दिवसातून छप्पन वेळा

Submitted by अनन्त्_यात्री on 24 April, 2018 - 12:41

दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
आरश्या पाठचा अचपळ पारा
माझ्या नसात दौडत असतो

दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
टेक्नोमंद जेव्हा ठरतो
मीच मला डफ्फर वाटतो

कोsहं प्रश्न पडतो तेव्हा
मुमुक्षू मी दिसतो खास
टपरीवरचा चहा पिताना
मीच टपोरी टाईमपास

अचाट काही जेव्हा बघतो
अफाट काही जेव्हा ऐकतो
अद्भुताची चाहूल लागून
अवघा चेहेरा कुतूहल बनतो

जुनी गाणी, जुने छंद,
वार्‍यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा

लोलक तोच, तिरीप नवी
जुनीच कविता, नवा कवी
अनंतरंगी अनवट खेळ
आकळण्याची आली वेळ

Group content visibility: 
Use group defaults

नवीन कविता नवा कवि Happy

अशाच नवनवीन, सुंदर, विविध विषयांवरील कवितांच्या प्रतिक्षेत.....

जुनी गाणी, जुने छंद,
वार्‍यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा...कसली जिवंत हालचाल आहे शब्दांत !