी हा माझा मागासलेपणा असेल कदाचित. पण मला या नायिकांबद्दल खुप प्रेम आहे. झीनत काय, हेलन काय, यांनी शृंगार पडद्यावर रंगवला पण त्यांना पाहून कधीही किळस वाटली नाही. उत्तान हावभाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शिसारी ही आताच्या काळातल्या "आयटेम" साँग्जची देणगी आहे अशी माझी समजूत आहे. झीनतच्या शरीराकडेच जास्त पाहिले गेले आणि तिच्यातल्या अत्यंत गुणवान अशा अभिनेत्रीकडे दुर्लक्ष झाले असेही मला वाटते.

गाण्याच्या सुरुवातीलाच विजेच्या कडकडाटाने घाबरून झीनत राजेशखन्नाला घट्ट मिठी मारते आणि पंचमदाची सुरेख धून सुरु होते. नायकाला पावसात भिजायचे आहे. खरं तर तिलाही त्याच्याबरोबर पावसाचा आनंद घ्यायचाय. पण विजेची भीती वाटते. गडगडाटाची भीती वाटते. आणि संकोचदेखिल वाटतो आहे. पण तो मात्र खुलेपणाने बाहेर येऊन कोसळत्या पावसात उभा राहिल्यावर ती देखिल मागे सरत नाही. कारण पावसाने वस्त्रे अंगाला चिकटून तिचे सौंदर्य अधोरेखित झाले आहे याची तिला कल्पना आहे. त्यामुळे तो आपल्यासाठी आणखी वेडा होणार आहे हेही ती चतूर रमणी जाणून आहे. "अंबर खेले होली ऊईमा भीगे मेरी चोली, हमजोली..." असे शब्द आनंद बक्षींनी उगाचच लिहिलेले नाहीत.

राजेश खन्नाचं देखणेपण आणि त्याने पावसात मनमुक्तपणे केलेला अभिनय आनंद देऊन जातो. तो त्याच्या विशिष्ट पद्धतीने पावसाचा जूण मनमुराद आनंद घेत आपल्या नायिकेवरोबर नाचलाय. पाहिलं की असं वाटतं शेवटी कसदार अभिनय असणे हेच महत्त्वाचे. बाकी नृत्य, अ‍ॅक्शन, शरीरसौष्ठव या सार्‍यातलं नैपूण्य या नंतरच्या गोष्टी. त्यातच किशोरच्या परकायाप्रवेशाचा अनुभव देणार्‍या आवाजाची जोड आहे. त्यामुळे गाण्याचा परिणाम आणखी गडद होतो. झीनतला चपखल बसेल असा आवाज अताने वापरला आहेच. पण त्यात पावसात भिजलेली तरुणी गात आहे अशी अनुभूती आणणे हे फक्त एक लताच करु जाणे. नायिका तर ओलेती आहेच पण तीचा आवाजही पावसाने जणु चिंब झाला आहे असेच वाटते.

गाण्याबद्दल विचार करताना देवलांच्या संगीत मृच्छकटिकची आठवण झाली. आणि पुढील ओळी आठवल्या.

तेची पुरुष दैवाचे | धन्य धन्य जगिं साचे ||
अंगे भिजली जलधारांनी | ऐशा ललना स्वये येऊनी |
देती आलिंगन ज्यां धावुनि | थोर भाग्य त्यांचे ||

गाण्याचा आस्वाद घेताना दिसतं की या गाण्यातल्या नायकाला ते थोर भाग्य लाभले आहे.

अतुल ठाकुर

गाण्याचा विडियो येथे पाहता येईल
https://www.youtube.com/watch?v=7IsvJVlFyGI

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा . माझे फेवरिट गाणे. आजकाल रोज ऐकत आहे. अंबर खेले होली उई मां भीगी मेरी चोली हमजोली म्हण णार्‍या
मुली तरी आता कुठे राहिल्यात .
मी एक सावन प्ले लिस्ट बनवली आहे.
१) ऑलवेज विल बी अब के सावन में जी डरे रिम झिम तन पे पानी गिरे. आर्डी लता किशोर. अल्टिमेट
२) वरचे गाणे ऐसी बरसातों में कैसा लगता है.
३) अमित स्मिता आज रपट जाये तो हमें ना उ ठैयो. पिक्चर नमक हलाल
४) झीनत अगेनः हाय हाय ये मजबूरी. साधी साडी पण काय दिसते. पिक्चर रोटी कपडा मकान
५) नया जमाना हेमा: रामा रामा गजब हुई गवा री
६) पानी रे पानी तेरा रंग कैसा. ठेका व कोरस जबरी शोर सिनेमा
७) रिम झिम गिरे सावन.
८) टिप टिप बरसा पानी. रवीना मोहरा सिनेमात

झीनत काय, हेलन काय, यांनी शृंगार पडद्यावर रंगवला पण त्यांना पाहून कधीही किळस वाटली नाही. उत्तान हावभाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शिसारी ही आताच्या काळातल्या "आयटेम" साँग्जची देणगी आहे अशी माझी समजूत आहे.

झीनतच्या शरीराकडेच जास्त पाहिले गेले आणि तिच्यातल्या अत्यंत गुणवान अशा अभिनेत्रीकडे दुर्लक्ष झाले असेही मला वाटते.

यात विरोधाभास आहे असे नाही का वाटत ?

आजच्या काळात अत्तान हावभाव आहेत त्यामुळे (काहींच्या) मनात शिसारी झाली असे तुम्ही म्हणताय. तसेच असे पूर्वी काही नव्हते. म्हणून (काही) लोकांना किळसवाणे वाटले नाही. म्हणजे काही लोकांसाठी आज अत्तान दृश्ये , हावभाव असतात असे पूर्वी नव्हते तर मग

झीनत अमानच्या काळात तिच्या शरीराकडे लक्ष जावून अभिनयाकडे दुर्लक्ष का बरे झाले असावे ?

अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका तिला फार कमी मिळाल्या असे मला वाटते. "धूंद" मधील एक भूमिका तशी होती. डॅनिची पत्नी म्हणून. बाकी अनेक भूमिकांमध्ये उदा. कुर्बानी, अबदुल्ला अशासारख्या चित्रपटांमध्ये तिला एखादे तरी दृश्य अंगप्रदर्शन करायला लावणारे होते. बहुधा त्यामुळेच तिच्यातील उत्तम अभिनेत्रीकडे दुर्लक्ष झाले असेल.

कुर्बानी, अब्दुल्लाच नाही. सत्यम शिवम सुंदरम मधली अनेक दृश्ये उत्तान म्हणता येतील. दोस्ताना मधे कारण नसताना अंगप्रदर्शन आहे. त्या काळाचा विचार केला तर अशी दृश्ये, हावभाव हे जास्त उत्तान वाटत असतील. आता ते तितकेसे वाटत नाही. काळाचा महीमा देखील पहायला हवा.

त्यामुळे त्या काळातली दृश्ये किंवा नायिका उत्तान नाहीत, किळसवाण्या नाहीत आणि आजच्या आहेत ही तुलना अनाठायी वाटली. एव्हढे सोडून रसग्रहण हवे होते.

त्यामुळे त्या काळातली दृश्ये किंवा नायिका उत्तान नाहीत, किळसवाण्या नाहीत आणि आजच्या आहेत ही तुलना अनाठायी वाटली. एव्हढे सोडून रसग्रहण हवे होते.

हे माझं वैयक्तीक मत आहे. म्हणूनच "अशी माझी समजूत आहे." असे शब्द मी वापरलेत. रिसर्च पेपर असता तर भाषा वेगळी वापरली असती. काय की पावसातल्या गाण्यावर हौसेने लिहिताना मला फार काटेकोर रहावंसं वाटत नाही.

एव्हढे सोडून रसग्रहण हवे होते.
अनाठायी काय आहे आणि रसग्रहण कसे हवे हे ठरविण्याचे माझ्या लेखापुरते स्वातंत्र्य मी स्वतःला देऊ इच्छितो. प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.

इथे आपण वैयक्तिक मतच मांडत असतो (दुस-याचे मत असल्यास त्यावर चर्चा का करावी )
समजुतीचेही तेच.

अनाठायी काय आहे आणि रसग्रहण कसे हवे हे ठरविण्याचे माझ्या लेखापुरते स्वातंत्र्य मी स्वतःला देऊ इच्छितो >>> कृपया माझ्या लेखावरा न आवडणारे प्रतिसाद नकोत अशी तळटीप दिली असती तर वेळ आणि कष्ट वाचले असते असे मला वाटते. आपल्या लेखांच्या बाबतीत इथून पुढे ही काळजी अवश्य घेण्यात येईल. धन्यवाद.

धन्यवाद जाई!
अमा धन्यवाद!
"अब के सावन में जी डरे रिम झिम तन पे पानी गिरे." जबरदस्तच. कधीतरी लिहेन यावर.
लिस्ट मस्त आहे. "टिप टिप बरसा पानी. रवीना मोहरा सिनेमात" हे पाहिल्याचे आठवत नाही.

समजुतदारपणा दाखवल्याबद्दल पुन्हा खुप खुप आभार! >> आपल्या समजुतदारपणाच्या व्याख्या ध्यानात आल्याने सोपे गेले. पुन्हा एकदा आपले आभार.

अमा, "नया जमाना हेमा: रामा रामा गजब हुई गवा री" हे गाणं निसटलं. हे पाहायला हवं. तुम्हाला मी माझी देखील लिस्ट देतो
१. रिमझीम गिरे सावन (लता)
२.रिमझीम के तराने लेके आई बरसात
३. अबके सावनमें जी डरे
४. भीगी भीगी रातोंमे
५. दिल तेरा दिवाना है सनम
६. बरखा रानी जरा जमके बरसो

शेवटच्या गाण्यात शत्रुघ्न सिन्हा बरखारानीला ऑर्डर दिल्याच्या थाटात गाणे म्हणताना दिसतो. मजा येते पाहायला.

या निमित्ताने येथील रसिकांनी आपापल्या आवडत्या पावसाळी गाण्यांची लिस्ट येथे टाकावी. आणखी गाणी लक्षात येतील. Happy

लेख मस्तच जमलाय...
माझे हे अतिशय लाडके गाणे...

आणि राजेश खन्ना तर प्रचंड लाडका... उत्तरार्धात त्याने त्याचे जे हसे करून घेतले ते जाऊदे पण उमेदीच्या काळात पूर्ण देशातल्या मुलींना वेडे करायची त्याची कॅपसिटी होती, इतर तितकेच देखणे अभिनेते असतानाही, त्याला स्वतःला प्रचंड मर्यादा असतानाही..... त्याच्यानंतर असे वेड लावणारा कुणीही आला नाही, अमिताभची गोष्टच वेगळी.

त्याच्या डोळ्यात खूप जादू होती, तो हिरॉईनकडे प्रेमाने बघून निरागस हसला की बघणाऱ्या तरुणीला तो तिच्याचकडे प्रेमाने बघून हसतोय असे वाटायचे...

बाकी त्या काळाबद्दल बोलायचे व तेव्हाच्या उत्तान याभिनेत्रींबद्दल बोलायचे तर आपल्या आयुष्यात तो काळ येऊन गेलेला असणे आवश्यक आहे. आज जुने चित्रपट पाहताना कामुक, उत्तान दृश्ये बघताना तितके अवघडलेपण वाटत नाही जेवढे तेव्हा वाटायचे. त्या काळात मेन लीड हिरोईनी सूचक देहप्रदर्शन करायच्या, उघड देहप्रदर्शनाचे काम साईड हेरॉईन, vamps वगैरेवर सोडले होते. त्यातल्या काही जणी इतक्या उत्तान प्रदर्शन करायच्या की घरात चित्रपट पाहताना अस्वस्थ वाटायचे. आजची मुले बलात्काराचे दृष्यही शांतपणे पाहतील, मीही पाहीन कारण आता नजर मेलीय. जॉनी मेरा नाम मधले पद्मा खन्नाचे गाणे टीव्हीवर कधीही दिसले नाहीच पण जेव्हा मी इतरत्र पाहिले तेव्हा खूप किळस वाटली. हल्लीच परत पाहिले तेव्हा अजिबात वाटली नाही कारण आता तेच ते सर्वत्र पाहून नजर मेलीय. जयश्री टी, अरुणा इराणी, पदमा खन्ना या स्त्रिया खूप वेळा असह्य व्हायच्या. अर्थात त्यांचा त्यात काहीही दोष नव्हता, त्यांना करणे भाग होते.

अशा त्या जुन्या काळात हेलनने जास्तीत जास्त कॅब्रे केले असूनही ते sensual वाटले पण उत्तान, चीप वाटले नाहीत. तिची दृश्ये पाहताना कधीही अवघडलेपण वाटले नाही. झीनतबेबी sensual होती पण मेन लीडनेच खुलेआम देहप्रदर्शन करायची पद्धत मात्र तिनेच सुरू केली. तिच्याबाबतीत माझे मत लेखकापेक्षा थोडे वेगळे आहे Happy अर्थात या गाण्यात मात्र पाहावीशी वाटते हे नक्की...

वरच्या लिस्टित ओ घटा सावरी, थोडी थोडी बावरी ऍड करा. खूप गोड गाणे आहे.

कजरा लगाके, गजरा सजाके मध्ये राजेश मुमताज. दोघेही गोड दिसलेत. तिनेही गुलाबी साडी नेसलीय Happy

त्याच्या डोळ्यात खूप जादू होती, तो हिरॉईनकडे प्रेमाने बघून निरागस हसला की बघणाऱ्या तरुणीला तो तिच्याचकडे प्रेमाने बघून हसतोय असे वाटायचे...
अगदी खरं आहे साधना!

माझे दोन (ये रे, ये रे) पैसे:

प्यार हुआ, इकरार हुआ है - श्री ४२०

रिमझिम रिमझिम, रुनझून, रुनझून - १९४२, अ लव्ह स्टोरी.

प्यार हुआ, इकरार हुआ है - श्री ४२०
माझेही फेवरीट Happy
रिमझिम गिरे लता वाले जास्त आवडते, मस्त पाऊस दाखवलाय मुंबई चा. >>१००+
आणखी एक लिस्टमध्ये
राजेंद्रकुमारने बहुधा एकदाच किशोरचा आवाज वापरलाय. "तुमको भी तो ऐसा ही कुछ होता होगा ओ सजनी..."