परोमा: भूमिकांच्या पलीकडे जाउन स्त्रीत्वाचा शोध

Submitted by अश्विनीमामी on 1 June, 2018 - 03:13

चित्रपट सुरू होतो तोच पुजोबाडीच्या उत्साहित करणार्‍या, प्रफुल्लित वातावरणात, तयारी चालली आहे . लगबग, गडबड संगीत... सुस्नात, सिंदूर लावलेल्या लाल काठाच्या साड्या नेसलेल्या वंगललना कामात मग्न आहेत. मुले धडपडत आहेत. बाप्ये गप्पा मारत बसले आहेत. ह्याचे एक केंद्र आहे ती मूर्ती आणि दुसरे आहे काकीमा/ बौदी परमा चौधरी, धाकटी सून. म्हणजे आपली राखी - इतके सोज्वळ खानदानी सौंदर्य, त्यातही फारशी जाणीव न ठेवलेले. घरकामात, पूजेच्या तयारीत मग्न.

ह्या घरगुती माहौल मध्ये आलेला एक सर्वस्वी परका - राहुल - फोटोग्राफर ,तिच्या सौंदर्याने मोहित होतो व एक फोटो फीचर करायची रीतसर परवानगी घेतो. परमा प्रथम बावचळते.पण मग हो म्हणते.घरात नवरा सर्वोच्च स्थानावर, त्याही वर सासुमा, व मग मुले ह्यांचे करण्यात स्वत्वाकडे दुर्लक्ष झालेली ही चाळीशीची गृहिणी. तिचे माहेर असे तसेच. एक लग्न झालेला भाउ आणि म्हातारी आई.- सुनेच्या राज्यात दबलेली.

नवरा रात्री दिवा बंद करतो तेव्हा ती चटकन ऑटोमेटेड रिस्पॉन्स असल्यासारखी त्याला सामोरी जाते. ( अचानक सापडलेली सतारीची नखी विसरून) मुलांचे सासूचे करण्यात, कधी मधी किटीपार्टीला जाण्यात दंग.

राहुलचा कॅमेरा तिला दशदिशांनी सिड्यूस करतो. फोटो प्रक्रियेत ते दोघेही मनाने शरीराने जवळ येतात. तिच्या मनाला पंख फुटतात. पण झेप घेण्याआधी तिचा हा विवाहबाह्य संबंध घरच्यांना कळतो. मग तिला रिजेक्ट केले जाते. मुले नवरा सासू, घरचे नातेवाईक तिला मखरातून काढून फेकून द्यायला बघतात. त्यांना तिची घृणा, तिरस्कार वाटतो. नवरा तर इगो दुखावल्याने अगदीच संवाद तोडतो.पण तिला अपराधी वाटत नाही. उलट् ती स्वतःशी जडलेले नाते जोपासू बघते. नोकरी करून चरितार्थ चालवायला जमेल का ते चाचपते. शरीराच्या नव्या जाणिवा पुसून न टाकता पुढे जाते. इतकी बेसिक ही कथावस्तु.

चित्रपटाचे वेगळेपण आहे त्याची ट्रीटमेंट. एका संवेदनशील स्त्री दिग्दर्शिकेने बनविलेला जेनिफर ह्या आपल्या मैत्रिणीला अर्पण केलेला चित्रपट. परमेचे व्यक्तिमत्व तिच्या कौटुंबिक सामाजिक भूमिकेत इतके मिसळून, हरवून गेलेले असते कि ती देखील आपले स्वत्व विसरून जगत अस्ते आणि सुखी देखील दिसते. राहूल च्या निमित्ताने शरीर मनावर जमलेली सुखवस्तू धूळ उडून जाते व आतले कलासक्त, हसरे मन झेप घेउ पाहते. राहूल पहिल्यांदी तिच्या माहेरी गच्चीवर एकांतात तिचे पहिले चुंबन घेतो तो सीन अतिशय सुरेख चित्रीत केला आहे. एक स्त्री दिग्दर्शकच इत की लिरीकल संवेदनशीलता दाखवू शकते. त्याच्याबरोबर अनिर्बंध असे सूख अनुभवल्यावर तिला परत नवृयाबरोबर संसार करणे अतिशय जखडल्या सारखे वाट्ते ती मुक्त होउ बघते. ती असे करू पाहते आहे ह्या शक्यतेनेच नवर्‍याचे विश्व हादरते. तो तिला हातखर्चाला जास्तीचे पैसे देउन समेट घडवू बघतो. पण आधी तिला वेश्या म्हणून त्याने नाते काय लेव्हलला आहे ते स्पष्ट केलेच आहे. हा सीन बघवत नाही. मुले, सासरचे दूर जातात. जी भूमिका इतक्या सहजतेने इतकी वर्षे नि भवली ती हातातून सहज निसटून जाते. त्याचे स्पेक्स बदलले की अ‍ॅप्रुव्हल रेटिंग गेल्या सारखे.

एका अलिप्त भावनेने ती हे सर्व नाकारते व स्वतःचे जीवन जगू पाहते. त्यात तिला राहूल आला तरी आता फारसा फरक पडणार नाहीये. त्या सुखद पण अल्पजीवी नात्याने तिला एका वेगळ्या शक्यतेकडे धाडले आहे. आधीच्या मजबूत बांधण्या तोडमोड करून.

राखीने ह्यात अतिशय सहज अभिनय केला आहे. अप्रतिम दिसते. आपल्यालाही प्रेमात पडायला होते. काय ते सुरेख लांब केस, ते डोळे आणि ते कुंकू. ते हसणे, त्या सुती साड्या आणि तो गृहिणीचा वावर. ते राहूल म्ह्णून चित्कारणे. ते बिलोरी हसणे.

आजच्या मानसिकतेतून बघायला गेले तर अनजान माणसा बरोबर कोणी इतक्या लिबर्टीज घेणार नाही. दूर फिरायला जाणे, काय छापणार ह्या बद्दल करार नसणे, फोटो काढताना तिसरे कोणीच नसणे. पण ती काही ट्रेन्ड मॉडेल नाही.

राहुलच्या सहवासाची चटक लागल्यावर तयार होउन जाताना सासूने/ मुलीने हटकल्यावर ती बावरते, बिचकते पण तरीही जातेच. एक प्रकारे इच्छेची बळी. आपले कुटुंब खरे तर आपले नाहीच ही तिला जेव्हा जाणीव होते तो खरा मुक्तीचा क्षण. मग पुढे राहूलची साथ असो वा नसो. हाच मुद्दा लंचबॉक्स चित्रपटातही आला आहे १९८४ मधली मानसिकता, नैतिकतेच्या कल्पना आता जरा विचित्र वाटतात.
वैयक्तिक स्वातंत्र्या बाबत तर आपण माय चॉइस हे वळण घेतले आहे. तीस वर्शापूर्वी आलेल्या ह्या चित्रपटाने भद्रलोक
मानसिकतेला तडा गेला असेल कि नाही माहीत नाही पण तो एक सशक्त प्रयत्न तरी आहे.तिच्या बाजूने पाहिले तर जरी काही एक मोडतोड झाली तरीही तिला आयुष्यात काही जेन्युइन सुखाचे क्षण मिळाले तरी. व्हेन यू फील ११० % अलाइव्ह. नुसते इंटीमेट नाही तर एका छान सहचरा बरोबर काहीही करण्याचे. त्यात ते एकाठीकाणी जातात व ते लोक त्यांना अमेरिकेत कारावान घेउन हिंडणारे समजतात. परमा जिथे तिथे सतारवादनाचे कार्य क्रम करते असे राहूल थापा मारतो. तर ते विचारतात मग तबला कोण वाजवते साथीला? तर ती म्हणते अल्लारखा !!! राहूल तर चोकच होतो हसून. नवरा तिला फारच गृहित धरतो. मला तर ते जास्त व्हायोलंट वाटले. स्त्री, तिचे रूप, अस्तित्व
एका चौकटीत घट्ट बसवायचे. तरच ते सुखद आहे; हे पटत नाही. जगू दे कि तिला मोकळे.

बिग बॅड इंटरनेट. यूट्यूब वर भाग सहा, सात आठ चे व्ह्यूज आहेत २ ४ ते ८ लाखाच्या घरात. फॉर द इंटिमेट सीन्स. :angry: बाकी भागांचे हजाराच्या घरात. शेवटच्या १२ व्या भागात कथेची संगती पूर्ण होते. ती शोधत असलेले झाडाचे नाव तिला सापडते. मध्यमवर्गीय गृहिणीच्या जीवनात घडणार्‍या नाट्याचे साधे चित्रण. जीवन बदलून टाकणारे मोहाचे क्षण...त्यांना हो म्ह्णायचे कि नाही हा आहे खरा हर चॉइस.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटात राखी घरात इतरांकडून हेटाळणी स्वीकारतेच पण तिचा नवरा तिला स्पर्शही करू इच्छित नाही, स्वतःच्याच घरात ती अस्पृश्य असल्यासारखे कोपऱ्यात उभी राहते त्याच्यासमोर. त्याच्या शर्टचे कफलिंग पण ती हातात देऊ शकत नाही तर तिने टेबलावर ठेवलेले तो उचलतो, खोलीही बदलू पाहतो. याचे कारण स्त्रीची योनीशुचिता. तिने दुसऱ्या पुरुषासोबत संग केला म्हणजे ती भ्रष्ट झाली हा सामाजिक विचार. बलात्कारित स्त्रीला यामुळे दुहेरी त्रास भोगावा लागतो. या विचाराने भयंकर नुकसान केलेय.

पण त्या जागी पुरुष असेल तर बाहेर लफडे करून उपरती होऊन परतलेल्या नवऱ्याला स्त्री शिव्याशाप देईल पण त्याला बेडरुमातून बाहेर काढणार नाही, तिची इच्छा असली तरी. तिने तसे केले तर घरचे तिलाच दोष देतील.

आवडीचे जिला गवसले आहे, तिला सन्मानाने त्या बंधनातून मोकळे करण्याचा विचार इतर कुटूंबियांनी करावा>>>>
करावा ही थेअरी झाली. प्रत्यक्षात कुणी करत नाही. याचे कारण त्यांना होणारा त्रास फक्त घरातील एक माणूस गेले म्हणजे त्याच्या जबाबदाऱ्या आपल्यावर म्हणून नसतो तर त्यांनाही सामाजिक त्रास भोगावा लागतो. चित्रपटातही शेजारी, नातेवाईक बोलताना दाखवलेत. इथे कुणी म्हणतील की त्यांचा काय संबंध, ते कोण बोलणारे. पण भारतीय समाजात तरी असले नाक खुपसणारे भरपूर आहेत.

चित्रपट शेवटी कळला नाही. सगळे अर्धवट सोडल्यासारखे वाटले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर तिला परत कुटुंबात घेतले जाते का? करण हॉस्पिटलात तिला सगळे भेटतात, प्रेमाने बोलतात. ती नोकरी वगैरेचे बोलते तेव्हा तिचा डॉक्टर नवऱ्याला डोळ्यांनीच दटावून हो हो करतो. घरात राहून तिला नोकरी करायला नवरा देणारच नाही. म्हणजे प्रत्यक्षात तिने घर सोडून बाहेर पडल्याखेरीज तिला मानसिक स्वातंत्र्य लाभणार नाहीच. पण बाहेर पडणे शक्य दिसत नाही. तिची मैत्रीण म्हणते मला घर असल्यामुळे मी राहू शकते, तुला घर नसेल तर इतक्या कमी पगारात काही होणार नाही. हिचे शिक्षणही नाही. एकंदरीत आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर इतर स्वातंत्र्याच्या उर्मी दाबून ठेवाव्या लागणार.

प्रत्यक्षात कुणी करत नाही म्हणून तर हा सिनेमा आज ही पुरोगामी ठरतो. ज्या नात्यात कुठलीही वृद्धी (ग्रोथ) होणे शक्य नाही, नवीन अनुभवांची भर पडत नाही, मानसिक्/भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत ते जोखडासारखे नाते घाण्याच्या बैला प्रमाणे माणसे (स्त्री असो का पुरूष) ओढत राहतात. राखीला पुढे आर्थिक स्थिरता लाभेल नाही लाभेल पण घरात ती आणि पर्यायाने इतरही सुखी होणार नाही हे अगदी जाणवते.

योनिशुचिता - Biggrin नुकताच वीरे दि वेडिंग बघितला आहे त्यामुळे डिक्शनरी "चरमसुख" वर अडकली आहे. 'य' पर्यंत पोहोचायला आणि अर्थ समजायला वेळ लागेल.

• राखी आर्थिक स्वतंत्र असती किंवा तिचे पूर्ण घरच तिच्या पैशावर चालत असते तर घरच्यांची प्रतिक्रिया कशी असती?

• कुटुंबाच्या आर्थिक वर्गानुसार त्या प्रतिक्रियेत फरक पडला असता का?

• आजीच्या हातच्या चकल्या आणि आईच्या हातचे पापड यांची जालावर येऊन आरती करत फिरणारे लोक 'त्या स्त्रियांचे बाहेर प्रेमसंबंध असते' तरी तशीच आरती करत फिरले असते का?

• दुसऱ्याच्या घरात & घरभाडे न देता राहणारे कोणीही मालकाला त्याच्याच घरातल्या एका रूम मधून बाहेर काढू शकतात का?े

• आजीचा प्रियकर असणे नातवाने चालवून घेतले असते का या प्रश्नांसोबतच आजोबांना consent म्हणजे काय हे कळत होत का? ते आजीला 'आनंद' देऊ शकत होते का? असे प्रश्न नातवाला पडतील का?

• आजीच जाऊदे, आईचंदेखील जाऊदे गेलं त्यांचं आयुष्य पण आपल्या मुली, नातीलापण आपण एका पुरुषाला allocate करून टाकणार आहोत का? आपण स्वतः त्याच सिस्टमचा भाग बनून पुढच्या पिढीसमोर हेच आदर्श ठेवणार आहोत का?

चित्रपट शेवटी कळला नाही. सगळे अर्धवट सोडल्यासारखे वाटले. >> खादी भांडार गृहात साड्या विकायची नोकरी उपल ब्ध आहे असे बोलण्या तून कळते. घरात बंदिवान व इतरांची उपेक्षा झेलात राहायचे नाही आहे व ती जी पहिली नात्यातली बाई माहेरी गच्ची वरच्या खोलीत राहून वेडी होउन तिने जीव दिला ती ही ऑप्शन आहे. पण त्याच्या मधले
पॉसिबल आहे. जगताना सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख पटली आहे. मला हे हवे आहे, असे जगायचे आहे , असे नाही हे समजणे ते झाले आहे. बाकी चार खस्ता काढू असा हिशेब असेल. राहूलचे पत्र वार्‍यावर उडून गेले आहे. असा शेवट आहे.

ं मला पहिले ही दु:खांतिका वाटली पण असे ही होउ शकते की राहूलची ती असाइन मेंट संपल्यावर तो ओक्टोबर मध्ये परत येणार् असतो व राजस्थान मध्ये एक शूटिंग असाइन मेंट असते. तेव्हा त्यांना एकत्र राहता येइल. घटस्फोट इन प्रोसेस कधी तरी फायनल होईल व राहुलच्या बरोबर ची रिलेशन शिप विल मीट इट्स लॉजिकल एंड व पुढे अमर्याद स्वातंत्र्य. यू मे ऑर मे नॉट हॅव अ मॅन इन युअर लाइफ अँड मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा नवरा जितका सुखात ठेवेल त्यापेक्षा एक डिग्री कमी भौतीक सुखात जगता येइल. राहूल व ती दूर कुठेतरी जातात व एक साइट चढून लांबवरून कलकता शहर बघतात तेव्हाही तो तिला जाणीव करून देतो की तू सर्वात इतकी बुडालेली आहेस कधीतरी दुरून पर्स्पेक्टिव्ह व्हिजन ने स्वतःकडे बघ. एकदा ती व्हिजन सापडली की पतिपर्मेश्वर मोड वापरणे जरा अवघड होते.

बादवे सतार शिकलेली आहे सतारीचे क्लासेस पण घेता येतील. इट इज ऑल पॉसिबल.

राहुलच्या बरोबर ची रिलेशन शिप विल मीट इट्स लॉजिकल एंड व पुढे अमर्याद स्वातंत्र्य>>>>>

हे व्हायच्या आधी, त्या दोघांनाही किंवा दोघांपैकी एकाला मूल हवे झाले, ते जन्माला घातले गेले तर नंतर रिलेशन लॉजीकली संपल्यावर त्या मुलाचे काय? कुणी जबाबदारी घ्यावी? कुणीच घेतली नाही किंवा घेऊ इच्छिले नाही तर आईवडील हवे असण्याच्या मुलाच्या हक्काचे किंवा गरजेचे काय?

पाहिला चित्रपट..
साधनाच्या पहिल्या पोस्ट शी सहमत..! तुमच्या स्वातंत्र्याविषयक निर्णयांनी बाकी कुटुंबीय गोत्यात नको यायला. +1
प्रत्येकाने स्वतंत्र पणे वागायचं ठरवलं तर समाज व्यवस्थेला ,कुटुंब संस्थेला काही अर्थच उरणार नाही..
लग्न केलं म्हणजे ते टिकवणं, मुलांची जबाब्दारी..हे सगळं दोघांचं आहे ना..! मग कुणा एकानेही केलेली बेईमानी किं वा विश्वासघात.. हा समर्थनीय नाहीच.!

हे व्हायच्या आधी, त्या दोघांनाही किंवा दोघांपैकी एकाला मूल हवे झाले, ते जन्माला घातले गेले तर नंतर रिलेशन लॉजीकली संपल्यावर त्या मुलाचे काय? कुणी जबाबदारी घ्यावी? कुणीच घेतली नाही किंवा घेऊ इच्छिले नाही तर आईवडील हवे असण्याच्या मुलाच्या हक्काचे किंवा गरजेचे काय?>> हे ह्या चित्रपटाच्या परीघा बाहेरचे प्रश्न आहेत तरी ही
त्यांचे ते बघून घेतील की. फिकर नॉट. विथ ग्रेट पावर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबीलीटी.

माझें बरेचसे पॉईंट्स चित्रपटाच्या परिघाबाहेरचे आहेत. केवळ इथे चर्चेत बऱ्याच जणांनी असे स्वैर स्वातंत्र्य हवे याचा पुरस्कार केलाय, त्या संदर्भात मी ते मांडलेत.

स्वैर स्वातंत्र्य की कुटुंब याचा विचार आधीच करायला हवा हे माझे ठाम मत. चित्रपटात पाहू गेले तर परोमा आत्महत्येच्या निर्णयाप्रत येते हेही दाखवलंय. घरच्यांनी लाथाडले व प्रियकराचाही पत्ता नाही अशा स्थितीत नैराश्याने ग्रासलेली परोमा ब्लेड जवळ करते. सुदैवाने ती वाचते व नंतर तिला आत्मभान येते हा पुढचा भाग. पण ती तशी वाचली नसती तर स्वैर स्वातंत्र्याच्या नादाने जीव गमावून बसली हाच निष्कर्ष निघाला असता. स्वैर स्वातंत्र्याच्या वाटेवर हे असले खाचखळगे येणार. पुढे जाऊन एका पार्टनरला लॉजिकल एन्ड करावासा वाटेल व दुसरा त्याला तयार नसेल तरीही त्रास आहेच. एकूण मानव प्राण्यात स्वैर स्वातंत्र्य असे काहीही नाहीय. त्याची कुठेही भावनिक गुंतवणूक होऊ शकते व एकदा ती झाली की पुढचा प्रवास त्याच्या हातात राहात नाही. प्राण्यांमध्ये ही गुंतवणूक फक्त मेटिंग सिजनपुरती होत असावी, कल्पना नाही. त्यानंतर तुझे तू, माझे मी. त्यामुळे त्यांना या संदर्भात कसलाही त्रास होत नाही. काही प्राणी व पक्षी आयुष्यभर एकच जोडीदार करतात, ह्यात भावनिक गुंतवणूक असते की कसे हे माहीत नाही. मी तरी असे वाचले नाही.

एकूण मानव प्राण्यात स्वैर स्वातंत्र्य असे काहीही नाहीय. त्याची कुठेही भावनिक गुंतवणूक होऊ शकते व एकदा ती झाली की पुढचा प्रवास त्याच्या हातात राहात नाही. >> > हे म्हणजे एखादा माणूस पटत नाही त्याचे विचार पटत नाही तरी जबरदस्ती त्याच्यासोबत संसार करा असच? Not justifiable at least in 21st century.. लग्न हे आता पार्ट of लाइफ म्हणून बघायची गरज आहे.. इतर चुका होतात ना आयुष्यात.. त्या कवटाळून थोडीच बसतो आपण.. हेही कधीतरी त्याच angle ने स्विकारण्याची गरज आहे आता..

स्वैर स्वातंत्र्याच्या वाटेवर हे असले खाचखळगे येणार. >> स्वैर स्वातंत्र्य फक्त शरीराच्या हार्मोन्सच्या गरजेपोटी येणारे निर्णय व विचार करून घेतलेले आपल्याला काय पद्धतीचे जगायचे आहे हा अ‍ॅडल्ट मॅचुअर पद्धतीने विचार करून आपल्याला नक्की किती डिग्री स्वातंत्र्य हवे आहे हा विचार करून त्या पद्धतीने जीवन आखणे ह्यात फरक आहे. अ‍ॅडल्ट हूड आल्यावर शिक्षण पूर्ण होउन आर्थिक बाबीत स्वतंत्र झाल्यावर किंवा बरोबरीने विचार करून आपल्याला एक व्यक्ती म्हणून जीवनात इतरांची किती इन्वॉलव्ह मेंट हवी आहे आपल्याला किती झेपते आहे ह्याचा विचार करून तसे जीवन आखता व जगता यावे. ह्या आखण्यात स्त्रीला चॉइस असावा. मत मांडता यावे व तिच्या मताचा आदर असावा. चुका झाल्यास त्या सुधारून पुढे जाता यावे. स्वैर मॉड्युल खूप आक र्शक दिसते पण तो खरा इवॉल्व्ड मार्ग नव्हे. त्या पुढे जाउन विचार व्हावा. हे लिंग निरपेक्ष आहे.

प्राणी जगतात मेटिंग पुरते एकत्र येणे तसेच जन्मभर एकत्र राहणे एका मेट बरोबर आठ माद्या ते ं मेटिंग नंतर जिवलगा ला मारून टाक णारी मादी असे अनेक प्रकार आहेत सर्व नैसर्गिक आहेत. त्यासाठी वेगळी लेख मालिका
लागेल. ब्लु प्लॅनेट सीरीज किंवा नेटफ्लिक्स वर अधिक माहिती उपलब्ध आहे.

हे म्हणजे एखादा माणूस पटत नाही त्याचे विचार पटत नाही तरी जबरदस्ती त्याच्यासोबत संसार करा असच?>>>

खरेतर हे थोडेफार असे होते. बाहेरून सर्व काही ठीकठाक असलेल्या संसारात कुणाची घुसमट होत असेल तर कुटुंबातले इतर सदस्य स्वीकारत नाहीत, विरोध करतात. 21सावे शतक जरी असले तरी अपल्याइथे अजून विवाह मंडळे जोरदार धंदा करताहेत. तिथे वधू वरांची फिझीकल व मेंटल कंपॅटीबीलिटी सोडून बाकी जातपात, सामाजिक स्थान, आर्थिक पत सगळे मॅच करून अगदी सुयोग्य वर वधु शोधून दिले जातात. सो, लग्न हा आपल्याकडे अजूनही एक सामाजिक करार आहे. त्यात पुढे जाऊन असले प्रश्न येणारच. त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची तर कुटुंबसंस्थेवर आघात होणार. आज पुढच्या पिढीत आपण हे स्वीकारूही. पण चित्रपटात जी पिढी दाखवली त्यात हे स्वीकारणे त्या कुटुंबाला भयंकर कठीण गेलेले दाखवलंय, जे वास्तव आहे.

पण चित्रपटात जी पिढी दाखवली त्यात हे स्वीकारणे त्या कुटुंबाला भयंकर कठीण गेलेले दाखवलंय, >> कथावस्तू सत्तरच्या दशकात घडते.

छान लिहिलय !
मला बर्‍याच वेळेला अशा चित्रपटाच्या निर्मीतीमागच्या निखळ हेतूबद्दल शंका येते मात्र . हा विषय पूर्णपणे पटतो पण तरीही ही वस्तुस्थिती नाही म्हणूनच एका अर्थाने कुटुंब व्यवस्थेची घडी टिकून आहे असं वाटत . अर्थात तिच्या पायी बळी गेलेल्या किती तरी इछा , आकांक्षा असतीलच .
माया मेमसाब आणि अनाहत ची आठवण आली.

अमा, सिनेमा पाहिला. कन्सेप्ट चांगली आहे, पण एग्झिक्यूशन मला स्वतःला फारसं आवडलं नाही. न आवडण्यात मोठा वाटा राखीचा आहे. माझ्या डोळ्यांना ती भीषोण शुंदर दिसली नाहीच, पण अभिनयात फारच तोकडी पडली आहे! परोमाच्या आत्मशोधाच्या प्रवासातली (तुम्ही मथळ्यात 'स्त्रीत्वाचा शोध' म्हटलं आहात, मला स्त्रीत्वाच्याही पलीकडचा म्हणून आत्मशोध वाटतो), कथेत प्रत्येक पावलावर अपेक्षित असलेली दुविधा, घालमेल, भीती तिला अजिबातच दाखवता आलेली नाही.

आत्मशोधाचा प्रवास अवघडच असतो. ती एका चाकोरीला रुळलेली आहे, स्वतःचे पंख वापरायचे विसरूनच गेलेली आहे. यात तिचा इनर्शिया किती आणि जाच किती हे तिचं तिलाच ठाऊक - घरात कोणी तिला जाच वगैरे करताना सकृतदर्शनी तरी दिसत नाही. म्हणजे उदा. तिला सतार वाजवायला बंदी नसते, ती शरीरसंबंधांना ठरवलं तर 'आज नको' म्हणू शकतेच, इ.
हे वळण काही अंशी तिच्या कंडिशनिंगमधून आणि बर्‍याच अंशी तिच्या आळसातूनही आलेलं दिसतं.
विवाहबाह्य संबंध हा मुळी चित्रपटाचा विषयच नाही - ते एक निमित्त आहे केवळ तिला ती 'एस्केप वेलॉसिटी' देणारं. तो फोटोग्राफर आहे - त्रयस्थ लेन्समधून तिचं जग कसं दिसतं हे तिला त्याच्या निमित्ताने प्रथमच कळतंय, इतकंच.

तिचा आत्महत्येचा प्रयत्नही म्हणूनच प्रतिकात्मक आहे. परोमा - अ‍ॅज शी वॉज नोन बिफोर - इज नाऊ गॉन. ही पुनर्जन्म झालेली व्यक्ती तिच्या पायावर उभी राहू पाहते आहे - आर्थिकच नव्हे, सर्वच दृष्टींनी. नवरा तिच्या नोकरी करण्याच्या कल्पनेनेही गडबडून जातो - कंडिशनिंगचे बळी सगळेच आहेत. 'कुटुंब तिच्या आत्मशोधात अडसर आहे का?' याचं उत्तर नवर्‍याच्या नोकरीवरून गडबडण्यात आलं.
मुलगी एका क्षणी तिची तहान समजून ते रोप किती छान आहे म्हणते - तिची पिढी तो प्रवास आणखी डोळसपणे करेल अशी आशा तिथे निर्माण होते.

विवाहबाह्य संबंध हा मुळी चित्रपटाचा विषयच नाही - +१०००००
एखादीचा प्रवास ओशोंनी लिहील्याप्रमाणे संभोग से समाधीतक असा होईल. एखादी "उंबरठा" लाथाडेल, एखादी नव्या व्यवसायात पडून "दिल धडकने दो" म्हणेल तर एखादी जनाबाई होवून अभंग लिहील. मूळात चाकोरीबद्ध संसारा पलिकडे ह्या पात्रांना काही सापडले आहे. पोपटासारखे पिंजर्‍यात बसून ह्या घारींच्या आकाशाची कल्पना करणे कठीण आहे.

मी सिनेमा पहिला नाहीये,
पण अमा नि जे लिहिले आहे ,त्याच्या कॉन्टेन्युअशन मध्ये स्वाती_आंबोळेंनी लिहिलेले वाचले तर सिनेमा जास्त उलगडतो आहे असे वाटते

अमा, वुडी अ‍ॅलनचा 'विकी, क्रिस्टीना, बार्सिलोना' मूव्ही पाहिला नसाल तर हायली रेकमन्डेड.

अमा, वुडी अ‍ॅलनचा 'विकी, क्रिस्टीना, बार्सिलोना' मूव्ही पाहिला नसाल तर हायली रेकमन्डेड.>> व्ह् य तर बघितलाय ना. काय पॅशन ती क्रेझी बाय को व एकूण सेटिंग अगदी पसंतीचे आहे माझ्या. बेटर द्यान ७:५५ बोरिवली लाइफ एनी डे. वुडी अ‍ॅलन चे चित्रपट मला आव डतात. इंग्रजी वापरतो खर्‍या अर्थाने. एव्ढे करून काल एस्केप फँटसी म्हणून थोडावेळ मोहोब्बते बघितला. ख्या ख्या ख्या.

तिचे नाव परमा आहे ते मला माहीत आहे पन मराठीत त्याचा वेगळा रोगट अर्थ होतो म्हणून ते परोमा असे लिहीले आहे शीर्शकात.

मला `परमा'चं कास्टिंग अजिबातच आवडलं नव्हतं. >>> ईथलं वाचून तुनळीवर बघायचा प्रयत्न केला.
चर्चा वाचून , मला रिचर्ड गेरेचा "अन्फेथफुल' आठवला . अर्थात दोन्घाची जातकुळी आणि कन्सेप्ट पूर्णतः वेगळी आहे.

त्यात ही बायकोचं सगळं सुरळीत चाललं असतं .
पण ती "त्या" च्या कडे आकर्षित होते कारण पहिल्याच भेटीत तो फार "चार्मिन्ग" वाटतो .
आणि एकंदरच दोघांच सूत जुळल्यावर तिचं आयुश्य फार स्पाईसी आणि हॅपनिंग वाटतं .
ईथे असं काहीच नाही . राहूल प्रत्येक फ्रेम मध्ये लोचट वाटला . तो ज्या नजरेने तिच्याकडे बघतो , लस्ट ! .

मला `परमा'चं कास्टिंग अजिबातच आवडलं नव्हतं. स्क्रिप्टही फारसं आवडलं नाही. >>> + 1
सिनेमा बघितला व्यवस्थित पण मनाला भिडला किंवा त्यातून काही उदात्त वगैरे निष्पन्न झालंय असं काहीच झालं नाही somehow. कलाकृतीतून दाखवलेलं चाकोरीबाहेरचं किंवा सामाजिक चौकटीबाहेरचं वागणं किंवा विचार हे देखिल कधी कधी इतके जबरदस्त सच्चे वाटतात की आपण प्रेक्षक ते मान्य करतो. तसं काही हा सिनेमा बघून वाटलं नाही. इवल्याश्या मोबाईलवर पाहिल्यामुळे impact काहीच झाला नसेल. पक्का कमर्शियल असलेला विवाहबाह्य संबंधांवर असलेला 'गाईड' ही आवडून गेला होता.

{{{ पक्का कमर्शियल असलेला विवाहबाह्य संबंधांवर असलेला 'गाईड' ही आवडून गेला होता. }}}

विवाहबाह्य संबंध हा गाईडने स्पर्श केलेल्या विषयांमधला एक विषय असला तरीही विवाहबाह्य संबंधांवर असलेला ही 'गाईड' ची ओळख नक्कीच असू शकत नाही. तो श्रद्धा / विश्वास आणि त्यामुळे घडणार्‍या अशक्यप्राय गोष्टी यावर जास्त फोकस करतो जसा की, ट्यूबलाईट.

सामाजिक चौकटीबाहेरचं वागणं किंवा विचार हे देखिल कधी कधी इतके जबरदस्त सच्चे वाटतात की आपण प्रेक्षक ते मान्य करतो. तसं काही हा सिनेमा बघून वाटलं नाही + १ उलट परमाच्या घरच्यांचं वागणं पटलं..! तिच्याशी कुणीच बोलत नाही पण हॉस्पिटल मध्ये भेटायला येतात..तिची काळजी करतात..तिची सायकोलॉजिकल ट्रिट्मेंट ही करायला तयार असतात..

राहूल प्रत्येक फ्रेम मध्ये लोचट वाटला . तो ज्या नजरेने तिच्याकडे बघतो , लस्ट ! >>>

मला तर उलट वाटलं. त्याला काहीच अ‍ॅक्टिंग जमलेलं नाही. त्या भूमिकेसाठी त्याची निवडच चुकली आहे.

अमा धन्यवाद, एक चांगला चित्रपट बघितला. मला आवडला. एकूणच सगळं जाणतं कुटुंब फारच सहनशील आणि समजूतदार वाटलं.

राहूल प्रत्येक फ्रेम मध्ये लोचट वाटला. तो ज्या नजरेने तिच्याकडे बघतो , लस्ट !
अगदी अगदी हेच जाणवलं..

जो शेवट दाखवला त्या शेवटानंतर काय होणार परमाचं असा प्रश्न पडला! तिला स्वत्वाची जाणीव झाली. राहुलची माहीती देणारा पेपर तिने वार्‍यावर खिडकीतून सोडून दिला त्यामुळे राहुल विषय तिने संपवला असे वाटले. शेवटी मुलगीला अचानक आईविषयी का प्रेम वाटले ते अनाकलनीय वाटले. परमाला रोपाला फूलं आलेली बघून आनंद वाटला ते समजूच शकतं, पण मुलगीत अचानक का बदल झाला? मला तर परमा सासरी परत जाणार नाही एकटीच राहणार की काय असंही वाटलं.

Pages