सुक्या सोड्यांचे कालवण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2018 - 04:00
sodyanche kalvan
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाटीभर सोडे

पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचून
हिंग थोडसं
हळद १ चमचा
लाल मसाला २ चमचे
चवीनुसार मिठ
तांदळाचे पीठ १ चमचा
लिंबाएवढी चिंच
फोडणीसाठी तेल
फोडणीसाठी तेल

२ मध्यम चिरलेले कांदे
कोथिंबीर चिरलेली थोडी
२ हिरव्या मिरच्या मोडून

भरीसाठी भाज्या हव्या असतील तर
१ वांग फोडी करून
बटाटा फोडी करून
शेवग्याच्या शेंगा तुकडे करुन

क्रमवार पाककृती: 

सोडे कोमट पाण्यात १० मिनीटे भिजत घालावेत.

गॅसवर भांडे गरम करुन तेल टाकून लसूण फोडणीला द्यायचा व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवायचा. आता त्यावर हिंग, हळद मसाला घालायचा.

ते एकजीव झाले की कोलंबीचे सोडे, शेंगा, बटाटे व वांगी घालायची.

आता त्यात गरजेनुसार पाणी घालायचे व भाज्या शिजू द्यायच्या.

भाज्या व सोडे शिजले की त्यात चिंचेचा कोळ करून त्यातच तांदळाचे पीठ कालवून तो कोळ रश्यात घालावा. पुन्हा कालवणाला एक उकळी येऊ द्यावी व मिठ घालावे. नंतर गॅस बंद करण्यापूर्वी मोडलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी म्हणजे कोथिंबीर व मिरच्यांचा सुगंध टिकून राहतो.

आता घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.

मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसीपी.

कालच कोळणीने ताजे सोडे दिले. प्रचंड महाग Sad अर्धा किलो सोडे, थोडे बोंबील व थोडे सुकट मिळून 1300 ला फटका बसला.

जागू अगं कित्ती दिवसांनी तुझी रेसिपी आली. पाहूनच मस्त वाटलं. एकदम जुन्या माबोचा फिल आला मला.
सोडे बिडे मी कधी खाईन असं वाटत नाही. पण तुझ्या रेसिप्या बघणं हा डोळ्यांसाठी सोहळा असतो.

लिहित रहा की गं नेहमी Happy

तोंडाला पाणी सुटले जागुताई Wink
आमच्या कडे हि अगदी असेच करतात. एकदम भारी होते.
>>घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते>>> अगदी खरे
आज संध्याकाळी करायला सांगणार आईला. Happy

हो साधना सोडे किलोला १००० च्या वरच असतात. महाग असतात.

दक्षिणा मलाही खुप बर वाटल. आणि तुझा रिप्लाय वाचून जास्तच. मलाही जुना फिल आला.

रचाना धन्यवाद.

यम्मी.. तुझ्या रेसिपि दिसल्या की फार बरं वाटत.
फोटो पाहुन आधी मला वाटल, सोडे म्हणते आनि बोंबिल च्या तुकड्याचे फोटो का टाकते?? नीट पाहिल्यावर कळले की मोठी कोळंबी आहे ही.मस्त दिसते आहे डीश.

जागुतै काही बेसिक प्र्शन विचारते,,
१)जेव्हा आपण विकत घेतो सोडे, तेव्हा त्या कोळंब्या ऑलरेडी पाठीचा धागा काढुन वाळविलेल्या असतात ना ??
२) आनि नसेल तर थोडा वेळ पाण्यात भिजवुन आपल्य्ला काढता येत असतील ना. ??

जागू,रेसिपी मस्तच.
तुमच्याकडे अशा अख्ख्या कोलंबीचे सोडे मिळतात? मी नागाववरून घेतले होते तेही एका कोलंबीचे उभे चिरुन दोन तुकडे असलेले सोडे आणले होते.

दक्षिणा +1 . जागू, मला फार आवडतं तुझ्या रेसिपी वाचायला. नॉनव्हेज खात/करत नसले तरीही इथे येते मी.

येप्प! मी पण जागूडी करताच इथे येते. आता कळले की वाळलेल्या कोळंबीला सोडे म्हणतात ते. रेसेपी छान आहे, मत्स्यप्रेमींची पर्वणीच की.

अंकु नाही काळा धागा नाही काढत वाळवताना.
तसे हवे असतील तर आपल्याला स्वतः साफ करून वाळवावे लागतील.

गरम पाण्यात भिजले की साफ करता येतील.

जाई धन्यवाद.
देवकी आमच्याकडे खास मिळत नाहीत. मी अलिबाग वरून आणले होते.

मुरुडला वगैरे चांगले मिळतात.

ऑर्किड, रश्मी खुप खुप धन्यवाद. छान वाटत तुमचे प्रतिसाद वाचून.

Yey!
फायनली जागूची रेस्पी आली. मी पण काही नॉनव्हेज खात नाही पण तुझ्या रेस्पींकर्ता Happy

स्लर्प!
सोडे महागच असतात. सुकट , वाळवलेले बोंबील या मानाने कोलंबी सोलून त्याचे सोडे करणे हे काम तसे कौशल्याचे असते आणि त्यासाठी वापरलेल्या कोलंबीची क्वालीटीही वेगळी असते.

व्वा! बर्याच दिवसांनी जागूतैंची माशाची रेसिपी आली. दिवस धन्य झाला. आता हे पोटात गेलं की अंतरात्मा शांत होईल Happy

मी काही नॉनव्हेज खात नाही पण तुझ्या रेसिप्या अगदी चवीचवीने वाचते.

ही तर खुप दिवसानी लिहिली आहेस. त्यामुळे जास्तच मजा आली वाचताना.

आम्ही सोडे पोह्यात घालतो कधी कधी. नेहमीच्या कांदेपोह्यात, फोडणीत भिजवलेले सोडे घालायचे, बाकी सेमच. जरा कांदा तेलात छान परतला की तिखट मिरची घालायची, कढीपत्ता, बटाटा मस्त शिजली की पोहे परतायचे. वरून ओलं खोबरे व कोठिंबीर.

नाहितर, सेम वरच्यासारखेच कालवण बनवतो पण तांदूळाच्या पिठी एवजी नारळाचे दूध घालायचे.

अंकु त्रास नाही होत. फक्त प्रमाणात खायचे.

योकु, धनि, फेरफटका, असुफ, ममोताई, प्राजक्ता, आर.एम.डी, अभिनव, सस्मित तुम्हा सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद.
स्वाती अगदी बरोबर.

आदिती झिंगा म्हणजेच कोलंबी

देवीका पोहे नाही केले कधी आता तुझ्या रेसिपीने ट्राय करेन.

अरे वा जागू! खूप दिवसांनी रेसिपी टाकलीस.... बाकी सोडे बिडे माहित नाही. मी तुझ्यासाठी डोकावले Happy तुझी रेसिपी आली की माबोवर एक प्रकारचा घरगुती दरवळ असतो.

आम्ही सोडे पोह्यात घालतो कधी कधी.>> +१
आमच्याकडे जावाई मंडळी आली की रविवारी सकाळी नाष्ट्याला सोडे घालून पोहे व्हायचेच.

मी शक्यतो पोयनाडच्या बाजारातुन घेतो. १५००/१६०० रु. किलो. आणी त्याच्या बरोबर जवळा, अंबाडी सुकट, बोंबील, करल्या, वाकट्या तितक्याश्या खास नव्हत्या. माकुल पण मस्त मिळाले होते.

बाकी जागुतैच्या पाककलेबाबत काय बोलणार.

मस्त आहे रेसिपी. कोणतेही ड्राइड फीश वापरून करता येइल का असे कालवण? इथे चायनिज शॉप्समध्ये ड्राइड्/सॉल्टेड फीश मिळतात ते वापरून करून पहायला हवे एकदा.

Pages