आठवणीतील गाव

Submitted by राजेश्री on 12 May, 2018 - 08:00

आठवणीतील गाव

कितीतरी दिवसांनी म्हणण्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मी आज माझ्या गावी अगदी वेळात वेळ काढून अभ्यासाचं ओझं दूर सारून आठ दिवस तरी राहायचं म्हणून कापुसखेड ला आले होते .पूर्वी गावाचा बसस्टॉप म्हणून तिथे एक झाड होत ते पाडून त्याच ठिकाणी छोटा बसथांबा केला होता. मातीची लिपार दिलेली घरे फार आवडायची मला ती जाऊन आता छोटे मोठे बंगले झाले होते , जनावरांचे कुडाचे , छपराचे गोठे जाऊन गावकऱ्यांनी सिमेंटचे गोटे तयार करवून घेतले होते गावाचा हा आखीव रेखीव कायापालट बघताना माझ्या मनाला आपण आता मातीच्या सुवासाला पारखे झाल्याची हुरहूर वाटत होती.
घराच्या दिशेनं चालत असताना 'मैत्र जीवा चारा अभियान ' असं एका भिंतीवर ठळक अक्षरात लिहिलेलं दिसलं . जवळच जनावरांची छावणी होती . सुक्या वाळलेल्या चाऱ्यावर जनावर अक्षरशः तुटून पडत होती . हिरवागार चारा हा केवळ पुस्तकी शब्दच राहिला असं वाटत होत . शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन "शेती" आज ह्या शेतीनच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला होता . वीज बिल,पाणी पट्टी एवढं भागवायलाही जिथं पीक येत न्हवत तिथे जनावरांचा चारा तरी कसा भागणार ज्या गावानं मला चैतन्याचा न आटणारा झरा दिला तेच गाव आज माझ्याकडे दिनवाने होऊन बघते आहे असं वाटत होत. घरी जाऊन रानातून आले फेरफटका मारून असं काकींना सांगून चुलत बहिणीबरोबर रानाच्या दिशेने चालू लागले.
चालता चालता माझ्या डोळ्यासमोर मागच्या दहा ते बारा वर्षांपूर्वीचा गावातला एक एक दिवस सरकू लागला. लहानपणी शाळेत जात असताना आठवड्यातील शनिवार ,रविवार दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावकडंच असायचो . 'कापुसखेड मला लावतय वेड' हे आमचं परवलीच वाक्यं असायचं.इस्लामपूरला म्हातारं आई आली की तिच्या बरोबर मी आणि माझा भाऊ कापुसखेड साठी रवाना व्हायचो . त्यावेळी आमच्या गावाला जायला टांग्याचीही सोय होती . त्यात बसून टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा हे गाणं म्हणायला आम्हाला फार आवडायचं. प्रवासाला दिलेल्या दोन रुपयाबद्दल म्हातारं आई आमच्या पुढे टांग्यान जायचं का भजी खात गावाला चालत जायचं असे दोन option ठेवायची यल्लमा चौकातील ती मोठ्या काहिलीत तळली जाणारी गरम गरम कांदाभजी बघून आम्ही भजी असं तारस्वरात ओरडायचो. गरमागरम भजी खात एक मैलापर्यंत आम्ही न कुरकुर करता जायचो अजून दोन मैल बाकी असले की पाय दुखतात म्हणून रस्त्यावरच बसायचो . इस्लामपुरातून तीन चढ पार केलं की आमचं गाव यायचं मग मागून गावाचा कुणी सायकलवाला किंवा मोटारसायकलवाला भेटला कि म्हातारं आई त्याला थांबवून आर बाबा या पोरासनी तेवढं मळ्यात सोड मी मागणं येते चालत म्हणत आम्हाला पुढं लावून द्यायची . गावाकडे असल्यावर सकाळ झाली की चुलीपुढे शेकत , जाळं घालीत अंघोळीच पाणी तापवत बसायचो. अंघोळ आवरून थोरल्या आई बरोबर पहाटेच धारा काढायला रानात जायचो. डोक्यावर पाटी ,हातात दुधाची भली मोठी किटली घेऊन थोरली आई रानात जायला तयार झाली कि,मी तिच्यामागे चालण्यासाठी हट्ट करायचे. न्याहरी (आजच्या भाषेत ब्रेकफास्ट) करून घे मी तवर बाहेर थांबते असं म्हणत ती वाड्यातून खाली उतरलेली सुद्धा असायची . मी तिच्या डोक्यावरची चुंबळ आणि पाटी दे म्हणून हट्ट करायचे आणि ती सुद्धा कौतुकाने माझ्या डोक्यावर चुंबळ ठेवून त्यावर पाटी ठेवायची आणि मग आम्ही मायलेकी झपाझप रानाच्या दिशेनं पावलं टाकू लागायचो.
सकाळच्या बोचऱ्या थंडीत कुडकुडत ...रानावनात पक्ष्यांच्या किलबिलाटाने सारा रानपरिसर दुमदुमायचा मधेच कोकीळ कुहू कुहू म्हणत साद घालायची ...पोपटांच्या झाडावर बसलेल्या थव्याकडे कुतूहलाने बघत त्यांना विठू विठू म्हणून साद घालत,डोक्यावरची पाटी सांभाळत मी आईच्या चालण्याच्या वेगाला गाठायला तिच्यामागे धावायचे.मैलावर असलेलं रान तोपर्यंत नजरेच्या टप्प्यात आलेलं असायचं.पांदीतुन(ओघळीतून)जात असताना काटेरी झुडपातील इवली इवली बोर त्या काट्यांच्या आडून वाकुल्या दाखवतायत असा भास व्हायचा . रानफुलांनी धर्तीवर रंगेबिरंगी रांगोळी रेखाटलेली असायची . 'आई,एवढी डोक्यावरची पाटी घे ,मला बोरं घ्यायचीत' असं म्हंटल कि ,आई म्हणायची ,"कट्याशिवाय तुला बोर नाय मिळायची पोरी, हातात काटा घुसण्यापरीस थांब मीच देते तुला तोडून " म्हणत ओंजळभर लाल-पिवळसर बोर ती माझ्या फ्रॉकच्या खिशात ठेवायची.
हैशा आलं रान असं म्हणत ती माझ्या डोक्यावरची पाटी उतरून घ्यायची . तोच ती पाटाच पाणी सुरु करायला विहिरीवर बसवलेल्या मोटारीच्या लाल पेटीकडे जायची पण तिकडे जायची मला अजिबात परवानगी नसायची त्यातलं हिरवं बटन दाबलं रे दाबलं कि , पाटावर बसवलेल्या पंपातुन पाणी धो धो करीत पाटातून मग ओघळीतून वाहायच . या पाण्याच्या वाटा तयार करायला मला फार आवडायचं ,आई म्हणायची ,"उसाला पाणी सोडलंय,जा त्या ओघळीत पडलेली आंब्याची वाळकी पान काढ जा"हे माझं आवडीचं काम असायचं. मला सगळ्यात जास्त आवडायचं ते पाटातल्या पाण्यात धुणं धुवायला...पाटातीलच वाहत पाणी घेऊन एका कडेला धुणं धुवायच फार गंमत यायची "राजू(या जू चा उच्चlर बैलाच्या मानेवरील जु अश्या पद्धतीने ती करायची) इथं आलीस होय भिजायला ...हो बाजूला नाक गळायला सुरवात होईल" थोरल्या आईच हे ठरलेलं वाक्य असायचं.
मी कोवळ्या कोवळ्या लुसलुशीत काकड्या हळूच घेऊन खातेय तोपर्यंत आई धार काढून आलेली असायची. एवढ्या मोठया पेल्यातील दूध ते ही न तापवता मी कशी प्यायचे याच मला आता आश्चर्य वाटत. मग आई ऊसातून सगळ्या जनावरांना कोवळी हिरवीगार वैरण तोडून आणायची पाटातून मग ओघळीतून मग उसाच्या प्रत्येक सऱ्या तपासून ऊसाला पाणी व्यवस्थित पाजलं जातंय का ते बघायची . मोठया मोठया तयार झालेल्या काकड्या पाटीत तोडून घे,कुठं उसाच्या मध्ये मध्ये भाजीपाला टोक ,कोथिंबीर उगवल्या का बघणे ,जनावरांचे शेणघाण काढणे ,जनावरे सावलीत बांधणे अशी कामे थोरली आई लागोपाठ न थकता करीत राहायची . मध्ये मध्ये मला राजू हे खाऊन बघ,तिकडे जाऊ नको....असं माझ्यावरही लक्ष देणं चालू असायचं.रानात घड्याळ कुठंच नसताना १ वाजत आला चल जेवूया, ३ वाजले घटकाभर पड निवांत , ४ वाजले कपडे वाळली असतील आन जा असं तंतोतंत वेळेचा अंदाज तिला कसा यायचा याच मला आश्चर्य वाटत राहायचं.सांजवेळी घरी जायची वेळ झाली की अण्णांनी(काका) माझ्या चुलत भावाला माळशेतातून अगदी एक मैलभर अंतरावरच्या गवळदेवाच्या रानापर्यंत ऐकू जाईल अशी "आर सुभ्यां $$$ हे$$ !म्हणून मारलेली आरोळी त्याला तिथं सहज ऐकू यायची आणि तोही तिथून आलो$$हो$$आण्णा म्हणून प्रतिसाद द्यायचा .जमीन नांगरायच्या वेळी आण्णा नांगराला बैलांना(दौलत आणि सुंदर) जुंपायाचे त्या नांगराच्या फाळावर मला बसायला द्यायचे तिथे बसायला मिळाले की मला माझा राज्याभिषेक झाला आहे असा अभिमान वाटायचा.बघता बघता सार शेत नांगरून सुद्धा व्हायचं ,बैलांना मोकळं करून आण्णा विहिरीवर बसवलेली मोटार सुरु करायला जायचे आणि बैलांना पाणी पाजून त्यांना वैरण काडी करून पुन्हा आणि दुसऱ्या कामाला लागायचे. संध्याकाळी बैल गोठयात बांधून आण्णा आम्हाला कणसांचा हुरडा खायला द्यायचे.
पहाटे तर मी रानात हरभऱ्याची भाजी तोडताना सायन्सच्या सरानी सांगितलेला प्रयोग करून बघायचे. सर म्हणायचे ,"हरभऱ्याच्या भाजीवर पहाटे असणाऱ्या दवबिंदूत ऍसिड असत" ते मी जिभेला लावून बघायचे तेंव्हा खरंच जीभ चरचरायची . मला तर त्या लहान वयात आमचं रान म्हणजे सार जग वाटायचं. रानात सगळ्यात जास्त गंमत यायची ती उन्हाळ्याच्या सुट्टीत ,आमच्या रानात साखरी, शेपू, केळी, साखरगोटी,खोबरी, नासकी या सगळ्याच जातीच्या आंब्याची झाडे असायची(अजुनही आहेंत) आंबे पाडाला आलेले असायचे. भावड्या,काका,आबा,पिंट्या, नाना,बिट्या सगळे झाडावर पाडाचे आंबे काढायला चढलेले असायचे आणि आम्ही म्हणजे मी माझ्या आतेबहिणी झाडाखालून झाडावर चढलेल्या सर्वाना पिकलेला आंबा देण्यासाठी सर्वाना गुलब्या लावायचो. आंबे पाडाला आलेल्या दिवसात आपले पूर्वजही झाडावर ठाण मांडून बसलेले असायचे त्यांचा या झाडावरून त्या झाडावर चाललेला सुरपारंब्याचा खेळ आम्ही सावध राहून बघायचो कारण कधी माकड महाशय खाली येतील आणि केस ओढून किंवा गालावर चापट मारून जातील याचा नेम नसायचा .
दुपारी एक दीडच्या सुमारास आम्ही सर्वजण आंब्याच्या झाडाखाली गोल करून जेवायला बसायचो . भाकरी,उसळ,दही,कांदा प्रत्येकजण हातात घेऊनच खायचो आणि जेवून झालं की पाटातील वाहत पाणी ओंजळीने प्यायचो. जेवण झालं की ऊसाच्या फडातील ऊस काढून दे म्हणून मी आईच्या मागे लागायचो. ऊस खात खाली वाकलेल्या आंब्याच्या झाडावर चढून झोके घेणं मला फार आवडायचं . त्या झाडाच्या खोबणीत पाखरं राखायला एक गोफण ठेवलेली असायची त्या गोफणीत दगड घालून आण्णा जशी गोफण फिरवतात तशी गोफण फिरवण्याचा मी प्रयत्न करायचे तर ती फिरण्याआधीच तिच्यातील दगड खाली पडायचा . शेतात पाखरं राखायला शेताच्या मधोमध बुजगावण ही उभा केलेलं असायचं डोकं म्हणून मडकं त्यावर चुन्याने डोळे ,तोंड काढायचं आणि ते मडकं काठीमध्ये उभारून एक फटका शर्ट अडकवलेला असायचा तो इतका ढगळा असायचा कि ,आण्णा कायम वापरत असलेला 'बुजगावण्या' हा शब्द का वापरतात ते खरं खुर बुजगावण बघूनच कळलं . आज लहान मुलांना माउस च्या एका क्लीक मधून खरंखुरं जगच त्यांच्या मुठीत येत. पण त्या आभासी जगापेक्षा जगण्याचे खरे खुरे तत्वज्ञान सांगणार माझं छोटस जग मला फार आवडायचं. गावाकडे टीव्हीवर रामायण आणि महाभारत सोडून दुसरं काही बघायची परवानगी नसायची . आमची काकी तर डोक्यावर पदर घेऊन देवपूजेबरोबर राम, लक्ष्मण,सीतेला ओवाळून रामायण बघायला बसायची.आमचे (काका) तात्या टीव्ही बघता बघता राजा हे खा,ते खा म्हणत सर्व भावंडात माझाच जास्त लाड करायचे.
रानातील थोरल्या आईची कामे आता आवरत आलेली असायची आई सकाळी वाळत घातलेली कपडे व्यवस्थित करून पाटीत ठेवायची ,सगळया जनावरांना पाणी दाखवून झालं की संध्याकाळी धारा पटापटा आटपायची आता ती सकाळची हलकी हलकी पाटी माझ्या बेताची नसायची ,त्यात संध्याकाळच जळण, शेणकुटे, ताजी ताजी फळ आणि पालेभाजी, मिरच्या अश्या जिन्नसानी पाटी खचाखच भरलेली असायची. त्यात एवढं सगळं असूनही आईच्या डोक्यावरून ती पाटी न धरताही कशी पडत नाही याच मला आश्चर्य वाटत राहायचं.
मी दुधाची भरलेली किटली सावकाश धरत रानातील ते संध्याकाळचे विलोभनीय दृश्य बघत आईच्या मागून चालायचे . पक्ष्यांचा थवाही किलबिलाट न करता आपल्या घराच्या ओढीने निघालेला असायचा ,आकाशात पांढऱ्या ढगांवर सोनेरी झालरी चढलेल्या दिसायच्या.सूर्याचं मावळतीच मोहक दृश्य बघत बघत मी हरपून गेलेले असायचे . उद्या रानात येऊन आपल्याला काय काय काम करायची आहेत याचा पाढा वाचत मी आई बरोबर घरी यायचे.
संध्याकाळी चुलीवरची गरम गरम भाकरी , कोरड्यास ,वैलावर शिजवलेला टपोरा भात.... गरम गरम दूध नाहीतर कढी असा बेत असायचा. जेवता जेवता पेंग यायला सुरुवात व्हायची आणि अगदी उद्या सकाळीच थोरल्या आईच ,"राजू उठ रानात जायचंय धारला उशीर होतोय" हे वाक्य कानावर पडलं कीच जाग यायची.
आज ज्यावेळी मी रानात जात होते त्यावेळी पांदीच्या कडेला असलेल्या घनदाट झाडांनी पांदीची साथ कधीच सोडली होती. कुठेतरी शेवरीची,पिंपळाची पर्णहीन झाड कुणाच्या तरी चुलीच जळण व्हायचं वाट बघत होते. त्या झाडावरून रानात जाताना साद घालणारे,किलबिलाट करणारे पक्षी त्या झाडाची साथ सोडून गेले होते. छोट्या छोट्या कैर्यांनी लगडलेली ,बहरलेली आंब्याची झाडे आज म्लान दिसत होती आज त्या झाडाच्या फांदीवर बसून झोके घेणं त्या झाडांनाही परवडल नसतं त्यांचा बहर ओसरला होता. रानात मध्यावर असणार ऊसाच शिवार ऊसाच्या फडानी गजबजून गेलेलं असायचं. आज लोकरी माव्याने केलेलं ऊसाच हाल बघवत न्हवत. कोवळा लुसलुशीत पाल्यालाही कधी काळी तोंड न लावणारी जनावरं आज कडबा ही कराकरा चावून खातायत .गोठयातील दौलत आणि सुंदर ची जोडी नजरेस पडत न्हवती. खटका मारल्या मारल्या दौडत येणार पाणी आज खोल खोल विहिरीत उतरून दोन घागऱ्याची कावड करून आणावं लागत होत. जनावरांना चारा नाही आणि म्हणूनच दुधाने ओसंडून वाहणाऱ्या किटल्यांमध्ये आज किती दूध मिळालं हे डोकावून बघावं लागतंय.
आज कितीतरी अंतरावरून आपल्या खड्या आवाजात ये$$$$ सुभ्या$$$हे$$$ अशी आरोळी देणारे आण्णा जसे थकलेत तसे रानही या दुष्काळानं थकल्या थकल्या सारखं वाटत होत. त्या रानातून ओसंडून वाहणारा उत्साह,चैतन्य,गारवा,आनंदी आनंद दमल्या भागलेल्या जीवांचा विसावा सार लोप पावलेलं होत.
त्या करपलेल्या पिकांची सहानभूती वाटून घ्यावी कि,लावून खपणाऱ्यांची काहीच कळत न्हवत. सायन्सच्या सरांनी आठवीत असताना सजीव धडा शिकवलेला आठवतोय झाडे सजीव असतात . आज सजीव झाड निर्जीव भासू लागली होती. हरभऱ्याच्या झाडावर चमचमणारे मोती आज कुणीतरी पळवून नेल्यासारखं वाटत होत. रानफुलांच्या रांगोळीने सजलेल्या परिसरात आज दिसत होत्या केवळ चिरा पडलेल्या जमिनी ....काट्यापासून सांभाळत तोडलेल्या टपोऱ्या बोरांच्या ठिकाणी आज फक्त काटेच आपल्याला भकासपणे न्याहाळत असलेला भास होत होता. वाटलं ते काटेही मनात म्हणत असतील ,'आज जर झाडावर बोरं असती तर तुला मुळीच नसतो टोचलो'
आज फार लवकर रानातून बाहेर पडायचे होते मला त्या सूर्याचं तेज लोप लावायच्या आत नाहीतर हे सारं आणखी भकास दिसत राहील . मी थोरल्या आईची वाट न बघता , आई मी घरी जाते ग,म्हणत झपाझपा पावलं उचलून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते,पावलाखालची वाटच संपत न्हवती आज उद्या मला इथं बिलकुल यायचं न्हवत.
रात्री तर मी या सगळ्यातून सावरून जेवूच शकले नाही.रात्र अशीच तळमळत काढली ,पहाटेच उठून बसले धारेला जायला म्हणून न्हवे तर इस्लामपूरला जाणारी पहिली गाडी मला अजिबात चुकवायची न्हवती. ,"मैत्र जीवा चारा अभियान" हे चार शब्द वाचत वाचत मी बस थांब्याच्या दिशेने झपाझप पावले टाकू लागले.
*ताजा कलम--- हा माझ्या गावावरचा लेख मी बी ए च्या तिसऱ्या वर्षाला असताना लिहिला होता . पावसाच्या अभावाने सगळीकडेच दुष्काळ सर्वांचं जीवन दुष्फळ करीत होता . आमच्या कॉलेज मध्ये मैत्र जीवा चारा अभियानांतर्गत चारा गोळा करून तो NSS मार्फत गावांना पाठवला जात होता . आमचं गाव हि या दुष्काळाच्या झळांचे चटके सोसत होत.तेंव्हा मी हि सत्य स्थिती लिहिली होती. यंदा पाऊस जोमात होता. माझ्या मैत्रिणींना दीपाली व सुजाताला पण मला आमचं रान दाखवायचं होत पावसाने रानात हिरवळ आली होती. आबाने बांधलेली गवळदेवाच्या रानातील विहीर तुडुंब भरली होती आम्ही रानात चिखलातून विना चप्पल हुंदडलो,रानभोजन केलं रानाची नवी ऊर्जा घेऊन इस्लामपूरला परतलो.
ताजा कलम सांगण्याचं प्रयोजन हेच कि गोष्टीचा सुखांत सर्वांनाच आवडतो. मला सुद्धा.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलं आहे. वाचता वाचता इतके उदास वाटू लागले. मला तळटीप वाचून फार बरं वाटलं. सुखांत आपल्या सर्वांनाच आवडतो. तुमचे रान आणि गाव असेच बहरू दे नेहमीच.

हे खूप सुंदर लिहीले आहे. सर्व आठवणी गोळा करून एक छानसे पुस्तक नक्की तयार होईल. मनावर घ्या. शैली खूप फ्रेश व छान आहे.

अश्विनीजी माझं ही श्री ची लेखणी
हा पहिला ललित लेखांचा संग्रह प्रकाशित झाला आहे.त्यात आहे आठवणीतील गाव

छान लिहिले आहे राजेश्री!

हा माझ्या गावावरचा लेख मी बी ए च्या तिसऱ्या वर्षाला असताना लिहिला होता . पावसाच्या अभावाने सगळीकडेच दुष्काळ सर्वांचं जीवन दुष्फळ करीत होता. >> कोणते वर्ष?

खूप छान लिहीलस.. आमचे शेत नसले तरी मैत्रिणीच्या शेतावर कधीमधी दिलेल्या भेटी अविस्मरणीय होत्या..