कशाने बेगडी वाटे तुला माझे समर्पण ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 May, 2018 - 00:37

तुझ्या बेबंद वृत्तीचे तिने केलेय औक्षण
तुला अस्वस्थ का करते तिचे निर्लेप मीपण ?

तुझ्या भवती तुझा गोतावळा असतोच कायम
तुला कळणार नाही काय असते एकटेपण

तुझ्या हातात सोपवले जिने आयुष्य सारे
तिच्या नशिबात तू कायम दिली आहेस वणवण

मिळत नाही, निघत नाही, दिसे अस्पष्ट सारे
तुझ्या डोळ्यात गेलेला असावा रे धुलीकण

तुला पडताळण्यामध्ये मला स्वारस्य नाही
नकोसे वाटती आता तुला माझे-तुझे क्षण

तुझ्या-माझ्यामधेेे काहीतरी पूरक असावे
मला कळते, तुला वळते जगाशी राजकारण

अताशा काय निष्ठेला तुझ्या झाले कळेना
कशाने बेगडी वाटे तुला माझे समर्पण ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users