येरे येरे कावळ्या...

Submitted by अतुल ठाकुर on 27 April, 2018 - 01:18

समाजातील काही चालीरितींमध्ये राजकारण कसं असतं आणि त्याचा वापर "पॉवर" साठी कसा करता येतो हे आपल्याकडील मरणाच्या आणि तोरणाच्यादेखील प्रसंगांमध्ये दिसत असते. समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. वैयक्तीक आयुष्यातही दुर्दैवाने काही दु:खद प्रसंगी आपल्याला हजर रहावं लागतं. अशावेळी अगदी मुद्दाम नाही पण काही ठिकाणी लक्ष जातंच आणि काही गोष्टी लक्षातही राहतात. अलिकडेच नात्यात एका वर्षश्राद्धाला जावं लागलं. आजुबाजुच्या बायकांनी जमून जेवण करण्याची पद्धत आमच्याकडे इतिहासजमा झाली आहे. त्यामुळे एक छोटासा टेंपो जेवणाच्या पदार्थांनी भरून आला होता. श्राद्ध विधी झाले होते. आता पान ठेवण्याचा प्रसंग आला.

इमारतीच्या मागे एक टाकी होती त्यावर पान ठेवायला सर्व जण गेले. आलेले बहुतेक तेथे जमा झाले होते. गेलेला माणुस "पिण्याचा" भोक्ता होता. त्यामुळे "तीर्थ" ठेवलं का वगैरेही विनोद झाले. मग पान ठेवून सर्वांनी निरनिराळ्या सूरात "काव काव " ओरडून झाले. आजकाल बिल्डींगच्या अवतीभोवती डिश अँटेना असतात म्हणून की काय पण कावळे जरा कमी दिसू लागलेत. तरीही एक दोन कावळे बाजुच्या नारळाच्या झाडावर उतरले. मंडळींना जोर आला. पण ते कावळे काही केल्या खाली येईनात. मग गेलेल्या माणसाच्या जवळच्या सर्वांनी पाणी शिंपडून झाले. "काव काव" करून झाले. गर्दी आहे म्हणून कावळे खाली येत नाहीत. म्हणून सर्व जण थोडे दूर उभे राहिले. गेलेल्याची काही इच्छा राहिली असणार. जोपर्यंत ती इच्छा आपण पूर्ण करु असा शब्द कुणी देत नाही तोपर्यंत कावळा अन्नाला शिवणार नाही अशी एक समजूत आहे. आणि कावळा जोपर्यंत अन्नाला शिवत नाही तोपर्यंत आलेल्यांनी जेवायचं नाही ही एक पद्धत आहे.

कावळा काही खाली येईना. मग नेहेमीची क्लृप्ती लढवण्याचा प्रसंग उभा राहीला. ती अशी की "गेलेला माणुस अतिशय समंजस होता. तुम्ही जेवल्याशिवाय काही तो अन्नाला शिवणार नाही. त्यामुळे आपण जेवून घेऊ". अशी "मांडवळी" करावीच लागते. आणि ती करण्याची वेळ येथेही येऊ लागली होती. पण तेथे बहुधा नेहेमीच्या तीर्थप्रशनाच्या बैठकीतला मित्र होता तो पुढे झाला. त्याने साधारणपणे शिवाजीपार्कला प्रचंड गर्दीला संबोधताना नेतेमंडळी जो आवाज "लावतात" तसा आवाज लावला. आणि एकदा गेलेल्याच्या भावाकडे आणि सर्वांकडे पाहून तो बोलु लागला. "अहो तुम्ही म्हणा आता की मी तुझ्या मुलीचं, मुलाचं कार्य यथासांग करीन. त्यांचं लग्न लावून देईन. आम्हीही काही कमी पडून देणार नाही. पण तुम्ही आता हे म्हणायला पाहिजे. बोला मी त्यांचं सारं काही करीन."

भाऊ काहीच बोलेना आणि याचा धबधबा थांबेना. अशावेळी बहुतेक माणसे बेरकीपणाने जो गरीब बिच्चारा असतो, ज्याच्यावर हा मारा होत असतो त्याच्याकडे पाहात असतात. त्याला काय बोलावे हे सुचत नव्हते. शेवटी तो कसानुसा म्हणाला हे सर्व मी मनात बोललोय. पण समोरच्याचे सुरुच होते. शेवटी एकदाचा कावळा उतरला. तो अन्नाला शिवला आणि मंडळी जेवायला निघाली. मात्र निघताना भाऊ काहीही बोलला नाही यावर कुजबुज सुरु होती. बोलला असता तर काय झालं असतं? ही एक पद्धत असते असेही काहीजण म्हणत होते. हा असं बोलणार्‍यातला नाही असा दोष देणारेही निघाले.

माझ्या मते जर आपण जे बोलणार आहोत ते करण्याची आपली ऐपत नसेत तर पद्धत म्हणून देखील माणसाने बोलु नये. तो खोटेपणा आहे. आणि ज्या भावाबद्दल हे बोलणे सुरु होते त्याची खरोखरच तशी ऐपत आहे असे मला वाटत नव्हते. त्यामुळे त्याने जर तोंड उघडले नाही तर त्याला निदान मी तरी दोष देऊ शकलो नाही.

अर्थात यातील अंधश्रद्धा वगैरे मी येथे विचारात घेतली नाही. समाजमनाचा अभ्यास करताना काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. तरच त्यामागील जास्तीचा अर्थ लक्षात येत असतो. शेवटी काय तर श्राद्ध झाले. ब्राह्मणाला दक्षिणा मिळाली. जेवणारे जेऊन गेले. कावळ्यानेही अन्न शिवले. आणि गरज नसताना एक माणुस उगाचच बदनाम झाला.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते जर आपण जे बोलणार आहोत ते करण्याची आपली ऐपत नसेत तर पद्धत म्हणून देखील माणसाने बोलु नये. तो खोटेपणा आहे. आणि ज्या भावाबद्दल हे बोलणे सुरु होते त्याची खरोखरच तशी ऐपत आहे असे मला वाटत नव्हते. त्यामुळे त्याने जर तोंड उघडले नाही तर त्याला निदान मी तरी दोष देऊ शकलो नाही.

आणि गरज नसताना एक माणुस उगाचच बदनाम झाला.

>> पटलं.