काळचक्र!!!

Submitted by सुमेधा आदवडे on 16 May, 2018 - 23:57

मी अजूनही भ्रमात होते. किती वेळ ह्या कॉट वर पडून होते कुणास ठाऊक. आहे कुठे पण मी? अंधुक अंधुक दिसतंय सगळं. सगळे पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. डॉक्टर्स? नर्सेस? हॉस्पिटल असावं हे. म्हणजे मी आजारी आहे की काय? काय झालंय मला? बाबा बोलताना दिसत आहेत डॉक्टरांशी. आई पण आहे वाटतं.
मी बेड वर उठून बसण्याचा प्रयत्न करत होते. पण मला हलताच येईना. काय झालंय मला? सगळं शरीर आखडल्यासारखं का वाटतंय?
नर्स माझ्या जवळ धावत अली. आई पण आली तिच्या मागोमाग. ती इतकी खुश कशी, मला बरं नाहीये तरी सुद्धा?
"डॉक्टर..डॉक्टर अनु शुद्धी वर आलीये..डॉक्टर!" आई ओरडत होती. बाबा आणि डॉक्टर पण धावले माझ्या बेड जवळ.
"हाय अनु... अनुदी...कसं वाटतंय तुला? डोकं दुखतंय का?"
मी डोक्याला हात लावत मान होकारार्थी हलवली. डॉक्टरांनी नर्स ला काही सूचना दिल्या आणि ते बाबांना बाजूला घेऊन गेले आणि पुन्हा काहीतरी सांगू लागले.
"अनु..कशी आहेस बाळा?" आईचा हसऱ्या चेहऱ्यावरच्या हळव्या आवाजात प्रश्न आला.
मला उत्तर द्यायचंय. बोलायचंय. घसा, तोंड सगळं सुकलंय. मी बेड शेजारच्या छोट्या टेबलावरच्या पाण्याच्या बाटली कडे बघितलं. उजव्या हाताने ती घ्यायला गेले तेव्हा आईने पुढे होऊन मला ग्लास मध्ये पाणी भरून दिलं. तेव्हढ्यात डॉक्टर कडे चटकन आईची नजर गेली. त्यांनी नजरेनेच काही तरी सुचवलं. बहुतेक पाणी प्यायला हरकत नाही अशा अर्थी काहीतरी..मी घटाघट ग्लास संपवला. अजून एक ग्लास प्यायले. अख्खी बाटली संपवली पाण्याची. तेव्हा जरा बरं वाटलं.
"आई..अमेय कुठे आहे? अस्मी सोबत आहे का? "
आई चक्रावून माझ्या कडे बघू लागली. बघतच राहिली. ही बोलत का नाही? मी पुन्हा विचारलं,
"आई..अमेय कुठे आहे ग? अस्मी कुठे आहे? "
आईने बाबांना हाक मारली. बाबा माझ्या जवळ आले.
"कशी आहेस बेटा?" त्यांनी डोक्यावरून हात फिरवला माझ्या.
"बाबा..अमेय कुठे आहे सांगा ना. घरी गेलाय का? अस्मी ठीक आहे ना?"
"कोण अमेय? आणि ही अस्मी कोण?
हे लोक असे काय करत आहेत. आई बाबाना माझा नवरा आणि मुलगी कुठे आहे हे माहित नाही? काय झालंय ह्या सगळ्यांना?
"बाबा??? माझा नवरा आणि मुलगी माहित नाही तुम्हाला?"
"काय बोलतीयेस तू अनु? तुझं लग्न झालं की मग नवरा आणि मुलगी होणार ना?" आई बोलली. बाबांनी तिला हाताने शांत केलं. मी भांबावून गेले होते.
"अनु, तुला काही होतंय का? डोकं दुखतंय?"
"बाबा. मला काही होत नाहीये. शरीर अखडलंय फक्त..आणि.."
"अगं तू इतका काळ इथे कॉट वर पडून होतीस. शरीर आखडणारच. हळू हळू होईल हं नीट सगळं."
" इतका काळ?? कधी पासून आहे मी इथे? काय झालंय मला?"
"तुझा अपघात झाला होता बेटा." बाबा म्हणाले.
पण अमेय कुठे होता इतका वेळ? आता कुठे आहे तो?
"बाबा..." मला थकायला झालं होत फार. बोलायची पण ताकत नव्हती. आई बाबांनी मला आधार देत पुन्हा झोपायला लावलं.
"अमेय कुठे आहे? बोलवा त्याला .." मी बडबडत होते तंद्रीत. नर्स डॉक्टरांना घेऊन आली. त्यांनी मला तपासलं. नर्सला सूचना दिल्या. एक इंजेक्शन दिलं मला. आणि मला पुन्हा झोप लागली.
मला जेव्हा जाग आली तेव्हा बऱ्यापैकी फ्रेश वाटत होतं. आई बाबा दोघेही शेजारी होते. आणि आता दादा वाहिनी पण आले होते. त्यांनीही जवळ येऊन आपुलकीने माझी चौकशी केली.
"आई, अमेय आलाय काय?"
सगळे माझ्याकडे पुन्हा आश्चर्याने पाहू लागले. दादा बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला. ते त्याच्या कानात काहीतरी कुजबुजले.
" अगं अशी काय करतेस अनु? कोण अमेय?" आई म्हणाली.
"आई. आता मात्र हद्द झाली. तुम्ही माझ्या नवऱ्याला ओळखत नाही का? तुम्हीच लग्न लावून दिलं होतं ना माझं? बरं..तुम्ही तुमच्या नातीला पण विसरलात? अगं आज वाढदिवस आहे तिचा. कुठे आहे माझी पोरगी?"
"अनु..अगं तुझ्या ऍक्सीडेन्ट नंतर तू आज शुद्धीवर आलीयेस. हे काय बोलतीयेस तू? कोण नवरा? कोण मुलगी. बाळा तुझं लग्नच नाही झालंय अजून."
"काहीही बोलू नको आई. आमच्या लग्नाला २ वर्षे झालीत.आणि आज अस्मिचा, माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे. आज १२ मार्च आहे ना?
"होय अनु, आज तारीख १२ मार्चच आहे. पण तू जे काही बोलतेस तसं काही नाही आहे." दादा म्हणाला.
मी त्याच्याकडे बघत राहिले.
"२ वर्षांपूर्वी तुझा अपघात झाला होता."
"बरं. ज्या अर्थी मी नीट आहे म्हणजे वाचली असेन त्यातून. मग आता काय झालंय?"
" अनु, तू गेल्या २ वर्षांपासून कोमात होतीस!"
बाबांचं हे वाक्य विजे सारखं माझ्यावर आदळलं! मी २ वर्ष कोमात होते? २ वर्ष? मला कसं काही आठवत नाही?

हा अमेय कुठे आहे आणि? मी दादाला त्याचा फोन मागितला. अमेयचा नंबर मला स्पष्ट आठवत होता:
९८६७२५४३६०. मी नंबर डायल केला.
"हॅलो अमेय..कुठे आहेस तू?"
"कोण बोलतंय?" पलीकडून आवाज आला.
"अरे मी अनु. अमेय..तुझाच नंबर आहे ना हा?"
"हो मी अमेय. पण कोण अनु? मी ओळखलं नाही"
मी अवाक झाले. फोन कट केला. आता मात्र माझा बांध फुटला. मी ढसाढसा रडू लागले. आई आणि वहिनी माझ्या जवळ येऊन धीर देऊ लागल्या. दादा डॉक्टरांना घेऊन आला.
"अनुदी..काय होतंय? काही दुखतय का?
"डॉक्टर मला काहीच समजत नाहीये. माझं लग्न झालंय, मला मुलगी आहे. तिचा आज पहिला वाढदिवस आहे. मला स्पष्ट आठवतंय. आठवतंय काय? प्रत्येक आठवणीचे सगळं चित्र स्पष्ट आहे माझं डोक्यात. आणि हे सगळे म्हणत आहेत असं काहीच नाही. मी खोटं बोलत नाहीये हो डॉक्टर."
मी तावातावाने उठून उभी राहिले चक्क. पायांना मुंग्या आल्या होत्या..बधिर झाले होते अक्षरश:. मटकन बेडवर बसले पुन्हा. डॉक्टरांनी मला शांत केले.
"अनुदी..शांत हो..मला माहित आहे तू खोटं बोलत नाहीस. " सगळे चकित होऊन डॉक्टरांकडे पाहू लागले.
"हो ना? तुमचा विश्वास आहे ना? मग माझ्या अस्मिला मला भेटू द्या हो. आज माझ्या पिल्लूचा वाढदिवस आहे हो!"
"बरं ..ठीक आहे. तू सध्या थोडा आराम कर." डॉक्टर म्हणाले.
"नाही. तुम्ही आधी अमेयला तिला घेऊन यायला सांगा. करा त्याला फोन. ९८६७२५४३६०!"
"ओके अनु..आम्ही बोलावतो त्याला. तू आधी पड बघू बेडवर थोडा वेळ." डॉक्टर म्हणाले. आई आणि वहिनीने मला आधार देत बेड वर झोपवलं. बाबा आणि दादा डॉक्टरांच्या मागे मागे गेले.
**************************************************************************
मी हॉस्पिटलमधून घरी आले, म्हणजे मला दादा आणि बाबांनी घरी आणलं, तेव्हा समोरच आजी दिसली. मग तिच्या जवळच जाऊन बसले. आजीने मायेने डोक्यावरून हात फिरवला.
"बरी आहेस ना अनु?"
मी फक्त होकारार्थी मान हलवली. आईने पाणी आणून दिलं. तेवढ्यात माझी नजर समोरच्या भिंतीवरच्या कॅलेंडर कडे गेली. मी आईला हाक मारली.
"आई, हे काय ग ? २ वर्ष जुनं कॅलेंडर का लावलंय अजून?"
"अगं जुनं कुठे? ह्या वर्षीचच कॅलेंडर आहे ते." आई
"२०२० साली २०१८ चं कॅलेंडर कसलं लावताय तुम्ही?"
"अनु, अशी काय बोलतेस अगं ? २०१८ सालच चालू आहे हे."
"काय आई....मस्करी करायला कोणी भेटलं नाही का सकाळपासून?"
"मस्करी कशाला करेन मी ह्या बाबतीत? २०१८ सालच चालू आहे आता. विचार बाबांना"
"हो ग अनु. तुला का वाटतंय २०२० साल आहे म्हणून? स्वप्न पडलं होतं काय?"
मी भांबावून गेले. असं कसं होईल? २०१८ साली आपलं लग्न झालं , २०१९ साली अस्मी झाली. आता २०२० साल चालू आहे. हे सगळे असं काय म्हणत आहेत?
मी जवळच माझा फोन होता तो घेतला. बाबानी कालच चार्ज करून हॉस्पिटलला आणून दिला होता. अमेय ला फोन लावला. ९८६७२५४३६०.
"हॅलो अमेय..मी बोलतीये "
"कोण मी?" पलीकडून आवाज आला.
"अरे अनु बोलतीये. माझा आवाज विसरलास का?"
"कोण अनु?"
"ए मस्करी बंद कर. अस्मी कुठंय?"
"मॅम, कोण हवंय आपल्याला? परवा सुद्धा आपण फोन केला होतात ना?"
"तू अमेयच बोलतोय ना? अमेय बार्गे?"
"हो मी अमेय बार्गे."
"अरे मग तू मला कसं ओळखत नाहीस? मी तुझीच अनु आहे रे. थांब मी येते तुला भेटायला. कुठे आहेस?
आता लंच टाइम असेल ना? मी येते लोअर परेल ला."
"अहो..तुम्हाला कसं माहित माझं ऑफिस लोअर परेल ला आहे ते?"
"मला कसं माहित नसेल. एम्पायर इस्टेट ना? मी आले."
त्याने काही बोलायच्या आत मी फोन कट केला. आणि पर्स आणि फोन घेऊन निघाले सुद्धा.
आई, बाबा, आजी तिघांनी थांबवलं. नुकतीच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होऊन आलेली मी लगेच बाहेर त्यांच्या मते, कोण कुठल्या अनोळखी माणसाला भेटायला निघाले. तिघंही गोंधळले होते. शेवटी बाबा ऐकलेच नाही. माझ्या सोबत आले.
एम्पायर इस्टेट मध्ये आत गेल्यावर दूरवर अमेय काही लोकांसोबत फिरताना दिसला. जेवल्या नंतर त्याला फेऱ्या मारायची सवय होती. मी धावत त्याच्याजवळ गेले..आणि बाबा माझ्या मागे.
त्याच्या समोरच जाऊन उभी राहिले
"अमेय..." त्याने त्याच्या कलिग्स ना पुढे व्हायला सांगितलं. तो माझ्याकडे आश्चर्याने बघताच राहिला.
"अनु, अगं कोणाशी बोलतीयेस? ओळख नाही काय नाही.."
"बाबा..हा माझा नवरा आहे.." मी अमेय कडे बोट दाखवून बोलताच बाबा आणि अमेय दोघे डोळे फाडून माझ्याकडे बघू लागले. का कुणास ठाऊक.
"सॉरी हं..ती आजारी आहे जरा." बाबा अमेयला म्हणाले,
"बाबा..मी अगदी ठणठणीत आहे. हा माझा नवरा अमेय. तुम्हीच आठवा. दादर ला शिवाजी पार्कला माझं सासर आहे, म्हणजे याच घर..आमचं घर. आई, अप्पा, सोहम भाऊ..आणि माझी अस्मी..अमेय..अस्मी कशी आहे रे?"
"अनु..चल..घरी चल बघू." बाबा माझा हात धरून मला नेऊ लागले. अमेय ने त्यांना थांबवलं.
"एक मिनिट..तुम्हाला माझं घर कुठंय ते आणि माझ्या घरच्यांबद्दल कसं माहित?" त्याने गोंधळून जाऊन विचारलं.
"अरे तुझ्या बायकोला तुझ्या घरच्यांबद्दल माहित नसेल का?" तो अजून गोंधळला.
"अहो..काही नाही. तुम्ही काही मनावर घेऊन नका. सॉरी अगेन." बाबा मला नेऊ लागले. अमेय आमच्याकडे बघत तिथेच उभा राहिला हे मला जाणवत होतं.
मी कोमात असलेल्या काळात किती तरी गोंधळ झाला होता हे आता हळूहळू उघडकीस येत होतं. माझ्या ऑफिसची पण तीच तऱ्हा. मी सिटीबँक मध्ये जॉब करत होते, तर घरातले सगळे म्हणत होते तू तिथे कधी जॉब केलासच नाही. ते म्हणत होते कि मी पोलॅरिस नावाच्या कंपनीत कन्सल्टन्ट होते. त्यांना सांगून मी थकले कि मी पोलॅरिस सोडून दीडेक वर्ष झालंय. अस्मी झाल्यावर मी मॅटर्निटी ब्रेक घेतला आणि मग नवा जॉब शोधला, सिटीबँक मध्ये. आश्चर्य म्हणजे दादा मला बळेच पोलॅरिस च्या ऑफिस मध्ये घेऊन गेला तेव्हा माझे कलिग्स, तिथला इतर स्टाफ सगळे मला पाहून खुश झाले आणि माझ्या डेस्क वर घेऊन गेले. तिथे माझ्या बऱ्याचशा वस्तू होत्या. खाली डेस्क मध्ये, समोर ऑफिस बोर्ड वर. माझ्या बॉस ने मला त्याच्या केबिन मध्ये बोलावलं आणि जुजबी विचारपूस करून झाल्यावर एक नवा प्रोजेक्ट माझ्यावर सोपवला. हे कसं शक्य आहे? मी सोडला होता हा जॉब, हे ऑफिस, ही माणसं.
पण जबाबदारी अंगावर आली म्हणून मी कामाला सुरुवात केली. ऑफिसचा पहिलाच दिवस होता. संध्याकाळी काम संपल्यावर मी घरी दादरला निघाले. शिवाजी पार्कला उद्यान गणेश मंदिरात गेले. तिथेच अमेय भेटला.
"बरं झालं इथेच भेटलास. मला बोलायचं होतं तुझ्याशी. आपल्याला घरी बोलता येत नाही सगळ्यांमध्ये." मी
"कोणाच्या घरी?" अमेय पुन्हा गोंधळला
"अरे असं काय करतोस? आपल्या घरी. चल बस तिकडे." तो मुकाट्याने तिथल्या एका बेंच वर जाऊन बसला.
"अमेय.." मी बोलायला सुरुवात करताच बाबा तिथे आले.
"अनु, इथे काय करतेस? चल घरी जाऊया."
"बाबा, आम्ही दोघे जाऊ घरी एकत्र. मला थोडं बोलायचं होतं अमेयशी. तुम्ही कसे इथे ह्या वेळेला? आज हार्मनी क्लब नाही का?"
"अगं अनु मला अजून २ वर्षे आहेत सिनियर सिटीझन व्हायला. तू चल बघू घरी."
"काय बोलताय बाबा..आता २ महिन्यांपूर्वी तर आपण तुमची साठी केली होती."
"तू चल घरी. आपण बघू काय ते." बाबा मला हात धरून उठवत निघाले सुद्धा. पुन्हा अमेय आमच्याकडे बघतच बसला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिस मधून निघाल्यावर उद्यान गणेश मंदिरात गेले. अमेयला आज मी मुद्दाम हुन फोन करून इथे भेटायला सांगितलं होतं. मी तिथे पोहोचले तेव्हा अमेय कुठेच दिसला नाही. थोड्या वेळाने तो आणि बाबा एकत्र मंदिरात येताना दिसले. मला आश्चर्य वाटलं. पण म्हटलं आज ऐकुया ह्या दोघांचं म्हणणं. आपली मस्करी करत आहेत का सगळे मिळून? ह्यांचा डाव ह्यांच्यावरच उलटवूया आता.
ते दोघे एका बेंच वर बसले. मी तिथून थोड्या अंतरावर एका झाडाखाली, त्यांना दिसणार नाही अशी बसले.
पण ते काय बोलत आहेत हे ऐकण्यासाठी मला ह्या गर्दीत कानात जीव आणावा लागणार होता.
बाबांनी बोलायला सुरुवात केली.
"अमेय, सर्वप्रथम तुम्हाला जो काही त्रास झाला, त्यासाठी मनापासून मी तुमची माफी मागतो."
"माफी नका मागू काका. हा काय प्रकारआहे पण? मला काहीच कळलेलं नाहीये. तिला काय झालंय? ती मला तिचा नवरा का म्हणते?"

"२ वर्षांपूर्वी ऑफिस मधून येत असताना, रस्ता क्रॉस करताना तिचा अपघात झाला. एका भरधाव ट्रक ने तिला ठोकर दिली आणि तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती कोमात गेली. डॉक्टरांनी काही शाश्वती दिली नाही. कोमातल्या पेशंट्सच म्हणे काही सांगता येत नाही. कधीही शुद्धीवर येऊ शकतात. काही क्षणात, काही दिवसात किंवा अनेक वर्षानंतर सुद्धा. अनुला २ वर्षे लागली."

"पण ती मला कसं काय ओळखते? मी तिला ओळखत नाही."

"हो. तुमचा तिचा काहीच संबंध नाही. पण तिचा मेंदू आता २ वर्षे पुढच्या काळात जगतो आहे. त्यानुसार ती बोलतीये, वागतीये."

"पण हे कसं शक्य आहे?"

"आधी आमचा ही विश्वास बसत नव्हता. पण शुद्धीवर आल्या पासून तिने दोनच नावांचा घोषवारा लावला होता...अमेय आणि अस्मि. ह्या दोन नावांच्या व्यक्तींना आमच्या पैकी कोणी ओळखत नव्हतं. आम्ही डॉक्टरांशी बोललो. ते म्हणाले, तिच्या मेंदू ला जबरदस्त धक्का बसल्यामुळे ती आता दोन वर्षे पुढच्या काळात जगत आहे. त्यामुळे, ह्यानुसार तुम्ही बहुदा ह्या मधल्या दोन वर्षांच्या काळात तिच्या आयुष्यात आलेली व्यक्ती असावी. तुमचा गोंधळ मी समजू शकतो. पण आहे हे असं आहे. मी तिला तुमच्यापासून लांब ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न कारेन. तुम्हाला तिचा त्रास होऊ देणार नाही."

"एक मिनिट काका..मी तिला ओळखत नाही हे खरंय. पण तिने माझ्या बद्दल सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे. आणि काहीच संबंध नसताना तिला माझा मोबाईल नंबर कसा माहित?

"ती पण आणखी एक आश्चर्याची गोष्ट आहे. तिला सगळ्यांचे फोन नंबर, मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत. म्हणजे ह्या दोन वर्षाच्या काळात तिच्या समजुती प्रमाणे ज्या पण व्यक्ती तिच्या आयुष्यात आल्या, त्या सगळ्यांचे फोन नंबर तिला पाठ आहेत. ह्या अपघाता नंतर तिच्याकडे ही नवी क्षमता आली आहे.आता सुद्धा नवे नंबर ती एकदा बघूनच न चुकता अगदी योग्य सांगते. इस्त्रीवाला, भाजीवाला, आमची कामवाली अगदी खालच्या वॉचमनचा नंबर सुद्धा तिला तोंडपाठ आहे!"

"कमाल आहे!"

"खरंच कमाल आहे. बट इट्स द फॅक्ट. अनु ला क्रोनेस्थेशिया आहे. तिला तिच्या भविष्यातल्या गोष्टी आधीच दिसत आहेत. ह्याला दैवी देणगी म्हणावं कि शाप हे अजून आम्हालाही कळत नाहीये."
बाबा हताश पणे तिथून उठून निघून गेले. अमेय एकटाच बेंच वर बसून राहिला होता.

बाबांचं बोलणं ऐकून मी अगदी स्तब्ध झाले होते. काहीच कळत नव्हतं. हे कसं शक्य आहे? मला सगळं सगळं स्पष्ट आठवतंय. अमेय माझ्या घरी त्याच्या आई वडीलां सोबत आला होता तो दिवस, आमचं अरेंज मॅरेज, शिवाजी पार्कच घर, खालच्या किराणा दुकानातला राजू वाणी, शिवसी सी एच सोसायटी, वाचमन, लिफ्टमन, ५ वा माळा, आई, अप्पा, सोहम, अमेय आणि माझी अस्मि. हे सगळं नाहीये? माझ्या आयुष्यात ही माणसं नाहीयेत? कसं शक्य आहे?
घरी येऊन मी नेट वर क्रोनेस्थेशिया वर भरपूर रिसर्च केला. एन्डेल टूलविंग नावाच्या माणसाने ह्याबद्दल शोध लावला म्हणे. ह्या अवस्थेत माणूस स्वतःच्या भूतकाळातल्या किंवा भविष्यातल्या अनेक गोष्टी, माणसं, घटना अगदी व्यवस्थित कायम आठवू शकतो. मी दुसऱ्या प्रकारात मोडत होते. ह्या विषयावर, एक सिनेमा पण निघाला होता, २०१६ साली. म्हणजे मी कोमात असताना! काय योगायोग आहे! थोडक्यात काय, तर हा काही आजार नाही. एक देणगीच आहे. भविष्यातल्या अनेक वाईट घटना, प्रसंग टाळण्यासाठी, पुढे माझ्या वागण्या बोलण्यात बदल करून मी ह्याचा वापर करून शकत होते. पण मला जे काही भविष्यातले आठवतंय ते कितपत खरं आहे? हे जाणून घेण्यासाठी मला ह्या दोन वर्षांपमधून जावंच लागणार होतं. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

ह्याचा प्रत्यय मला तीनेक महिन्यानंतर आला. बाबा माझ्या साठी स्थळे बघू लागले होते. त्यामुळे ऑनलाईन मॅरेज पोर्टल्स मध्ये माझं प्रोफाइल होतं. अनायासे अमेय ने, हो तोच अमेय बार्गे. त्याने ते पहिले. तो मला ओळखत होताच. त्याने बाबांना फोन करून बघण्याचा कार्यक्रम ठरवला. आणि २०१८ साली आमचं शुभमंगल झालं. इथपर्यंत तर मला जे आठवत होतं त्याप्रमाणे झालंय.
आता पुढचं सगळं खरं होतंय कि नाही ह्या साठी मला येणाऱ्या सगळ्या वर्षांमधून जावं लागणार होतं. शेवटी काळच सगळ्यावरचं औषध ठरतो. त्यापेक्षा शक्तीवान कोण असणार?

-सुमेधा आदवडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय Happy

ह्या विषयावर, एक सिनेमा पण निघाला होता, २०१६ साली. म्हणजे मी कोमात असताना!
>> आहे का असा सिनेमा खरच?

हा paradox आहे
तिला पुढच्या दोन वर्षांमधील घटना आधीच माहिती आहेत. मग तर गोंधळ होणं अपेक्षित नाहीये कारण होणारा गोंधळही तिला आधीपासूनच माहीती आहे...

धन्यवाद मित्रांनो☺️
>> आहे का असा सिनेमा खरच?
हो आहे ☺️
ग्रहण वरून सुचली का काय ---
नाही ग..मी नाही बघत ती मालिका.

एक सिनेमा पण निघाला होता, २०१६ साली. >>> २००६ चा ग्लास हाऊस का? म्हणजे मला कथा वाचताना तोच आठवत होता.

कथा आवडली.

धन्यवाद लोकहो Happy

२००६ चा ग्लास हाऊस का?>>>>
नाही. २०१६ चा क्रोनेस्थेशिया हा सिनेमा