काही आठवणी

Submitted by हरिहर. on 18 May, 2018 - 01:55

नातेवाईकांकडे लग्नकार्याला जायचा योग आला. नेहमीचेच वातावरण. बऱ्याच दिवसांनी भेटलेले नातेवाईक. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ऊत्साह. खळखळून हसनं. बरचसं खरं, थोडंफार खोटंही. एकमेकांच्या चौकशा, ख्याली खुशाली वगैरे. लहाण मुलांची धावाधाव, यजमानांची तारांबळ, पाहूण्यांच्या फर्माईशी, पंगतीतले आग्रह, या सगळ्यात अगदिच विसंगत वाटनारी केटरर्सची निर्विकार वाढपी मंडळी. एकूण वातावरणात छान ऊत्साह भरला होता. मी ही जरा बाजूला दोन खुर्च्या ओढून आत्याची मुलगी सुरभीबरोबर बोलत बसले होते. बोलत म्हणजे हातात सरबताचा ग्लास खेळवत श्रवण भक्ती करीत होते नेहमी प्रमाणे. मला हे अगदी ऊत्तम जमतं. आवडतही. बाईसाहेबांची गाडीही पटापट रुळ बदलत धावत होती. नुकतीच दुबईवरुन परतल्यामुळे विषयांना तोटाचा नव्हता. कधी 'नविन शिकलेल्या पाककृती’वरुन गाडी दुबईतल्या 'कडक नियम आणि शिस्तीवर' जाई तर मधेच खुप दिवस हवी असलेली साडी अमुक तमुक ठिकाणी कशी मिळाली यावरून 'आत्याची तब्बेत' यावर घसरायची. मधुन मधुन "तुझं कसं चाललय?" हे धृपद येतच होतं. ईतक्यात तिचा छोटा मुलगा पळत आला. मोठा गोड छोकरा होता. स्वारी खेळून दमली असणार. आता त्याला मम्मी हवी होती. मग त्याचे खुर्चीच्या पाठीला लोंबकळणे, आईच्या पदरात तोंड लपूऊन गोल गिरक्या घेणे सुरु झाले. या सर्वाला कंटाळून मग त्याने मम्मीच्या हातावर डोकं ठेऊन मधे मधे "मम्मी…मम्मी.." अशी आळवणी सुरु केली. सुरभी त्याच्या गालावर, डोक्यावरून हात फिरवत माझ्याशी बोलत होती.

आता तिची गाडी "हा कसा त्रास देतो, हुशार आहे पण फार हट्टी आहे, त्याच्यापासून काही लपवायची सोय नाही" या सारख्या गोड तक्रारींची स्टेशने घेत धावायला लागली. गडी आता जाम कंटाळला असणार. कारण त्याचा "मम्मी…मम्मी…" चा सुर आर्जवीपणाकडून चिडचिडेपणाकडे झुकायला लागला होता. मग सुरभीने बाजूची पर्स घेऊन त्यातली छोटी पाण्याची बाटली काढून झाकण ऊघडून त्याला दिली. पाणी पिल्यावर तिने बाटली व्यवस्थीत ठेऊन पर्समधला मोबाईल त्याच्या हातात दिला. माझे कान सुरभीकडे आणि नजर त्याच्याकडे होती. त्याने खुप सराईतपणे टच आयडी वापरुन मोबाईल सुरु केला. (कमाल झाली. सुरभीने त्याचाही फिंगर प्रिंट स्कॅन केला होता तर.) शेजारची खुर्ची जवळ ओढत आणली आणि तिच्यावर न बसता समोर गुडघे टेकून बसला आणि खुर्चीवर दोन्ही हाताचे कोपर ठेऊन तो मोबाईलबरोब खेळायला लागला. हे सगळं पाहून सुरभी कौतुकाने म्हणाली "अगं, मलाही त्या मोबाईलमधलं फारसं काही कळत नाही पण याला काही सांगावं लागत नाही बघ." मी कधी त्याच्याकडे तर कधी त्याच्या आईकडे आळीपाळीने पहात राहीले काही क्षण आणि अचानक मला त्या माय-लेकारांची खुप किव वाटायला लागली. लग्नामुळे 'एम फील' मधेच सोडून नवऱ्याच्या मागे गेली पाच सहा वर्ष देशोदेशी फिरणारी ती आई आणि तिचं स्मार्ट फोन लिलया हाताळणारं गोड, स्मार्ट पिल्लू यांच्या विषयी माझ्या मनात अतीव कणव दाटून आली. चक्क डोळे भरुन येतायत की काय आता, असं वाटायला लागलं. सुरभी दंडाला धरुन हलवत विचारत होती "काय झालं? बरं वाटत नाहीए का?" पण मला बधिरल्यासारखंच झालं होतं जरा. मी माझ्या बालपणाबरोबर या ऊगवत्या पिढीच्या बालपणाची तुलना करत होते. या मुलांच्या बालपणातुन कोण कोणते आनंदाचे ठेवे वजा झालेत, नामशेष झालेत ते पहात होते.

मला आठवत होती माझी आई, आज्जी, अप्पा, आमचं घर, त्या घरातलं माझं बालपण…

आम्ही तिन भावंडं, आई, अप्पा आणि आज्जी असं आमचं छोटं कुटूंब. त्यावेळेच्या ईतर कुटूंबांच्या मानाने छोटंच म्हणावं लागेल. कारण मला आठवतं, त्यावेळेस मला माझ्या मैत्रीणीचा फार हेवा वाटे कारण तिच्या घरी तिचे काका-काकू आणि त्यांची मुलंही असायची. रामाच्या मंदिराशेजारी आमचं चार खोल्यांचं, कडीपाटाचं घर होतं. त्याचा दर्शनी भाग संपुर्ण लाकडी होता. समोर लहाण अंगण आणि फुटभर ऊंचीचा दगडी ओटा. ओट्याला लागूनच गावाचा मुख्य रस्ता गेलेला. आमच्या डाव्या बाजूचं घर म्हणजे सोनाराचं दुकान होतं. पुढील भागात बैठ्या लाकडी कपाटामागे बसुन सोनारकाका काम करत आणि मागील बाजू ते रहाण्यासाठी वापरत. गावातील बहूतेक घरांना परसदार होते. तसे ते आमच्या घरालाही होते. तिथे आईने जास्वंद, मोगरा, भरपुर कृष्णतुळशी वगैरे लावल्या होत्या. घोसाळ्याचा आणि तोंडल्याचा वेलही आईने भिंतीवर व्यवस्थीत चढवला होता. पाणी तापवण्याचा बंब, सरपण, लहानशी बाज या सारखा नेहमीचा पसारा तिथे पडलेला असे. समोरच्या बाजूची खोली मोठी होती. ती आमची बैठकीची खोली. तिथे भिंतीवर विणा वाजवणारी शारदा, रिध्दी-सिध्दींसोबत गणपती, आईने केलेला शर्टच्या गुंड्यांपासून बनवलेला व फ्रेम केलेला हंस आणि मोरावर बसलेला कार्तीकेय असे फोटो होते. कार्तीकेय तसा अनोळखी देव. अप्पा मद्रासला गेले होते तेंव्हा त्यांनी आणलेला. बाजुच्या भिंतीवर एक फळा टांगलेला. बाजूच्या कोनाड्यात पांढरे, रंगीत खडू असत. त्या फळ्याचे अनेक ऊपयोग असत. संध्याकाळचा अभ्यास करण्यासाठी, भांडलो की एकमेकांशी बोलण्यासाठी, अप्पांकडे एखाद्या गोष्टींची कबुली द्यायची हिंमत नसेल तर ती देण्यासाठी. नविन म्हण, सुविचार वाचले की तेही ईथे लिहिले जायचे. म्हणींची सगळ्यात जास्त भर आज्जीची असे. ती लिहित नसे पण बोलताना म्हणींचा खुप वापर करे. मग त्या म्हणी आठवून आठवून ताई फळ्यावर लिहून ठेवी. अगदी हसुन पुरेवाट होईल अशा म्हणी असत आज्जीच्या.

या फळ्याच्या खुप गमतीदार आठवणी आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. एकदा आई कशावरुन तरी मला खुप ओरडली. मलाही राग आला. मग माझं नेहमीचं अस्र मी बाहेर काढले. दिवसभर आईबरोबर बोलले नाही. आईनेही माझा रुसवा काढायचा प्रयत्न केला नाही. दुपारपर्यंत मी अस्वस्थ झाले. पण 'मी का माघार घ्यायची?' म्हणून मीही बोलले नाही. शेवटी ताईनेच समजूत काढली. म्हणाली "आज तुझी आवडती भाजी करायला सांगुयात आईला?" मला दही घालून केलेल भरीत खुप आवडे. मी खुष पण बोलायचं कसं? शेवटी ताईनेच माझ्यावतीने फळ्यावर लिहीलं 'मला आज माझी आवडती भाजी हवीये.' संध्याकाळी सगळे पानावर बसलो तर आईने ताईचे अक्षर पाहून तिची आवडती भाजी केलेली. माझं तोंड अगदी पहाण्यासारखं झालेलं. आज्जीच्या हा प्रकार लक्षात आल्यावर हसुन म्हणाली "लिहिल तो खाईल". मग अप्पाही मोठ्ठ्याने हसुन म्हणाले "रुसला तो फसला". अशा खुप गमतीदार आठवणी आहेत या फळ्याच्या.

आई-अप्पांनी आमच्यावर ठरवून काहीही संस्कार केले नाहीत कधी. त्यांच्या वागण्यातून ते आपसुकच होत गेले. त्यामुळे ते अगदी ठळकपणे कोरले गेले. आम्हाला कधीही अभ्यासाला बसवावं लागलं नाही की स्वतःची कामे स्वतःच करायला शिकवावं लागलं नाही. 'एकमेकांना मदत करावी','दुसऱ्याच्या गरजेला धावून जावं' किंवा 'कोणतेही काम लहाण नसते' वगैरे तात्पर्य सांगणाऱ्या गोष्टी कधी आम्हाला कुणी सांगीतल्या नाहीत. स्वयंपाकघरात एका बाजूला सहा इंच ऊंचीचा ओटा होता. त्यावरच साधारण पाच फुट लांबीचा दुसरा ऊंच ओटा होता. त्यावर गॅसची शेगडी असे. आई खाली बसुन पोळ्या लाटत असे आणि अप्पा ऊभे राहून पोळ्या भाजत असत. कधी कधी अप्पांना कोर्टाचे काम असले की ताई चौरंगावर ऊभे राहून पोळ्या भाजत असे. संध्याकाळी जेवणं ऊरकली की दुसऱ्या दिवसाची काही भाजी निवडायची असेल तर आम्ही सगळेच मागील अंगणात निवडत, निसत बसायचो. त्यावेळेसही आईपेक्षा अप्पांचं भाजी निवडनं नेटकं असायचं. आई 'बाजूला' बसली की आज्जीचं आमच्यावर बारीक लक्ष असे. "तिला कावळा शिवलाय, शिवाशीव करु नका." म्हणून रागवायची. मग स्वयंपाकघर अप्पांच्या ताब्यात असे चार दिवस. आम्ही सगळे या चार दिवसांची फार आतूरतेने वाट पहायचो. कारण स्वयंपाक अप्पा करायचे. आई सुगरणच होती पण अप्पांच्या हाताला काही वेगळीच चव असे. पदार्थ मोजके आणि ठरलेलेच करत पण फार चविष्ट करत. साधं थालीपीठ लावलं तरी सुंदर होत असे. भांडी घासायचं काम आम्हा मुलांचं. ताई घासुन देई आणि मी व माझा छोटा भाऊ विसळत असू. छोट्या भावाचे नाव सुहास, पण आज्जी लाडाने दादा म्हणे. त्यामुळे आम्हीही दादाच म्हणायचो. जरा मोठे झाल्यावर, ईतरांच्या घरातलं पाहून लक्षात आलं की 'पुरुष' स्वयंपाकघरातील कामे करत नाही. कमाल आहे. आजही आम्ही दिवाळीला दादाकडे आलो की आवर्जून एखादवेळेसतरी सगळे मिळून भांडी घासतो आणि परसदार मीस करतो.

अप्पा तालूक्याला कोर्टात वकीली करत. अशीलांपैकी बरेचसे ओळखीचेच असत. आजूबाजूच्या वाडीवस्तीवरील. त्यांची घरची, आर्थीक परिस्थीती अप्पांना माहीत असे. त्यामुळे ते बरेचदा फी घ्यायचे टाळायचे. आमच्या घरी दुधाचा रतीब घालायला राऊतात्या येत. खुप सज्जन माणूस. घर कसेबसे चालेल ईतकीच कमाई. थोरल्या भावाबरोबर त्यांचा कसलासा कज्जा सुरु होता. अप्पा त्यांना स्वखर्चाने तालूक्याला घेऊन जातच पण दुधाच्या रतीबाचे पैसे वेळच्या वेळी त्यांच्या घरी पोहचते करीत. अशा वेळेस ते आईपुढे संकोचाने वावरत. आई जेंव्हा म्हणे "असुद्या हो, येते वेळ कुणा कुणावर. आपण आपल्या परीने होईल ते करावं." मग अप्पा मोकळेपणाने हसत. आता आठवत नाही पण एअर फ्रान्स असाव बहूधा. त्यांची जाहीरात असे. अप्पांनी त्यांना माझ्या नाव पत्त्यासह पत्र पाठवलं. एक महिन्यानंतर माझ्या नावाचं जाड कागदी पार्सल आलं. आईने ते न फोडता व्यवस्थीत ठेवलं. संध्याकाळी शाळेतून आल्यावर आम्ही सर्वांनी ते बारकाईने पाहीलं. भारताबाहेरुन आलेलं ते पार्सल, त्यावरची वेगळी भाषा, तो भारी कागद, तिकीट. वर प्रिंट केलेलं माझं नाव चार वेळा तपासुन पाहीलं. सगळेच गोंधळलो. आम्ही अप्पांकडे पाहीलं. त्यांचा काळजीने भरलेला चेहरा पाहून आम्हीही काळजीत पडलो. आज्जी म्हणाली "काय असेल ते असेल. फोडून पहा. मी बसलीये ईथे. काही होत नाही." किती धिर वाटला असेल आज्जीचा म्हणून सांगू. मी हलक्या हाताने पार्सल फोडलं, आणि आतून सळ्ळकन दोन डझनभर तरी चकचकीत फोटो बाहेर घरंगळले. पोस्टकार्ड साईजचे, वेगवेगळ्या कोनातुन टिपलेले एअर फ्रान्सच्या विमानांचे सुंदर फोटो. मी हरखुन विस्फारलेल्या नजरेने ते फोटो पहात होते. सोबत शुभेच्छा लिहिलेला निळसर चमकदार कागद. मग आईने अप्पांनी केलेला पत्रव्यवहार सांगीतला. फोटो अगदी माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर आलेले. मी अप्पांकडे पाहीलं. ईतक्या वेळ ते काळजीचे नाटक करत होते. पण आता छान मिश्कील हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं. ईतकं निर्व्याज हसू आणि ईतकं सुंदर गिफ्ट मी परत कधी पाहीलं नाही. मी फोटो बाजूला सारले आणि अप्पांच्या गळ्यात पडून रडायलाच सुरवात केली. सगळे कौतूकाने हसत होते आणि मी रडत होते. अप्पा हलक्या हाताने मला थोपटत होते. संध्याकाळी आईने ओवाळले तेंव्हा ते अगदी रात्री झोपी गेले तोपर्यंत फोटो माझ्या मुठीतच होते.

खरं वाटनार नाही पण त्या वेळी आमच्या गावात फार तर चार किंवा पाच टिव्ही होते. एक ग्रामपंचायतीचा आणि चार अजून कुणाकूणाकडे. नाव आठवत नाही पण संध्याकाळी ७:३० च्या सुमारास एक फार सुंदर मालीका लागायची. ज्यांच्याकडे टिव्ही होता त्यांची मुलगी माझ्याच वर्गात होती. तिच्याकडून मालीकेविषयी ऐकले आणि मग मी त्यांच्याकडे टिव्ही पहायला जायला लागले. छान रंगले होते मी मालीकेत. एक भाग संपला की पुढच्या आठवड्यात काय होणार याची प्रचंड ऊत्सुकूता लागायची. मालीकेचे शिर्षकगीतही आता आता पर्यंत माझ्या लक्षात होतं. एक दिवस वर्गात बाईंनी अचानक सराव परिक्षा जाहीर केली. दुपारच्या जेवणाच्या सुट्टी नंतर बाईंनी फळ्यावर प्रश्न लिहिले आणि ऊत्तरे लिहायला सांगीतली. दहा पैकी मार्क असत अशा परिक्षेला. शाळा सुटताना बाईंनी प्रत्येकाच्या पाटीवर गुण लिहून दिले. बाई गुण जितके जास्त तितक्या बारीक अक्षरात लिहीत व कमी असतील तर मोठ्या अक्षरात लिहीत. मी नेहमी प्रमाणे ऊड्या मारतच घरी आले. आईला पाटी दाखवायची घाई झालेली. मला माहीतच नव्हते, जिच्याकडे मी टिव्ही पहायला जायचे तिला पाच पेक्षाही कमी गुण मिळाले होते. नेहमी प्रमाणे मी तिच्याकडे मालीका पहायला गेले. मी बसनार ईतक्यात काकू आतून आल्या. एकदा माझ्याकडे व एकदा मैत्रीणीकडे रागाने पाहून त्यांनी खटकन टिव्ही बंद व केला बाॅक्सचे शटर लाऊन घेतले. (त्या वेळी टिव्ही ब्लॅक-व्हाईट असायचे व त्याला लाकडी शटर असायचे.) मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. संध्याकाळी मी ताईला सर्व काही सांगीतले. अबोल्यातच जेवण केलं. गप्प गप्प राहूनच आईला मदत केली. आईने विचारलही "काय झालं? शाळेत भांडली वगैरे का कुणाशी? कुणी बोललं का काही? गुण तर चांगले मिळालेत की!" माझं एक नाही दोन नाही. मग अप्पाही अस्वस्थ झाले. मुलांनी चुका कराव्यात, व्रात्यपणा करावा त्यांची हरकत नसे. कधी गुण कमी मिळाले परिक्षेत तरी रागावत नसत. मात्र त्यांना काही सांगीतलं नाही, लपवून ठेवलं तर ते दुखावत. आपली मुलं आपल्याशी मोकळेपणाने बोलायला घाबरत असतील तर ती आपलीच चुक आहे असं त्यांना वाटायचं. शेवटी त्यांनी ताईला खोदून खोदून विचारलं. 'तुला सांगीतल्या शिवाय रहायची नाही ती’ म्हणाले. ताईनेही सांगून टाकले. मीही मग त्या मालीकेचे नाव टाकले. शाळा, मैत्रीणी, खेळ इत्यादी मधे मी तो प्रसंग विसरुनही गेले. मधे चार-पाच दिवस गेले आणि दोन माणसे पत्ता विचारत घरी आली. अप्पांशी बोलली आणि माळ्यावर चढली. ही काही घर शाकारायची वेळ नव्हती. मला समजेना. तोवर दारात एक गाडी येऊन थांबली. अप्पांनी काळजीपुर्वक एक बाॅक्स ऊतरवून घेतला. खाकी रंगावर ठसठशीत काळ्या इंग्रजी अक्षरात लिहिलं होतं Sharp. तोवर त्या दोन माणसांनी ऍंटीना लावला होता. त्यातल्याच एकाने खाली येऊन बाॅक्स मधून टिव्ही काढून आईने मोकळ्या केलेल्या टेबलवर ठेवला. त्याला ऍंटिनाची वायर जोडली. विजेची पिन योग्य ठिकाणी लावली. मग याचे घरातून व दुसऱ्याचे छतावरुन सुरु झाले. "जरा डावीकडे" "जरा ऊजवीकडे" "आलं का?" "दिसतय का?" दहा मिनीटात ऍंटिना ऍडजेस्ट झाला. अप्पांनी चक्क कलर टिव्ही आणला होता. गावातला पहिला रंगीत टिव्ही. सगळ्यांना खुप आनंद झाला होता. संध्याकाळी टिव्ही पहायला शेजारचे, घरातले मिळून बाहेरची खोली भरुन गेली होती. मला मात्र टिव्ही घेतल्याच्या आनंदापेक्षाही अप्पांना 'माझा अपमान' त्यांचा स्वतःचा अपमान वाटला याचं समाधान जास्त होतं. आणि त्यावर त्यांनी काढलेला मार्ग तर भारीच होता.

आई-अप्पा श्रध्दाळू होते पण कर्मठ नव्हते, धार्मीक होते पण धर्मभोळे अजीबात नव्हते. आईचा आठवड्याचा दर सोमवारी ऊपवास असे. चतुर्थीही करी. गणपतीवर तिची फार श्रध्दा. पण तिने आम्हाला ऊपवासाचे शास्रीय महत्त्व सांगीतलं, धार्मीक महत्व आमच्या मानन्यावर सोडलं. आमच्या घरी ऊपवासाला कधी साबुदाण्याची खिचडी केलेली मला आठवत नाही. आवडायची सगळ्यांना. ताकात साबुदाणे भिजवलेली खिचडी आई करायचीही छान पण पोह्याला, सांजाला पर्याय म्हणून नाष्ट्याला करायची. तिचा ऊपवास म्हणजे लिंबू-पाणी. तो सोडायचा दुसऱ्या दिवशी. तिच्या ऊपवास मोडण्याच्या कल्पनाही वेगळ्या होत्या. ऊपवासाला न चालणारं काही खाण्यात आल्यामुळे तिचा ऊपास मोडत नसे. अकारण कुणावर रागावण्याने, चिडचीड केल्याने, शक्य असुनही कुणाला मदत करायचा कंटाळा केल्या मुळे तिला ऊपास मोडल्यासारखा वाटायचा. लहाण मुलांनी ऊपवास करू नये यावर मात्र आई ठाम असे. घरी गणपती यायचे, नवरात्रात घट बसायचे. आई सगळं निगूतीने करायची. पण तिने कधी वैभवलक्ष्मी सारखी व्रते केली नाहीत. आईची मते तशी लवचीक असत. कुणी पटवून दिलं तर आई तिची मते बदलायची. वर "बरं झालं बाई, तु सांगीतलस ते. मला माझंच खरं वाटत होतं ईतके दिवस." अशी प्रांजळ कबुलीही देई. पण काही बाबतीत तिची मते खुप ठाम असत. गुढी पाडव्याला कडूलिंबाची पाने खान्यापासुन आमची कधी सुटका झाली नाही. आज्जीला कारल्याची भाजी पहायलाही आवडत नसे. पण या बाबतीत सासूचं सुनेपुढे काही चालत नसे. शनीवारी अप्पा बाजारातून आले की आज्जी पिशवीकडे पाही. जर कारली दिसली तर तिचं तोंड बारीक होई. अशा वेळेस आम्हाला आज्जीची गम्मत वाटे, किवही येई. पण अशा बाबतीत आईपुढे कुणाची मात्रा चालत नसे. अप्पांची मतेही देव-धर्म या बाबतीत आईपेक्षा फारशी वेगळी नव्हती. घरी दहा दिवस गणपती येत तेंव्हा अप्पा खुप आनंदात असत. चार दिवस अगोदरच अप्पा आणि आम्ही मुलं तयारीला लागायचो. आजोबांच्या काळातला एक मजबूत लाकडी टेबल होता माडीवर. तो पुढच्या दालनात येई. आई त्यावर पडदे, शाली वगैरे टाकून देई. मग दोन दिवस आम्हाला सुचेल ती आरास आम्ही करायचो. अप्पांचं मार्गदर्शन असायचंच. सुचनाही असायच्या.

गावात मुर्तींचा स्टाॅल लागायचा. मग आमची वरात मुर्ती निवडायला जायची. बहुतेकदा एकमत होई. नाहीच झाले तर अप्पा कुठली तरी भडक रंगाची मुर्ती निवडायचे. मग आम्ही घाई करुन आमच्यातले मतभेद दुर करायचो आणि आवडलेल्या मुर्तींपैकी एका मुर्तीवर एकमताने फुले टाकायचो. मग दुकानदार ताईच्या नावाची चिठ्ठी मुर्तीच्या सोंडेत अडकवायचा. ताई मोठी की नाही, म्हणून. आम्ही भावंडे आजही ज्या एकदिलाने रहातो त्याचं मुळ हे अप्पांनी अशा पद्धतीने रुजवलं आमच्यात. मग मुर्ती वाजत गाजत घरी येई. पुढे देवाभाऊची हलगी असे, मागे अप्पांच्या हातात नविन कापड टाकलेली मुर्ती आणि आम्ही. आईने पायावर पाणी टाकले की अप्पा घरात येत. शेटेकाका आलेले असत. मग बराच वेळ पुजा चाले आणि प्राणप्रतिष्ठा होई. मग दहा दिवस अप्पा भलतेच खुशीत असत. त्यांनी कधी शिवाशीव पाळली नाही पण हौस म्हणुन सोवळं नेसून पुजा करत. पण अप्पांनी देवाकडे कधी काही मागीतलं नाही. त्यांचं म्हणनं असे "आपण देवाची लेकरे, लेकराला काय हवं ते त्याला न सांगता कळतं. आपलं हित आपल्याला नाही कळत, त्याला कळतं, त्यामुळे योग्य ते तो देतोच न मागता. आपण फक्त छानपैकी थॅंक यू म्हणायचं मनापासुन." या दिवसात अप्पांचा आणि बाप्पांचा सदैव संवाद चाले. त्यात कुठलाही दंभ, नाटक, मुद्दामहून करनं नसे. अत्यंत सहजते हे चाले. कामावर जाताना "चला, येतो देवा." म्हणत आईबरोबर बाप्पांनाही विचारत. ती मुर्ती नसेच आमच्यासाठी. पाहूणे आलेत घरी असं समजून सगळे व्यवहार चालत. सकाळचा पहीला चहा बप्पाला मग सगळ्यांना. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणाचही तसच. रविवारी सुट्टी. त्यामुळे आम्हा मुलांचा दंगा प्रचंड. भांडण तर ठरलेलेच. कधी बाहेरच्या खोलीत भांडायला लागलो की आतून आज्जी हुंकारे. आमचे आवाज चटकन खाली येत. बप्पापुढे कसं भांडायचं म्हणुन जिभा चावत आम्ही बाहेर नाहीतर परसदारी येत व पुन्हा भांडण कंटिन्यू केलं जाई. रात्री झोपायच्या अगोदर अप्पा गणपतीच्या पाया पडत. 'मंगलमूर्ती मोरया’ झालं की "देवा झोपा आता, ऊशीर झाला" म्हणत झोपायला जात. अप्पांचं पाहुन हळु हळू आम्हीही बाप्पाशी बोलायला लागलो. लग्नानंतर सासरी गणपती आले तेंव्हा माझी ही सवय पाहून नवरा हसला होता. पण आता नवराही कामावर जाताना "बप्पा येतो, भेटू संध्याकाळी" म्हणुन जातो. आणि रात्री झोपायच्या अगोदर चिरंजीवही ईवलेसे हात जोडून "गुड नाईट बप्पा" म्हणतात. अप्पांनी कुठलही कर्मकांड नाही असा धर्म आणि देवावर भिती ऐवजी मैत्रीयुक्त श्रध्दा आम्हाला शिकवली. "देवबाप्पा कान कापील" म्हणून कोणी लहाणग्यांना दटावलं तर मला हसू येते, ते त्यामुळेच.

आई-अप्पा दोघांनाही साहीत्याची विषेश आवड. माझी मोठी मावशी पुण्याला रहायची. आईचा आणि तिचा नियमीत पत्रव्यवहार असे. अप्पांनी कामाच्या गरजेपोटी घरी फोन कनेक्शन घेतले होते. पण आईला पत्र लिहिण्यातच जास्त रस असे. मावशीला लिहिलेल्या प्रत्येक पत्रात शेवटी एक दोन पुस्तकांच्या नावाचा किंवा लेखकांचा ऊल्लेख असे. मावशी जमेल तशी पुस्तके घेई व यात्रेच्या, कार्याच्या निमित्ताने गावी येई तेंव्हा घेऊन येई. 'अप्पासाहेबांची' आवड माहीत असल्या मुळे अप्पांना दिवाळी, वाढदिवस या निमित्ताने ज्या भेटी मिळत त्यात बहुतकरुन पुस्तकेच असत. अप्पांना कोणतेही साहीत्य वर्ज्य नसे. अनेक लेखक त्यांना आवडत. पुस्तक आवडल्याचे अभिप्राय ते आवर्जून पत्राने कळवत. बऱ्याच नावाजलेल्या लेखकांबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते. आम्हाला वाचायची आवड त्यांनी मोठ्या खुबीने लावली. जेवताना एखादा प्रसंग अगदी रंगवून सांगत. खुप ऊत्सूकता वाढली की मग म्हणत "आता बाकीचे ऊद्या सांगेण." पण आम्हाला रहावत नसे. पुढे काय झालं? याची प्रचंड ऊत्सुकता असे. अप्पांचा फारच पिच्छा पुरवला की म्हणत "टेबलावर आहे ते पुस्तक, त्यात वाचा. नाहीतर थांबा ऊद्यापर्यंत." ऊद्यापर्यंत थांबायला कुणाला धिर धरवत नसे. मग ते पुस्तक वाचायची चढाओढ लागे. त्यांचे सर्वात आवडते लेखक, किंवा कवी म्हणूया हवं तर, म्हणजे माऊली. 'ज्ञानेश्वरीकडे त्यांनी धार्मीक ग्रंथ म्हणून जेव्हढे पाहीले त्या पेक्षा जास्त साहीत्य ग्रंथ म्हणून पाहीले. नववा अध्याय त्यांचा विषेश आवडीचा. कधी कधी एखादी ओवी वाचताना अगदी भाराऊन जात. मग मोठ्याने हाक मारत "मनू, ईकडे ये." मग मी निमूटपणे त्याच्या समोर जाऊन बसे. मग ते त्यांना आवडलेली ओवी सोपी करुन मला समजाऊन सांगत. ते सांगत असलेलं सगळ्ळं काही पार डोक्यावरुन जाई. माझा चेहरा पाहीला की त्यांच्या हे लक्षात येई. मग हसुन म्हणत "लहाण आहेस अजून, मोठी झालीस की कळेल सारं. आता फक्त कानावरुन जातायत ते शब्द ऐक फक्त. मग लयीत ती ओवी पुन्हा म्हणून दाखवत. ज्ञानेश्वरी वाचताना कित्येकदा म्हणत "एवढसं पोर, आणि काय ही बुध्दीची झेप!" आणि मग आमच्याकडे खुप वेळ आशा भरल्या डोळ्यांनी पहात रहात. आज कळतं अप्पा काय शोधायचे आमच्यात ते. अशा बाबतीत आमचे अप्पा थोडे वेडेच होते.

अप्पांच्या कोर्टाच्या आवारातून 'शिवनेरी किल्ल्याचं' फार सुंदर दर्शन होई. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शिवनेरी दाखवायला नेलं होतं तो दिवस लख्ख आठवतो. आईने दुधाच्या दशम्या आणि चटणी बांधून दिली होती. कोर्टाच्या आवारातच अप्पांचं ऑफीस होतं तिथे सामान ठेवलं आणि तेथूनच पायी निघालो. वर पोहचल्यावर अप्पांनी सगळ्यांना शिवायीच्या पायावर डोकं ठवायला लावलं. मग गड अगदी बारीक सारीक माहीती देत दाखवला. शिवबाचा जन्म झाला ते स्थळ, पाण्याच्या टाक्या, कडेलोट असं बरच काही.

आज्जी कधीच गेली. आता आई थकली, अप्पाही थकले. दादानेही छान मोठं घर बांधलय गावी. आई-अप्पांचा दिनक्रम बदलला असला तरी जो आहे तो फार शिस्तीत बांधून घेतलाय. त्यांना माझी आठवण आली किंवा मला त्यांची आठवण आली की फोन होतात. मग दोघेही एक चक्कर माझ्याकडे टाकून जातात. पायावर डोकं ठेवणाऱ्या, गणपतीला 'गुड नाईट' म्हणनाऱ्या नातवाला पाहीलं की आई-अप्पा समाधानाने हसतात. रात्री जेवणं ऊरकली की झोपायच्या खोलीत आई लहाणपणी जशी हाक मारायची तशीच हळवी हाक मारते, विचारते "मनू, ठिक चाललय ना सगळं?"
ऊगाच डोळे भरुन येतात. "वेडी कुठली!" म्हणत आई लहाणपणी जवळ घ्यायची तशी जवळ घेते, हलक्या हाताने कुरवाळत रहाते.
खुर्चीत बसून अप्पा कौतुकाने, तर दारात ऊभं राहून माझं पिल्लू आश्चर्याने आम्हा दोघींकडे पहात रहातात.

(या अगोदर प्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लिहिले आहे. . एकदम भावस्पर्शी. >>> + १००००

पण सुरुवातीची तुलना का ती कळली नाही .
खरतरं , आता "आमच्याकाळी असं .." अशा लेखनाचा सूरच आवडत नाही .
माझ्या आई-बाबांच्या लहानपणीचा काळ , माझ्यापेक्शा १०-१२ वर्शानी मोठ्या आणि लहान असणार्या माझ्या चुलत्/आत्ते/मावस भावंडांच्या लहानपणीचा काळ , माझ्या लेकाचा आता लहान्पणीचा काळ हा वेगवेगळाच असणारं Happy .

@स्वस्ति,
"आमच्याकाळी असं नव्हते.." असा सुर नव्हता लावायचा. पण तसं वाटलं असेल तुम्हाला. प्रत्येक पिढी त्या त्या वेळी प्रगतच असते. मला म्हणायचं होतं, आमच्या लहाणपणी कलर टिव्ही ही फार अपुर्वाईची गोष्ट होती. पण आम्ही चिडल्यावर, रुसल्यावर किंवा आमची समजुत काढण्यासाठी टिव्हीचा ऊपयोग मोठ्यांनी कधी केला नाही. खेळायच्या वेळी खेळ, अभ्यासाच्या वेळी अभ्यास असा सरळ प्रकार होता. आज आजुबाजूला जे दिसते ते जरा विषण्ण करणारे आहे. मुलांची समजुत काढण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो हे काही पटत नाही. मी आजही माझ्या भावाच्या लहान मुलाला सोसायटीच्या बागेत येणारी फुलपाखरे दाखवायला नेतो. पक्षांची घरटी दाखवतो. फुलझाडांची, फळझाडांची मराठीत माहीती देतो. मला फक्त एवढच म्हणायचं होतं.
आजच्या प्रगतीविषयी माझे अजिबात वाईट मत नाही. मला स्वतःला वेगवेगळी गॅझेट्स वापरायला आवडतात. तरीही काही तुम्हाला तसे वाटले असेल तर 'लिहायच्या ओघात लिहिले' असं समजुन सावरुन घ्या.
प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद!

लेख छान आहे. आटह्वणी आवडल्या. लेख फिक्शनल आहे का? म्हणजे असं की लेख बाईच्या भूमिकेतून लिहिला आहे आणि इथे तुमचा प्रतिसाद वाचून आणि तुमचे बाकी २-३ लेख वाचून तुम्ही पुरुष असावेत असं वाटतय.
अगदीच आवांतर आहे ही चौकशी पण गोंधळ होतोय लेख आणी खालची तुमची प्रतिसादात्मक प्रतिक्रिया वाचून.

पहिले दोन पॅरा वाचून लेख सोडून देणार होतो. पण तुमचा दालबाटी लेख आवडलेला म्हणून अजून वाचुया म्हणून पूर्ण वाचला.
सुंदर आठवणी आणि कुठलाही आव न आणता निर्व्याज पणे लिहिल्यात तुम्ही. लेख आवडलाच. Happy
मात्र फोन वर जजमेंटल होणं मात्र खटकलं. ते टा़ळता आलं असतं तर! असं मलाही झालं.

मुलांमधल्या पिअर प्रेशर मूळे इर्षेने, बहुतेक परवडत नसताना, गावातला पहिला रंगीत टीव्ही घेणारे बाबा आणि खूप महिन्यांनी लग्नात भेटलेल्या बहिणीशी दोन घटका बोलायला मिळावं म्हणून स्वतःचा फोन आपल्या खेळून दमलेल्या मुलाला देणारी आई यातली तुलना मजेशीर वाटली. पण मोबाईलला नावं ठेवणं हे नॉस्टॅल्जिक लिखाणाचं हुकुमाचं पान आहे, ते तुम्ही "लिहिण्याच्या ओघात" वापरालात यात तुमची तुमच्या टार्गेट ऑडिअन्स बद्दल समज दिसून येते.
एका पुरुषाने स्त्री दृष्टिकोनातून लिहिलेला लेख लोकांना अकृत्रिम वाटून डोळ्यात पाणी येणे हीच तुमच्या लेखनाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे.

बाकी छान आहे ललित! तुमचा चाहता झालो आहे.

लेख आवडला पण ललित असावे बहुधा कारण लेखात ती आहे पण लेखक प्रतिक्रिया देताना स्वतःच्या देतोय. असो, तो इतका महत्वाचा मुद्दा नाहीय.

हल्लीच एक व्हिडिओ पाहिला, कुठल्यातरी वेबसाईट चा होता, गेल्या 160 वर्षात आपण कुठल्या गोष्टी करणे कशा प्रकारे बदलत गेलो व त्याचे दुष्परिणाम वगैरे. त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गॅजेट वापरणाऱ्या सगळ्याच लोकांचे, त्यात सगळ्याच पिढ्या आल्या, झालेले नुकसान जाणवते व आपण काय गमावले ते लक्षात येते. अर्थात ते परत कमावणे आपल्याच हाती असले तरी कित्येक बाबतीत परतीच्या वाटा आपण बंद केल्या आहेत.

@शुम्पी
बहुतेक लेखात काही खरे काही काल्पनिक असतेच. मी पुरुष असुनही मला असा एखादा लेख लिहावा वाटला म्हणून लिहिला आहे. जमला आहे की नाही हे तुम्ही ठरवायचे. बहुतेक प्रसंग खरे असले तरी बरीचशी पात्रे काल्पनिक आहेत.
प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद!

@अमितव
खुप धन्यवाद!
या अगोदर हा लेख मी मिपावर व फेबूवर टाकला होता. काही जणांच्या पहिल्या पॅरा विषयी अशाच प्रतिक्रिया आल्या होत्या. ईथे माबोवर टाकताना सुधारणा करता आली असती. पण नाही केली.

एका पुरुषाने स्त्री दृष्टिकोनातून लिहिलेला लेख लोकांना अकृत्रिम वाटून डोळ्यात पाणी येणे हीच तुमच्या लेखनाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे.+1
खूप छान लिहिता तुम्ही !!

मुलांमधल्या पिअर प्रेशर मूळे इर्षेने, बहुतेक परवडत नसताना, गावातला पहिला रंगीत टीव्ही घेणारे बाबा आणि खूप महिन्यांनी लग्नात भेटलेल्या बहिणीशी दोन घटका बोलायला मिळावं म्हणून स्वतःचा फोन आपल्या खेळून दमलेल्या मुलाला देणारी आई यातली तुलना मजेशीर वाटली. पण मोबाईलला नावं ठेवणं हे नॉस्टॅल्जिक लिखाणाचं हुकुमाचं पान आहे, ते तुम्ही "लिहिण्याच्या ओघात" वापरालात यात तुमची तुमच्या टार्गेट ऑडिअन्स बद्दल समज दिसून येते.
>> अगदी अगदी Wink

एका पुरुषाने स्त्री दृष्टिकोनातून लिहिलेला लेख लोकांना अकृत्रिम वाटून डोळ्यात पाणी येणे हीच तुमच्या लेखनाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे.
>> ह्म्म्म....

===
खरतरं , आता "आमच्याकाळी असं .." अशा लेखनाचा सूरच आवडत नाही .
>> +१
एक टिपिकल फॉरमॅट असतो अशा लेखांचा. तिचती श्यामच्या आईने प्रेरित आई, तेचते स्वाभिमानी वडील आणि जालावर येऊन दवणअंडी घालणारी त्यांची मुलं Angry
प्रार्थमिक शाळेत असताना परिक्षेला निबंध लिहा मधे 'माझी आई/आजी/वडील' हे विषय हमखास असायचे. त्याचेच हे प्रौढ वर्जन Uhoh

खूप हृदय, संस्कारक्षम आठवणी .

एक पिढी कशी घडली आणि दुसऱ्या पिढीने काय गमावलय वेगाचं कालचक्र पकडण्याच्या ओघात हे मनाला पटतयं .

चांगला झाला आहे हा लेखही.

एका पुरुषाने स्त्री दृष्टिकोनातून लिहिलेला लेख लोकांना अकृत्रिम वाटून डोळ्यात पाणी येणे हीच तुमच्या लेखनाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे. >> +१