बाप ….

Submitted by manishh on 29 May, 2018 - 06:53

सगळ्या बापांसारखेच,
आपल्या बापालाही काही कळत नाही
याची खात्री पटल्यानंतर…

मला ह्याच शाळेत का घातलं?
फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं?
असे आरोप केल्यानंतर…

बाप आहे ना, तो चुकतोच.
आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच
हे समजून चुकल्यानंतर…

मग तू स्वतः बाप झाल्यावर,
वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर
प्रेमाने जवळ घेतल्यानंतर…

कधीतरी आठवेल का तुला
लहानपणी तू शांत झोपल्यावर,
कित्येकदा तुझ्या केसांमधून हात फिरवत,
हळूच तुझी पापी घेऊन,
तुला एकटक पहात असतांना
भरून आलेले माझे डोळे.
माझ्या गालांवरून ओघळणारे ते पाणी
कधीतरी उतरेल का तुझ्या डोळ्यात,
माझ्या हळव्या आठवणीने
मी नसल्यानंतर?

~ मनिष (28/5/2018)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults