अस्तित्व !

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 May, 2018 - 23:30

चक्रीवादळात सैरभैर होवून
भेलकांडणा-या आयुष्याच्या वाळक्या पानाला
विचारू नकोस त्याच कुळ-मूळ-जात !

परिस्थितीच्या चटक्यांनी
अकाली करपलेलं पान
नियतीच्या कचाट्यात गवसून
छिन्न-विच्छिन्न होवून विखरण्याआधीच

एकतर झेल अलगद
नि ठेव कवितेच्या वहीत
आठवणी जाळीदार होईस्तोवर !

वा वाहू दे
संथ काळाच्या पात्रात
प्रवाहपतित !

नाहीतर येवू दे खुश्शाल पायदळी
निदान अस्तित्वाचा झालेला भुगा
पुन्हा मातीत मिसळताना
धन्यता तरी पावेल !

पण नको होवू देवूस भक्ष्य
गैरसमजांच्या लवलवत्या ज्वाळांच
कारण उरलेल्या राखेची धग
होरपळून काढेल उरल-सुरल अस्तित्व !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users