आणि आई ने एव्हरेस्ट सर केला

Submitted by विठ्ठल_यादव on 20 May, 2018 - 12:58

पहिल्या लघु कथेला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून नवीन लघु कथा लिहण्याचा मोह मला आवरला नाही , घाई न करता २ मिनिटे वेळ काढुन वाचावं , हि विनंती

लघुकथेच नाव : आणि आई ने एव्हरेस्ट सर केला

आणि आई ने एव्हरेस्ट सर केला ....

पुण्यात जॉब करता करता मला आता 3 वर्ष पूर्ण झाली होती , आई वडिलांचा एकुलता एक मुलगा घरट्यातून निघून या पुणे शहरात आपलं अस्तित्व निर्माण करू पाहत होता. वयाची पंचविशी गाठली तरी आई वडिलांना सोडून राहणे मला काय जमलेलं नाही, तिकडे आई वडिलांचं हि तेच हाल होतं.

आई हा माझा सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा विषय, आई सोबत माझ खूपच चांगल जमतं , लहानपणा पासून आईने खुप लाड पुरवले माझे. आईच्या बाबतीत माझा स्वभाव खूपच हळवा. काय माहित, पण "आई" या टॉपिक वर मी ५ मिनिटे जरी बोललो तरी डोळ्यातुन अश्रुधारा चालू होतात .. इतका हळवा असण्याच कारण म्हणजे आईचा स्वभाव........ खूपच मनमोकळा, हसमुख आणि तितकाच इनोसंट .. शरीर एकदम काटक, हालचाली पण खूप चपळ .. शुभ्र वर्ण आणि चेहऱ्यावर तेज ....
तिच्याकडे खूप किस्से असतात सांगायला आणि सगळ्यांना हसवयला .. अगदी पहिल्या भेटीतच तिचा खूप चांगला रेपो जमतो सगळयासोबत.
स्वयंपाकाबद्दल तर काय बोलायचे, उत्तम, स्वादिष्ट जेवण बनवण्यात तिचा हात कोणीही पकडू शकत नाही, मुलाला आवडीचे पदार्थ खाऊ घालणे हा जणू तिचा छंदच आहे. तिच्या ह्या मनमोकळ्या स्वभावामुळे आमच्या घरी नातलगांची नेहमीच खूप रेलचेल असते .. माणसं कशी जोडावी हे तिच्या पेक्षा चांगलं कोणी शिकवू शकणार नाही.

३० वर्षा पूर्वी एका छोट्या खेड्यातून सोलापूर शहरात आलेली आई, खेड्यात जेवढ्या मनमोकळे पणाने ती वावरत होती तेवढं शहर तिला रुचला नव्हतं, शहरात एकटी फिरणे, प्रवास करणे, खरेदीला जाणे या पेक्षा घरात राहणे ती जास्त पसंद करते.

एरवी खूप हसत खेळत राहणारी आई काही दिवसापासून मानेच्या दुखन्याने त्रस्त होती , मानेच दुखणं तिला आता सहन होण्यापलीकडे गेलं होत, पण हॉस्पिटल ला जायला खूप घाबरायची ती. त्यात अलोपॅथीच्या गोळ्यांची अलेर्जी होती तिला. अलोपॅथी चे साईड इफेक्ट्स नकोत म्हणून आम्ही सोलापूर मधेच होमेयोपॅथीक डॉक्टर कडे गेलो, १ वर्ष ट्रीटमेंट घेऊन सुद्धा प्रकृतीत काही सुधारणा नव्हती. सततच्या मान दुखीमुळे आई पण बेहाल झाली होती आणि आम्हला हे तिचे हाल बघवत नव्हते.

असेच एकेदिवशी पुण्यातील दर्डा डॉक्टरबद्दल माहिती मिळाली .. त्यांच्या होमेयोपॅथीक ट्रीटमेंट मूळ मानेच्या दुखण्यावर बऱ्याच लोकांना गुण आला होता, आता आम्ही सगळे आईला फोर्स करू लागलो होतो कि आपण पुण्याच्या डॉक्टर ला दाखवू .
पण पुण्यात जायला सारख ना-नु करायची ती, आम्हला वाटायचं कि तिला मोठाले रस्ते, गर्दी, गोंगाट, ट्राफिक चा त्रास होतो म्हणून नाही म्हणतीय. पण कारण वेगळंच होतं .

पुण्यात खूप उंच उंच इमारती आहेत, आज काल हॉस्पिटलच्या इमारती पण खूप उंच उंच असतात, आता वरच्या मजल्यावर जायला लिफ्ट चा वापर करावा लागणार, तिला प्रॉब्लम होता तो "लिफ्ट" चा, लिफ्ट ला खूप खूप खूप जास्त घाबरते ती, एक वेळेस १००० पायऱ्या चढेल पण लिफ्ट चा वापर नाही करायची. पण काही करून आम्ही तिला राजी केलं.

पुण्यात माझ्या मामाची मुलगी राहते, अनु .... माझ्या इंजिनिर बनन्या मध्ये तिचा मोलाचा वाटा होता, कोणते करिअर निवडायचं इथं पासून लाईफ मधल्या सगळ्याच बाबतीत तिने खूप खूप मदत केली, या अनोळखी शहरामध्ये ती एक आधार स्तंभ होती आमचा ..

पुण्यात आल्यावर माझ्या घरी राहायला यायचं असं माझ्या मामाच्या मुली ने आई वाडीलांना बजावलं होत फोन करून, पुण्यातील पहुनचाराची जबाबदारी तिने घेतली होती. पण एक मोठा प्रॉब्लम होता, तिचं घर होत ते नवव्या मजल्यावर..

संध्याकाळी आई चा मला कॉल आला "उद्या येतोय पुण्याला आम्ही, दवाखाना आटपून अनु कडे जाऊ ......" थोडासा पॉज घेऊन आई म्हणते ..
"पण काय रे .. अनुचं घर तर नवव्या मजल्यावर आहे .. कसं करायचं " आई बारीक आवाजात घाबरत घाबरत म्हणाली. लिफ्ट मध्ये चढण्यापेक्षा आजार सहन केलेला बरा असा तिला वाटायचं.

आई ला धीर देण्यासाठी मी म्हणलो "अगं, काळजी कशाला करते आम्ही आहोत कि सगळे, तुला जर एकदम नऊ मजले लिफ्ट ने जाऊ वाटत नसेल तर आपण ३-३ मजले जाऊ, लिफ्ट थांबवू आणि परत जाऊ ... आणि तरी पण भीती वाटत असेल तर आपण हळू हळू आरामात पायऱ्या चढत जाऊ ".
आई ला थोडं बरं वाटलं पण भीती काय कमी झाली नाही .

तो दिवस उजाडला, आई वडील दोघे पण पुण्याला आले.. मध्यम वर्गीय माणूस हॉटेल मध्ये खूप क्वचितच जातो, तसं आई वडील पण खूप कमी वेळा हॉटेल ला गेले होते .. म्हणून मी त्यांना पुण्यातील चांगल्या हॉटेल मध्ये जेवायला घेऊन गेलो, मग तिथून आम्ही दवाखान्या कडे वाटचाल केली, दवाखाना झाला, डॉक्टरांनी गोळ्या औषधे दिली .. आता आमची पाऊले अनु च्या घराकडे निघाली ..

दिघी इथल्या खूप मोठ्या सोसायटी मध्ये "बि" विंग च्या नवव्या मजल्यावर ती राहते... आम्ही सोसाईटी मध्ये पोहचलो, आईच्या मनात धुकधुक वाढत हाती. मी आई कडे पाहत होतो, टोलेजंग इमारतीला पाहून तिला अजून घाबरल्यासारख झालं.

" चल आईss , लिफ्ट आलीss" मी म्हणालो..... , गगनचुंबी इमारती ला पाहण्यात गुंग असलेल्या आईला आता लिफ्ट चढायची आहे हे लक्षात आलं.

" नको रे .... आपण पायऱ्या चढत जाऊ " मृदू आवाजत म्हणाली .
मी आणि वडील तिला धीर देत म्हणलो " अगं काही नाही होत, ३-३ मजले चढायचं ठरलाय ना आपल, चल, आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत".

मनात नसताना सुद्धा आम्ही म्हणतोय म्हणून तिने लिफ्ट मध्ये प्रवेश केला, वडीलांनी इशाऱ्या मध्ये ९ नंबर दाबायला सांगितलं, आता आम्ही ३ ऱ्या मजल्यावर न थांबता नवव्या मजल्यावर थांबणार होतो .. मी नऊ नंबर दाबला, लिफ्टचा दरवाजा बंद झाला.

मी आईच्या शेजारीच उभा होतो, आई ने ऑलरेडी डोळे बंद केले होते, लिफ्ट थोडीशी हलली आणि आई घाबरली, तिने पटकन मला मिठी मारली आणि माझा हात घट्ट पकडला .........

लिफ्ट वर जाण्यासाठी लागलेले २० सेकंद मला २० वर्ष मागे घेऊन गेले, लहानपणीचं तिचं एवुलस बाळ कोणत्याही गोष्टीला घाबरला कि असेच तिला मिठी मारून तिचा हात पकडायचा .. आता वीस वर्षानंतर मी आईच्या भुमिकेत आलो होतो आणि आई तिच्या बाळा प्रमाणे मिठी मारून उभी होती, तिच्या खांद्यावर हात टाकून तिला धीर देत होतो, हा क्षण मनात खूप घर करून गेला. आई वडील उतरत्या वायला लागले कि मुलगा आणि पालक यांचे पात्र बदलतात ... मुलाला पालकाचा रोल निभावायला लागतो आणि आई वडिलांना पाल्याचा...

"टिंग" आवाज आला आणि लिफ्ट उघडली ... आई ने सुटकेचा निःश्वास सोडला .. ती पटकन लिफ्टच्या बाहेर आली, मी आणि वडील सुद्धा बाहेर पडलो ... बंद होत्या लिफ्ट कडे आई एकदम हसत बघत होती ... ज्या भीती ला मनात जोपासून, त्याला खत पाणी घालून तिने "एव्हरेस्ट" एव्हढा मोठ बनवला होता, त्याला तिने आज पार केलं होतं, त्याचा आनंद पाहताच दिसत होता.

आई कडे पाहून माझ्या मनात मी हि हेच शब्द पुटपुटले

"आई ने एव्हरेस्ट सर केला........ "

- विठ्ठल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगले लिहिले आहे. तुमच्या आईची लिफ्टबद्दलची भिती कायमची दूर झाली असेल आता. यावरून एका नातेवाईकाच्या सासूची आठवण झाली. बरीच जुनी गोष्ट आहे, पण केवळ इंजेक्शन नको म्हणून त्या बाईने मोतीबिंदूचे ऑपरेशन करायला नकार दिला आणि उरलेले आयुष्य आंधळे रहाणे पसंत करून, खरडत खरडत काढले, ज्यामुळे घरातल्या इतरांना पण प्रचंड मनस्ताप झाला.

<<< त्यांच्या होमेयोपॅथीक ट्रीटमेंट मूळ मानेच्या दुखण्यावर बऱ्याच लोकांना गुण आला होता, आता आम्ही सगळे आईला फोर्स करू लागलो होतो कि आपण पुण्याच्या डॉक्टर ला दाखवू .>>>
ही चूक करू नका. साखरेच्या गोळ्या खाऊन दुखणे बरे होणार नाही. खऱ्याखुऱ्या डॉक्टरला दाखवून उपाय करून घ्या.