ती माय असते .. !!

Submitted by satish_choudhari on 29 May, 2018 - 12:23

बंद मुठ्ठी घेऊन जेव्हा
रडत रडत बाळ जन्मा येतं
त्याच्या पहिल्या रडण्यावर
डोळ्यात आनंदाश्रू घेऊन हसते
ती माय असते ..
ती माय असते .. !! १ !!

ठेच लागली भूक लागली
भीती वाटली नाती तुटली
हे जग जेव्हा आपल्यास
असे परके वाटू लागते
तेव्हा फक्त जिचे नाव तोंडी येते
ती माय असते ..
ती माय असते .. !! २ !!

मुलाबाळांसाठी घरासाठी
जी रात्रंदिवस झटते
मुल बिमार असलं की
जी रातभर जागत असते
ती माय असते
ती माय असते .. !! ३ !!

ज्या मुलाबाळांसाठी जिने
जीवनभर कष्ट वेचले असते
तेच तिला सोडून जातात तेव्हा
पतीला समजावून सांगते ..
अहो पाखरांना अडवायचं नसते
अन त्यांची बालपणीची खेळणी
कवटाळून जी रातभर रडत बसते
ती माय असते
ती माय असते .. !! ४ !!

जीवनाच्या रंगभूमीची ती
मोठी कलाकार असते
बाळ माझा दुनियेचा राजा
साऱ्या जगाला सांगत बसते
पण जेव्हा तोच सोडून जातो
तेव्हा पुन्हा रडता रडता जी हसते
ती माय असते
ती माय असते .. !! ५ !!

कवी - सतीश चौधरी

Group content visibility: 
Use group defaults