चाळीतल्या गमती-जमती (२०)

Submitted by राजेश्री on 20 May, 2018 - 21:03

चाळीतल्या गमती-जमती (२०)

"ओ मेरी प्यारी इंदू" अस काहीस वातावरण आमच्या घरात तयार झाल्याचं बघून माझा ललिता पवार सारखा जळफळाट होऊ लागला.तिच्यासारख्या एक डोळा बारीक करून घरात आलेल्या म्हातारीकडे एक सारख रागाने बघत राहीलं तरी म्हातारी मला काही ताकास तूर लावून देत नव्हती.आधी निदान इंदू आज्जी घरात येऊन बसायची.तरी ती घरात फक्त गप्पा मारायलाच यायची. आमचा कुणाचा स्पर्श करून घ्यायची नाही.तहान लागली तरी आमच्या घरातलं पाणी प्यायची नाही मग काही खाणपिणं तर लांबचीच गोष्ट.सोवळं कडक पाळायची .पण एक दिवस उजाडला की तिला आमच्या घरातील पाणीच काय तर अगदी चहा,नाष्टा,जेवण खाल्ल्याशिवाय काही तरणोपाय राहिला नाही.काय बर झाल असावं असं ,सांगते ना
एक दिवस नेहेमीप्रमाणे उजाडलं पण सूर्याच्या तालाला ताल देऊन वेळापत्रक आखाणार्या इंदू आज्जीच्या घरातून त्या झोपेतून उठल्याची काही चिन्हे दिसेनात.सकाळचं पाणी सुटले तरी आज्जी उठल्या नाहीतच मग मम्मी दार वाजवून बाहेरून हाका मारू लागली.खूप हाका मारल्यावर इंदू आज्जीच्या कन्हाल्यासारखा आवाज येऊ लागला.जाग्या होऊन त्यांनी कशी बशी कडी काढली आणि तिथेच कोसळू लागल्या.मम्मीने त्यांना आधार दिला.त्यांना सावकाश झोपवलं.तेंव्हा मात्र दूर हो तिकडं हा शब्द त्यांच्या तोंडातून आलाच नाही कसा येणार त्या फक्त अस्फुट कन्हणत होत्या मग बोलतील तरी कश्या.त्यांच्या अंगात ताप होता. आदल्या दिवशी बाजारातून येताना पावसात भिजल्यामुळं त्या आजारी पडल्या होत्या. मम्मीने त्यांच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.तायडीला आल्ले की सुंठ घालून चहा करायला सांगितला. एकही शब्द न बोलता मम्मीच्या आधाराने उठून त्यांनी तो चहा पिला.मग काही वेळाने भाताची पेज मग हलकं फुलक खायला काही.मग थोड्यावेळाने त्यांना आवरायलाही मदत केली.रिक्षा करून दवाखान्यात नेण्यात आलं. स्वतःच्या कंबरेला लावलेल्या चाव्या काढून त्यांनी अमक्या ठिकाणी पैसे आहेत हे सांगितल्याचे मला आजही आठवते.थोडक्यात कडक सोवळं पाळणाऱ्या आज्जीना या एका असह्य आजारपणामुळे "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" या गाण्याशी ओळख पटली होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users