मी एक राधा

Submitted by समृदधी on 2 June, 2018 - 08:05

मी एक राधा

त्या नटखट कृष्णाचा नटखटपणा
मनापासून जपणारी
त्याच्या डोळ्यांतल्या स्वप्नांमध्ये
त्याच्या इच्छा आकांक्षा …त्याची सर्व स्वप्ने
पूर्ण होण्याची प्रार्थना करणारी मी एक राधा ….
त्याच्या आभाळाला गवसणी घालण्याच्या ध्येयामध्ये
त्याच्या सफलतेची मनोकामना करणारी मी एक राधा….

कधी आई म्हणून कधी बहिण म्हणून
कधी मुलगी म्हणून कधी मैत्रीण म्हणून
तर कधी फक्त अनामिका म्हणून
त्याच्या भोवती सतत रुंजी घालणारी मी एक राधा
मी एक राधा….. त्याचा अवखळ पणा जपतानाच
त्याच्या चुका वेळीच दाखवून त्याची कानउघाडणी करणारी

कारण नसताना लुटुपुटीच भांडण करणारी….
रुसणारी मग तोही रागावला कि त्याची लाडीकपणे
मनधरणी करणारी मी एक राधा…..
त्याला सदैव योग्य मार्ग दाखविणारी
त्याने निवडलेल्या मार्गावर ठाम राहून
आयुष्य सकारात्मकतेने घेण्याचा सल्ला देणारी मी एक राधा…..

स्वतः कोसळून पडली तरतरी त्याच्या पाठीशी
ठामपणे उभी राहून भरभक्कम आधार देणारी
त्याच्या ओघळणाऱ्या अश्रुंमधून
त्याची दुःखही ओघळून निघून जाऊदे हि आस ठेवणारी मी एक राधा…..

देवाच्या गाभाऱ्यात अखंड मंद तेवणाऱ्या
नंदादीपासारखी मी एक राधा……
त्याच्या आयुष्यात नसूनसुद्धा
त्याच कृष्णपण मनापासून जपणारी मी एक खरीखुरी कृष्णराधा…….

- समृद्धी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults