पालक, मॅग्गि आणि बर्रंच काही...

Submitted by Charudutt Ramti... on 4 June, 2018 - 13:43

परवा शाळेत पालक सभेस जाऊन आलो. ‘पालक सभेस’ हल्ली ‘पालक सभा’ म्हणत नाहीत. ‘पेरेंटल-ओरियेंटेशन मीटिंग’ असे म्हणतात. भाजी तीच, पुर्वी आमच्या वेळी होती ती…फक्त साहित्य आणि कृती वेगळी. पालक सभेस जायचं म्हणजे , क्लाएण्ट कडे प्रॉजेक्ट रिव्यू मीटिंग ला जातो तितके नाही पण तरी सुद्धा बर्या पैकी टेन्षन असतं. पुढं काय काय वाढून ठेवलंय ह्याचा नेमका अंदाजच येत नाही. कारण गेल्या पालक सभेत असेच टिचर नी सगळ्या पालकांच्या गळ्यात एक एक प्रोजेक्ट बांधले होते आपापल्या पाल्या कडून करून घ्यायचे म्हणून. शाळेतले प्रोजेक्ट म्हणजे वेळ, साहित्य आणि पैसा ह्या तिघांची मुबलक प्रमाणांत होणारी उधळपट्टी असं माझं परखड मत आहे, जे मी प्रांजळपणे शाळेपुढे व्यक्त करण्याचे अनेक असमर्थ प्रयत्न करून पाहिलेत. गेल्या मीटिंग नंतर एका महिन्याच्या आत ‘आर्याने’ प्रोजेक्ट वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण केला नाही म्हणून आम्हाला शाळेकडून समन्स आलं होतं. “रिसायकल्ड मटेरियल पासून युजफुल थिंग्ज” बनवायचा प्रोजेक्ट दिला होता. आर्या तेंव्हा सीनियर के. जी. मधे होती. “प्रोजेक्ट आर्याने करणं अपेक्षितच नव्हतं” हे प्रोजेक्ट टायटल वरुन कुणीही सहज ताडले असते. बाकींच्या पालकांना मिळालेल्या प्रोजेक्ट च्या मानाने आमचा सोप्पाच म्हणायचा. एका पालकांना इसविसन दोन हजार नंतर "नोबेल" पारितोषिके मिळालेले शास्त्रज्ञ शोधून त्यांचे फोटो एका कार्डबोर्डवर चिकटवून आणायचे होते. हा प्रोजेक्ट पूर्ण करताना एकदाही भांडण नाही झालं, आई बाबांच्या मध्ये, तर खरं म्हणजे शांततेचं नोबेल दोघांत विभागून त्यांनाच द्यायला हवं इतका त्यांचा हा प्रोजेक्ट किचकट होता. आमचा प्रोजेक्ट करतानाही अनंत अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागले. त्यातली सर्वात मुख्य अडचण म्हणजे, घरातलं बरचसं रीसायकल्ड मटेरियलचं हल्ली, वाळला कचरा आणि ओला कचरा असं वर्गीकरण होत पुढे त्यातील अर्धा कचरा वर्मिक्युलरच्या प्लँटमधे त्या गांडुळांच्या 'बफे' लंच ला जात असल्या मुळे रिसायकल मटेरियलचा घरात हल्ली जाम तूटवडा भासत होता. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही एक क्लुप्ति केली. डि-मार्ट मधून बरेचसे व्हर्जिन मटेरियल, ‘रिसायकल्डच असते सगळे प्लास्टिक हल्ली’ ह्या नावाखाली गोळा करून आम्ही चक्क क्रेडिट कार्ड वर विकतच आणले. पण कसे काय कोण जाणे, हे प्रोजेक्टचे मटेरियल आम्ही मॉल मधून विकत आणले आहे आणि हा रिसायकल्ड मटेरियल चा नव्हे तर ‘स्मगल्ड गूड्स वापरुन’ केल्या सारखा प्रोजेक्ट वाटतोय अशी शंका आमच्या मुलीच्या आर्ट अँड क्रॅफ्ट च्या टिचरना बरोब्बर आली. आर्यानंच ही फितुरी केली असण्याची शक्यता ही पूर्ण पणे नाकारता येणार नाही. वर आम्ही प्रोजेक्ट पूर्ण करण्यात तीन दिवस उशीर केला होता. त्यात प्रोजेक्ट मधे एकही रीसायककल्ड वस्तू वापरली नसल्यामुळे आम्हाला एकंदरीत चांगलंच फैलावर घेतलं टिचरनं.

" हाउ विल युवर किड अंडरस्टॅंड इंपॉर्टेन्स ऑफ एनव्हायरॉनमेंट , इफ यू पेरेंट्स युवरसेल्फ इंडल्ज इंटू सच इर्र्रिसपॉन्सिबल बिहेवियर ?"
त्या एनव्हायरॉनमेंट वाल्या टिचरनी ‘वातावरण’ एकदम टाइटच करून टाकलं होतं. तब्बल अर्धा तास क्लास घेतला त्या दिवशी आमच्या दोघांचा टिचरनी.

तिकडे टिचर ने आम्हा पालकांचा क्लास घेतल्यावर, घरी आल्या वर हिने माझी ट्युशन घेतली.
"तुझं ना घरात आजिब्बात म्हणजे आजिब्बात लक्ष नाहीए हां....पहातिये मी..! " एकदा का आरोपी वरचा गुन्हा सिद्ध झाला की मग बायका विंचवाला ठेचावा ना तश्या , पुरुषाला ठेचतात. खरं म्हणजे ह्या गुन्ह्यात माझी बायको ही सहआरोपी होती, कारण डी मार्ट ची मूळ संकल्पना माझी जरी असली तरी त्या गुन्ह्यात तिचा ही सहभाग होताच, कारण शॉपिंग सगळे तिनचं केलं होत. पण "मेरा वचन ही मेरा शासन है" हे वाक्य मी आमच्या 'टू बी. एच. के.' माहीशमती मधे गेले कित्येक वर्षे अनुभवतोय.

“ त्यात माझा काय दोष? ” - केस चं हियरींग सुरू होण्या आधीच माझा डिफेन्स संपलेला असतो.

“दोष तुझा नाही...माझा आहे...मीच तूला ओव्हरएस्टिमेट केलं इतकी वर्षं.” - विषय बंद.

आमच्या घरातल्या पुरूष प्रधान संस्कृतीच्या शेवटाची ती सुरूवात असते. ( बिगीन्निंग ऑफ द एण्ड ऑफ अन् एज ओल्ड मेडिव्हल मेल डॉमिनेंट ओर्थोडॉक्स मेनटॅलिटी. )
ह्या गुन्ह्याबद्दल मला घरात "रिसायकल्ड" जेवण आणि “रिमेक” केलेलाच फक्त ब्रेकस्फास्ट मिळेल गिळायला इथून पुढे दोन दिवस, अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

पूर्वीच्या ह्या पदरी असलेल्या पालक सभेच्या अश्या एकंदर कडू गोड अनुभवा नंतर आज भितभीतच मीटिंगला गेलो. मला जरा कौटुंबिक जवाबदा-यांची जाणीव व्हावी म्हणून हिने ह्या वेळी - " ‘तू’च पेरेण्ट मीटिंग अटेंड करायची...मी येणार नाही. आणि लिहून आण डायरीत सगळे पॉइण्ट्स न चुकता ” – अशी तंबीवजा पूर्वसुचनाच देऊन मला शाळेत पाठवलं. पालकांनी विद्यार्थ्यांकडून पुढील वर्षात काय काय तयारी करून घ्यायची हे मुकाट पणे ऐकून घ्यायचं अशी मनाची तयारी करूनच मी सभेला गेलो.

आल्या आल्या टिचर नि सगळ्या पालकांची प्रेझेन्टी घेतली. पाल्याच्या रोल नंबर वरुन पालकांनी ‘प्रेझेण्ट’ म्हणायचं. अटेंडन्स अपेक्षे पेक्षा जरा कमी असावा. कारण टिचर ने ओन्ली ट्ववेंटी सेवन आउट ऑफ फॉर्टी...असं नाराजीच्या सुरात म्हणत फाईल बंद केली.

टिचरनी सुरुवात केली ती शाळा अवलंब करत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धती विषयी सांगत. एकंदर आर्या ची क्लास टिचर, कविता चौधरी नावाची पुर्वी एक रिन किंवा सर्फ ची कुठली तरी एक एडव्हर्टाइजमेंट करायची ती 'उडान' वाली मॉडेल - तशी एकदम कडक स्वच्छ धुतलेली शुभ्र पर्सनालिटी होती त्यांची. सभेत सुरुवातिपासूनच चांगली पकड घेतली ह्या कविता चौधरी नं.
“प्रायमरी किड्स आर टॉट इन मेनी वेज, बट ईव्हॅल्यूएटेड इन ओन्ली टू वेज वर्ल्ड ओव्हर. दोज आर फॉर्मॅटीव अँड समेटीव.” बाई आज फॉर्म मधे आल्या सारख्या सुरेल आवाजात बोलत होत्या... त्यामुळे सभेत आजिबात वेळ वाया घालवू न देता डायरेक्ट फॉर्मॅटीव समेटीव अश्या क्लिष्ट विषया मध्ये हात घालत टिचर झरदिशी समेवर आल्या. विषय क्लिष्ट आहे म्हणताना सभेतली ऑडियन्स मधली कुजबुज जरा थांबली आणि वर्गात एकदम शांतता पसरली.

“समेटीव ईव्हॅल्यूएशन इज डन एट दि एण्ड ऑफ द टर्म विच इज अ कन्वेन्षनल मेथड यू अँड आय हॅव सीद, व्हेअर दि प्रॉपद् ,एग्झाम्स् आर कंडक्टेड. फॉर्मॅटीव मीन्स वुई इवॅल्यूयेट किड्स ड्यूरिंग दि ‘टर्म’ इटसेल्फ. इन शॉर्ट - वुई डोण्ट कंडक्ट - एनी टाइप ऑफ एग्झाम्स् - फॉर स्टूडेंट्स ऑफ फर्स्ट स्टॅंडर्ड ! ” - टिचर चा पहिलाच ‘आयटम’ बॉम्ब. माझ्या पोटात गोळा. कारण एगझॅम्स नाही म्हणजे, प्रॉजेक्ट वर भर. म्हणजे माझं पुन्हा मरण. माझ्यातला विंचू पुन्हा एकदा ठेचला जाणार.

" इफ यू डोण्ट कंडक्ट एकझाम्स देन हाउ डू यू रॅंक स्टूडंटस ? " – एवढ्यात चीडीचुप्प बसलेल्या ऑडियन्स मधल्या एका धाडशी मातेनं, ‘हिरकणी नं कोजागिरीला ज्या शिताफी नं बुरूज उतरला असेल, तशी शिताफी दाखवत’ पहिला प्रश्न केला. तिला बहुधा माझ्या सारखीच पुढे येऊ घातलेल्या संकटाची आगामी चाहूल लागली असावी.

“ पार्क युवर क्वेस्चन. यु विल गेट चान्स टू आस्क.” - टिचर नं तोंडाची इस्तरी ही ‘न’ मोडू देता त्यांच्या दिशेने ‘फाड’कन इंग्रजीत फेकल्या गेलेल्या प्रश्नाला तितक्याच अस्खलित इंग्रजीत ‘ताड’ कन उत्तर दिलं. आपण 'कितीही मराठी' 'बाणा मराठी' करत टाहो फोडला तरी मराठी मधील ‘संवादात’ ही इंग्रजी ची जरब मुळीच नसते (असं स्वत: पु. लं. नी लिहून ठेवलंय.) पुर्वी टी. व्ही. वर रामायणात कसे एकमेकांचा बाण शत्रूपर्यंत पोचण्या आधीच आकाशातुन परत शत्रुकडे उलटवले जायचे, तसा आपला प्रश्न टिचर पर्यंत पोचायच्या आतच हवेत घायाळ होऊन पडला असं समजतांच हिरकणी जरा हिरमुसली...पण तीने चेहृयावर नाराजीचे सूर आजिबात न उमटवू देता.... सभेस आलेल्या दहा बारा बाबांपैकी निदान दोन तीन 'बाबांनी' तरी , आपण पॉलिश्ड अश्या इंग्रजीत प्रश्न विचारत असताना आपल्या कडे वळून पहिलं आणि मनातल्या मनात का होईना आपल्या धाडशी पणाची (आणि त्याच बरोबर मुख्यत्वे आपल्या सौंदर्याची) मनोमन तारीफ केली असेल अशी समजूत घालतघेऊन सपशेल माघार घेतली. शी एक्सेप्टेड टू लूज़ द बॅटल, जस्ट बिकॉज़ शी न्यू, शी वन द वॉर! कारण तीनही बाबा त्या हिरकणी वर इंप्रेस झालेले आहेत, हे भाव ‘बाबालोक’ आपल्या चेहेर्यावर अजिबात लपवू शकले नाहीत. शेवटी तीनही बाबांच्या आईंनी मध्यस्ति करत...आपापल्या बाब्बांच्या बरगडीत कोपराचा अणूकुचीदार असा सांधा घुसवून छोट्या आतडी मध्ये चांगले दोन तीन वार केले, तेंव्हा कुठे भान हरपून हिरकणी कडे लागलेलं ध्यान काढून मग परत समोर सुरू असलेल्या आपल्या शंभू राजेंच्य च्या भविष्या विषयी सुरू असलेल्या बखरीत लक्ष द्यायला खविंदांनी सुरूवात केली. पण त्यात त्या बिचार्या बापुडवाण्या बाबांची काही चूक नसते . पहिली दुसरितल्या मुला मुलींच्या आया असतात तशा छान. बरेचसे बाबा ‘ड्यूयेल पर्पज’ ने पालक सभेला येतात अशी शंका ‘ही’ खाजगी मध्ये कित्येक जणींनी व्यक्त सुद्धा केलीय , इतक्या छान दिसतात ह्या आया. ( असो फार विषयांतर बरे नव्हे... आजचा विषय तसा गंभीर आहे! ) इकडे मुख्य कथानकाच्या अनुषंगाने हे उपकथानक घडत असताना - तिकडे समोर कविता चौधरींनी पहिलीत असणा-या विषयांचे निवेदनही सुरू केले होते.

पण खरं सांगू का? मला ही असले (त्या हिरकणी ला पडला) तसे प्रश्न खूप पडतात...पण उठून विचारण्याचे धाडस गोळा होत नाही. आम्ही परीक्षा घेत नाही हे ऐकल्यावर मला खरं म्हणजे दुसरा कळीचा प्रश्न पडला..."तुम्ही जर परिक्षाच घेत नाही, तर मग एच. डि. एफ. सी. बॅंकेतून डि. डि. च्या स्वरुपात आमच्या कडून परीक्षा फी च्या नावाखाली जे पैसे उकळता त्या ‘फी’तून टिचर लोकांना वर्ष भर पुरेल एवढ मेक-अप चं साहित्य आणता काय?” असा मला खोचक प्रश्न पडला. पण तो त्या पालक सभेत उद्घ्रुत करण संयुक्तिक नसतं झालं. कारण समोर उभ्या त्या तितक्याच भोचक टिचर ने माझ्यातल्या पालकाचं सूप करून चार चौघात घटाघटा पिलं असतं...लक्ष्मणांन शूर्पणखेचं रक्त प्याव तसं, आणि सर्व उपस्थित आयांनी हा नाट्यमय प्रसंग अगदी रोचक पणे पहिला असता टी वरची मालिका पाहावी तसा. त्यातही चुकुन मी माझं श्रीमुख उघडलं असतंच न राहवून त्या बाईंच्या पुढयात, तर मात्र घरी - "काsय? , कुsठे काsय बोलतात काही भाsन बीन असतं का तुला ?" ह्या वाक्यानिशी सीन सुरू होऊन, "तुझी ही आचरट विनोद बुद्धी आहे ना ती तुला चांगलीच भोवणार आहे एक दिवस... आणि मलाही ….नशीब माझं - दुसरं काय...?" ह्या डायलॉगनेच मग तीस मिनिटांचा आमचा लघुपट संपला असता. गंमत म्हणजे ह्या लघुपटात माझ्यासाठी एकही संवाद नसतो. कमल हसन ने पुष्पक सिनेमात घेतले तसे फक्त मूकाभिनयाचे पारितोषिक घ्यायला शेवटी स्मित हास्य करत स्टेजवर जायचे…!

निम्मी सभा संपत आली तरी आपला कडक लक्ष्मी गेट अप उतरवायला तयार नसलेल्या कविता चौधरी टिचरनी वर्ष भरात काय काय सिलॅबस शिकवणार आहे ते सांगायला सुरूवात केली. मुख्य विषय तीन. गणित, इंग्रजी आणि एनव्हायरॉनमेंटल सायन्स. त्यातील एनव्हायरॉनमेंटल सायन्सचा सिलॅबस म्हणजे डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात काही वर्षांपूर्वी जी जागतिक पर्यावरण विषयक गोलमेज सारखी एक परिषंद भरली होती त्या परिषदेचा जाहीर नामाच वाटत होता. गणिताचा सिलॅबस माझ्या मुलीला सोडा मलातरी नीट झेपेल काय असं मला वाटू लागलं. माझं स्वत:च गणित अत्यंत कच्चं असल्यामुळे असेल कदाचित, बारावी ऐवजी आत्ता "पहिली पासूनच गणित सोडून ‘बायो’ घेता येईल का 'बये' लेकीला माझ्या गणिता ऐवजी?" अशी चौकशी टिचरकडे करावी काय असे विचार मनात येऊ लागले. आमच्या वेळी हे सिलॅबस वगरे प्रकरण नव्हतं. पोर्षन असायचा छोटासा. आणि तोही बराचसा ऑप्षन ला टाकायचा पर्याय आम्हाला उपलब्ध होता. हल्ली पोर्षन फक्त हॉटेल मधे गेल्या वर रोटीचा उपलब्ध असतो. तन्दुरी रोटी विथ बटर... टू पोर्षन अशी ऑर्डर हल्ली वेटरला लोक देतात. बापरे काय डीवॅल्यूयेशन झालाय आमच्या वेळच्या शिक्षणाचं! एनव्हायरॉनमेंटल सायन्स झालं , गणित झालं. इंग्लीश तर अपरिहार्यच आहे. त्यामुळे त्या विषयी तक्रार करण्याची सोयचं नव्हती. ते मागून घेतलेलं दुखण होतं. आमचं इंग्रजी चांगलं नसल्यामुळं आम्ही मागे पडलो...त्यामुळे आपल्या मुलांचं इंग्रजी पक्कं पाहिजे अश्या पोटतिडिके पोटी तर ही शाळा निवडली. गंमत म्हणजे आर्याला पहिली पासून मराठी हा विषय आहे, हे आज च प्रथम कळले. पण ह्या टिचर स्वत:च, उत्तर हिंदुस्तानी प्रांतातून स्थलांतरित होऊन नुकत्याच म्हणजे फक्त गेले दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आल्या होत्या. त्या कँटॉंमेंट च्या पुढे साळुंके विहार येथे रहाण्यास आहेत असं कुणी तरी शोधून काढलं होतं. मीटिंग च्या सुरुवातीलाच कुणाशी तरी त्या बोलत होत्या तेंव्हा मराठीचा खून होत असताना मी स्वत: ऐकलं. "मी सालुनकि विआर मधून रोज उबेर अगर ओला करून स्कूल ला पाहुंच्याते." असा त्यांचा एकंदर मराठी अक्सेण्ट् होता. थोडक्यात टिचरचं मराठी पाहून आर्याचं मराठी सुधारण्या पेक्षा, जेव्हढ आहे तेवढ टिकलं आणि अधिक बिघडू न दिलं बाईंनी , तरी शाळेला दिलेले पैसे वसूल झाले असा हिशेब मी केला.

टिचरनि पंचेचाळीस मिनिटं एक-रकमी स्वत: चं बोलून झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास ओपन केला. नुकताच घडलेला हिरकणी वर अपमानाचा गुदरलेल प्रसंग आठवून कुणी प्रश्न विचारायला धजेच ना. तरी सुद्धा , दोन मिनिट शांतते नंतर मग एक दोन धाडशी पालक उठून प्रश्न विचारायला लागले.

प्रश्न अगदी मूलभूत होते. “मुलांना मोबाइलच्या प्रलोभना पासून कसे दूर ठेवावे ?”. हा प्रश्न विचारल्या विचारल्या तिकडे बॅक बेंचर्स पालक , जे इथवर मीटिंग मधे आपल्या मोबाइल वर चॅटिंग किंवा गेम्स खेळण्यात गुंग होते त्यांनी ‘चॅट’दिशी आपले मोबाइल खिशात सरकवले आणि माना हलवत आपणही मीटिंग मधे सहभागी आहोत असा अभिनय करण्यास सुरूवात केली. एकंदरीत 'मुलांना मोबाइलच्या आकर्षणा पासून कसे दूर ठेवावे?' ह्या प्रश्नाचे उत्तर देताना टिचर ची तारांबळ उडाली...गेल्या तासा दीड तासात पहिल्यांदाच टिचर अडचणीत आल्याची लक्षणं दिसत होती. तेव्हडयात त्यांच्याच पर्स मधला मोबाइल वाजला. आणि मग मॅडमच खजील झाल्या. सभेच्या सुरुवातीस “कीप युवर फोन ओन् साइलेंट मोड विदाउट फेल” अशी धमकी वजा सूचना करून सगळ्या पालकांना ते ही आपले विद्यार्थिच आहेत अश्या पद्धतीची आत्तापर्यंत वर्तणूक देत असलेल्या टिचर ‘स्वत:च’ त्यांचा मोबाईल सायॅलेंट करायला विसरल्या होत्या. त्यांच्याच मोबाईल ची रिंग बरोब्बर नको त्या वेळी वाजली तशी गेले तास दीड तास अव्याहत पणे, जणू काही शाळे ने ‘व्हायबरेट’ मोड वर टाकल्या असाव्यात तश्या थयथयाट करत वागणा-या मॅडम स्वत: च अचानक सायलेंट मोड वर टाकल्या सारख्या झाल्या.

दुसरा प्रश्न एका पालकांनी विचारला जंक फुड बद्दल. खरं म्हणजे आमच्या पिढीत कुणालांच जंक फुड विषयी काही बोलायचा नैतिक अधिकार अजिबात उपलब्ध नाही. कारण आमची अक्खि पिढीच्या पिढी स्वत: मॅग्गि नावाच्या 'भिकार' पण तितक्याच चविष्ट अशा जंक्कांना वर वाढलेली आहे. आई बापा कडे जोरदार हट्ट करत आणि असह्य असं रडत ‘मॅग्गि’तली की ‘मॅग्गि’ नक्की मिळते आणि पोराने एकदा का पाच रुपयाची गिळगिळित अशी मॅग्गि गिळली की बापाला पोरगं किमान तीन तास तरी रविवारचं उन्हाळ्याचं दुपारी पंख्याखाली घोरत पडू देतं असा प्रमेय आमच्या वेळी घरो घरी सिद्ध झाला होता. त्या वेळी आमची आक्खी पिढी त्या शरबती की खपली बिपली गव्हा पासून बनवलेल्या हातसडी च्या शेवयांऐवजी मैदा आणि (आम्हाला त्या वेळी अज्ञात असलेलं मोनो सोडियम ग्लुटामेट नावाचं विशद्रव्य) टेस्टमेकर च्या चंदेरी पूडीतून मुक्त पणे दोन कप पाण्यात मिसळला, तो दोनचं मिनिटांत तयार होणारा प्रसाद अगदी सात्विक अन्न समजून ग्रहण असे. त्या आमच्या कुपोषित पिढीलाच आता आमच्या पुढच्या पिढीला जंकफुड पासून कसं दूर ठेवायचं हा प्रश्न पडलाय. पण खरं सगायचं तर...रविवार ची ती शांत दुपार, ते पंख्याखालचं ते रडक्या पोरा कडून विकत घेतलेलं घोरणं आणि ते तीन तासांचे प्रमेय आजही जस्सेच्या तस्से लागू आहेत. मॅग्गिची जागा मात्र फक्त ‘मॅक्डी’नि घेतलीय… एवढाच काय तो गेल्या तिस पस्तीस वर्षात घडलेला बदल!

त्या जंक फुड च्या प्रश्ना लाही एकंदर समाधान कारक उत्तर देता आलं नाही कविता चौधरींना.

मग कुणीतरी स्कूल बस च्या लेट येण्याचा विषय काढला. ते आठवून मग दुस-या एका पालकांनी दुस-या शाळेच्या स्कूल बसेस जी. पी. एस. , एनेबल्ड आहेत. त्यामुळे त्या शाळेतल्या पालकांना ऑफीसमधे बसून मोबाइल वर बस सध्या कोणत्या रूट वर आहे ते समजते....तुम्ही तुमच्या शाळेच्या बसेस कधी जी. पी. एस. एनेबल्ड करणार ? अशी चौकशी केली.

तो प्रश्न संपतो न संपतो तोच दुसरे कुणी तरी स्कूल मधे गेल्या वेळी गॅदरिंग ची सी. डि. उपलब्ध करून देतो असे सांगूनही ती शेवट पर्यंत ती मिळालीच नाही अशी तक्रार केली.

एकंदरीतच एका मागून एक अशी पालकांवरील होणार्‍या अन्यायाला वाचा फुटत गेली.

प्रश्नोत्तराचा तास, फारच अंगलट येतोय असं वाटल्यावर टिचरनी तो जरा मग आवरताच घेतला. “ प्लिज ई मेल ऑल युवर क्वेस्चन्स...वी आर रन्निंग आउट ऑफ टाइम नाउ.”

“टिचर वुई हॅव रिटन मेल्स प्रिवीयसली ऑल्सो...बट वुई हेवेंट रेसीव्हड एन्नी काइंड ओफ फीडबॅक इन पास्ट”

टिचर नी 'ही' कॉमेंट ही ऐकल्या न ऐकल्या सारखी करत आपल्या साईडनी वर्ग सुटल्याची एकतर्फी बेल वाजवली. टिचर “ओके , मीटिंग इस कॉल्ड ऑफ नावू…बाय सी यु इन नेक्स्ट मीटिंग, थॅंक यू फॉर युवर टाइम” असे म्हणत शेवटचे खोटे खोटे लाडीक हसत वर्गा बाहेर निघून गेल्या.

चांगला रंगत आलेला दोन अंकी नाटकाचा प्रयोग असा मध्यंतरातच अर्धवट बंद केल्यामुळे काही आया जाम चिडल्या सारख्या वाटत होत्या.

"काय हे...काहीच संगितल नाही...टिचर नि ह्या मीटिंग मधे - यूनिफॉर्म, गॅदरिंग, बस टायमिंग, डब्यात काय द्यायचं काय नाही...सुट्या...सगळे पॉइण्ट्स तसेच राहीले बोलायचे" - मॅग्गि या अन्ना मधे असलेल्या जीवन सत्वांच्यावर बुद्धीची जेवढी वाढ होऊ शकते त्या वर वाढलेली सर्व बुद्धी वापरत एक आई आपल्या चिरंजीवांच्या अक्ख्या वर्षातील सर्व शालेय गरजांची यादी घोकत त्राग्याने बोलली.

“ हो हो ...मी टाकणार आहे व्हॉटसअप ग्रूप वर हे आज च्या मीटिंग चं...परत घ्या म्हणावं मीटिंग.” - झोटिंग आवेषात दुसरी आई. परत मीटिंग पाहिजे म्हणत मोबाइल वर किती प्रीपेड बॅलेन्स शिल्लक आहे ते पाहत...शिल्लक असेल डेटा, तर लगेच वॉटसॅप ग्रूप वर बोंबाबोंब करायची असा मनसुबा तिने स्वत:शी मांडला असावा. पण पुढच्याच मिनिटात बहुदा डेटा शिल्लक नसावा म्हणून तिने मोबाइल तसाच परत पर्स मधे सरकऊन दिला. दोन मिनिटं शाळेच्या वायफाय ला 'कनेक्ट' होतय काय असा प्रयत्न ही तिने करून पहिला पण तो अयशस्वी ठरला असावा. कारण मी आता लेखी तक्रारच करते असा धोरणात्मक बदल तिने अचानक स्वीकारला. त्याला अजुन दोन तीन मातांनी अनूमोदन दिलं.

उपस्थित 'बाबा' आपापल्या पाल्या चे बोट धरून अजूनही आजुबाजूच्या 'आयांना' निरखण्यातच व्यग्र होते.

"बाबा...चल नं घरी...का थांबलोय अपप्ण ?" - एक कार्ट बाबाचा टी शर्ट ओढत बोललं. इंग्रजी माध्यमात शिकणारी मध्यमवर्गातली मुलं टिचर समोर असल्या की आपल्या आई बापाशी येईल तेव्हढ तोडक मोडकं पण न चुकता इंग्लीश मध्येच बोलतात. टिचर ची पाठ फिरली रे फिरली की लगेच ही कार्टी आपापल्या मातृभाषेकडे वळतात.

"हो हो चल हा पिल्लू निघू आपण... " ऑफीसची वेळ टळून गेल्या मुळे आता सिकलीव टाकावी आणि दुपारी मस्त ताणून द्यावी असे खट्याळ विचार येत होते बाबाच्या मनात.

“ बाबा मला भूक लागली” - कार्ट !

"हो आई न बिस्किटं दिलित बॉक्स मध्ये, देऊ का तुला खायला" - बाबा !

“नको मला बिस्कीत...मॅकडि मध्ये जाउ या क्का अपप्ण ?” - पुन्हा पंखा...पुन्हा दुपार...आणि पुन्हा प्रमेय सिद्धता. एक बाबा सटकले रंगमंचा वरुन. पहिले सटकले हे बघून दुसर्या दोघा तिघांनी ही ताबडतोब पळ काढला.

तिकडे आया लेखी तक्रार करण्यासाठी कागद पेन वगरे शोधून दमल्या. ह्या रि-सायकल आणि रि-युज वाल्या शाळेत साधे आखीव ताव ही मिळेनात ह्यांना. मग एकीने “ ए अगं ऐक ना, मला नं ऑफीसला जायचय...तू एक काम कर नं ...शाळेच्या ग्रूपवर कंप्लेंट चा ड्राफ्ट पाठव ना...मग मी प्रिंट मारते ऑफीस मधून, घरी येताना येते घेऊन...मला आता उशीर झाला...जायला हवं आज ऑडिट आहे ऑफीस मध्ये नेमकं”- असं म्हणंत काढता पाय घेतला.

पाहता पाहता...निम्मा वर्ग रिकामा झाला. मीही ‘क्राइमसीन’ वरुन पळ काढला. घरी परत जाताना उगाचचं काही प्रश्न पडले. काहीही कारण नसताना डोक्यात प्रश्न चिन्हं निर्माण झाली.

प्रश्न क्र. एक. - ‘पालकांनी मीटिंग स्वत: एटेंड करण्या ऐवजी, " आम्ही तुमची पालक मीटिंग एटेंड करू - वेळ आमचा पाल्य तुमचा" अशी टॅग लाईन असणारी कोणती आउट-सोरसिंग एजेन्सी उपलब्ध आहे का ? असल्यास कोठे? नसल्यास...ती एक बिजनेस ऑपर्चुनिटी होऊ शकत नाही काय?

प्रश्न क्र. दोन - 'पहिली'ला समेटीव एग्झामच नसल्यामुळे सर्वच मुले पुढील इयत्तेत ( म्हणजे दुसरित ) जाणार . कुणी नापास होणे नाही. तसे असल्यामुळे परफॉरमन्स अप्रेझल म्हणून दर तीन महिन्यातुन एक पालक सभा घेणे हा त्या टिचर चा एकमेव के.आर.ए / के.पी.आय. असेल काय? तसे असल्यास टिचरचा बोनस प्लान आणि एन्यूयल इनक्रिमेंट त्याच्याशी लिंक असेल काय?

प्रश्न क्र. तीन - पालकसभेला किती टक्के पालकांची उपस्थिती होती ह्याला किती वेटेज दिलं असेल अप्रेझल मध्ये ? ती उपस्थिती वाढविण्या करिता शाळेने जर पालक बोलावल्यावर सभेस आले तर व्हेज बर्गर जरी नाही पण एट लिस्ट वडा-पाव तरी ( फूल नाही, पण फुलाची पाकळी तरी च्या धर्ति वर ) ठेवला तर...पालकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ होईल काय ?

असे अनेक प्रश्न मी स्वत:ला विचारत राहिलो शाळेतून निघतां निघतां. आणि शेवटी निरूत्तर होऊन मग घरी पोचलो. मला इकडे मीटिंगला पाठवून बायको स्वत: शॉपिंग-बिप्पिंगला गेली असावी तुळशी बागेत बहुतेक. माझ्या डोक्याची मात्र पार मंडई झालेली. साडे अकरा बारा वाजून गेल्या वर आता इथून पुढे ऑफीसला जाण्यात काही मतलब नव्हता. 'वर्क फ्रॉम होम' करावं असां विचार केला. न सांगता घेतलेल्या सुट्टीला 'वर्क फ्रॉम होम' असं म्हणण्याची पद्धत ज्याने रूढ केली...त्याचा मी आयुष्य भर ऋणी राहीन. नंतर हळूच ग्रूप वर कुणी कंप्लेंट लेटर चा ड्राफ्ट वगैरे काही टाकलांय काय? हे चेक करावं म्हणून ऑनलाइन आलो. तर ग्रूप वर राहुल गांधी, मोदी, कर्नाटक मध्ये कुमार स्वामींचे सरकार आणि इतर राजकीय पोस्ट काही 'बाबा'लोकांनी टाकल्या होत्या. एक दोन आयांनी कुठल्या तरी रेसिपीज आणि पावसाळी सॅंडल्सचे डिझाइन्स असलेल्या पोस्ट टाकल्या होत्या. मी शांत पणे मोबाइल ठेऊन दिला. हे दोन अंकी नाटक सुरू झालं तेव्हा सकाळी साडे आठ नउ झाले होते. नाटकाचा प्रयोग संपला तेव्हा घरी यायला बारा पावणेबारा वाजले. जाम भूक लागली होती. किचनच्या कट्यावर पाहिलं. काहीच शिल्लक नव्हतं. अगदी रि-युज रि-सायकल कॅटॅगरीचे सुद्धा काहीच शिल्लक नव्हते. अधाशी पणे इकडे तिकडे शोधाशोध केली. एवढयांत मॅग्गिचं पिवळं पाकीट रॅक वर दिसलं. कात्रीनं टराटरा रॅपर फाडलं. टेस्ट मेकर ची पुडी उकळत्या पाण्यात रिकामी केली. दोनच मिनिटांत मस्त मॅग्गि शीजली. डिश मधे न घेता गरम भांड्यात चमचा बुडवून तशीच भुकेजल्या पोटी दीड मिनिटांत आक्खी मॅग्गि संपवली. पंखा लावला आणि पंख्या खाली सहज म्हणून जमिनीला पाठ टेकवून पडलो. जो काही मस्त डोळा लागला, तो डायरेक्ट अडीच तीन तासां नंतरच जाग आली.... मॅग्गिचा प्रमेय पुन्हा सिद्ध झाला होता...पंचवीस वर्षांनतर ही जस्सा च्या तस्सा !

चारूदत्त रामतीर्थकर,
४ जून २०१८ , पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख एकदम खुसखुशीत, आणि हळूच अंतर्मुख करायला लावणारा मात्र आहे ! आवडला. पुलेशु.

मजा आली वाचताना. पण जरा अजून मुद्रितशोधन करुन टाकता आला तर अधिक वाचन-सुलभ होईल असे वाटते.>> +१ जसे.. इंग्रजी वाक्ये English मधेच लिहिली तर वाचायला जास्त सोपं पडेल.

भारी लिवलय.
आमच्या शाळेत घाला पोराला.. ४ थी पर्यंत होमवर्क नाही, प्रोजेक्ट शाळेतच. Happy
पण पालकांचा सहभाग जास्त अपेक्षित आहे - जमेल तसा.

फार भयंकर धमाल लिहिलंय!! मॅगी वर वाढलेली पिढी, व्हॉटसप वर तक्रार करणार असलेल्या आया,इंग्लिश सुंदर हिरकणी सगळ्याला अगदी अगदी झालं ☺️☺️☺️

मनसोक्त अभीप्रायांबद्दल धन्यवाद.

शुद्ध लेखनातील चुकांबद्दल दीलगिरी. आता शक्यतो सर्व चुकांची दुरुस्ती करून 'धागा' पुन्हा प्रसारित केला आहे. अजुनही काही त्रुटी आढळल्यास आणि त्या निदर्शनात आणून दिल्यात तर त्या ही दुरुस्त करता येतील.

अभिप्रायांबदद्ल पुन्हा एकदा धन्यवाद !

इंग्रजी वाक्ये English मधेच लिहिली तर वाचायला जास्त सोपं पडेल. >> +१

वाचणे अवघड झाल्याने अर्ध्यातच सोडून दिले Sad