अशीच एक आठवण

Submitted by VB on 25 May, 2018 - 14:54

पावसाळा ... माझा आवडता ऋतू. खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या पावसासंबधीत. दरवेळी पाऊस एक नवीन अनुभव, नव्या आठवणी देऊन जातो. अशीच एक नवीन आठवण एक नवीन अनुभव मला गेल्या आठवड्यात आला.

काही कामानिमित्ताने गेल्या आठवड्यात दोन दिवसांची कोल्हापूर वारी झाली. खरेतर ज्या कामासाठी गेले होते त्याला दोन दिवस लागणार होते म्हणून दोन दिवसांची रजा घेऊन गावी गेले होते अन अनपेक्षितपणे ते काम पहिल्याच दिवशी पूर्ण झाले तेही अर्ध्या दिवसात त्यामुळे माझ्याकडे सुट्टीचा दीड दिवस शिल्लक होता. मी जिथे होते तिथून आमचे गावही जवळ होते. आधी ठरल्यानुसार संध्याकाळी दादा येणार होता मला घरी न्यायला, पण आता अचानक काम लवकर उरकल्याने अन गाव जवळच असल्याने मी पायी चालत जायचा निर्णय घेतला. अगदी आरामात जरी गेले तरी अर्ध्या तासात पोचले असते म्हणून कुणालाच काही न कळवता निघाले एकटीच.
मे महिन्यातील दुपारचे रणरणते ऊन असूनही एकटी चालत जाण्याचा निर्णय घेण्यामागे अजून एक छुपे कारण म्हणजे आमच्या गावी जायचा हा रस्ता खूप सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर जाईल तिथवर हिरवीगार ऊस शेती, रस्त्याच्या दोन्ही कडेला आंबा, फणस, बाभळी अन बरीचशी झाडे होती ज्यांची नावेदेखील माहीत नाही मला. पण खूप छान वाटते तिथून जाताना. म्हणून ही संधी मला वाया घालवायची नव्हती.
जेव्हा मी चालायला सुरुवात केली तेव्हा खूप ऊन होते अगदी अंगाची लाही लाही होईल इतके. क्षणभर वाटले मूर्खपणा तर करत नाहीयेना इतक्या उन्हात चालायचा. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला समजावून चालू लागले. पाच-दहा मिनिटे चालली असेल, अचानक आभाळ भरून आले, ढगांचा गडगडाट झाला अन काही कळायच्या आत पाऊस पडू लागला. त्यावेळी मला जो आनंद झाला तो शब्दात सांगताच येणार नाही. खूप खूप खूप छान वाटले. सगळीकडे ओल्या मातीचा सुगंध पसरला होता. आजूबाजूचा हिरवा निसर्ग अजूनच सुंदर भासू लागला. पावसाचा अंदाज नसल्याने माझ्याकडे छत्री नव्हती त्यामुळे पावसात भिजायला मला एक आयते कारण मिळाले , जेणेकरून आता किमान त्यासाठी ओरडा पडणार नव्हता. मस्त पावसात भिजत, रमत गमत चालली होती मी घरी .अर्ध्या वाटेत पोचल्यावर मला मोठा दादा भेटला, तो शेतातल्या घरी चालला होता. मला अचानक बघुन आधीतर तो मला ओरडला एकटीने चालत येण्यासाठी तेही अश्या अवेळी, पण मग त्याच्या ओरड्यामुळे माझा उतरलेला चेहरा पाहून तो मला सोबत शेतातल्या घरी घेऊन गेला. तिकडे तर मस्त पार्टीची तयारी चालू होती. मी रात्री येणार म्हणून माझे आवडते दिवशी-मटण करायचे ठरले होते, पण त्यांना म्हणे सकाळी आधीपासूनच अंदाज आला होता पावसाचा म्हणून हे सगळे गावच्या घरात न करता शेतातल्या घरी करायचे ठरवून सगळे जण तिकडेच जमले होते. एव्हाना पाऊस थांबला होता तरी वातावरण खूप छान होते. तिथे गेल्या गेल्या वाहिनीने आधी मस्त गरम चहा अन बुंदी-कुरमुरे दिले. तो गरम चहा पीत निवांत मागच्या अंगणातील बैलगाडीत बसले. ही माझी लहानपणपासून ची सवय. लहान असताना गावी गेले की कधी कधी यायची मावशीसोबत मी या घरी, तेव्हासुद्धा असेच बसायचे या बैलगाडीत कितीतरी वेळ. खूप शांत अन प्रसन्न वाटायचे. अगदी तसेच आजही वाटले. मन भूतकाळात रमले, चांगल्या वाईट आठवणीत कधीतरी तिथेच डोळा लागला. दादाच्या आवाजाने जाग आली. जेवण तयार होते. खरेतर तेव्हा संध्याकाळ चे चार वाजले होते, मला कितीही भूक असली तरी मी असे अवेळी खाणे टाळते पण समोर दिवशी अन पालव्याच्या मटणाचे जेवण असताना भरल्यापोटी सुद्धा परत जेवू शकते मी अन आज तर अशीही दुपारी जेवले नव्हते. मग काय तुटून पडले जेवणावर, नेहमी पेक्षा जास्तच जेवले.
जेवण झाल्यावर अगदी लहान मुलांसारखा हट्ट करून शेतात फिरायला गेले खरी पण ओल्या बांधावरून चालताना दोन-तीनदा घसरगुंडी झाल्यामुळे परत फिरावे लागले.
मी परत येईस्तोवर वहिनीची सगळी आवराआवर झाली होती. सगळे सामान एकत्र करून आम्ही सगळे गावच्या घरी आलो.निघताना दोन गुलाबाची फुले तोडून घेतली सोबत. खूप छान वाटत होते.
काहीही ध्यानीमनी नसताना एक सुंदर पावसाळी दुपार अनुभवली होती मी, अगदी माझ्या पावसाळ्याच्या अनेक आठवणींच्या कप्प्यात साठवून ठेवावी अशी .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अनुभव VB

पहिला पाऊस असतोच मुळी एकदम स्पेशल !
वर्षभरातली मनाची सर्व काहली हळुवार वाहवुन नेणारा अन् कोऱ्या पाटीगत जागा करून देणारा Happy
आपण फक्त जमेल तितकी शिदोरी बांधून घ्यायची, बस्स !

मस्तच!
पाऊस...अजुन महिनाभर वाट पहावी लागेल. Sad

सर्वांचे आभार.

पाऊस...अजुन महिनाभर वाट पहावी लागेल. Sad>> हो ना, पण येत्या आठवड्यात पडेल कदाचित वळवाचा पाऊस, जसा नेहमी मे महिन्याच्या अखेरीस पडतो.

मला मुळातच पावसाळा खूप आवडतो, आपण जसे एखाद्या खास कार्यक्रमा साठी वा सणासुदीची खरेदी करतो तशी माझी पावसाळ्याची खरेदी असते. नवीन पावसाळी चप्पल, पर्स, छत्री , कपडे अन बरेच काही.
तशी शॉपिंग ची आवड असल्याने अशा खरेद्या दरमहिना खरेतर महिन्यातून सुद्धा बरेचदा होतात, पण तरी खास पावसाळ्या साठी खरेदी करायची मज्जाच वेगळी

छान
मलाही खुप आवदते शोपिंग करायला

छान लिहिले आहे VB.
फोटो हवे होते.

दिवशी अन पालव्याच्या मटणा >> दिवशी म्हणजे काय माहित नाही.

छान लिहिलंय.
पण समोर दिवशी अन पालव्याच्या मटणाचे जेवण असताना>>>> म्हणजे काय?

अ‍ॅमी अन देवकीताई, प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.

फोटो हवे होते. >>> आता परत कधी असा योग आला तर नक्की टाकेन. यावेळचे सुद्धा आहेत पण ते सेल्फी अन ग्रुप्फी असल्यामुळे नाही टाकले.

दिवशी अन पालव्याच्या मटणाचे जेवण >>>> पालवा म्हणजे शेळी अन दिवशी म्हणजे रिकामा ऊकडीचा मोदक.

तांदळाच्या पिठाचे भागवट करुन, कोमट असताना व्यवस्थीत मळुन घ्यायचे. बेसनाच्या लाडुच्या आकाराचे गोळे करायचे पिठाचे, हाताला हलकेसे तेल लावायचे अन ते गोळे हलक्या हाताने मोदकाच्या आकाराचे वळुन घ्यायचे. अगदी मोदकासारखे दिसतात . ह्याच्या मधल्या पोकळी मधे अंड्याची बुर्जी किंवा चणाडाळ-खोबर्याची भाजी भरुन खायला पण आवडते मला.

पालव्याचे म्हणजे मध्यम वयाच्या बोकडाचे मटण. शेळी खात नाही.
>>> बोकड नक्कीच नाही, कारण ते वातड लागते, बिल्कुल चव नसते त्याला.

पालवा म्हणजे लहान शेळी

कोल्हापूरच्या आसपासचा शेतातला पाऊस मग तो नक्कीच आठवणीत राहणारा असणार. वादच नाही. कोल्हापूरहून माझ्या गावाकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. पावसाळ्यात तो छोटासा नागमोडी रस्ता आणि बाजूची दरी धुवाधार पावसाने भरून गेलेली असते. ते दृश्य केवळ अप्रतिम. घाट भयाण, भव्य, खोल, विशाल, विराट वगैरे असतात. पण तो रमणीय आहे Happy छोटेखानी वळणदार दरीतून नजर जाईल तिथवर पाऊसच पाउस आणि दूर तिकडे अंधुक दिसणाऱ्या डोंगररांगा. लहानपणी तिथून कैकदा एसटीमधून प्रवास केला. त्या आठवणी अविस्मरणीय Happy

बाकी इतकी वर्षे मटन खात असूनही पालवा, बकरे, शेळी, मेंढी, बोकड, बोलाई यातला फरक मला अजूनही कळत नाहीच Biggrin