थांब...

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 25 April, 2018 - 01:47

थांब...
स्टोव्हवरच दूध थोडं उतू जाऊ दे,
दारात हाक मारणाऱ्या भाजीवाल्याला थोडं थांबू दे,
थांब एक क्षण.
आणि स्वतःकडे आरशात पहा
तू तीच आहेस का जे बनण्याची तू स्वप्नं पाहिली होतीस?
जर उत्तर नाही असेल तर आत्ताच कामाला लाग
स्वतःला तसं बनवण्यासाठी...

थांब...
धुतलेले कपडे मशिनमध्ये तसेच राहू देत,
किचनमधल्या भाड्यांना तुझी थोडी वाट पाहू दे,
तुझ्या चिमुकल्याला त्याच्या पप्पांशीही थोडं खेळू दे,
गरमागरम चहाचा एक घोट घे, त्याचा सुगंध आणि उब जाणवू दे तुला,
थांब एक क्षण.
आणि विचार कर
तू तीच आहेस का जे बनण्याची तू स्वप्नं पाहिली होतीस?
जर उत्तर नाही असेल तर आत्ताच कामाला लाग
स्वतःला तसं बनवण्यासाठी...

थांब....
तुझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या चर्चा तुझ्या डोक्यावरून राॅकेट बनून उडाल्या तरी हरकत नाही,
त्या fastest टार्गेट अचिव्हर च्या बिरुदाला जरा वाट पाहू दे,
मार ऑफिसबाहेरच्या हिरवळीवर एक फेरफटका, ती नुसती खिडकीतून बघण्यासाठी थोडीच आहे?
आणि तुलाच आश्चर्य वाटेल
पण
तू तीच आहेस का जे बनण्याची तू स्वप्नं पाहिली होतीस?
जर उत्तर नाही असेल तर आत्ताच कामाला लाग
स्वतःला तसं बनवण्यासाठी...

थांब....
बनवू दे तुझ्या शेजारणीने तुझ्यापेक्षा उत्तम पदार्थ,
असुदे त्यांच्या मुलांवर त्यांचा अधिक चांगला कंट्रोल, तुझ्या मुलांवर तुझा आहे त्यापेक्षा;
ती तुलना नकोच करू,
तुझ्याकडे जे आहे ते बघ.

धाव तुझ्या स्वप्नांमागे,
काढ अडगळीत पडलेली ती सितार,
ती रद्दीत जायला आलेली तुझी चित्रांची वही,
तो ढीगभर साड्यांखाली असलेला तुझा आवडता स्कार्फ,
तो कधीकाळी उघडलेला पुस्तकांचा खण,
ती कव्हरवर धूळ साठलेली तुझी लिखाणाची वही,
त्यात भेटशील तूच तुला
तशी बनायचा प्रयत्न करणारी,
ज्याची तू स्वप्न पहिली होतीस....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे! छे! दुध उतु जाउ दिलं तर पुसणार कोण? तीच.
भाजीवाला काय वाट बघायचा नाही. तंगडतोड करुन मार्केटात जावं लागेल. तिलाच.
तर मग असले काही बनण्याच्या स्वप्नांचे विचार अशा अवघड वेळी करु नये.
निवांत क्षणी करावा. Happy

जमलंय लेखन. Happy

छान लिहिलंय.
ही कविता / मुक्तक womens day ला न येता एरवी आलं त्यामुळे बर वाटलं.
नाहीतर वूमेन्स डे ला भरमसाठ पूर येतो आणि डे संपला की ओसरतो.