हक्काची रजा...

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 May, 2018 - 11:43

ह्या कवितेतून समाजातील एका शोषित घटकातील रज:स्वलेची काय तक्रार आहे, मागणी आहे ती विचारात घेऊयात...

हक्काची रजा...

या बया...
ऐकलं ते नवलच !!

तुमा गरतीच्या बायांना
नोकरी धंद्यात
सा-सा म्हैनं पगारी रजा गावती म्हनं
बालांतपनाची !

पॉर व्ह्यायच्या पह्यलं
तंदुरुस्त पॉर निपजावं म्हनून
नंतर...
पॉर लुचतय अंगावर म्हनून

बाबो !!!

आमच्यात तर
दिसं भरत आलं तरी धंदा चुकत न्हाय
व्हई ना का इनिफेक्शन !
अन पॉर बाह्यर आलं तरिबी !!

बसावच लागतंय
धंद्याला

त्ये इटाळाचं चार दिसात बी
मान-पाठ-कंबर येक झाली तरी
कमी 'रेटा'त बसतोच की,
कुनी थेरडा वा मिसरूड फुटलेला
गावतो जाळ्याला !

मी काय म्हनते,
गरतीच्यांचा अन आमचा
प्रॉब्लेम तर शेमच !!

इकडं 'बसलं' अन ऐन वक्ताला
तिकडं पॉर रडलं
भुकेनं कळवळून
की पाना पाजरुन
झंपर भिजतय अमुचबी
वलकच्च !!

सा-सा म्हैनं नगच
पन त्ये चार दिसं अन
ओल्या बालांतीनीचा सव्वा म्हैना

आमास्नीबी गावलं का वो
हक्काची रजा ?

पगारी नसलं तरी बी चाललं !

आयता भाकर तुकडा मात्तुर द्याल काय ?
दोन येळा गिळायला !

हातावरच पॉट हाय वो आमचं !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users