नखशिखांत मी कसाब आहे

Submitted by निशिकांत on 23 May, 2018 - 01:39

नखशिखांत मी कसाब आहे ( मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात सामील कसाई अजमल कसाबचे फासावर जाताना अखेरच्या क्षणी काय मनोगत असेल? याची आपल्या संस्कृतीनुसार शेवटच्या दोन कडव्यात कल्पना करत लिहिलेली रचना. सहाजिकच कांही उर्दू शब्द आले आहेत. )

जिहाद आहे जुनून माझा
परिचय अजमल कसाब आहे
खरे सांगतो करणीनेही
नखशिखांत मी कसाब आहे

मज सांगितले, जिहादात मी
शहीद झालो जर लढताना
अल्ला देइल हजार पोरी
बनेन तिकडे मी मस्ताना
बक्षिस घेण्या कैक मारले
चुकता केला हिसाब आहे
खरे सांगतो करणीनेही
नखशिखांत मी कसाब आहे

काच मनाला बिलकुल नाही
गुन्हेगार मज जरी ठरवले
पाप कशाचे? मी जे केले
कानी माझ्या जसे भरवले
माझ्या देशी मजला आदर,
मान मरातब, रुबाब आहे
खरे सांगतो करणीनेही
नखशिखांत मी कसाब आहे

मी केलेल्या कुकर्मांमुळे
नर्क मिळाला यदाकदाचित
स्वर्गाच्या सीमेवर सुध्दा
घुसखोरी मी करेन निश्चित
कुणात हिंम्मत, धर्मांधांना,
विचारायची जवाब आहे?
खरे सांगतो करणीनेही
नखशिखांत मी कसाब आहे

लोक तंत्र अन् न्याय प्रक्रिया
प्रसन्न झालो इथे बघूनी
कसा भाळलो शत्रूवर मी!
द्वेश दाटला मनी असूनी
नावामध्ये "पाक" तरी पण
सारे तिकडे खराब आहे
खरे सांगतो करणीनेही
नखशिखांत मी कसाब आहे

नोंदवली मी मनात माझ्या
शेवटची जी माझी इच्छा
जन्म मिळावा भरतात मज
नेक आदमी बनण्या सच्चा
सत्त्यमेव जयतेच्या देशी
हरेक बंदा जनाब आहे
खरे सांगतो करणीनेही
नखशिखांत मी कसाब आहे

निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users