स्फुट - इस्त्री

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2018 - 23:51

स्फुट - इस्त्री
========

वय आठ, बाबांना सगळ्या शर्ट पँट्सना इस्त्री करताना मन लावून पाहायचो

वय अठरा, सगळ्या शर्ट पँट्सना मन लावून इस्त्री करायचो

वय अठ्ठावीस, माझे शर्ट्स लाँड्रीत, बाबांचे घरीच, इस्री बाबा करत, मी कामात व्यग्र

एक इस्त्री कामातून गेली, दुसरी घेतली

वय अडतीस, बाबा कधीच निवृत्त, त्यामुळे अधेमधेच इस्त्री करत, माझे कपडे लाँड्रीत

वय अठ्ठेचाळीस, धोबी घरी येतो, कपडे धुवून, इस्त्री करून आणून देतो

बाबा त्यांच्या एखाददोन शर्ट्सना घरीच इस्त्री करतात

तेवढेच हात हलते राहतात म्हणतात

वाईट वाटते, पण मुरलेल्या सवयी म्हणून सोडून देतो

आठ दिवस धोबी आला नाही, तर त्याला चार फोन करतो

इस्त्री नीट चालली नाही, तर बाबा जाऊन इलेक्ट्रिशियनकडून दुरुस्त करून आणतात

मला सांगत नाहीत, नाहीतर मी आग्रह करेन कपडे धोब्याला द्यायचा

अठ्ठेचाळीस वर्षांत, मी सतत बदलत राहिलो

इस्त्री एकदाच बदलली

बाबा एकदाही बदलले नाहीत

भिंतीच्या कपाटात एक इस्त्री

आणि एक माळ्यावर पडलेली जुनी, तीन हप्त्यांत घेतलेली

एक मन रमवणारे बाबा

आणि एक हे सगळे लिहून माझे मन किती विशाल हे दाखवणारा मी

बाबा नाही तर निदान इस्त्री तरी व्हायला शिकले पाहिजे मी! 

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aavadale

Aavadale

जमलंय!

(मला कपड्यांना इस्त्री करायची आहे हे आठवले)