मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती

Submitted by बेफ़िकीर on 9 June, 2018 - 05:48

गझल - मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती
========

इलाजासारखी कुठली, विकारासारखी होती
मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती

दिखाऊ मैफिलींची ती सफर लाथाडली आम्ही
जिथे भोई कवी होते, बघ्यांना पालखी होती

तिला सांभाळ आयुष्या, तुला टाळायची वेडी
सखी आहे तुझी आता, कधी माझी सखी होती

मनांना भेटण्यासाठी सुखे आक्रंदती माझी
जमाना संपला तो, ज्यातली दुःखे सुखी होती

प्रवासी माणसे होती सदा काळापुढे हतबल
स्वतःच्या सोबती होती, स्वतःला पारखी होती

तिचा मेसेजसुद्धा येत नाही रक्त काढाया
जिचा मिस्कॉलसुद्धा आमची कोंबडनखी होती

जगाने आणले ओढून ह्या स्वार्थी जगामध्ये
खरोखर 'बेफिकिर' व्हावे अशी नड आणखी होती

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिखाऊ मैफिलींची ती सफर लाथाडली आम्ही
जिथे भोई कवी होते, बघ्यांना पालखी होती>>>>>सुरेख!

जगाने आणले ओढून ह्या स्वार्थी जगामध्ये
खरोखर 'बेफिकिर' व्हावे अशी नड आणखी होती>>>>> मस्त!

लाजासारखी कुठली, विकारासारखी होती
मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती

दिखाऊ मैफिलींची ती सफर लाथाडली आम्ही
जिथे भोई कवी होते, बघ्यांना पालखी होती >> वाह! वाह!

तिचा मेसेजसुद्धा येत नाही रक्त काढाया
जिचा मिस्कॉलसुद्धा आमची कोंबडनखी होती >> हा शेर अज्जिबात समजला नाही. कृपया समजावून सांगावात.

बाकी शेर ठिक वाटले मला.

छान !

तिचा मेसेजसुद्धा येत नाही रक्त काढाया
जिचा मिस्कॉलसुद्धा आमची कोंबडनखी होती >> हा शेर अज्जिबात समजला नाही. कृपया समजावून सांगावात. ,>>>> +११११
मलाही, हा एक शेर सोडून बाकीची गझल आवडली ☺️