तिथे ओठंगून उभी...

Submitted by अनन्त्_यात्री on 25 May, 2018 - 07:08

रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते
असे झाड फुलताना पान पान किल्बिलते

क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते
त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते

रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते
ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण गुंजते

फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते
तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते

नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते
तिथे ओठंगून उभी..
...एक कविता असते

Group content visibility: 
Use group defaults

अहाहा.....
जियो.....
केवळ सुंदर..... Happy